उत्सवी स्वरूपात साजरे केले जाणारे एकमेव भाषिक संमेलन म्हणजे ”अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन”..
लिहणाऱ्या,वाचणाऱ्या, बोलणाऱ्या साहित्य रसिकांसाठी हा एक आनंद सोहळाच. मात्र अलीकडे ही साहित्य संमेलनं साहित्यांपेक्षा साहित्यबाह्य कारणानीच जास्त चर्चिल्या जावू लागली आहेत. ‘वाद’ हा तर संमेलनसंस्कृतीचा अविभाज्य घटक बनला आहे.
संमेलन कुठे भरवायचे इथून वादाला सुरवात होते..अध्यक्ष पदाचा निवडीवरून हा वाद रंगतो आणि चिघळतो.. संमेलनातील कार्यक्रम आयोजनावरून या वादाचे रुपांतर गदारोळात होते, तर पदाधिकार्यांच्या वक्तव्यावरून कधी कधी हा वाद सभ्यतेच्या सर्व सीमा ओलांडतो. वाद आणि साहित्य संमेलन हे एक समीकरणच बनल्याने संमेलन संपल्यानंतरही, अगदी पुढचे संमेलन जाहीर होईपर्यंत ‘वादाचे’ कवित्व आव्ह्यातपणे सुरूच असते.
यंदाच्या यवतमाळात होणाऱ्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी नामवंत कवयित्री अरुणा ढेरे यांची बिनविरोध निवड झाल्यामुळे मराठी संमेलनाला लागलेला वादाचा शाप यावेळी पुसला जाणार, असे वाटत असतानाच उद्घाटकांच्या निमंत्रणावरून संमेलनाच्या सहा दिवस आधी निर्माण झालेल्या वादाने सगळ्या उत्साहावर पाणी फिरवले आहे.
प्रसिद्ध इंग्रजी लेखिका नयनतारा सहगल यांना मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनासाठी आमंत्रित करण्यात आले. मात्र त्यांच्या भाषणाने काहींची गोची होऊ शकते, हे लक्षात आल्यानंतर सहगल यांचे आमंत्रण रद्द करण्याचा असंस्कृतपणा आयोजकांनी दाखविला आहे. एकद्याला आमंत्रित करून नंतर त्यांना ‘येऊ नका’ असे सांगणे मराठी संस्कृतीला निश्चितच शोभा देणारे नाही. मराठी संस्कृती ही ‘अतिथी देवो भव’ मानणारी आहे. आपण अतिथी किंवा प्रमुख पाहुणे म्हणून एखाद्या व्यक्तीला आमंत्रित केल्यावर तिचे स्वागत करणे आणि अपमान न होता ती परत जाणे ही आपली जबाबदारी असते. पण, आमंत्रित करून नयनतारा सहगल यांचे आमंत्रण रद्द करणे, आणी ते माध्यमांमधून जाहीर करणे, ही फार मोठी नामुष्कीची आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीला कलंक लावणारी गोष्ट आहे.
नयनतारा सहगल यांची विचारधारा कोणापासूनही लपून राहिलेली नाही. वास्तविक आणि परखड लिखाणामुळे स्वतंत्र बाण्याच्या बंडखोर लेखिका म्हणून अनेकदा त्या चर्चेत राहिल्या आहेत. त्यामुळे सहगल यांना आमंत्रित करताना आयोजकांनी त्याच्या विचारधारेचा विचार करायला हवा होता. उदघाटनसारख्या एवढ्या मोठ्या जबाबदारीसाठी एकाद्या लेखकाची निवड करताना सदर लेखक कोणता विचारधारेचा आहे.. त्याचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन काय. याचा परामर्श संमेलनं आयोजिकानी घेणे अपेक्षित होते..त्याकडेही दुर्लक्ष केल्या गेले असेल तर ते अधिक गंभीर स्वरुपाचे म्हणावे लागेल, कारण यातून नियोजनातला ढिसाळपणा साहित्य महामंडळाची अकार्यक्षमता दिसून येते.
मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाला इंग्रजीत लिहिणा-या लेखिकेला का बोलावले, असा आक्षेप नोंदवत शेतकरी न्याय हक्क संघर्ष समिती आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने संमेलन उधळून लावण्याचा इशारा दिल्याने हा ‘पळपुटा’ निर्णय घेण्यात आल्याचा ‘पोरकट’ खुलासा आता करण्यात येतोय. वास्तविक, असे प्रश्न उपस्थित केल्या जातील, याचा अंदाज आयोजकांना अगोदरच यायला हवा होता. आणि तसेही आयोजक आता काय राजकारण्यांच्या मर्जीनुसार साहित्य संमेलनातील आमंत्रित ठरविणार आहेत काय?
मनसेने संमेलन उधळण्याचा इशारा दिला, दोन दिवसानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तो मागे घेतला. हे साहित्य संमेलन आहे, कि राजकीय कार्यक्रम. मनसेनं संमेलन उधळण्याचा इशारा दिला होता तर राज्यात कायदा सुव्यवस्था नावाचा काही प्रकार आहे कि नाही? मनसेच्या इशाऱ्यासमोर राज्यातील कायदा व्यवस्था हतबल झाली होती का ? असे अनेक प्रश्न आता साहित्य प्रेमींच्या मनात उठत आहेत. नयनतारा सहगल यांचे आमंत्रण रद्द करण्यात आल्यानंतर अनेक साहित्यिकांनी संमेलनावर बहिष्कार घालण्याचा निर्णय जाहीर केलायं. त्यामुळे मराठी भाषेच्या या दिमाखदार सोहळ्याला गालबोट लागलंय, याची जबाबदारी कोण घेणार, हे आता आमंत्रण रद्द करणाऱ्यांनी जाहीर केलं पाहिजे.
नयनतारा सहगल यांचं आमंत्रण रद्द करण्यामागे निरनिराळ्या अफवा पसरवून दबावाच्या कथा रचल्या जात असल्या तरी त्यांच्या वास्तवदर्शी आणि परखड लिखाणामुळे भाषणामुळे काहींची अडचण होणार होती, हेही कारण या निर्णयामागे असावे. नयनतारा सहगल यांचं संमेलनातील लिखित भाषण सोशल मीडियावर व्हायरल झालंय. स्वातंत्र्य चळवळीतील आपला कौटुंबिक वारसा मांडत सहगल यांनी वर्तमान स्थितीवर परखड मत मांडलंय. कलेवर,साहित्यावर होत असलेले अतिक्रमणं, लेखकांवरील हल्ले, धार्मिकतेच्या नावावर बेभान झालेली झुंडशाही, इतिहासाचं पुनर्लेखन आदी विविध ज्वलन्त आणि तत्कालीन विषयावर सहगल यांनी मत मांडल्याचे समाजमाध्यमात आलेल्या त्यांच्या भाषणावरून लक्षात येते. अर्थात सहगल यांचे विचार हा त्यांचा वयक्तिक अभिव्यक्तीचा मुद्दा समजला तरी साहित्याच्या पंढरीत सहगल यांना आपले विचार मांडण्यापासून रोखणे म्हणजे एकप्रकारे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा संकोच केल्यासारखेच आहे. देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा संकोच केल्या जातोय, हे सहगल यांचं म्हणणं संमेलन आयोजकांनी एकप्रकारे सत्यच केलं नाही का? अर्थात संमेलनात कोणते विचार मांडले गेले पाहिजे आणि कुणाला बोलावले पाहिजे, हे सुचविण्याचा आमचा हेतू नाही. सहगल यांचे विचार त्यांचे वयक्तिक विचार आहेत. त्यावर विश्लेषण हा एक स्वातंत्र्य मुद्दा होऊ शकेल. आमचे म्हणणे इतकेच कि संमेलन आयोजकांनी हात दाखवून अवलक्षण करून घेऊ नये.
साहित्य संमेलनात राजकारण घुसलंय, हे सर्वश्रुत असलं तरी संमेलनाकडे मराठी भाषेचा प्रातिनिधिक सोहळा म्हणूनच पाहिले जाते. त्याचा दर्जा आणि पावित्र्य सांभाळले गेले पाहिजे. कुणालाही बोलवा, अगदी तुमच्या मर्जीतल्या, विचारधारेतल्याच लेखकांना बोलावा. पण मराठी संस्कृतीच्या अब्रूची लक्तरे वेशीवर टांगू नका. अनोळखी व्यक्तीलाही देवासमान वागवावे, हे औदार्य मराठी संस्कृती आपल्याला शिकवते. कितीही वैमनस्य असलं तरी मंगल प्रसंगी येणाऱ्यांचे स्वागत करण्यासाठी आपण पुढे होतो. मग मराठीच्या मंगल सोहळ्यला संकुचितपणाचे गालबोट का? याचा विचार साहित्य धुरणीनीं करायला हवा. मराठी साहित्य संमेलन मराठी भाषेचा एक मोठा सोहळा आहे. त्याच्या आयोजन-नियोजनात राजकारण घुसले तर साहित्य प्रेमी त्यापासून दुरावतील. त्यामुळे संमेलन व्हावे..बिनवादाचे व्हावे..संस्कृती जोपासून व्हावे. यासाठी प्रयत्न झाले पाहिजे.
— अँड. हरिदास बाबुराव उंबरकर
Leave a Reply