सुंदर तरूणीचा पाठलाग करायचा म्हणून गोमु उत्साहीत झाला होता.
माझे कपडे त्याला फारसे चांगले वाटेनात.
मग त्याने अन्वय पाटीलकडून नवे शर्ट आणि एक कोटही घेतला.
अन्वय अमेरीकेहून परत आला होता.
शाळेपासूनच त्याला गोमुबद्दल सॉफ्ट कॉर्नर.
कपडे तर दिलेच वर थोडे पैसेही दिले पण मला म्हणाला, “जरा लक्ष ठेव त्याच्यावर. उतावळा असतो प्रत्येक काम यशस्वी करायला.”
दुसऱ्या दिवशी झकपक कपडे घालून गोमु हीनल देसाईच्या पाठलागावर निघाला.
पूर्वीचा पाठलागाचा अनुभव त्याच्या कामी नाही आला कारण त्या एका दिवसांत हीनल तीन चार घरांमध्ये गेली.
पण कशासाठी गेली, ते कळलं नाही.
गोमुने तर्क लढवला की ती सेल्स गर्ल असावी.
प्रत्येक ठिकाणी गोमुला बाहेर वेळ काढावा लागे.
त्याचं जेवणही चुकलं.
दुपारनंतर ती एका मोठ्या हॉटेलात शिरली.
गोमुही त्या हॉटेलच्या रेस्टॉरंटमधे गेला.
त्या महागड्या हॉटेलमधे फक्त सँडविच खाण्यासाठी अन्वयने दिलेल्यांतले अर्धे पैसे संपले.
त्याने चहाही मागवला नाही.
हीनल कुठे नाहीशी झाली तेही त्याला कळलं नाही.
शेवटी तो रात्री नऊपर्यंत हॉटेलसमोर उभा राहून परतला.
येतांना वाटेत त्याला डॉक्टर गुपचुपेंचा फोन आला.
त्याने रिपोर्टींग केल्यावर त्यांनी त्यालाच दम भरला, “असा कसा पाठलाग करतां ? क्षणभरही तिला नजरेआड होऊ देऊ नका. उद्या नीट काम करा.”
▪
दुसऱ्या दिवशी गोचिड जशी कुत्र्याच्या पाठीला चिकटते तसं हीनलच्या मागावर रहायचं गोमुने ठरवलं.
आदल्या दिवशीप्रमाणेच तीन चार घरी फिरून दुपारी हीनल पुन्हां त्याच हॉटेलात शिरली.
आदल्या दिवशीसारखा बाहेरच उभा न रहातां, गोमु तडक तिच्या मागोमाग आंत शिरला.
तिने रिसेप्शनकडून चावी घेतली व ती लिफ्टमध्ये शिरली.
गोमु हिंमतीने त्याच लिफ्टमध्ये शिरला.
लिफ्टच्या आरशात तो तिला पहात होता.
ती किती छान आणि निरागस दिसत्येय, हा सहज मनांत आलेला विचार त्याने चुकीचा लिहिलेला शब्द खोडरबराने घाईघाईने खोडतात तसा खोडला.
आपले गुप्तहेराचे कर्तव्य तो विसरला नाही.
हीनल चौथ्या मजल्यावर उतरली तसा तोही तिच्यामागून चपळाइने लिफ्टच्या बाहेर आला आणि तिच्या मागे जाऊ लागला.
तिच्या मागोमाग जाऊन ती कोणत्या खोलींत जाते, ते त्याला पहायचं होतं.
ती अचानक एका रूमसमोर थांबली.
गोमु तोपर्यंत तिच्यापासून हातभर अंतरावर होता.
तिने रूमचे दारं उघडले, तेव्हां तो बरोबर तिच्या मागेच होता.
▪
रूम उघडून ती अचानक वळली आणि तिने गोमुचा हात धरला. “आंत या, ना !” असे म्हणत तिने गोमुला रूममध्ये ओढला.
भांबावलेल्या गोमुने कांहीच विरोध केला नाही. “मी आवडले कां तुम्हांला ? कालपासून माझ्या मागे मागे आहांत. मी पाह्यलेय. मग आतां कां लाजतां ?”
गोमुला कांहीच उत्तर सुचेना.
तो “नाही, तसं नाही…” असं जेमतेम म्हणाला.
तिच्या हातातून आपला हात सोडवून घेण्याचा त्याने दुबळा प्रयत्न केला.
अशा सुंदर मुलीबरोबर त्याला झटापट करायची नव्हती.
पण तो तिला कांही सांगूही शकत नव्हता कारण डॉक्टर गुपचुपेंनी खरं सांगायला मनाई केली होती.
हीनल त्याच्याशी जवळीक साधण्याची, त्याच्याशी प्रेमालाप करण्याचा प्रयत्न करू लागली.
मात्र गोमु तिच्या भुलवण्याला बळी पडला नाही.
तो दाराकडे गेला व लॅच उघडून त्याने बाहेर जाण्यासाठी दार उघडले.
दाराबाहेर दोन आडदांड गुंड दार अडवून उभे होते.
त्यांनी त्याला परत आत ढकलले.
▪
गोमुच्या मागे ते दोघेही आत आले.
एकाच्या हातांत आतां पिस्तुल होतं आणि त्याने ते गोमुवर रोखलं होत.
दुसऱ्याने त्याला हीनलकडे ढकललं.
हीनल आणि गोमु एकत्रच त्या रुममधील डबलबेडवर आदळले.
प्रतिक्षिप्त क्रिया की मुद्दाम हे गोमुला कळलं नाही पण पडतांना हीनलने त्याला घट्ट धरलं.
तेवढ्यांत ‘क्लीक’ असा आवाज आला.
त्या दुसऱ्या गुंडाने गोमुचा हीनलच्या मिठीत असलेला फोटो काढला.
गोमु तिला बाजूला ढकलून उठायचा प्रयत्न करू लागला, तेव्हां पिस्तुल हातात असलेला गुंड गरजला, “चुपचाप हम बोलेंगे वो करो, नही तो खोपडीमे गोली डालूंगा, क्या ? समझा ?”
पुढली पंधरा मिनिटं गोमु हिप्नॉटाईज झाल्यासारखा त्यांच ऐकत होता.
त्यांच्या सांगण्यावरून शर्ट बनियन काढून ठेवला.
तोपर्यंत हीनलनेही थोडे कपडे कमी केले होते.
हीनल सांगेल तसा गोमु तिचा हात हातात घेऊन किंवा कमरेभोवती हात घालून बसला व त्यांचे असे पंधरा-वीस फोटो काढले गेले.
मग गोमुचा बनियन, शर्ट त्याला परत दिला आणि त्याला बाहेर काढण्यात आले.
पिस्तुलवाला गुंड बसस्टॉपपर्यंत त्याच्याबरोबर आला आणि बसमध्ये बसवुन गेला.
▪
गोमु भेदरला होता.
गोमुला दरदरून घाम सुटला.
“तिकीट, तिकीट” ह्या कंडक्टरच्या बोलण्याकडेही त्याचं लक्ष नव्हतं.
आपल्याला कुठे जायचयं ते ठिकाणही त्याला आठवेना.
शेवटी बसच्या शेवटच्या स्टॉपचं तिकीट घेऊन तो बसला.
अर्थातच तो सीबीडीलाच पोहोचला.
बसमधून उतरला आणि सरळ माझ्या रूमवर आला.
पाण्याचे तीन ग्लास पोटात रिचवले.
मग तो बोलू लागला, “पक्या, काय भयानक प्रसंग रे !” त्याने झालेली सर्व हकीकत मला सांगितली.
माझा गोमुवर पूर्ण विश्वास होता.
त्यामुळे मला त्याच्या खरेपणाविषयी शंका आली नाही.
इतर कोणी त्याच्यावर विश्वास ठेवलाच नसता.
मी म्हणालो, “पण असं करण्यांत काय हेतु असेल त्यांचा ?”
गोमु म्हणाला, “पक्या, मलाही ते कळत नाही. पण त्यांचा उद्देश चांगला नसणार हे तर नक्कीच. काय करू ?”
मला डॉक्टर गुपचुपेंची आठवण झाली.
“अरे, तू आजचं रिपोर्टींग केलसं कां ?” मी विचारलं.
“हे सगळं कसं सांगू रिपोर्टींगमध्ये ?” गोमु म्हणाला.
पण मग शेवटी त्याने फोन केला.
पण डॉक्टर गुपचुपेनी कांही फोन उचलला नाही.
त्या दिवशीचं रिपोर्टींग मागायला त्यांचाही फोन आला नाही.
▪
दुसऱ्या दिवशी अकरा वाजतां गोमु रस्त्यांतून जात असतांना कुणीतरी त्याच्या हातांत एक एन्व्हलप कोंबलं आणि तो इसम पळाला.
गोमु त्याचा चेहराही पाहू शकला नाही.
गोमुने ते पाकीट थरथरत्या हाताने उघडलं.
आंत त्याचे आणि हीनलचे अर्धवस्त्रावृत फोटो होते.
त्या फोटोंवरून असं वाटत होतं की गोमुने हीनलवर बळजबरी करायचा प्रयत्न केला असावा.
खरी परीस्थिती उलट होती तरीही.
फोटो पाहून होतात न होतात तोंच त्याला फोन आला, “छान आहेत ना आपले फोटो ? आवडले ?” हीनल बोलत होती.
“आतां त्याची फी म्हणून फक्त एक लाख रूपये रोख मी सांगेन तिथे पोहोंचते करा. दोन दिवसांची मुदत आहे तुम्हांला. पैसे जमा करून ठेवा आणि फोनची वाट पहा. पोलिसांकडे वळलात तर हे फोटोच आधी माझ्या तक्रारीसह त्यांच्याकडे पोंहोचलेले असतील.”
संध्याकाळी गोमु माझ्या रूमवर आला आणि मला त्याने हे सांगितलं.
असं कांहीतरी होणार, हे नक्कीच होतं.
पण आतां ते समोर आलं होतं.
डॉक्टर गुपचुपेंना पुन्हा पुन्हां फोन करायचा प्रयत्न केला.
पण नुसती रिंग वाजत होती.
▪
दुसऱ्या दिवशी मी ऑफीस बंक केलं.
गोमु आणि मी परत त्या वाशीच्या डॉक्टर गुपचुपेंच्या आॕफीसांत गेलो.
त्यांना डायरेक्टचं सांगायच ठरवून आम्ही तिथे गेलो.
डीटेक्टीव्ह गुपचुपेंच्या ऑफीसला मोठ जुनाट टाळं होतं.
ऑफीसवर पाटी मात्र होती.
तीच पूर्वी पाहिलेली.
शेजारच्या वकीलांच्या ऑफीसात चौकशी करायचं ठरवून आम्ही दोघानी त्या आॕफीसात प्रवेश केला.
वकीलांच्या पाटीवरचं नाव आम्ही पाह्यलं तेव्हा आम्ही आत पाऊल ठेवलं होतं.
आम्ही चकीत झालो होतो कारण वकीलांच नांव होतं ॲडव्होकेट गुपचुपे.
आम्हाला समोरचं एका टेबलापाशी वकीलाचा काळा कोट घालून बसलेले ॲडव्होकेट गुपचुपे दिसले.
मी जरा घुश्शांतच होतो.
पण गोमुला त्यांना पाहून बरं वाटलं होतं.
तो पुढे होत म्हणाला “डॉक्टर साहेब, ती मुलगी लबाड निघाली हो.”
“डॉक्टरांशी बोलायचं असेल तर त्या ऑफीसात. इथे नाही. इथे फक्त ॲडव्होकेट गुपचुपेंशी बोलू शकता. कांही लीगल सल्ला हवाय कां ?” ॲडव्होकेटनी न्यायमूर्ती कोर्टांत त्यांना जशी समज देत असावेत त्या शब्दांत आम्हांला समज दिली.
▪
मला वाटले, यांना वकील म्हणून सल्ला विचारायला हरकत नसावी. किंबहुना अशा ब्लॅकमेलच्या केसमध्ये वकिली सल्ला महत्त्वाचा होता.
मी गोमुपाशी तसं पुटपुटलो.
गोमुने प्रश्न विचारायला सुरूवात करतातच ते म्हणाले, “माझी एका वेळेची फी आहे, दहा हजार रूपये. तुम्हाला म्हणून पांच हजार घेईन.”
आम्हा दोघांकडे मिळून तीन हजार रूपये होते, त्यावेळी तेवढे त्यांना दिले व बाकीचे नंतर द्यायचे कबूल केले.
मग गोमुने आपल्याला कसं फसवण्यांत आलं आहे, ते त्यांना सांगितलं.
ॲडव्होकेट गुपचुपे म्हणाले, “तुम्ही सांगतां हे खरं कशावरून ? मी तुमची केस घेईन पण आधीच सांगतो की कोर्ट ह्या बाबतींत स्त्रियांचीच बाजू घेतं.”
मी विचारलं, “मग पोलिसांत तक्रार द्यायची नाही कां ?”
ते म्हणाले, “न दिलेलीच बरी. त्या पेक्षा साठ-सत्तर हजार देऊन कॉम्प्रोमाईज करा, असा सल्ला मी देईन.”
असं म्हणून त्यांनी तुम्हाला दिलेली वेळ संपली असे सांगितले व ते उठले.
▪
आम्ही बाहेर येतो न येतो तोंच गोमुचा फोन वाजला.
आता फोनवर हीनल ऐवजी त्या दोन गुंडांपैकी एकाचा आवाज होता. “क्यों बे ! पैसा कब दे रहा है. देख, आज लास्ट वॉर्निंग देता हूं. कल सुबह फोन करूंगा और पैसा लेनेको कौन किधर आयेगा यह बतायेंगे. और चालाखी मत करना. हमारे आदमी तुम्हारे पीछे है. अभी तू वाशीमे है ना !”
गोमु म्हणाला, “पक्या पूर्ण तावडींत सांपडलो रे यांच्या. आता काय करू ?”
मी म्हटलं, “हे बघ, ते लोक पोलिसांत जाण्याची नुसती धमकी देताहेत.
जातील असं मला कांही वाटत नाही.
कारण पोलिस सत्त्य शोधून काढतील, ही भीती त्यांना वाटतच असणार.
तेव्हा आपणच प्रथम पोलिसांकडे जाऊया.”
पण गोमुला ते कांही पटेना.
तो हताश झाला होता.
इतक्यांत त्याचे लक्ष तिथल्या ज्योतिषाचार्याच्या पाटीकडे गेलं.
तिथे लिहिलं होतं “ज्योतिषाच्या आधारे खाजगी प्रश्नांवर अचूक सल्ला.”
ज्योतिषाचार्य मार्कंडेय मौर्य.
गोमु म्हणाला, “पक्या, आता हाच एक मार्ग राहिलाय.”
मी ‘नको, नको’ म्हणत असतांना माझ्या दंडाला धरून त्याने मला त्या ऑफीसमध्ये नेलंच.
आम्ही दारांतूनच आंत डोकावलो.
आमचा दोघांचाही क्षणभर विश्वासच बसला नाही.
आंत पगडी घालून डॉक्टर गुपचुपे उर्फ ॲडव्होकेट गुपचुपे उर्फ मार्कंडेय मौर्य ध्यान लावून बसले होते.
आम्ही दोघांनीही क्षणभर एकमेकांकडे पाहिलं आणि मार्कंडेयानी आम्हाला पहायच्या आधीच आम्ही तिथून धूम पळालो ते सरळ बसमध्ये.
▪
एवढे सर्व झाल्यावर गोमुला माझा सल्ला पटला.
परंतु आम्ही पोलिस स्टेशनवर न जातां, डीसकाउंटेड फोनच्या बाबतींत आम्हाला मदत करणाऱ्या साहेबांच्या घरी गेलो.
त्यांनी गोमुचे सर्व बोलणे बारकाईने ऐकून घेतले.
ते म्हणाले, “उद्या क्राईम ब्रँचच्या ऑफीसात या.
अशा पध्दतीने ब्लॅकमेलींग करणाऱ्या काही छोट्या टोळ्या असतात.
त्यांची मोडस ऑपरेंडी तीच रहाते.
सेल्सगर्ल म्हणून काम करतांनाही ती घरांची पहाणी करत असेल.
तुम्हाला कांही फोटो दाखविण्यांत येतील.
तुम्हाला भेटलेली हीनल किंवा ते गुंड त्यांत मिळतात कां ते पाहू.”
“त्यांचा उद्या सकाळीच फोन येणार, त्याचं काय ?” गोमुने विचारलं.
“आणखी वेळ मागून घ्या. नाही तर फोन स्वीच ऑफ ठेवा. त्यांतून ते गेलेच पोलिस स्टेशनला तर मी आहे ना !” साहेबांनी धीर दिला.
दुसऱ्या दिवशी फोनवर गोमुने आणखी एक दिवस मागितला आणि तो मान्य झाला.
क्राईम ब्रँचला अद्यावत थिएटरमध्ये पडद्यावर आम्हाला फोटो दाखवू लागले.
प्रथम मुलींचे फोटो पाहून झाले पण गोमुला हीनल दिसली नाही.
पुरूष गुन्हेगारांच्या फोटोतही फोटो संपत आले, तरी त्या गुंडांचा पत्ता नव्हता.
शेवटचे दोन फोटो राहिले असतांनाच एक महाकाय माणसाचा फोटो समोर आला.
“सर, हेच ते चंद्रगुप्त गुपचुपे अथवा ॲडव्होकेट गुपचुपे उर्फ मार्कंडेय मौर्य.” गोमु ओरडला. मी दुजोरा दिला.
साहेब म्हणाले, “हा आतापर्यंत दोनदा जेलमध्ये गेलेला फरार गुन्हेगार आहे. शिवाय आणखी गुन्ह्यांतही हवा आहे. डॉक्टर वगैरे कांही नाही. पक्का चारसोबीस आहे. बाकीचे त्याने धंद्यात नव्याने ओढलेले असावेत. गोमाजीशेठ प्रत्येक वेळी तुम्ही आम्हाला महत्त्वाच्या आरोपीला पकडून द्यायचं काम करतां. तुम्ही कुठल्याही खाजगी गुप्तहेराहून कमी नाही.”
संध्याकाळच्या आंत साहेबांनी सर्व गुन्हेगारांना पोलिस कस्टडीत घेतले होते.
दुसऱ्या दिवशी पेपरांत क्राईम रिपोर्टरने छोटी बातमी दिली होती, “ब्लॅक मेलिंगचे रॅकेट नवी मुंबई पोलिसांनी उध्वस्त केले”.
— अरविंद खानोलकर.
Leave a Reply