पन्नास वर्षांपूर्वी पुणे शहरात, रस्त्यावर हातगाडीवाले भरपूर दिसायचे. त्या काळी चारचाकी हातगाडीवाल्यांचं प्रमाण कमी होतं. या दोन चाकी हातगाडीवरुन कोळशाची पोती, जळणाची लाकडं, धान्याची पोती, प्रिंटींगसाठी कंपोज केलेल्या गॅल्या, कागदांची रिमं, इ. घेऊन जाताना हमखास दिसायची.
लांबलचक लाकडी फळ्यांनी बनविलेली ही हातगाडी बारा ते पंधरा फूट लांबीची असे. त्याला दोन लोखंडी चाकं असत. जर त्यांच्यावर वजनाचा भार कमी असेल तर तो गाडीवान हातगाडी हाताने ढकलत नेत असे. कधी हातगाडी मालाने भरलेली असेल तर तो गाडीला लावलेला पट्टा खांद्याला अडकवून गाडी ओढत जाई.
कोळशाच्या वखारवाल्यांकडे त्यांचच काम करणारे हातगाडीवाले नोकरीला असायचे. कोळशामुळे त्यांचे कपडे काळे झालेले असायचे. भवानी पेठेतील तेलाचे व्यापारी असे हातगाडीवाले कायमस्वरूपी बाळगायचे. त्यांच्याकडून तेलाचे डबे हातगाडीवरुन किरकोळ दुकानदारांकडे पाठवले जायचे.
त्याकाळी शहरातील वाहतूक ही गर्दीची नसायची. त्यामुळे या हातगाड्या मोठ्या प्रमाणात दिसायच्या. या गाड्यांना देखभालीचा खर्च कधीही नसायचा. चाकांना वंगण केलं की, गाडी सहज ओढली जायची.
दुपारच्या वेळेस दमून भागलेले हातगाडीवाले सावली पाहून, डबा खायचे व डुलकी काढायचे. असे हातगाडीवाले तरुणांपासून ते वयस्करांपर्यंतचे, मी घाम गाळताना पाहिलेले आहेत.
पंचवीस वर्षांपूर्वी आम्ही रास्ता पेठेतील ‘दिशावर व्यापार’ या दैनिकाच्या दिवाळी अंकांचं काम करायचो. त्या संपादकाशी गप्पा मारताना त्यांनी आम्हाला सांगितले की, हातगाडी चालविणाऱ्या माणसाची मजुरी, त्याचा कष्टाचा घाम सुकून जाण्याआधी देणं आवश्यक असतं. तो घाम सुकून गेल्यावर देण्यात काहीएक अर्थ नाही. या दैनिकातून सर्व दुकानदारांना रोजचे बाजारभाव कळायचे. मोबाईल आल्यापासून हे दैनिक बंद झालं..
उन्हाळ्यात अशा हातगाडीवाल्यांना भरलेली गाडी ओढताना जिकीरीचं वाटायचं. पावसाळ्यात डोक्यावर पोत्याची खोळ करुन ती पाठीवर सोडलेली असायची व माल भिजू नये म्हणून त्यावर ताडपत्री टाकलेली असायची. हिवाळ्यात मात्र त्यांना कामाचा फारसा शीण येत नसे.
या कष्टकऱ्यांना व्यसन असायचं ते, तंबाखू खाण्याचं. एकदा का ती तंबाखू मळून दाढेखाली ठेवली की, हातगाडीला वेग येत असे. दिवसभर कष्ट केल्यावर धरणीला पाठ टेकली की, हे लगेच झोपी जायचे.
अशी हातगाडी ओढून चरितार्थ चालविणाऱ्या पिढीने आजची अनेक नामवंत व्यक्तिमत्त्वांची पिढी जोपासलेली आहे. त्यांचं आयुष्य कष्टांचं होतं, मात्र त्यांनी आपल्या मुलांसाठी हिरवळ निर्माण केली. अशा हातगाडीवाल्यांमध्ये स्त्रियांचाही सहभाग होता. त्यांनीदेखील आपल्या कुटुंबासाठी कष्ट केलेले आहेत.
कालांतराने हातगाडी इतिहासजमा झाली. आता सगळीकडे चारचाकी हातगाड्या दिसतात. विशेषतः भाजीवाले, केळीवाले, वडापाव, कच्छी दाबेली वाले अशा हातगाड्या वापरतात. मालाची वाहतूक आता टेम्पोतून होते. आता वाहतुकीला रस्ते लहान पडू लागलेत. दोन मोटारी समोरासमोर आल्यावर रस्ता तुंबून जातो. अशा गर्दीत माणसांनाही वाट काढता येत नाही मग हातगाडी कशी चालवता येईल?
हातगाडी चालविणाऱ्यांचे कष्ट हे राबणाऱ्या बैलासारखे होते. तेव्हा बैलगाड्या दिसायच्या त्या बर्फाची वाहतूक करणाऱ्या. बैलांना आणखी एकदा जुंपलं जायचं ते गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीच्या वेळी. चार बैलांच्या ओढणाऱ्या गाड्यावर गणपतीची मिरवणूक निघे. आता मिरवणूकीत शक्यतो बैलगाडीचा वापर केला जात नाही. त्याऐवजी ट्रॅक्टर वापरतात.
पंधरा दिवसांपूर्वी मुंबईत पेट्रोल दरवाढीच्या मोर्चामध्ये एका बैलगाडीवर पंचवीस कार्यकर्ते घोषणा देत उभे राहिले. त्यातील एकाने फोटोसाठी गॅस सिलेंडर हातात घेतला होता. तो फोटोसाठी पोज देत असताना इतक्या माणसांच्या वजनाचा भार सहन न झाल्याने बैलांच्या खांद्यावरील जूला जोडणारा सांधा मोडला.. पंचवीस कार्यकर्ते खाली पडले.. बैल जखमी झाला.. या बुद्धीवानांना एवढेही कळू नये की, मुक्या जनावरांना देखील जीव असतो..
© सुरेश नावडकर.
मोबाईल: ९७३००३४२८४
१७-७-२१.
Leave a Reply