गुरू म्हणजे केवळ शिक्षक नव्हे, केवळ आचार्य नव्हे. शिक्षक किंवा आचार्य त्या त्या विशिष्ट ज्ञानाशी आपला थोडाफार परिचय करून देत असतात. त्यांचा हात धरून आपण ज्ञानाच्या अंगणात येतो. परंतु गुरू आपणास ज्ञानाच्या गाभाऱ्यात घेऊन जातो. त्या त्या ध्येयभूत ज्ञानाशी गुरू आपणास एकरूप करून टाकतो. ज्ञानाशी तन्मय झालेला गुरू शिष्याशीही समाधी लावतो. शाळेत विद्यार्थी प्रश्न विचारतात, परंतु गुरूजवळ फारशी प्रश्नोत्तरे नसतात. तेथे न बोलता शंका मिटताल, न सांगता उत्तरे मिळतात. येथे पाहावयाचे, ऐकावयाचे.. न बोलता गुरू शिकवितो. न विचारता शिष्य शिकतो. गुरू म्हणजे उचंबळणारा ज्ञानसागर! सच्छिष्याचा मुखचंद्र पाहून गुरू हेलावत असतो. गीतेमध्ये ज्ञानार्जनाचे प्रकार सांगितले आहेत:
“तद्धिद्धि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया”
ते ज्ञान प्रणामाने, पुनःपुन्हा विचारण्याने, सेवेने प्राप्त करून घे. शिक्षकाजवळ परिश्रमाने आपण ज्ञान मिळवितो. परंतु गुरूजवळ प्रणाम व सेवा हेच ज्ञानाचे दोन मार्ग असतात. नम्रता हा ज्ञानाचा खरा आरंभ आहे. गुरूजवळ शिष्य रिकामे मन घेऊन जातो. विहिरीत अपरंपार पाणी आहे; परंतु भांडे जर वाकणार नाही, तर त्या भांड्यात त्या अनंत ‘पाण्यातील एक थेंबही शिरणार नाही. तसेच ज्ञानाचे जे सागर असतात, त्यांच्याजवळ जोपर्यंत आपण वाकणार नाही, निमूटपणे त्यांच्या चरणांजवळ बसणार नाही, तोपर्यंत ज्ञान आपणास मिळणार नाही. भरण्यासाठी वाकावयाचे असते. वाढविण्यासाठी नमावयाचे असते.
केवळ विनम्र होऊन येणारा हा जो ज्ञानोपासक शिष्य, त्याची जातकुळी गुरू विचारीत नाही. तळमळ ही एकच वस्तू गुरू ओळखतो. शत्रूकडचा कचही प्रेमाने पायाशी आला, तर शुक्राचार्य त्याला संजीवनी देतील. रिकामा घडा घेऊन गुरूजवळ कोणीही या व वाका, तुमचा घडा भरून जाईल.
गुरू म्हणजे एक प्रकारे आपले ध्येय. आपल्याला ज्या ज्ञानाची तहान आहे, ते ज्ञान अधिक यथार्थपणे ज्याच्या ठिकाणी आपणास प्रतित होते, तो आपला गुरू होतो.
– साने गुरुजी
Leave a Reply