(व्यास क्रिएशन्सच्या प्रतिभा दिपोत्सव २०१६ प्रतिभा नेर्लेकर ह्यांनी लिहिलेला हा लेख)
श्री गणेश हे महाराष्ट्राचं सर्वात लाडके दैवत. भारतातील जे पुराणोक्त २१ गणपती आहेत. त्यापैकी १७ गणपती एकट्या महाराष्ट्रात आहेत. देशभरातील गणपती मंदिरांची संख्या लाखोंच्या संख्येने आहे. दिवसेंदिवस गणेशभक्तांची संख्या वाढतच आहे.
गणपतीचे नुसते नाव जरी घेतले तरी चार हातांच्या गोंडस मूर्तीचे रूप चटकन नजरेसमोर येते. त्यातील एक हात भक्तांना आशीर्वाद देणारा असतो. दुसऱ्या हातात त्याला आवडणारा मोदक असतो. तर उर्वरीत दोन हातांमध्ये पाश, परशु, अंकुश आदी आयुधे असतात. गणपतीच्या बहुसंख्य मूर्ती चार हातांच्याच असून त्याच अधिक पूजिल्या जातात. पण त्यापेक्षा जास्त हात व कमी हात असलेल्या मूर्ती नाहीतच असे नाही. पुराणकथा आणि मूर्तीकाराची कल्पनाशक्ती यामुळे हातांची संख्या कमी-अधिक झाली असावी. माणसांपेक्षा देव श्रेष्ठ ही संकल्पना साकारण्यासाठी शिल्पकाराने कदाचित हातांची संख्या वाढविली असावी. दिवाळी हा आनंदाचा आणि प्रकाशाचा सण. ऐन दिवाळीत गणपतीचा वरदहस्त सर्वांपर्यंत पोहोचावा या उद्देशाने केलेली ही महाराष्ट्राची मुशाफिरी.
• ११ मुखे व २२ हातांची मूर्ती
महाराष्ट्रात सर्वात जास्त म्हणजे तब्बल २२ हात असलेली भव्य गणेशमूर्ती जुहू (मुंबई) येथे आहे. या मूर्तीचे अनोखे वैशिष्ट्य सांगायचे झाले तर तिला ११ मुखे आहेत. जुहू येथे श्री मुक्तेश्वर देवालय हे पुरातन मंदिर असून त्याचा जीर्णोद्धार हेमाडपंथी पद्धतीने झालेला आहे. या मंदिरामागे एक सात मजली इमारत असून प्रत्येक मजल्यावर एका देवतेच्या अनेक रुपांच्या मूर्ती येथे बसविल्या आहेत. तिसऱ्या मजल्यावर गणपतीच्या मूर्ती असून त्यात अष्टविनायक गणपतींचा समावेश आहे. ११ मुखी व त्याच्या दुप्पट हात असलेल्या मूर्तीच्या पायाजवळील उंदीरही पाहण्यासारखा आहे.
• माणसासारखेच दोन हात
सर्वात कमी म्हणजे २ हात असलेल्या गणपतीच्या मूर्ती महाराष्ट्रात एकूण पाच ठिकाणी आहेत. नगर जिल्ह्यात दोन, ठाणे जिल्ह्यात दोन, तर नंदुरबार जिल्ह्यात एक अशी त्याची विभागणी आहे. नगर जिल्ह्यातील पुणतांबा येथे दोन हातांची गणेशमूर्ती अत्यंत सुरेख असून या दोन हातांमध्ये जपमाळ, पानपात्र व मोदक आहे. गणपतीने दोन्ही पायांची मांडी घातलेली आहे.
हा उजव्या सोंडेचा गणपती असून आसनावर दोन उंदीर कोरलेले आहेत. दुसरा दोन हातांचा गणपती प्रवरा संगम येथे असून उजवा हात आशीर्वादात्मक तर डाव्या हातात कमळ आहे. याच गावात रानातला गणपती नावाचे स्थान असून तेथील गणपतीची मूर्तीही दोन हातांची आहे. मुरबाडमध्ये स्वामी पुरुषोत्तमानंदजींनी बालगणेशाची दोन हातांची मूर्ती बसविली असून ती पन्नास वर्षांपूर्वीची आहे.
ठाण्यात विष्णूनगर भागात गोखले मंगल कार्यालयाजवळ दोन हाताची उभी गणेशमूर्ती असून ती १९७३ मधील आहे. धुळे जिल्ह्यातील शहाद्यापासून पन्नास ते पंचावन्न कि.मी. अंतरावर असलेल्या तोरणमाळ या थंड हवेच्या ठिकाणी तोरणेश्वर मंदिरातही दोन हातांची गणपती मूर्ती आहे. माणसालाही दोनच हात असतात. पण दोन हाताच्या गणपतीमूर्तीचे हात माणसाप्रमाणे मोकळे नाहीत.
• डोक्याला नागाचे वेटोळे
अठरा हातांची प्राचीन ज्ञानमूर्ती म्हणून रामटेक येथील गणपती मंदिराचा उल्लेख करावा लागेल. दगडी चौकोनी १६ खांब व त्यावर ३ मीटर लांब दगडी तुळ्या असलेले हे जुने मंदिर आहे. ओळीने असलेले तीन गाभारे व तीनही गाभाऱ्यात गणपतीच्याच मूर्ती हे वेगळेपण नजरेत भरणारे आहे. तिसऱ्या गाभाऱ्यातील मूर्ती अठरा हातांची असून कमळावर दोन्ही पायांची मांडी घालून बसलेली आहे. तीन हात मांडीवर, दोन हात पोटावर, उजव्या हातात कमंडलु व इतर सर्व हातांमध्ये तलवार परशु, गदा, तोमर अशी आयुधे आहेत. डोक्यावर नागाने वेटोळे घातलेले पुढच्या बाजूला ५ फण्या दिसतात. सोंडेला उजव्या हाताने पिळा घातला असून ती पोटावर ठेवलेल्या उजव्या हातातील मोदकावर ठेवली आहे. उजव्या सोंडेच्या गणपतीची ही मूर्ती पहिल्या रघुजींच्या काळात रामसागर खिंडशी तलावात सापडल्याचे सांगतात. रत्नागिरी येथे अठरा हाताच्या गणपतीचे एक मंदिर असून ते अंदाजे ५० वर्षांपूर्वी बांधले असावे. नजिकच्या पेठनाका येथील भक्तीधाम मंदिरातही अठरा हात असलेल्या गणपतीची भव्य मूर्ती आहे.
बारा हाताच्या गणपतीची तांब्याची मूर्ती दांडेकर घराण्यातील देव्हाऱ्यात असून ही पेशवेकालीन मूर्ती तीनशे वर्षांपूर्वीची असावी. वडनेरा येथील बारा हातांची मूर्ती संगमरवरी असून तीन डोळे हे तिचे अनोखे वैशिष्ट्य आहे. बीड जिल्ह्यातील कडा येथे पांडुरंग देशमुख यांच्या घरी बारा हातांची गणेशमूर्ती असून मांडीवर शारदा बसलेली आहे.
• दशभुजा गणपतीची किर्ती दूरवर
महाराष्ट्रातील अनेक प्रसिद्ध गणपती १० हातांचे असून उकोथरूड (पुणे) हेदवी आणि जांभुळपाडा येथील दशभुज गणपतीची किर्ती दूरवर पसरली आहे. जांभुळपाडा येथील र गणेशमूर्ती काळ्या पाषाणाची असून डाव्या मांडीवर लक्ष्मी बसली र असल्याने तो सिद्धलक्ष्मी महागणपती म्हणून ओळखला जातो. च नाशिक येथील दशभुज सिद्धी विनायक मंदिरातील मूर्ती १६२३ मधील असावी. रायगड जिल्ह्यातील गोरेगाव येथे दहा हात असलेली मूर्ती पंचधातूची असून ती अर्धनारीनटेश्वर रुपातील आहे. तिला विद्या गणेश म्हणतात. या गणेशाच्या उपासनेमुळे विद्या लवकर येते व वाचासिद्धी प्राप्त होते असे मानतात. पंढरपूर तालुक्यातील भाळवणी, कर्जत तालुक्यातील कोरेगाव, चांदुरबार तालुक्यातील कारंजा बहिरम, तर चंदपूर येथील महापूर मंदिरात आठ हातांचे गणपती आहेत.
ठाणे जिल्ह्यात ठाणे आणि पालघर जिल्ह्यात डहाणू येथे सहा हातांचे गणपती आहेत. पाचपाखाडी येथील ज्ञानेश्वर मंदिरातील मूर्ती अलीकडील आहे. तर डहाणू येथील मूर्ती देखील आठ-नऊ वर्षांपूर्वीचीच असावी. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीच्या आरंभी ॐकार गणेशाचे स्तवन केले आहे. त्यामध्ये गणेशाला सहा हात असल्याचे सांगण्यात येते.
• देवाचा वरदहस्त असणारे दाम्पत्य
.पुण्याचे मोरेश्वर कुंटे आणि विजया कुंटे या दाम्पत्याने आजवर महाराष्ट्रात लाखो कि.मी. प्रवास बाईकवरून करून १७ हजारावर मंदिरे पाहण्याचा आणि १८ हजारावर फोटो काढण्याचा अफाट आणि अचाट कार्यक्रम केला. लिम्का बुक ऑफ रेकॉर्डस्मध्ये या विक्रमाची नोंद झाली असून त्यांना तसे सर्टिफिकेट मिळाले आहे. विशेष म्हणजे वानप्रस्थाश्रमात त्यांनी हा प्रवास केला असून त्यावरील त्यांचे पुस्तक प्रसिद्ध आहे. देवांना इतके हात का? त्याची माहिती या पुस्तकातून मिळते. त्यांनी महाराष्ट्रातील ८८० गणेश मंदिरे पाहिली असून त्यात चार हातांच्या गणपतीची मंदिरे ९० टक्क्याहून अधिक आहेत. उर्वरित १० टक्क्यात २ हातापासून २२ हात असलेल्या गणपतीचा समावेश आहे.
माणसाला अनेक हात असते तर…
परमेश्वर, ईश्वर किंवा देव ही संकल्पना हिंदू संस्कृतीत वेदकाळापासून आहे. सुरुवातीला हजारो वर्षे देवांच्या मूर्ती नव्हत्या. देवतांच्या स्तुतीपर ऋचा होत्या. जेव्हा-केव्हा मूर्तीपूजा सुरू झाली असेल त्यावेळी मानवस्वरुपी मूर्ती हीच कल्पना साकारली गेली. प्रथम ज्यावेळी मूर्ती बनल्या त्या दोन हातांच्याच होत्या. माणसापेक्षा देव खूप श्रेष्ठ आहे, ही संकल्पना व्यक्त करताना शिल्पकारांना नवनवे धुमारे फुटले असावेत आणि त्यातून बहुहस्त देवतांच्या मूर्ती तयार झाल्या असाव्यात. माणसातील कलाकाराने नवनव्या संकल्पना राबवून देखण्या व आकर्षक मूर्तीना जन्म दिला.
गणपतीच्या व अन्य देवतांच्या बहुहस्त मूर्तीना माणसाने जन्म दिला असला तरी परमेश्वराने मात्र माणसाला दोनच हात दिले हे काम खरोखरच चांगले झाले असे म्हणायला हवे. परमेश्वराने माणसाला दोन डोळे, दोन कान, दोन हात व दोन पाय असले तरी चाल एक अशी ‘एकत्वाची’ भावना माणसाने जपावी ही परमेश्वराची प्अपेक्षा असली पाहिजे. परमेश्वराने आपल्याला दोन कान व एक जीभ दिली ती एवढ्यासाठीच की ‘जेवढे ऐकाल त्याचे निम्मेच – बोला.’ एका कानाने चांगले ग्रहण करा व दुसऱ्या कानाने वाईट असेल ते सोडून द्या असेही देवाला अभिप्रेत असावे.
माणूस आज असा का वागतोय? परमेश्वराची अपेक्षा तो पूर्ण करतोय का? त्याला दोनच हात असूनही तो माझे हात वरपर्यंत पोहोचले असल्याची शेखी मिरवीत आहे. देवासारखे अनेक हात असते तर त्याने काय केले असते कुणास ठाऊक?
-प्रतिभा नेर्लेकर , ठाणे
(व्यास क्रिएशन्सच्या प्रतिभा दिपोत्सव २०१६ ह्या श्री गणपती विशेषांक मधून प्रकाशित)
Leave a Reply