प्लास्टिकच्या अमर्याद वापरामुळे झालेल्या प्रदूषणाने भारतातील तमाम जनता त्रस्त झाली असतांना, काही प्रमाणात दिलासा देण्यासाठी सरकारने प्लास्टिकच्या वापरासंबधी काही नियम घालून दिलेत. परंतु या नियमातील त्रुटींचा आधार घेऊन गुटखा निर्मिती कंपन्यांनी पर्यावरणालाच धोका निर्माण केला. काही जागरूक पर्यावरणवाद्यांच्या प्रयत्नानंतर, महाराष्ट्रात गुटखा निर्मिती कंपन्यांच्या स्वैराचारी वर्तनावर निर्बंध घालण्यासाठी प्लास्टिक बंदीचा निर्णय घेण्यात आला.
गुटखानिर्मिती कंपन्यांनी विरोध केला परंतु शेवटी कायद्याचा दंडुका आल्यावर हा निर्णय स्वीकारावाच लागला. या प्रकाराने पर्यावरणवादी जरी संतृष्ट झाले असले तरी मात्र या कंपन्यांनी नवीनच शक्कल लढविली. गुटख्यावरील वेष्टन आपल्याला पाहायला कागदाचे दिसत असले तरी ही शुध्द धूळफेक आहे.
कागदी वेष्टानाच्या आतमध्ये पातळ प्लास्टीकचे आवरण दिलेले आहे. पूर्वी वापरले जात होते त्यापेक्षाही हे प्लास्टिक आवरण घातक आहे. जाडीने खुपच पातळ असल्याने त्याचे जमिनीत विघटन होत नाही. पर्यायाने पर्यावरणाचा ऱ्हास होण्यास नवीन वेष्टन सहाय्यक ठरणार आहे.
वरकरणी कागदाचे दिसणारे गुटख्याचे वेष्टन प्लास्टिकच्या आवरणासह असल्याने शासकीय कायद्याची पायमपल्ली होत आहे. तसेच शासनाच्या डोळ्यात धूळफेक आहे.
“ प्लास्टिक बंदी असतांना आतमध्ये प्लास्टीकचे आवरण कसे ? ” असा प्रश्न एका विक्रेत्यास विचारला तर त्याचे उत्तर मात्र चकित करणारे होते. तो म्हणतो तरी कसा, “ एवढे बारीक कोण पाहतो ? आणि पुन्हा खूप दिवसानंतर फक्त कागदी वेष्टानातील गुटख्याचा (प्लास्टिक नसल्यास) रंग बदलतो. मग हा शिल्लक माल कोण घेणार ?” जनतेचे आरोग्य महत्वाचे की, गुटखा कंपन्याचे हित महत्वाचे ? सार्वजनिक आरोग्यावर सरकारचा पर्यायाने जनतेचा अब्जावधी रुपये खर्च होतो. याबाबत कोणालाही काहीही वाटत नाही. शिवाय पर्यावरणाचा ऱ्हास होतो हे वेगळेच ..!
हा लेख प्रपंच करतांना दोन तीन नमुनेही मी स्वताकडे ठेवून घेतलेत.
या सर्व प्रकारावरून असा प्रश्न पडतो की, ज्या ग्राहकांच्या खिश्यावर विक्रेत्यांचे पोट भरते. त्यांना ग्राहकांच्या हितापेक्षा गुटख्याची विक्री महत्वाची वाटते. येथे कायद्याचे हनन होत असल्याचे त्यांना योग्यच वाटते.
या सर्व प्रकारावरानंतरही, नियंत्रण ठेवणाऱ्या विभागाचे याकडे लक्ष जाईल का ……..?
— नरेंद्र श्रावणजी लोहबरे उर्फ नरेश
Leave a Reply