![p-43551-gurudev-dutta](https://www.marathisrushti.com/articles/wp-content/uploads/sites/3/2017/12/p-43551-gurudev-dutta.jpg)
मी जेव्हा आपल्या दैवतांचं चार हस्ती शंख-पद्म-चक्र-गदा किंवा तत्सम काहीतरी धारण केलेल्या पारंपारीक रुपाचा अर्थ शोधायचा जेंव्हा प्रयत्न करतो, तेंव्हा बरंच काहीतरी सापडतंय किंवा ती मुर्ती सांगू पाहातेय असं मला नेहेमी वाटतं. कारण ती केवळ एक ठराविक स्वरुपातली मुर्ती किंवा साचेबद्ध प्रतिमा नसून, आपल्या प्राचिन पुर्वजांनी आपल्यासाठी जपून ठेवलेला त्यांचा काहीतरी महत्वाचा संदेश आहे, असं मला नेहेमी वाटतं.
श्री अक्कलकोट स्वामींच्या ओवीरुप चरित्रात श्री दत्त महाराजांचं वर्णन,
“चार वेद होउनी श्वान । वसती समीप रात्रंदिन । ज्याचे त्रिभुवनी गमन । मनोवेगे जात जो ।।” असं केलंय. या श्लोकातील पहिल्या दोन ओळी दत्तगुरुंच्या तसबिरीत प्रत्यक्ष पाहाता येतात. आणि या दोन ओळीच मला ‘श्री दत्तां’चा खरा अर्थ सांगतात असं वाटतं.
चार वेद म्हणजे ग्रंथ. ग्रंथ हे ज्ञानाचं प्रतिक. पुस्तकांचं वाचन आपल्याला जगभराचंच कशाला, तर ब्रम्हांडाचंही ज्ञान देतं हे मी काही नव्यानं सांगायला नको. आधुनिक काळात कुणाचंच वाचन थांबलेलं नाही, मात्र त्याचं स्वरुप बदललंय. पुस्तकांच्या ऐवजी जनांना ‘डिजिटल’ वाचनाची सवय वाढलीय.
‘डिजिटल’ हा शब्द आला, की त्याला जोडून ‘डाटा’ हा शब्द येतोच. ‘डिजिटल’ पद्धतीने साठा केलेल्या ज्ञानाला किंवा माहितीला ‘डाटा’ म्हणतात हे आता बहुतेक सर्वांनाच कळतं. ह्या ‘DATA’तच मला ‘DAT(T)A’ दिसतो. Data आणि Datta यातील साम्य मला हेच सांगते, की ‘दत्त’ म्हणजे ‘ज्ञान’..!
जेंव्हा आपण कंप्युटरसमोर बसून काही विषयांची माहिती घ्यायचा प्रयत्न करतो, तेंव्हा तो एका क्षणात, विषय परस्पर विरोधी असले तरी, तो जगभरातून आपल्यासमोर आणून उभं करतो. या लेखाच्या दुसऱ्या परिच्छेदातील श्लोकातील नंतरच्या दोन ओळी, ‘ज्याचे त्रिभुवनी गमन । मनोवेगे जात जो ।।’ हेच तर सांगतात. मनासारखा प्रचंड वेग आणि मनासारखं त्रिखंडात विहरणं, हे संगणकाला Dat(t)a मुळे आणि आपल्याला Datta’मुळे शक्य होतं.
दत्तांचं वर्णन करणाऱ्या श्लेकातील आणखी काही ओळी,
“कामधेनू असोनि जवळी ।
हाती धरिली असे झोळी ।
जो पहाता एका स्थळी ।
कोणासही दिसेना ॥”
अशा आहेत. कामधेनू इच्छापूर्तीचं प्रतिक. ग्रंथ आपल्याला मनोवांछित विषयाचं ज्ञान करून देतात. जो ज्ञानाचा उपासक असतो, तो झोळी पसरूनच असतो. तो ज्ञानाचा याचक असतो. ‘याचक’ आणि ‘वाचक’ यातील साम्यही मला हेच सांगते. आणि ज्ञान कोणत्याही एका स्थळी कसं असेल, ते तर यत्र तत्र सर्वत्र पसरलेलं असतं. असं असुनही ते दिसत नाही, शोधावं लागतं, दत्तगुरूंची आळवणी ती हिच..!!
एकदा का ज्ञान प्राप्तीचं ध्यान लागलं, की मग आपण आपण उरत नाही. तना-मनाचं भान हरपतं. अवघ विश्व एकच होऊन, मी तू पणा लोप होतो. श्री दत्तांच्या आरतीत उगाच नाही म्हटलंय, की “दत्त दत्त ऐसें लागले ध्यान । हरपले मन झाले उन्मन ॥ मी तू पणाची झाली बोळवण ।”
थोडक्यात मला समजलेला दत्तांचा अर्थ म्हणजे ज्ञान.
आजच्या कंम्प्युटर युगात,’Datta’ म्हणजे ‘Data’ म्हणजे पुन्हा ‘ज्ञान..!
लौकिक पातळीवर Data मदतीला येतो..
अध्यात्मीक पातळीवर Datta तारून नेतो. ‘दत्त’ या एकमेंवं दैवताच्या पुढे ‘गुरू’ ही उपाधी लागते, ती काही उगाच नाही. गुरू म्हणजे पुन्हा ज्ञानच..!!
मला जाणवलेले श्री दत्तगुरू असे आहेत असं मी मानतो, तुम्ही मानावं असा माझा आग्रह नाही. शेवटी देव कुठल्या रुपात मानावा, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. मला तो या रुपात दिसतो..! दत्तगुरू मला देत असलेला प्राचिन पूर्वजांचा संदेश ‘ज्ञानाला पर्याय नाही, ज्ञान म्हणजेच मी’ हाच असावा अशी माझी खातरी आहे..
जय जय गुरुदेव dat(t)a..
— नितीन साळुंखे
9321811091
Leave a Reply