उत्तर सिक्किम मधील भारत चीन सीमेवरील १४००० फुटावरील थांगु खेड्यातील एका छोट्या हॉटेल मधील लाकडी गोलाकार फळीवर गरम पाव मुरंबा, नुडल्स कॉफी असा दमदार नाश्ता. मध्यात उब आणण्यासाठी शेकोटीची जागा.वातावरणातील निरागस शांतता.
पुढचा टप्पा होता १७८०० फूट उंचीवरील गुरडोगमार लेक. देवावर भरवसा ठेवत प्रवास सुरु झाला. खडबडीत पठार. त्या मधून गाडी ज्या मार्गे जाईल तो रस्ता.वाटेत भारतीय सेनेचे तेलाचे डेपो, ट्रक्स, चिलखती गाड्या, भुई सुरंग पेरलेले सपाट जमिनीचे विभाग, सर्व बाजुनी भुरकट तांबट पठाराचा भाग व क्षितीजापर्यंत पसरलेल्या हिमाच्छादित डोंगररांगा. वाटेत चिखल व पाणथळी असा २० कीमी प्रवास. एक विलक्षण अनुभव घेत गायगाव येथील सैन्य छावणीत पोहचताच जवानांनी कुंकुमतिलक लावत आमचे स्वागत केले. गरम सूप ,कॉफी तर दिलीच, शिवाय चीन सरहद्दीवरील या शेवटच्या छावणीला भेट दिल्याबद्दल प्रशस्तीपत्र देण्यात आले. होळीचा दिवस, आम्ही बेसन लाडू दिल्याने ते खुश झाले. आम्हाला मानसिक धीर देत पुढे लेक पर्यंत आरामात जाण्याचा सल्ला दिला.
पुढील २० किमी. प्रवास आमची सर्वांची अळी मिळी गुप् चिळी, गाडीच्या काचा बंद, वर शुभ्र निळे आकाश, दुरवर दिसणारा मिनि कैलास बर्फाचा डोंगर पायथ्याशी खुरटे गवत चरणारे,काळे, कबर्या रंगाचे याक, प्रवासात आमची एकमेव गाडी, वातावरणातील भन्नाट सन्नाटा, १७८०० फूट उंचीचा दगड दिसला, गाडीने वळण घेतले आणि समोर बर्फाचा पसरलेला समुद्र व त्याच्या मध्यात चिंचोळा स्वच्छ निळ्या पाण्याचा ओहोळ, भ्रर दुपारच्या १ वाजताच्या उन्हात चकाकत होता. त्या पाण्यापर्यंत पोहचण्यास बर्फाच्या पायऱ्या.
गाडीतून बाहेर उतरलो मात्र, प्रचंड घोंगावत येणारे गार वारे, हवेतील ऑक्सीजनची विरळता यामुळे हालचाली मंदावल्या होत्या. मुंगीच्या पावलाने लेकच्या काठावर येऊन ध्यानस्थ पणे १० मिनिटे उभा होतो.मनाला मिळालेल्या अविस्मरणीय शांतीच्या वलयात पूर्णपणे डुबून गेलो होतो. गोठलेल्या बर्फात हे पाणी कसे राहते, हा निसर्ग चमत्कारच. तिबेटीयन गुरु पदमसंभवांची ही कृपा आहे. हे पाणी प्राशन केल्याने निपुत्रीकांना मुले होतात म्हणून अनेक भाविक भेट देतात. आमचा ड्रायव्हर उड्या मारत थेट पाण्यापर्यंत पोहचलेला, बाटल्या पाण्यानी भरत होता.
— डॉ. अविनाश केशव वैद्य
Leave a Reply