हळदीला आर्केस्ट्रा ठेवलेला, पहाटे साडे तीन वाजेपर्यंत आर्केस्ट्रा चालू होता. साडे अकरा बारा वाजेपर्यंत घरातली लहान पोरं आणि स्त्रिया नाचून नाचून दमले आणि एका मागोमाग एक कमी कमी होत गेले. सव्वा बारा च्या सुमारास गावातले युवा कार्यकर्ते आणि काही कार्यसम्राट नाचायला आले. बघता बघता एक एक जण आर्केस्ट्रावाल्यांच्या स्टेजवर चढू लागला. हळदीला शिजवलेले मटण, डाळ मुंडी आणि चाखण्याला आणलेली पन्नास हजारांची मच्छी, दोन लाखाची दारू पिऊन पिऊन सगळे झिंगायला लागले होते.
स्टेजवर नोटा उडायला लागल्यावर झिंग झिंग झिंगाट गाणे सुरु झाले आणि नोटा उडवणाऱ्यानी बंडलं बाहेर काढायला सुरुवात केली. स्टेज वर उडवलेल्या नोटा गोळा करताना गायक गायिकेच्या नाकी नऊ येऊ लागले, एका गायकाने त्याचे गाणे थांबवून नोटा उचलण्याचाच उद्योग सुरु केला.
नोटा उडवणारे पण कोणाचे लक्ष नाही असं बघून खाली पडलेल्या चार दोन नोटा पुन्हा उचलून स्टाईल मध्ये पुन्हा पुन्हा उडवायला लागले. दोन चार पोरं जागी होती ती पण नोटा मिळवण्याची खटपट करू लागली, काही म्हातारे पण धक्के खात हाताला नोटा लागतात का ते बघत होते.
एक वाजायच्या सुमारास मटण संपल्याची बोंब झाली, मग कोणीतरी अर्ध्या तासात नाक्यावरून चिकन वाल्याला उठवला आणि पंधरा कोंबड्या कापून आणल्या अडीच वाजता परत एकदा दारू ढोसून तर्रर्र झालेले नाचायला लागले, नवऱ्याच्या मित्रांनी त्याला खांद्यावर घेऊन नाचायला सुरवात केली. आर्केस्ट्रा वाले नवऱ्याचा नांव गाण्यात घुसवून ओढून ताणून गाणी गाऊ लागले. नवऱ्याला स्टेजवर नाचवता नाचवता त्याच्या अंगावरचे कपडे मित्रांनी फाडायला सुरवात केली. हळद लागलेले पांढरे सुती कपडे फाडताना मित्रांना खूप आनंद होत होता, नुसते खे खे करून खिदळत होते. मोठा पराक्रम गाजवतायत असं त्यांना वाटतं होते. नवऱ्या मुलाला लग्न काय पुन्हा पुन्हा होणार आहे आणि ही अशी मजा पुन्हा होणार नाही अशा भावनेने आनंद वाटत होता.
मांडवात चाललेला सगळा प्रकार बघून नवऱ्या मुलाचा बाप हताश झाला होता. मुलाला शिकवायला इंग्लिश मिडीयम मध्ये घातला होता, लाखो रुपये शाळेत आणि ट्युशनला घालवून हाती फक्त जेमतेम बारावी पास एवढच यश आले होते. कॉलेजला अर्धवट शिक्षण सोडल्यावर शिकवून फायदा नाही हे बघून कामाला लावण्याचा प्रयत्न केला पण हलकं काम करण्याशिवाय दुसरी कोणतीच नोकरी सापडेना. चुलत्याच्या गोडाऊनला कसाबसा कामाला लावला आणि एकदाचे त्याचे लग्न ठरवले.
लग्न करायचे बोलल्यावर दहा पंधरा लाख कुठून आणायचे तर, त्यासाठी जमिनीचा एक तुकडा विकला. पंचवीस लाख रुपये आल्यावर दहा बारा लाखात लग्न आटपणार या कल्पनेत असणाऱ्या बापाचे पोरा कडचा असूनही साखरपुड्यात साडे तीन लाख संपले. होणाऱ्या सुनेला त्याच्या पोराने चाळीस हजाराचा मोबाईल गिफ्ट दिला, सोने आणि साडीचोळी याच्यात दोन एक लाख रुपये आणि मॅचिंग कपडे लत्ते, मेक अप, बँड बाजा यांच्यात लाखभर रुपये घालवले.
जसजस लग्नाची तयारी सुरु झाली तसं तसं लाख लाख रुपये हातोहात संपू लागले. पत्रिका छापायला साठ हजार आणि त्या वाटायला पन्नास हजार. दाग दागिने पाच लाखावर गेले, हळद लग्न यासाठी ड्रेस कोड नुसार कपडे लत्ते दीड लाखावर, मटण दारू चार लाख, फोटो व्हिडीओ शूटिंग पन्नास हजार,मंडप डेकोरेशन दोन लाख, आर्केस्टा पन्नास हजार, बँड पन्नास हजार, घरातल्या बायकांच्या मेक अप साठी पन्नास हजार. पंचवीस लाखातले पंधरा लाख असेच संपले होते. दहा लाखाची नवी कोरी फोर व्हिलर हळदीच्या दिवशीच आणली होती. एवढं सगळं करून मटण पुरलं नाही जेवण संपले अशी बोंब झालीच.
जमिनीचा तुकडा पंचवीस लाखाला विकून त्या पैशाचा धिंगाणा बघून हताश झालेला नवऱ्या मुलाचा बाप मनातल्या मनात स्वतःच्या वाड वडिलांची माफी मागत होता. त्यांच्या पूर्व पुण्याईने आलेल्या सोन्यासारख्या जमिनीच्या तुकड्याला विकून त्यातून आलेल्या पैशांची झालेली माती त्याला बघवत नव्हती.
कुठल्याही समाजाशी या घटनेचा संबंध जोडू नका, लग्नासाठी सगळेच जमिनी विकतात असे नाही. तसेच कोणी कसा व किती खर्च करावा हा ज्याचा त्याचा वयक्तिक प्रश्न आहे. शेवटी हौसेला मोल नाही.
© प्रथम रामदास म्हात्रे
मरीन इंजिनियर
B. E. (Mech), DME, DIM.
कोन, भिवंडी, ठाणे.
Leave a Reply