स्वतंत्र भारताच्या इतिहासात आध्यात्मिक क्षेत्रात बहुधा सगळ्यात जास्त प्रसिद्धी मिळालेले आणि प्रभाव गाजविलेले व्यक्तिमत्व सत्यसाईबाबा यांचे पूर्ण नाव सत्यनारायण राजू होते. त्यांचा जन्म २३ नोव्हेंबर १९२६ रोजी झाला. वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी, १९४० मध्ये त्यांनी आपण शिर्डीच्या साईबाबांचे अवतार असल्याचे जाहीर केले. त्यानंतर ते भारतातील बहुधा सगळ्यात प्रसिद्ध आणि प्रभावशाली आध्यात्मिक गुरु बनले. प्रथम त्यांच्याभोवती हवेतून विभूती अथवा शंकराची पिंड काढून देणारे बाबा म्हणून काहीसे संशयाचे अथवा विस्मयाचे वातावरण होते. परंतु त्यानंतर त्यांनी स्थापन केलेली सेवाकार्ये, शिक्षण, आरोग्य, ग्रामसुधार आदी क्षेत्रांमधील कामांमुळे तसेच मोठमोठय़ा दानांमुळे त्यांचे नाव सर्वत्र झाले. आपण शिर्डीच्या श्रीसाईबाबांचे अवतार आहोत, असे जाहीर केलेल्या सत्यसाईबाबांचे अनुयायी अक्षरश: जगभर पसरले होते.
भारतातील राजकीय, आर्थिक आणि इतर अनेक क्षेत्रात त्यांचे अनेक उच्चपदस्थ अनुयायी मोठ्या संख्येने होते. राष्ट्रपती, पंतप्रधान, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती, झगमगते सितारे, सेलिब्रेटींचे सेलिब्रेटी मानले गेलेले क्रिकेटचे परमेश्वर अशा असंख्य लोकांचा समावेश सत्यसाईबाबांच्या भक्तगणांत होते. सत्यसाईबाबांची बहुतांश सेवाकार्ये आंध्र प्रदेशात आहेत. आंध्रप्रदेशात पुट्टपर्थी या गावी सत्य साईबाबांचा आश्रम आहे. त्यांची संपत्ती ४० हजार कोटी ते तब्बल १ लाख कोटी रुपयांच्या घरात असल्याचे बोलले जाते. सत्य साईबाबा यांचे निधन २४ एप्रिल २०११ रोजी झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply