विश्वनाथ शिरढोणकर यांच्या हजार तोंडांचा रावण या लघुकथासंग्रहाची ज्येष्ठ साहित्यिक संजय सोनवणी यांनी लिहिलेली प्रस्तावना.
विश्वनाथ शिरढोणकर हे मध्यप्रदेशात स्थायिक असलेले ज्येष्ठ मराठी साहित्यिक आणि कवी आहेत. हिंदी भाषेतदेखील त्यांच्या अनेक साहित्यकृती प्रसिद्ध आहेत. त्यांच्या लेखनातील सातत्य आणि त्यावरील निष्ठा वाखाणण्याजोगती तर आहेच, शिवाय त्यांनी जे जीवनदर्शन आपल्या साहित्यातून घडवले आहे ते अप्रतिम आहे. मध्यप्रदेशातील समाजजीवन, संस्कृती आणि महाराष्ट्रीय संकृतीचा मिलाफ त्यांच्या साहित्यातून दिसून येतो. मराठी साहित्यिक सहसा आपल्या प्रांताबाहेर पडण्याचे नावच घेत नसल्याने खरे तर त्यांच्या अभिव्यक्तीवर मर्यादा येते. परंतु विश्वनाथ शिरढोणकर यांनी त्या मर्यादा ओलांडून मराठी साहित्याच्या कक्षा रुंदावल्या आहेत.
बृहन्महाराष्ट्रातील मराठी साहित्यिक याबाबत आणि त्यांच्या साहित्य-सेवेबद्दल महाराष्ट्र आजवर कृपण राहिला असल्याचे दिसून येईल, आणि ही अनास्था आजची नाही. १९३८ साली ‘मध्यभारतीय मराठी वाङ्मय’ या कै. कृष्णाजी गंगाधर कवचाळे यांच्या ग्रंथाला लिहिलेल्या प्रस्तावनेत कै. नरहर रहाळकर यांनी लिहिले होते, ‘येथे नको असलेल्या अप्रिय गोष्टींचाही निर्देश करणे काही कारणांमुळे आम्हास अवश्य वाटते. ती गोष्ट म्हणजे आपल्या धाकट्या मालव बंधूविषयी ज्येष्ठ महाराष्ट्रीय बंधूंना वाटणारी अनास्था ही होय… इकडील साहित्यिकांची कुचंबणा होत राहून त्यांना आपले लेखनरूपी साहित्य वाचकांपुढे मांडण्यास आपल्या ज्येष्ठ महाराष्ट्रीय बंधूंकडे धावावे लागते व त्यात अधिकातः वेळा निराशाच त्यांच्या पदरी येते.’ (संदर्भ: अनुबंध, मराठी साहित्य मंडळ, गुलबर्गा प्रकाशित त्रैमासिक-२०१२).
विश्वनाथ शिरढोणकर यांनी आजवर मराठी साहित्याची सेवा करून, उत्तमोत्तम पुस्तके लिहून मराठीचे तेज मध्यप्रदेशातदेखील फाकवले असले तरी त्यांची घ्यावी तशी दखल मराठी साहित्यिकांच्या कंपूंनी घेतलेली नाही हे एक दुर्दैव आहे. ‘हजार तोंडांचा रावण’ या सशक्त कृतीबद्दल तरी असे होणार नाही अशी मला खात्री आहे.
‘हजार तोंडांचा रावण’ हा लघुकथासंग्रह आहे. शीर्षककथेतूनच त्यांनी समाजातील भ्रष्टाचाररूपी रावणाचा आणि अशक्त लोकशाहीचा संघर्ष यासाठी नवी मिथककथा निर्माण करून दाखवलेली आहे. लोकशाहीची नवी मूल्यव्यवस्था समाजात रुजवण्याची आवश्यकता त्यांनी या कथेतून अधोरेखित केलेली आहे. त्यांच्या इतर कथादेखील कधी वैयक्तिक तर कधी सामाजिक सुख-दुःखाचा तळस्पर्शी रंग घेऊन येतात आणि वाचकाला अंतर्मुख करतात. स्वतःच स्वतःशी संवाद करून आपले आहे ते जीवन सुसह्य करण्याची कसरत कशी केली जाते हे ‘गलगले परत आले’ या स्व-संवादात्मक कथेतून दिसते आणि जीवनाची दाहकता अंगावर येते. ‘रडायचं नाही’ ही तर अंतःकरणाला स्पर्शन जाणारी कथा आहे. लेखकाला राजकारण ते समाजकारण हे विषय वर्ज्य तर नाहीच; तसेच, दाम्पत्य-जीवनातील तानेबानेही त्यांना आकर्षित करतात, चिंतन करायला भाग पाडतात. या सर्वातून एकच बाब प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे विश्वनाथ शिरढोणकर या सर्जक व्यक्तीची अस्वस्थता. खरे तर जो अस्वस्थ होत नाही तो कधीच उत्तम साहित्यकृती लिहू शकत नाही. अशा प्रतिभावंताने लिहिलेले साहित्यदेखील वाचकांना पुरेसे अस्वस्थ करू तर शकतेच, ते जगण्याकडे पाहण्याची सशक्त दृष्टीही बहाल करू शकते. विश्वनाथ शिरढोणकर यात पूर्णपणे यशस्वी झालेले आहेत. वाचकांनी या कथा मुळातूनच वाचायला पाहिजेत व आपली दृष्टी विस्तारून घ्यायला पाहिजे.
या संग्रहातील ‘बदली’ ही कथा विशेष लक्षवेधी आहे. कर्मचाऱ्याच्या बदलीचा प्रश्न सोडवण्याऐवजी त्याला अमेरिकेतील ढासळलेली आर्थिक स्थिती ते शेअर मार्केट कोसळणे अशी अनेक कारणे देत राहणारा त्याचा खडूस बॉस आणि एक सहकारी या मध्यवर्ती कल्पनेभोवती फिरणारी ही कथा अगदी खाजगी कार्यालयातील अमानवी व्यवहाराकडे लक्ष वेधते. ही कथा मध्यप्रदेशातील सर्व विद्यापीठांत बी.ए. प्रथम वर्षसाठी (मराठी) पाठ्यक्रमात सामील आहे. या कथेचा हिंदी अनुवादही झालेला असून त्यांच्या ‘डेथ लिव्ह’ या हिंदी कथासंग्रहात प्रकाशित आहे. आकाशवाणीच्या इंदूर केंद्रावरून या कथेचे नाट्यरूपात तीन वेळा प्रसारणदेखील झालेले आहे. यावरून विश्वनाथ शिरढोणकर यांच्या मध्यप्रदेशातील लोकप्रियतेची कल्पना येऊ शकते. त्यांचे आजवरचे अधिकतर साहित्य हिंदीतच लिहिलेले असूनही त्यांनी मराठी माध्यमांशी असलेली आपली नाळ तुटू दिलेली नाही.
या कथासंग्रहालादेखील वाचक उदंड प्रतिसाद देतील आणि बृह-न्महाराष्ट्रातील प्रतिभाशाली साहित्यिकांवर आजवर झालेला अन्याय दूर करतील ही अपेक्षा आहे.
संजय सोनवणी
Leave a Reply