हा दुरावा साहवेना, संपवी क्षणभर स्वयें
एकदा स्वप्नांत तरि ये, एकदा तरि ज़वळ ये ।।
कां अशी गेलीस सखये प्रेमबंधन तोडुनी ?
कां अशी गेलीस सखये एकला मज सोडुनी ?
सात-जन्मीं-साथिचें तें वचन मजला आठवे ।।
काय झालें सांग, मजवर एकदम रुसलिस अशी
काय आलें सांग, जगतां त्यागुनी गेलिस कशी ?
जन्मभरचे पाश तुटणें , चांगलें ऐसें नव्हे !
तूं ज़री नाहींस पुढती, राहसी नयनीं तरी
तूं ज़री नाहींस ज़वळी, आठवण ज़वळी परी
राहते, राहील कायम स्मृति तुझी माझ्यासवें ।।
एकादा भेटून माझी तृप्ति नाहीं व्हायची
विकलता, त्या भेटिनें ज़ाईल वाढत हृदयिंची
रोज़ ये स्वप्नांत सखये, रोज़ मजला ज़वळ घे ।।
रोज़ ये स्वप्नांत सखये, रोज़ तूं स्वप्नांत ये ।।
– – –
( दिवंगत प्रियपत्नी डॉ. स्नेहलता हिच्या स्मृतीत )
– सुभाष स. नाईक. Subhash S. Naik
सांताक्रुझ (प), मुंबई. Santacruz(W), Mumbai.
Ph-Res-(91)-(22)-26105365. M – (91)-9869002126
eMail : vistainfin@yahoo.co.in
Website : www.subhashsnaik.com / www.snehalatanaik.com
Leave a Reply