(विजयादशमीचे सोने)
प्राचीन काळी ऋषिमुनी विद्यादानाचे काम करीत असत. त्यांचे आश्रम म्हणजे वेदाभ्यासाच्या शाळाच असत. अनेक शिष्य आश्रमात राहून विद्याभ्यास करीत होते. ऋषिमुनींनासुद्धा वेदविद्यापारंगत शिष्यांकडे पाहून कृतार्थ झाल्यासारखे वाटे. अध्ययन संपले की, काही ना काही गुरुदक्षिणा देण्याचा प्रघात होता. त्याशिवाय गुरुंचे ऋण फिटले असे समजत नसत.
कौत्स नावाचा एक सुलक्षणी, सुशील व सुंदर मुलगा होता. वेदशास्त्राचे अध्ययन करावे अशी इच्छा मनात धरून तो वरतंतू नावाच्या एका श्रेष्ठ ऋषींकडे विद्याभ्यासासाठी गेला. त्याची अनिवार इच्छा पाहून वरतंतूंना मोठा हर्ष झाला. सुमुहर्तावर त्यांनी कौत्सला विद्या शिकवायला आरंभ केला.
वरतंतूसारखा श्रेष्ठ गुरू आणि कुशाग्र बुद्धीचा व तीव्र स्मरणशक्तीचा कौत्स्यासारखा शिष्य! मग विद्यादान सफल न व्हायला काय झाले! कौत्साने मन लावून अभ्यास केला. गुरू जे शिकवीत ते कौत्स चटकन मुखोद्गत करी.
कालांतराने कौत्स सर्व विद्यांत पारंगत झाला. आता गुरूंचा निरोप घेऊन अध्ययन संपवावे असा विचार त्याने केला. त्यावेळी गुरूंना कोणती गुरुदक्षिणा द्यावी याचा त्याच्यापुढे प्रश्न पडला.
त्याने गुरूस वंदन करून विचारले, “गुरूवर्य, आपल्या विद्यादानाने मी आपला अत्यंत ऋणी झालो आहे, आपणाला गुरूदक्षिणा द्यावी अशी माझी इच्छा आहे; आपण आपली आवड सांगावी. मी ती पुरी करीन.” कौत्सा, मी विद्या विक्रय करणारा गुरू नव्हे. गुरूदक्षिणा घेणे म्हणजे अप्रत्यक्षपणे विद्या विकणेच होय. आपला शिष्य विद्येने सुसंस्कृत झालेला पाहून जो आनंद होतो, तीच खरी गुरूदक्षिणा होय. ती गुरूदक्षिणा मला पावली आहे, मी धन्य आहे.” गुरू म्हणाले.
परंतु गुरूदक्षिणा दिल्याशिवाय विद्या सफल होत नाही, अशी कौत्साची भावना असल्याने तो वरतंतूंना परोपरीने विनवू लागला. तेव्हा वरतंतू म्हणाले, “कौत्सा, दक्षिणा देणारच असशील तर मी तुला चौदा विद्या शिकवल्या आहेत; त्या प्रत्येक विद्येबद्दल एक कोटी याप्रमाणे १४ कोटी मुद्रा आणून दे. पण या १४ कोटी मुद्रा तू एकाजवळूनच आणून दिल्या पाहिजेत. दहावीस जणांतून जमा केल्यास मी घेणार नाही.”
ही अट पाळणे कठीण आहे, हे दिसत असूनही कौत्साने ती मान्य केली. गुरू गुरूदक्षिणा घेण्यास कबूल झाले, याचाच त्याला आनंद झाला होता.
त्याने प्रयत्न सुरू केला. एवढी मोठी रक्कम कोठून आणायची? अनेक मोठ्या राजांकडे त्याने हे दान मागितले, परंतु त्याची गरज पुरी करणारा कोणीही त्याला भेटला नाही. तो हिरमुसला झाला. सचिंत होऊन भटकू लागला. कोणी तरी त्याला सुचविले, ‘कौत्सा, आयोध्येचा रघू राजा दानशूर म्हणून प्रसिद्ध आहे. तो कुणासही विन्मुख करीत नाही, अशी त्याची ख्याती आहे. त्यास भेट, चौदा कोटी मुद्रा तुला सहज मिळतील.
कौत्स तत्काळ आयोध्येस गेला. त्याने रघू राजाची भेट घेतली. सकलविद्यांत प्रविण अशा कौत्साचं स्वागत रघू राजाने व राणीने अत्यंत पवित्र भावनेने केले. त्यांनी कौत्सासारख्या विप्रश्रेष्ठाचे आगमन एका उत्सवासारखे मानले. दोघांनी कौत्साची पूजा केली. पण तेथील परिसर न्याहाळून कौत्साची आशा पार मावळून गेली. कारण रघू राजा हा आता विपुल ऐश्वर्याचा धनी राहिला नव्हता; दान करून दारिद्र्यावस्थेत आनंद मानणारा योगी झाला होता. नुकताच विश्वजित यज्ञ करून त्याने आपले भांडार लुटवले होते. या रघुवंशाच्या राजांचे हे ब्रीदच होते की, दिग्विजय करायचा तो उपभोगाच्या लालसेने नव्हे.
दिग्विजयाने मिळवलेले धन दान करून वाटून टाकायचे. हा आदर्श रघू राजाने पाळला होता.
राजाने कौत्सास विचारले, “महाराज, या दासाकडून काय अपेक्षा आहे?’ दीर्घ नि:श्वास सोडून कौत्स म्हणाला, “राजा, मी तुमच्या सत्काराने तृप्त झालो आहे; तरीपण जे मागावयास आलो आहे, ते न मागता परतणार आहे. तुम्ही माझी इच्छा पुरी कराल की नाही याबद्दल शंका वाटू लागली आहे.” “ हे द्विजश्रेष्ठा”, राजा बोलला. “आपले काम कितीही दुष्कर असले तरी मी करीन. माझ्या स्थितीसंबंधी मुळीच काळजी करू नका. आपली इच्छा नि:संकोचपणे सांगावी. हे ऐकून कौत्साने राजास गुरूदक्षिणेचा सर्व वृत्तांत सांगितला व म्हटले, “माझ्या गुरूंनी बजावले आहे की, दहा घरी भिक्षा मागून मिळवलेल्या १४ कोटी मुद्रा मला चालणार नाहीत. हे द्रव्य मला एकाच दात्याकडून मिळाले पाहिजे. तुमची कीर्ती ऐकून मी तुमच्याकडे आलो. पण माझी घोर निराशा होणार असे दिसते आहे.” कौत्साचे निराशायुक्त भाषण ऐकून रघुराजास हसू आले व तो उद्गारला, “आपले म्हणणे सत्य आहे. मी विश्वजित यज्ञ केल्यामुळे अगदी निष्कांचन झालो आहे. तरीही आपणाला चौदा कोटी मुद्रा लवकरच देतो, याबद्दल खात्री बाळगा.” राजाने प्रधानाशी सल्लामसलत केली. प्रधानाने राजास सांगितले की, चौदा कोटी मुद्रा यांना देणे अशक्य आहे. खजिना रिता झाला आहे. कुठूनही करभार यायचा बाकी राहिला नाही. इंद्राकडून मात्र संपत्ती यायची आहे. ती आल्यास या ब्राह्मणाची इच्छा पूर्ण करता येईल. प्रधानाचे भाषण ऐकून रघूस आनंद झाला. इंद्रावर स्वारी करण्याचा निश्चय करून त्याने प्रधानास तशी आज्ञाही दिली. ब्राह्मणांस विचारून शुभदिवस नक्की केला. ब्राह्मणाने आश्विन शुद्ध दशमी हा दिवस सुचविला. त्या दिवशी स्वारी केल्यास यशप्राप्ती नक्की होईल, असे सांगितले.
हे वर्तमान नारदास समजताच तो इंद्राकडे गेला, व त्याने ही सर्व हकिगत त्याला कळविली. इंद्राने लागलीच कुबेरास पाचारण केले. रघुराजाचा पराक्रम त्याला माहीत होता. त्याने कुबेरास रघुराजाच्या नगरात सुवर्णमुद्रांचा वर्षाव करण्याची आज्ञा केली. आज्ञा होताच कुबेराने आयोध्या नगरीच्या बाहेर शमी व आपट्यांच्या झाडांवर सुवर्णवृष्टी करवली.
इकडे आयोध्येतील लोक रात्री झोपलेले होते, ते सकाळी उठून पाहतात तो, शमी, आपट्यांच्या झाडांवर एक सुवर्णाचा पर्वतच तयार झालेला दिसला. सर्व जण आश्चर्यचकित झाले. राजाने त्या सर्व सुवर्णमुद्रा कौत्साच्या स्वाधीन केल्या. ते सर्व द्रव्य घेऊन कौत्स गुरूंकडे आला. साष्टांग प्रणिपात करून ते सर्व द्रव्य त्याने गुरूस अर्पण केले. पण ते गुरू द्रव्याची अभिलाषा धरणारे नव्हते.
त्यांनी केवळ १४ कोटी इतक्याच मुद्रा घेतल्या व बाकीचे धन परत नेण्यास सांगितले. १४ कोटीहून अधिक घेण्यास स्पष्ट नकार दिला.
निरुपायाने उरलेले द्रव्य घेऊन राजाचे दूत आयोध्येला परत आले.
झालेला सर्व प्रकार राजास सांगून त्यांनी ते द्रव्य राजापुढे ठेवले. पण राजाही भोगलोलूप व स्वार्थी नव्हता; लक्ष्मीस तृण मानणारा होता. ते द्रव्य त्यानेही नाकारले व कौत्सास निरोप पाठवला की, “हे द्रव्य आपल्यामुळे प्राप्त झाले आहे, तेव्हा ते तुमचेच आहे. मला हे नको. आपणाकडेच ठेवावे.” कौत्साने उलट कळवले, “राजा, मला गुरूदक्षिणा देण्यासाठीच द्रव्य हवे होते, त्याहून अधिक द्रव्य घेऊन मी काय करू? मी वेदपठण करणारा ब्राह्मण, पापमूलक अशा द्रव्याचा विटाळसुद्धा मला नको. माझे कार्य झाले आहे. द्रव्य आपणाजवळच ठेवा. ”
गुरूंना द्यावयाच्या द्रव्याहून अधिक द्रव्य न घेणारा निस्पृह कौत्स वंद्य की गरजेपेक्षा अधिक दान पदरात टाकणारा व परत आलेले सुवर्ण नाकारणारा रघुराजा अधिक निर्लोभी?
राजाने द्रव्याकडे पाठ फिरवली. शमीच्या व आपट्यांच्या झाडांजवळ ते ठेवून दिले. तेव्हापासून शमीची व आपट्याची पाने आपण सोने समजून लुटतो व वाटतो. दसऱ्याचा म्हणजेच विजया दशमीचा सण सर्वांच्या परिचयाचा आहे.
[साहित्यसुधा, इ. ७ वी, १९७९, कर्नाटक सरकार, पृ. ३६-४०]
Leave a Reply