“आम्ही साहित्यिक’ या लोकप्रिय फेसबुक ग्रुपवरील लेखक अँड. प्रभाकर येरोळकर यांचा हा लेख. ते लातूर येथे जिल्हा न्यायालयात वकील आहेत. न्यायव्यवस्था, प्रशासन, साहित्य इत्यादी विषयांवर त्यांचे दीड हजाराहुन अधिक लेख वर्तमान पत्रीय स्तंभातुन प्रकाशित झाले आहेत..
कँप्टन दिप अतिशय सावध होता . दोनदा त्याला पहारेकर्यांने बाथरूममध्ये सोडले होते. फक्त पायांच्या साखळीला जोडणारा साखळदंड चावीने त्याने दोनदा मोकळा केला होता….।
गुरूनाथ नाईकांच्या कादंबरीची अशी ओघवती सुरुवात. शेवटपर्यंत उत्सुकता आणि हातातुन पुस्तक सोडवणारच नाही. विशेष म्हणजे त्यांच्या लिखाणात अश्लीलता नावाला देखील सापडणे कठीण. आणि तरीही ते कमालीचे वाचकप्रिय लेखक होते. मराठी वाचकांची एक अख्खी पिढी घडवणारा लेखक म्हणून ते कायम लक्षात राहतील.
जवळपास १२०० पुस्तके लिहिणाऱ्या , मराठीतील वाचक प्रिय लेखक ,गुरुनाथ नाईक यांना आयुष्यात अखेेरीस का होईना परंतु अ.भा.साहित्य संमेलनात सन्मान पुर्वक आमंत्रित करून व्यासपीठावर सत्कार करावयास काय हरकत असावी?
अनेक दैनिकांचे संपादक म्हणुन महाराष्ट्रात त्यांनी काम केले.
मराठीत विक्रमी कादंबऱ्या लिहुन वाचन संस्क्रती वाढविण्यास हातभार लावणाऱ्या नाईकांचा यथोचित सत्कार व सन्मान एकदा तरी संमेलन व्यासपीठावर व्हावा की नाही ?
खूद्द नाईकांनी च फोन वर व नंतर एकदा लातूरला आले होते त्यावेळेस प्रत्यक्ष भेटीत ही बाब मला सांगितलीे होती. नाईकांनी त्यांची बहुतेक पुस्तके मला भेट दिलीत. मध्यंतरी काही दिवस हेमचंद्र साखळकर या टोपण नावानेही त्यांनी काही पुस्तके लिहिली.
अर्थात त्यांच्या पडत्या काळात ते लातूरला एकमत मध्ये संपादक म्हणून आले होते. मी आठवड्याला स्तंभलेखन करायचो. नाईकांवर हडकोने एक फौजदारी केस केलेली. संबंधित न्यायाधीशांना मी नाईकांविषयी कल्पना दिली. तर ते त्यांचे वाचकच निघाले. तात्काळ जमानत मिळाली व नंतर केसही सुटली. लातूरात असताना त्यांच्या
पुस्तकांचे लिखाण थंडावले होते. तिकडे अनेक प्रकाशक त्यांच्या पुस्तकांच्या आव्रत्यावर आव्रत्या काढतच होते.आजही सर्वत्र तुम्हाला त्यांची पुस्तके दिसतील, वाचनालयात, प्रदर्शनात. पोलादी सावली, आँपरेशन ईगल,धगधगती सीमा, अशा असंख्य वाचनीय सातशेहुन अधिक साहसकथा,अडीचशेहुन अधिक सामाजिक, ऐतिहासिक कादंबर्या, १९५७ पासूनचा तो ते आजारी पडेपर्यंत चा मागच्या चार दोन वर्षापावेतोचा काळ, व्रत्तपत्र व्यवसायातला ४२ हुन अधिक वर्षे घालवलेला काळ. ही काय मामूली कामगिरी म्हणावयाची ? लिमका बूक मध्ये त्यांचे नाव आल्यावर महाराष्ट्र टाईम्स यधे त्यांची मुलाखत छापून आली होती.
तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख, नारायण राणे हे त्यांचे वाचक .
महाराष्ट्रात काँग्रेस सरकार असतांनाच नाईक वसईला गेले. गोव्यातील मुख्यमंत्री पर्रीकरांनी त्यांना तात्पूरते घर दिले व थोडी बहूत पेन्शन तीन हजारांची.
परंतु महाराष्ट्र सरकारने काही केले नाही. मराठी वाचकांची एक पिढी घडवली त्या या लेखकांसाठी.
आपल्या प्रकाशकांना श्रीमंत करून सोडणारा हा लेखक साहित्य संमेलनांकडुन कायम दुर्लक्षित राहीला. काय म्हणावे या दूर्भाग्याला ?
ज्यांचं कुणाही वाचकांनी काही ही आणि कधीही वाचलेलं नसतं अशी माणसे एखादे दुसरे पुस्तक लिहुन खूशाल संमेलन व्यासपीठावर मिरवत राहतात आणि अध्यक्ष देखील होतात. वर्षानुवर्षे हेच चाललेलं असतं.
अँड. प्रभाकर येरोळकर
Leave a Reply