![Ravindra-Walimbe-Pyasa](https://www.marathisrushti.com/articles/wp-content/uploads/sites/3/2022/09/Ravindra-Walimbe-Pyasa.jpg)
गुरुदत्त प्रोडक्शन हाऊसचे चित्रपट भरपूर चालत होते.आरपार, Mr & Mrs 55,C.I.D.पण गुरुदत आतून अस्वस्थ होता.आपण निर्मिलेल्या चित्रपटावर तो खुश नव्हता. त्याला एक अशी कलाकृती साकारायची होती,जेणे करून त्याच्यामधल्या दिग्दर्शकाला समाधान मिळेल. प्यासाचा विषय अनेक दिवस त्याच्या मनात घर करून होता.त्याने त्याच्या चित्रपट लेखक अब्रार अल्वीकडे हा विषय काढला.आणि प्यासा करायचे ठरवले.विषय गंभीर होता,म्हणून त्याने पहिली गोष्ट केली,त्याचा नेहमीचा संगीत दिग्दर्शक ओ.पी.नैयर याच्या नावावर फुली मारली,कारण त्याचे संगीत चित्रपटाला साजेसं नव्हते. व साचीन्दाना घेतले.कथेचा नायक शायर आहे म्हणून साहिरची निवड केली.
संपूर्ण चित्रपट मनुष्याच्या स्वार्थी आणि दुटप्पी स्वभावाचा आलेख मांडतो.फार थोडी पात्रे आहेत जी कविमनाचा नायक विजय म्हणजे गुरुदत्तवर मनापासून प्रेम करतात.गुरुदत्त काही कमावत नाही म्हणून त्याच्या कविता कवडीमोल भावात रद्दीवाल्याला विकणारे भाऊ,जिच्यावर मनापासून प्रेम केलं तिने दिलेला धोका,आणि निलाजरेपणे प्रेमापेक्ष्या आयुष्यात स्थैर्य व मानमरातब महत्वाचा असतो सांगणारी माला सिन्हा, माला सिन्हाच्या आयुष्यात गुरुदत्तचे काय स्थान आहे हे चाचपुन बघण्यासाठी गुरुदतला नोकरीवर ठेवणारा तिचा नवरा रेहमान.जवळचा मित्र श्याम जो नंतर पैशासाठी गुरुदत्तला दगा देणारा, पण त्याच बरोबर त्याच्या कवितावर मनापासून प्रेम करणारी व त्याच्या कविता छापायची माला सिन्हाला विनंती करणारी व माला सिन्हाने कितीही पैसे दिले तरी त्या न विकणारी गुलाबो म्हणजेच वहिदा रहेमान, गुरुदत साठी तीळतीळ तुटणारी त्यांची आई,अडचणीच्या वेळीही त्याची साथ देणारा सत्तार म्हणजेच जॉनी वॉकर,त्याच्यावर मनातल्या मनात अव्यक्त प्रेम करणारी टूनटून, गुरुदत मेला आहे असे वाटल्याने त्याच्या कविता छापून मालामाल होऊ बघणारा, व गुरुदत जिवंत आहे हे कळल्यावर इतरांकडून तो जिवंत नाही हे वदवून घेणारा रहेमान, गुरुदत्तच्या कवितांना प्रचंड मागणी आहे हे समजल्यावर ज्याला दोस्त मानला तो प्रकाशनाच्या नफ्यात हिस्सा मागणारा श्याम, ज्या भावांनी त्याला हाकलून दिले,ते अचानक पूतनामावशीचे प्रेम दाखवणारे भाऊ, अश्या अनेक मानवी स्वभावाची गुंफण व कंगोरे अतिशय समर्थपणे प्यासात दाखवले आहेत.आणि म्हणून गुरुदत उद्विग्नपणे म्हणतो “ मै वो विजय नही हुं, वो विजय मर चुका, ये लोग मरे दोस्त नही, ये सब दौलत के दोस्त है,मुझे किसी इन्सानसे कोई शिकायत नही,मुझे शिकायत है समाजके उस ढाचेसे जो इन्सानसे उसकी इंसानियात छीन लेता है,मतलब केलिये अपने भाईको बेगाना बना देता है,इसीलिये मै दूर जा रहा हुं”
आधी चित्रपटात विजयची भूमिका दिलीपकुमार करणार होता, पण त्याचे चाहते सांगतात कि तो “Tragedy king” ओळखला जाऊ लागल्याने तशीच भूमिका नाकारली, तर काही जणाच्या मते त्याला दिग्दर्शनात ढवळाढवळ करायची सवय होती आणि गुरुदत्तने ती करू दिली नसती म्हणून नाकारली. पण प्यासा गुरुदत्तच्या मर्मबंधातली ठेव होती हे नक्की. गुलाबो हि वेश्या अब्रार अल्विला खरच भेटली होती तो तिच्याकडे नियमित जात असे, त्यावरूनच प्यासाची गुलाबो घेतली. आधी प्यासात मधुबाला व नर्गिस काम करणार होत्या पण दोघींना गुलाबोच करायची होती, शेवटी गुरुदत्तने ठरवले आपण जिला तेलगुमधून आणली व C.I.D मध्ये व्ह्याम्पचा रोल दिला त्या वहिदा रहेमानला का गुलाबो देऊ नये? तिनेही गुलाबोचे सोने केले आहे. प्यासात इतर गाण्याबरोबर “रुत फिरी दिन हमारे” गाणे होते. पण ते पटकथेला मारक ठरू लागले व ते सुरु झाल्यावर लोकं ब्रेक घेऊ लागले म्हणून वहिदा रहमानच्या सांगण्यावरून ते काढून टाकले. ”जाने वो कैसे“ गाणे आधी रफीला देणार होते. पण बरीच चर्चा झाल्यावर ते हेमंतकुमारला दिले गेले. एक गाणे तर चक्क मोहमद रफीने कंपोज केले आहे. सचिनदा आले नव्हते, रफीने आधी नकार दिला होता. साहीर आला होता व ते रेकोर्ड झाले नसते तर रेकोर्डिंगचे पैसे वाया गेले असते, ते गाणे होते “तंग आ चुके है “ “हम आपकी आखोमे” हा तर उत्तम चित्रीकरणाचा व कोरिओग्राफीचा नमुना मानला जातो. ”सर जो तेरा चकराये “ ची ट्यून मूळ ब्रिटीश चित्रपट harry black वरून घेतली आहे जी आर.डी बर्मनला आवडली होती.साचीन्दाना ती नको होती पण चित्रपटातील ताण हलका करण्यासाठी हे गाणे घेतले आहे. Times magazine च्या 100 best films of all time मधला प्यासा एकमेव हिंदी चित्रपट आहे.CNN ने २५ उत्कृष्ठ हिरोमध्ये गुरुदतची निवड केली आहे.
आणि चित्रपटाच्या शेवटच्या सीनमध्ये गुरुदत वहिदा रहमानला सांगतो “मुझे दूर जाना है गुलाबो” गुलाबो विचारते “कहा” तो सांगतो “ “जहासे मुझे दूर न जाना पडे,” ती “बस यही कहने आये थे ?” तो फक्त विचारतो “साथ चलोगी?”
— रवींद्र शरद वाळिंबे.
Leave a Reply