भारतीय संस्कृती जगातील इतर संस्कृतींच्या तुलनेत अधिक प्रगल्भ आणि आधुनिक जगाला मार्गदर्शन करण्याची क्षमता ठेवणारी आहे. भारतीय संस्कृतीतील अनेक परंपरांचे आजही अनुकरण केले जात आहे. गुरू परंपरा ही देखील त्यातीलच एक. जगाला गुरू पुरंपरेची देणगी भारतानेच दिलीय. आम्हा भारतीयांच्या मनात गुरूबद्दल अपार श्रद्धा आणि आदराची भावना सदोदीत राहत आलेली आहे. अर्थात गुरूंकडुन मिळणाऱ्या ज्ञानाच्या बळावर शिष्य संसारातील अनेक अडथळ्यांवर मात करत असतो. जीवनाची खडतर वाट सुकर करत असतो. त्यामुळेच ‘तस्मै श्री गुरवे नम:’ असं आपण म्हणतो. आई हा सर्वांच्या जीवनातील पहिला गुरू. संस्कारांचे शिंपण करत आई मुलाला घडवत जाते. आयुष्यातील खडतर वाटेवर चालण्याचे बळ आईच देत असते. नंतर शालेय जीवनात प्रवेश करतेवेळी शिक्षक भेटतात. जीवनाला सर्वांगसुंदर आकार देण्याचे कार्य हे शिक्षक करतात. गुरू या शब्दाचा नेमका अर्थ, त्याची व्युत्पत्ती, तिला असलेले वेगवेगळे आधार यांच्याविषयी आपल्याला माहिती असतेच असं नाही. गुरू अज्ञान तिमिरातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे नेत असतो. जो निखळ सत्याची जाणीव करून देतो तो गुरू. शिक्षण क्षेत्र, क्रीडा क्षेत्र, संगीत, नाटय़, वैद्यक, न्यायशास्त्र, अध्यापन, राजनीती, अध्यात्म अशा जीवनाच्या विविध क्षेत्रांत ही गुरूपरंपरा दिसते. जीवनातील संस्कार, वर्णाश्रम, शिक्षणव्यवस्था, दैनंदिन व्यवहार, आचार, थोडक्यात समाजव्यवस्था उत्तम चालण्यासाठी मनुष्याला आवश्यक असलेले ज्ञान देणारा माणूस म्हणजे गुरू.
गुरू – परमगुरू – परात्परगुरू – परमेष्ठी गुरू अशी ही परंपरा आहे. योग आणि तंत्रात शिवपार्वती आद्यगुरू आहेत तर संन्यास मार्गात सनत, सनंदन, सनत्कुमार, सनातन हे गुरू आहेत. पण या सर्वाचे आद्य म्हणजेच व्यास महर्षी.
व्यास, शुक, जैमिनी, सुत.. ही अशी व्यास गुरुपरंपरा.
महाराष्ट्रातील वारकरी संप्रदाय, निर्गुण संप्रदाय, दत्त संप्रदाय, नाथसंप्रदाय यात गुरू हा सर्वश्रेष्ठ आहे.
आपण कोणाचे तरी शिष्य आहोत, या भावनेत एक कृतज्ञता वाटते. भारतीय गुरुपरंपरेत गुरु-शिष्यांच्या जोड्या प्रसिद्ध आहेत. जनक-याज्ञवल्क्य, शुक्राचार्य-जनक, कृष्ण, सुदामा-सांदिपनी, विश्वामित्र-राम, लक्ष्मण, परशुराम-कर्ण, द्रोणाचार्य-अर्जुन अशी गुरु-शिष्य परंपरा आहे. मात्र एकलव्याची गुरुनिष्ठा पाहिली की, सर्वांचेच मस्तक नम्र झाल्याशिवाय राहत नाही.
भगवान श्रीकृष्णांनी गुरूच्या घरी लाकडे वाहिली. संत ज्ञानेश्वरांनी वडीलबंधू निवृत्तीनाथ यांनाच आपले गुरु मानले, तर संत नामदेव साक्षात विठ्ठलाशी भाष्य करीत असत. त्या नामदेवांचे गुरु होते विसोबा खेचर. गुरुपौर्णिमा ही सद्गुरूंची पौर्णिमा मानली जाते. पौर्णिमा म्हणजे प्रकाश. गुरु शिष्याला ज्ञान देतात. तो ज्ञानाचा प्रकाश आपल्यापर्यंत पोहोचावा, म्हणून गुरूची प्रार्थना करावयाची, तो हा दिवस होय. गुरु म्हणजे ज्ञानाचा सागर आहे. जलाशयात पाणी विपुल आहे, परंतु घटाने-घागरीने आपली मान खाली केल्याशिवाय, विनम्र झाल्याशिवाय पाणी मिळू शकत नाही. त्याप्रमाणे गुरूजवळ शिष्याने नम्र झाल्याविना त्याला ज्ञान प्राप्त होणार नाही, हेच खरे तर लक्षात ठेवले पाहिजे.
वेगळ्या अर्थाने विश्वाचा विचार केल्यास आपल्या अवतीभोवती देखील विविध गुरू वेगवेगळ्या स्वरुपात आहेतच. जसे सूर्य प्रकाशाचा तेजपुंज, आपल्याला प्रकाशाचे गुरूतत्त्व सांगत असतो. चंद्र शितलतेच गुरूतत्त्व देत असतो. पृथ्वीकडुन सहनशीलतेच गुरूतत्त्व आपण घेऊ शकतो. आकाशाकडुन विशालतत्त्व आपल्या भेटीला येत असते. पाण्याकडुन निर्मलतेच गुरूतत्त्व प्राप्त होत असते. आपल्या अवती-भोवती असलेल्या या गुरू रुपांना-तत्त्वांना आजच्या दिवशी वंदन करू या.
– दिनेश दीक्षित
Leave a Reply