माझ्याकडेही आहेत
काही हजार पाचशेच्या नोटा
चलनातून बाद झाल्या तरी
तो माझा पैसा नाहीये खोटा
समारंभात कौतुक होऊन
बक्षिस मिळालेली एखादी नोट
प्रमोशन नंतरच्या पहिल्या
वाढलेल्या पगाराची एखादी नोट
शेवटची आवराआवरी करताना
आईच्या उशाशी सापडलेली नोट
देवळाच्या पाय-या चढताना
सापडलेली एखादी शुभशकुनी नोट
ब्यूटी पार्लरची पायरी चढून
तशीच उतरुन वाचवलेली एक नोट
श्रीगुरुंना गुरुदक्षिणा दिल्यावर
त्यांनी हातात घेऊन परत दिलेली नोट
अशा ह्या हजार पाचशेंबरोबर
इतरही छोट्या छोट्या नोटा आहेत
ह्यात राखीपौर्णिमेच्या
अन् भाउबीजेच्याही नोटा आहेत.
सा-या ठेवल्यायत मी जपून
कधीतरी काढून डोळे भरुन बघते
आठवणींचा उघडतो खजिना
अन् मी त्यात अगदी रमून जाते
ह्या नव्हत्या जमवल्या मी
वेळप्रसंगी उपयोगी पडण्यासाठी
रक्कमही इतकी मोठी नाही
मुलाबाळांच्या कामी येण्यासाठी
हा पैसा काळा नाही,
तर चमकदार, रंगीबेरंगी आहे
चलनातून रद्द झाला असला तरी
माझ्या लेखी तो अमूल्य आहे
नोटा बदलून आणल्या तर
ठेवणीतला सुगंध राहणार नाही
न बदलता ठेवल्या तर
किंमत शून्याच्या वर होणार नाही
विचारात पडलं मन
पैशाचं अवमूल्यन व्हायला नको
अन् आठवणींचा खजिनाही माझा
असा रिक्त, सुनासुना व्हायला नको.
मग पटकन निर्णय घेतला
नोटा बदलून त्याचा खाऊ आणला
आनंद पेरला खूप चेह-यांवर सिग्नलवर खूप मुलांना वाटून टाकला.
अस्मिता शरद देव
ठाणे, दि.२०/११/२०१६.
Leave a Reply