नवीन लेखन...

केसांची निगा – आयुर्वेदाच्या चष्म्यातून

Hair care from the perspective of ayurveda

आरशात बघितलं की सर्वप्रथम आपण आपली केश रचना ठीकठाक करतो. बाजारात कॉस्मेटिक्सच्या उत्पादनांपैकी निम्म्याच्या आसपास उत्पादने केसांसाठी असतात. केसांच्या उत्पादनाच्या जाहिराती पेपर, टी.व्ही., वेबसाईट, होर्डिंग्ज अशा कितीतरी माध्यमातून बघायला मिळतात. अमुक तेल वापरलं तर तळहातावर पण केस येतील अशा जाहिराती काही वर्षांपूर्वी पहाण्यात आल्या. थोड्याच दिवसांत त्या उत्पादनाची वारेमाप विक्री झाली पण लवकरच त्याची हवा गेली. केसांसाठी मनुष्य काय काय करु शकतो, काय काय कमाऊ शकतो आणि काय काय गमाऊ शकतो ह्याची अनेक उदाहरणे देता येतील. अॅडव्होकेट रत्नपारखींची “शेपटा” ही कविता वाचली की लक्षात येईल की एस.एस.सी.ला बसलेल्या एकाचं आयुष्य शुभदा जोशीच्या (काल्पनिक नाव) केसांमुळे कसं उध्वस्थ झालं. तिच्या काळाभोर केसांचा शेपटा बघत अख्खा पेपर बिचार्‍याने कोरा ठेवला.

“एस एस सीस मी बसलो होतो प्रथम परीक्षेस, एकाग्रतेने प्रश्न सोडवा आदेश उपदेशपेपर पहिला, घंटा पहिली, क्षण उत्सुकतेचा, माझ्या पुढती नंबर होता शुभदा जोशीचा

मानेला ती देऊनि झटका नकळत सवईने, लिहू लागली पेपरमधली पानावर पाने

मऊ रेशमी मोहक काळा शेपटीचा भार, तिचा तत्क्षणी येऊनि पडला माझ्या बाकावर

तीन ताशी एकचित्त मी तिच्या शेपटात, एक ओळही लिहिली नाही उभ्या पेपरात

शेवटचीती घंटा झाली आलो भानावरी, कळले आता अपुले जीणे गावी खेड्यावरी

शेतीवरती मोटेवरतो माझी उपजीविका, शिक्षणास मी आज पारखा शुभदा प्राध्यापिका

केसानी त्या गळा कापला अलगदजी माझा, परि बैलांचा पिळुनि शेपटा जगतो हा राजा”

                                             . . . . . . . . कवी – अॅडव्होकेट रत्नपारखी

बायकांना टक्कल का पडत नाही?

शंभरात तीस टक्के पुरुषांना टक्कल पडलेले दिसते. पण स्त्रियांमध्ये हे प्रमाण खूपच कमी आहे. केस गळतात अशी तक्रार बायका करतात खर्‍या पण केस जसे गळतात तसे नवीनही येतात. म्हणून पूर्णपणे कॅरम बोर्ड झालेल्या स्त्रिया सहसा दिसत नाहीत. पित्त वाढल्यामुळे केस पातळ होणे, तांबूस रंगाचे होणे, अकाली टक्कल पडणे ही लक्षणे होतात. पित्त हे रक्तामध्ये निवास करते. मासिक पाळीच्या माध्यमाने दर महिन्यात थोडे रक्त शरिरातून बाहेर पडते. त्यामुळे शरीरातील पित्त दोष चांगल्या प्रकारे नियंत्रणात ठेवण्याची निसर्गाची ही किमया स्त्रियांमध्ये आपोआप घडत राहते. ह्या उलट पुरुषांमध्ये टेस्टोस्टिरॉन नावाचे हॉर्मोन असते. हे हॉर्मोन उष्ण जातीचे असल्यामुळे शरीरात पित्त वाढवण्याचे कार्य करते. ह्या टेस्टोस्टिरॉन चे प्रमाण वाढले तर केस अधिकच गळतात. टेस्टोस्टिरॉन अधिक असल्यामुळे पुरुषांमध्ये कामशक्ती वाढते. म्हणूनच असे बघण्यात येते की टक्कल पडलेले पुरुष तुलनेने कामशक्ती मध्ये जरा अधिक सक्षम असतात. स्त्रियांमध्ये पण हे हॉर्मोन असते पण त्याचे प्रमाण अतिशय अल्प असते.

केसांचे विकार

केस गळणे, कोंडा होणे अणि अकाली पांढरे होणे हे मुख्यत: तीन आजार केसांच्या बाबतीत पहायला मिळतात. वास्तविक ह्यांना आजार म्हणावं का इथपासुनच सुरुवात करुया. डोक्यावरचे जवळपास १० टक्के केस हे सुप्तावस्थेत असतात. ह्याला “रेस्टिंग फेज” असे म्हणतात ह्या रेस्टिंग फेजची जागा सतत बदलत असते. साधारण सहा महिने हे केस रेस्टिंग फेजमध्ये असतात. ह्या काळात त्या केसांना पोषण मिळत नाही आणि पुरेसे पोषण न मिळाल्यामुळे थोड्याशा ताणामुळे ते केस गळून पडतात. मात्र इतर ९० टक्के भागात पोषण सुरु असते म्हणून हे केस वाढतातही. त्यामुळे थोड्याफार प्रमाणात केस गळणे हे नैसर्गिक आहे. त्याला आजार म्हणणे योग्य नाही. हे प्रमाण जर खूप जास्त असेल तर मात्र आजार समजला पाहिजे आणि त्याचे कारण शोधून मग इलाज केला पाहिजे.

दुसरी तक्रार म्हणजे कोंडा होणे, कोंडा हा मुळात केसांचा आजार नसून केसांच्या खालची त्वचा (Scalp) ह्या भागाचा आजार आहे. फंगस नामक जिवाणूंमुळे हा त्वचेचा आजार होतो. अकाली केस पांढरे होणे हा आजार म्हणावा का? हा पण एक समजून घेण्यासारखा विषय आहे. केसांचा मूळ रंग पांढराच असतो. मिलेनिन नावाचे एक काळे रंजक द्रव्य केसाला काळा रंग देते. वय वाढत गेल्यावर हे मिलेनिन निर्माण करण्याची क्षमता कमी होत जाते आणि म्हणून केसांचा रंग पांढरा होऊ लागतो.

Avatar
About डॉ. संतोष जळूकर 34 Articles
डॉ. संतोष जळूकर हे आयुर्वेदिक डॉक्टर असून ते आयुर्वेदिक औषधनिर्मितीच्या व्यवसायात आहेत. त्यांनी अनेक पुस्तकेही लिहिली आहेत.

1 Comment on केसांची निगा – आयुर्वेदाच्या चष्म्यातून

  1. Age 36
    केस खूप गळतात
    कोणतीही औषधे चालू नाहीत
    कोणताही आजार नाही
    कोंडा होतो खूप

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..