सरकारी माणूस आणि त्यांची कार्यपद्धती हा देशभरात चेष्टेचा आणि कुचेष्टेचा विषय असतो. मात्र काही सरकारी कर्मचारी आणि अधिकारी त्यांच्या कार्यपद्धतीने आणि सृजनशीलतेने लोकहितकारी योजना राबवतात आणि त्या प्रचंड यशस्वीही करून दाखवतात. १९७२ मध्ये मुंबईत दूरदर्शन केंद्र सुरू झाले आणि सृजनशीलतेला नवे आयाम मिळाले. आनंद देशपांडे ऊर्फ आकाशानंद यांनीही सृजनशील आणि लोकाभिमुख कार्यक्रम राबवून लोकांना ज्ञानाभिमुख केले.
सर्वसामान्यांपर्यंत पोहोचणे, त्यांना जाणून घेणे आणि त्यांचे काम व विचार तळागाळापर्यंत पोहोचवण्याचे काम त्यांनी ‘ज्ञानदीप’च्या माध्यमातून केले. निर्माता आणि पुढे मुंबई केंद्राचे उपकेंद्र संचालक म्हणून जरी ते कार्यरत असले तरी त्यांची खरी ओळख घराघरात पोहोचली ती ‘ज्ञानदीप’कार म्हणूनच. मुंबई दूरदर्शन केंद्राने एकापेक्षा एक असे विविधांगी आणि दर्जेदार कार्यक्रम दिले. त्यातील एक कार्यक्रम ‘ज्ञानदीप.’
नागपूर आकाशवाणी केंद्रावर कार्यरत असलेले आनंद देशपांडे मुंबई दूरदर्शन केंद्र सुरू झाल्यावर मुंबई केंद्रावर रुजू झाले. सुरुवातीला ‘ऐसी अक्षरे’ आणि ‘शालेय चित्रवाणी’ अशा कार्यक्रमांची निर्मिती त्यांनी केली. मात्र, त्यांनी निर्मिती केलेल्या ‘ज्ञानदीप’ने त्यांना घरांघरात पोहोचवले. शिक्षण, सामाजिक यासह विविध क्षेत्रात काम करणा-यांना व्यासपीठ मिळवून देणारा हा कार्यक्रम होता. त्यांची मते आणि विचार समजून घेणारा हा अभिनव कार्यक्रम होता.
आकाशानंद यांच्या कामातील नेमकेपणा, सातत्य आणि उत्कृष्ट नियोजन याच्या जोरावर हा कार्यक्रम खूपच गाजला. राज्यात तब्बल १५० ज्ञानदीप मंडळे स्थापन झाली, एवढी या कार्यक्रमाची लोकप्रियता होती. सरकारी माध्यमाच्या चाकोरीत आणि चौकटीत राहून त्यांनी हे काम केले. ‘ज्ञानदीप’वर आधारित ‘ज्योत एक सेवेची’ हे मासिकही त्यांनी २५ वर्षे चालवले. ‘ज्ञानदीप’वर पीएचडी झाली आणि ‘बीबीसी’ने ‘ज्ञानदीप’वर लघुपटही बनवला.
देशातील कार्यक्रमाची परदेशात दखल घेण्यात आलेला हा पहिला कार्यक्रम असावा. वाचन आणि लिखाणाची प्रचंड आवड असल्यामुळेच त्यांचा हा कार्यक्रम यशस्वी होऊ शकला.
दूरदर्शनवर त्यांनी ‘माध्यम चित्रवाणी’ नावाचे पुस्तक लिहिले. या पुस्तकाला राज्य सरकारचा सवरेत्कृष्ट पुरस्कारही मिळाला. त्याचबरोबर बालसाहित्यिक म्हणून त्यांची वेगळी ओळख होती. त्यांनी मुलांसाठी सुमारे ३०० पुस्तके लिहिली.
‘नाचू कीर्तनाचे रंगी। ज्ञानदीप लावू जगी’ असा संत नामदेवांचा अभंग आहे. आकाशानंदांनी सर्वसामान्यांशी थेट संवाद साधणारा ‘ज्ञानदीप’ महाराष्ट्रात लावला आणि त्याला लोकांनीही चांगला प्रतिसाद दिला. त्यांच्या कार्यक्रमाने अनेकांना प्रेरणा मिळाली आणि त्यातून पुढे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष सामाजिक, शैक्षणिक कार्याचा ज्ञानदीप तेवत राहिला.
आनंद देशपांडे ऊर्फ आकाशानंद यांचे १३ मार्च २०१४ रोजी निधन झाले.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply