गाय द मोपुसाँत हा सुप्रसिध्द फ्रेंच लेखक.
त्याने कथा, कादंबरी, कविता असे सर्व प्रकारचे विपुल लेखन केले आहे.
त्याचा जन्म ५ ऑगस्ट १८५० ला फ्रान्समधील डीप्पी येथे झाला.
त्याचे आई आणि वडिल, दोघेही मोठ्या घराण्यांतील होते.
त्यांच्या विवाहानंतर त्याच्या आईने द मोपुसाँत हे उपाधी सदृश नांव मूळ नावांपुढे जोडावे असा पतीला आग्रह धरला कारण त्यामुळे घराणे सरदार घराणे वाटावे.
पण लेखक अकरा वर्षांचा असतांना तिने समाजाचा रोष ओढवून घेऊनही घटस्फोट घेतला कारण पती तिला नेहमी मारझोड करत असे.
त्यानंतर गाय द मोपुसाँत तिच्या देखरेखीखालीच वाढला.
ती शिकलेली व भरपूर वाचन करणारी होती.
शेक्सपियर हा तिचा अत्यंत आवडता लेखक होता व त्याच्या लिखाणाची ती पारायणे करी.
तेराव्या वर्षी तिने त्याला प्रायव्हेट स्कूलमधे लॅटीन व क्लासिकल लिटरेचर ह्यांच्या अभ्यासासाठी प्रवेश मिळवला.
सुरूवातीपासूनच गाय द ला धर्माच्या कर्मठपणाची चीड होती.
त्याला शाळेतली शिस्त व धार्मिक कर्मकांडांची त्या काळांतील सक्ती पसंत न पडल्यामुळे त्याने स्वत:ला शाळेने काढून टाकावे असे वर्तन मुद्दाम केले.
सतराव्या वर्षी आईने त्याला ज्युनियर हायस्कूलमधे घातले व गुस्टाव्ह फ्लॉबर्ट ह्या चांगल्या साहित्यिकांची ओळख करून दिली.
तिथे त्याने कवी म्हणून नांव मिळवले व आवडीने नाटकांतही वावर सुरू केला.
तिथेच त्याने एका सुप्रसिध्द फ्रेंच कवीला तो समुद्रांत बुडत असतांना वाचवले.
१८७० मधे फ्रँको-प्रुशियन युध्दाची सुरूवात झाली.
त्याने आपले नांव स्वयंसेवक म्हणून नोंदवले.
१८७१मधे त्याची पॅरीस येथे नेव्ही ऑफीसमधे क्लार्क म्हणून नेमणूक झाली व तिथे त्याने दहा वर्षे काम केले.
तिथे फक्त सीन नदीमध्ये बोटिंग करणं एवढीच करमणुक होती.
मग गुस्टॉव्ह फ्लॉबर्ट ह्या प्रथितयश साहित्यिकाने त्याला आपल्या छत्रछायेखाली घेतला. फ्लॉबर्टच्या घरी त्याची एमिल झोला व रशियन कादंबरीवर आयव्हॅन तुर्गानेव्ह यांच्याबरोबर भेट झाली.
ते दोघेही वास्तववादी लिखाणाचे पुरस्कर्ते होते.
१८७५मधे फ्लॉबर्टच्या उत्तेजनाने त्याने एक विनोदी नाटक लिहिले व त्यांत कामही केले.
१८७८मधे त्याची बदली माहिती मंत्रालयाकडे करण्यात आली व तिथे वृत्तपत्रांसाठी लिहिण्याची जबाबदारी त्याच्यावर आली.
ते काम करून त्याला खूप फावला वेळ मिळे.
त्या वेळांत त्याने कथा व कादंबऱ्या लिहायला सुरूवात केली.
१८८०मधे त्याने बौल द सीफ ह्या नांवाने त्याच्या मते त्याचा “मास्टरपीस” प्रसिध्द केला.
ती छोटी कादंबरीच होती.
त्याचे वाचकांनी स्वागत केले.
फ्लॉबर्टनेही त्याची स्तुती केली.
लागलीच त्याने दोन कथा लिहिल्या व त्याही खूप गाजल्या.
१८८० ते १८९१ ह्या काळांत त्याची लेखणी सतत चालत होती व त्याने बरेच लेखन केले
प्रत्येक वर्षी त्याच्या कथा, कादंबऱ्या प्रसिध्द होत होत्या व सर्वच गाजत होत्या.
त्याची प्रतिभा व व्यावसायिक वृत्ती ह्यामुळे तो ह्या काळांत धनानेही खूप श्रीमंत झाला.
१८८१मधे त्याचा पहिला कथासंग्रह प्रसिध्द झाला व दोन वर्षांत त्याच्या बारा आवृत्ती निघाल्या.
१८८३मधे त्याने पहिली कादंबरी Une Vie (Woman’s life) ही प्रसिध्द केली.
तिच्या एका वर्षांत २५००० प्रती संपल्या.
त्याची दुसरी कादंबरी एका वर्षांत ३७ वेळा छापावी लागली.
इतकी अफाट लोकप्रियता व प्रचंड मागणी त्याच्या वाङ्मयाला होती.
अनेक साप्ताहिके/मासिके यांचे संपादक कथेसाठी त्याच्या मागे असत म्हणून तो कथाही लिहितच होता.
त्याच सुमारास त्याने त्याची सुप्रसिध्द कादंबरी ‘पिअर एट जॉन’’ ही लिहिली.
तो एकांतप्रिय व समाजापासून दूर रहाणारा होता.
त्याला ध्यानमग्न बसणे जास्त प्रिय होते.
परंतु प्रवास मात्र दूर दूर करत असे.
प्रत्येक प्रवासानंतर तो प्रेरणा घेऊन येई व जोमाने नवीन लिखाण करत असे.
समाजात मिसळणे आवडत नसले तरी समकालीन लेखकांबरोबर मात्र तो संपर्क ठेवत असे.
ॲलेक्झांडर ड्युमास ह्याच्याशीही त्याचा संपर्क होता.
फ्लॉबर्ट तर त्याची पाठराखण करतच होता.
इतर कांही साहित्यिकांबरोबर मात्र त्याची मैत्री टिकली नाही कारण ते गांवगप्पा, निंदा, कुचाळी, इ. करायला एकत्र जमत.
फ्रान्सचे म्हणजे पॅरीसचे सध्याचे आकर्षण ठरलेल्या आयफेल टॉवरला विरोध करण्यांत तो आघाडीवर होता.
शेहेचाळीस साहित्यिकांनी सह्या केलेले टॉवरला विरोध करणारे पत्र बांधकाम खात्याच्या मंत्र्याला देण्यांत आले होते पण त्याने त्यांत लक्षही घातले नाही.
त्याच काळांत म्हणजे १८८१-८५ मध्ये त्याने वेगवेगळ्या चार टोपणनांवांनीही लिखाण केले.
त्याला एकांतवास जास्तच प्रिय होऊ लागला व त्याला ‘सिफीलीस’ ह्या रोगाने त्रासून तो मानसिक आजाराचाही बळी होऊ लागला.
त्याच्या भावालाही तोच आजार होता व तो जन्मत: त्यांना मिळाला असावा असे म्हटले जाते.
२ जानेवारी १८९२ला त्याने स्वत:चा गळा कापून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांतून त्याला वाचवण्यांत आले.
त्यानंतर त्याला एका खाजगी मनोरुग्णालयात ठेवण्यात आले.
तिथे तो ६ जुलै १८९३ ला सिफीलिसने निधन पावला.
त्याने पुढील वाक्य त्याच्या कबरीवर लिहावे, असे लिहू ठेवले होते.
“मी सर्व गोष्टी अभिलाषेने जवळ केल्या पण आनंद कशापासूनही घेतला नाही.” ( have coveted everything and taken pleasure in nothing).
गाय द मोपुसाँत हा आधुनिक लघुकथेचा जनक समजला जातो.
अनेकांनी अँटोन चेकॉव्ह व तो दोघांनी आधुनिक वेगळ्या वास्तव जगाकडे वळवणाऱ्या साहित्याचा पाया रचला असे म्हटले आहे.
बरेचदा त्याच्या लेखनाला
दु:खाची, नैराश्याची काळी किनार असे.
त्याच्यावर जर्मन तत्वजञ शॉपेनहॉवर याच्या तत्वज्ञानाचा प्रभाव होता.
माणसांबद्दल लिहितांना अनेकदा तो कठोरपणे व निर्दयतेने लिहित असे.
तो जरी वास्तवाजवळ नेणारे लिहित असे तरीही तो कथेची आंखणी करून हुशारीने कथावस्तू मांडत असे.
वास्तववादी असुनही तो असं मानत नव्हता की माणसाच्या शारिरीक गरजा त्याच्या वर्तनाला जबाबदार असतात.
त्याला माणसाच्या वर्तनाचे इतर आयाम, सामाजिक संदर्भ, हे मांडण्यात जास्त रस होता.
गाय द मोपुसाँत अनेक लेखकांनी स्फूर्ति घेतली.
धक्कादायक किंवा अनपेक्षित शेवट करायची सुरूवात त्याने केली.
त्याच्या “नेकलेस” ह्या कथेची रूपांतरीत कथा मी पूर्वी सादर केली होती.
ती प्रसिध्द कथा आपल्याकडेही विद्यालयीन/महाविद्यालयीन पुस्तकांत होती.
त्याच्या कथा, कादंबऱ्या ह्यावर जर नाटके, चित्रपट, मालिका झाल्या नसत्या तर तें नवलच झालं असतं.
त्याने तीनशे कथा, सहा कादंबऱ्या, तीन प्रवासवर्णने व एक कविता संग्रह लिहिला आहे.
हे सर्व विपुल लेखन त्याने त्याच्या अवघ्या ४३ वर्षांच्या आयुष्यात केलं आहे.
त्यांतही सुरुवातीची २५ वर्षे जगण्याची धडपड करण्यांतच गेली होती.
आणि शेवटचे वर्ष आजारांत गेले.
फ्रॅंको-प्रुशियन युध्दामुळे त्याच्या अनेक कथांना युध्दाची पार्श्वभूमी आहे.
त्याने आपल्या अनेक कथांतून युध्दाचे दुष्परिणाम व युध्दाची व्यर्थता दाखविली आहे.
लीओ टॉलस्टॉय, फ्रेडरि नीत्शे व नंतरच्या अनेक लेखकांनी त्याची भरभरून स्तुती केली आहे तर अनेकांना शेक्सपीयरनंतरचा कल्पक व भाषेवर प्रभुत्व असणारा लेखक तोच वाटतो. (आपण चार्ल्स डिकन्सबद्दलही हेच म्हटलं जातं, हे पाहिलं आहे.)
त्याच्या मृत्यूनंतर सव्वाशे वर्षांनी त्याचे साहित्य आजही वाचले जाते, अभ्यासले जाते, ह्यानेच त्याच्या लिखाणाची महती अधोरेखीत होते.
— अरविंद खानोलकर.
Leave a Reply