नवीन लेखन...

हॅलिफॅक्स बंदरावरील गमती-जमती

 

मी प्रथम समुद्र पाहिला तो….. अरबी समुद्र ! बी.एड्.च्या शिक्षणासाठी एक वर्ष कारवारला होतो. रोज सायंकाळी बीचवर जायचो. दिवसभर उष्णतेने हैराण झालेल्या जिवाला तिथे कांहीसा गारवा मिळायचा. पुढे गोवा, मुंबईला जायचा अनेकवेळा योग आला नि अरबी समुद्राचे दर्शन वारंवार घडत गेले. परंतु महासागराचं महाकाय रूप पहायला मिळालं ते कॅनडामध्येच!

कॅनडाला जशी समुद्र किनारपट्टी लाभली आहे, तसेच सरोवरांचेही वरदान आहे. हॅलिफॅक्सला तरसिटी ऑफ लेक्स’ म्हणूनच ओळखले जाते. हॅलिफॅक्स बंदरावर अटलांटिक महासागराचं दर्शन घडलं नि एक अव्यक्त आनंद झाला. तसे महासागराचे महाकाय रूप इथे पहायला मिळाले नाही, कारण इथे महासागर जमिनीच्या अंतर्भागात शिरल्याने त्याला खाडीचे स्वरूप आले आहे. ही खाडी म्हणजे निसर्गरम्य परिसरात अवतरलेली जलपरीच जणू ! त्याच्या मध्यभागी असलेले छोटे बेट म्हणजे तारुण्यात सळसळणाऱ्या जलपरीच्या भाळावरचा टिळाच शोभावा ! त्यावरचा लाईटहाऊसचा सुंदर टॉवर तिच्या केशसंभारात माळलेला तुराच भासावा ! नाजुक, निळसर लाटांमुळे तिचं सळसळणारं लावण्य अधिक खुलून दिसत होतं.

उसळणाऱ्या लाटा, चित्रपटात पाहिलेला वा पुस्तकात वाचलेला सागराचा रुद्रावतार यावेळी पहायला मिळाला नाही. सागराच्या पृष्ठभागावर सगळेच कसे संथ आणि शांत होते. छोट्याछोट्या लाटा पाठशिवणीचा खेळ खेळत होत्या. ते सुंदर दृश्य पाहून माझे मन आनंद सागरात डुबक्या घेत होते.

‘हारबर वाक’ वरून मनसोक्तपणे फिरत निसर्ग निर्मित हे अद्भूत दृश्य आम्ही पहात होतो. समुद्र आज शांत होता; पण किनाऱ्यावर मात्र जनसागर उफाळला होता. नाना देशाचे, नाना वेशाचे, नाना भाषा बोलणारे,…… रंग़ीबेरंग़ी दृश्य मनाला मोहवित होते. त्यात नव्या ढंगात, नव्या रंगात, नव्या उमेदिने, नव्या संसारात पदार्पन केलेली नवी जोडपी अधिक ! विविध संस्कृत्यांच्या संगमात जणू सगळे एकरूप झालेले. बहूसंख्य इंग्रजी बोलणारे……मराठी किंवा हिंदी बोलणारे कुणी आढळतील या आशेने माझे कान वेध घेत होते नि डोळे धुंडाळीत होते. तशी एक-दोन कुटूंबे भेटली नि आपुलकीचा उबारा मिळाला. विदेशात स्वदेशी लोक अनोळखी असले तरी ते आपले वाटू लागतात. संस्कृतीच्या रेशीम धाग्याने त्यांची नाळ आपल्याशी जोडलेली असते. त्या गर्दीतही आम्ही त्यांच्याशी संवाद साधला. ते कुटूंब होते नागपूरचे. मुलगा सॉफ्टवेअर कंपनीत नोकरीला होता. त्याला भेटावे, नवं जग पहावं म्हणून ते आले होते. एवढ्या मोठ्या जनसमुदयात आपल्याशी मराठी बोलल्याचे ऐकून त्यांनाही आनंद झाला. पुढे तर त्यांचा मुलगाही माझ्या कन्येच्याच आयबीएम कंपनीत नोकरीला असल्याचे समजले.
हॅलिफॅक्स बंदर भुगोलात वाचलं होतं, आज प्रत्यक्ष पहात होतो. किनारपट्टीशेजारी धक्यावर एक-दोन थांबलेली जहाजे, दूरवर समुद्रात पर्यटकांना फेरफटका मारून आनणाऱ्या होड्या, बंदराच्या किनारपट्टीवर हातात हात घालून मौज लूटणारी तरूण जोडपी, कॉफिचे घुटके घेत विविधांगी दृश्ये पहाणारे पर्यटक…… सगळच कस वेगळ, नव-नव वाटत होतं. प्रदेश वेगळा, लोक वेगळे, त्यांची भाषा वेगळी. संस्कृती वेगळी………! सारं कस स्वप्नातल्यासारख ! लहानपणी प्रथमच बाबांच्या बरोबर बेळगावात आलो होतो नि शहरातलं दृश्य पाहून भांबावल्यागत झाल होतं. अगदी तसंच वाटलं ! एका वेगळ्या अनुभवाच्या नि विचाराच्या तंद्रीत असतांनाच कन्येने हाक मारली. माझे त्याकडे लक्ष नसल्याचे पाहून ती पुन्हा म्हणाली,

‘पप्पा ऽ’

मी दचकून प्रश्नार्थक नजरेने तिच्याकडे पाहिले. ती म्हणाली,

‘पाण्यावरून तरंगणारी ती ग्रीन बस पाहिलीत ?’

‘बस नि पाण्यात ?’ मी प्रश्न केला.

‘हो, बस कम बोट !’ तीने पाण्यावरून तरंगणाऱ्या बसकडे बोट करून दाखविले.

बसच होती ती, पाण्यावरून तरंगणारी ! मी कौतुकाने पाहू लागलो.

‘तीच बस आता जमिनीवर येईल नि रस्त्यावरून धाऊ लागेल.’ ती म्हणाली.

सगळेच कसे नवलाईचे ! कांही वेळाने ती बस जमीनीवर आली नि प्रवाशी बसप्रमाणे रस्त्यावरून धाऊ लागली. हिरव्या रंगाच्या या अनोख्या बसने लोकांना समुद्रात होडी बनून जलविहार घडविला नि जमिनीवर बस बनून रस्त्यावरून फेरफटका मारून आनला. बहूरुप्याप्रमाणे पाण्यात नि जमीनीवर रूप बदलणाऱ्या या बसचं मला कौतूक वाटलं. अर्थात हा जादूटोना नव्हता तर विज्ञानाचा चमत्कार होता. या चमत्कारी बसमध्ये बसून एक वेगळा अनुभव घेण्याचा मोह आम्हालाही झाला; परंतु वेळे अभावी ही हौस पूर्ण करता आली नाही.

काठाला लागूनच पाण्यात झुलणाऱ्या फ्लोटींग ट्रॅककडे माझं लक्ष गेलं. कांही पोरं नि थोरंही त्याच्या शेवटच्या टोकापर्यंत गमतीने पळत होती. पाण्याच्या लहरीबरोबर झुलत्या पुलाप्रमाणे तो झुलत होता. त्यावरून फिरण्यात पर्यटकांना एक वेगळा अनुभव आणि आनंदही मिळत होता. फ्लोटींग ट्रॅक म्हणजे पाण्याच्या पृष्ठभागावर तरंगणारा लाकडी मार्ग ! लोखंडी साखळीने किनारपट्टीला त्याला बांधल्याने तो किनाऱ्यालगतच पाण्यावर तरंगत होता. त्याच्यावरून चालतांना झुलत्या पुलाप्रमाणे पर्यटकांना एक आगळा आनंद देत होता. आम्हीही त्यावर उतरलो नि त्याच्याबरोबर झुलण्याची मौज लुटली. एकिकडे दूरवर पसरलेला निळसर महासागर तर दुसरीकडे किनारपट्टीवर पसरलेला रंगीबेरंगी जनसागर ! फ्लोटींग ट्रॅक वरून हे अद्भूत चमत्कार आम्ही आळीपाळीने पहात होतो, त्यातून मन सुखावत होते.

हॅलिफॅक्सच्या मध्यवस्तीतही मी कधी एवढी गर्दी पाहिली नव्हती. अर्थात पुणा-मुंबईची गर्दी पाहिलेल्यांना इथली शांतता अस्वस्थ करील, पण एका मोठ्या दगदगीतून बाहेर पडल्याचा आनंदही देईल. शहरे मोठी पण लोकवस्ती विरळ असेच कांहीसे चित्र ! सगळेच कसे आखीव, रेखीव नि नियोजनबद्ध ! किनारपट्टीवर ही निरव शांतता नव्हती. लोटलेल्या जनसागरातून वाट काढत आम्ही पुढेपुढे जात होतो. एका कोपऱ्यावर तंतूवाद्याच्या तालावर इंग्रजी गीत गाणारा एक तरुण गायक दिसला. त्याचे सुरेल गायन रशीकांना डोलावित होते, त्याच्या शेजारी असलेल्या पात्रात लोक खुश होऊन पैसे टाकीत होते. आपल्याकडे गर्दीच्या ठिकाणी भिक्षा मागणारे लोक हमखास असतात. इथे असला प्रकार मला कुठेच दिसला नाही. अर्थात हा गायक भिक्षा मागत होता, असे मला मुळीच म्हणायचे नाही. तो आपल्या कलेचे प्रदर्शन करीत होता नि लोक खुशीने त्याच्या कलेचे मोल देत होते. एक प्रकारे त्याच्या कलेचा हा गौरवच होता.

आनखी कांहीसे पुढे गेल्यावर एका गोऱ्या युवकाची नाजूक बोटे हार्मोनियमवर लिलया नृत्य करीत होती. त्यातून उमटणाऱ्या स्वरानी साऱ्यांना बेधुंद केले होते. लोक अधूनमधून टाळ्या वाजवून त्याच्या कलेला दाद देत होते. या साऱ्या कलाविष्कारांचा आनंद घेऊन आम्ही पुढे गेलो, तोच मुला-मुलींचे कसरतीचे प्रयोग सुरू असलेले दिसले. लोक कुतूहलाने ते पहात होते. टाळ्या वाजवून त्यांच कौतूक करीत होते. आपल्याकडे यात्रातून असली दृश्ये पहायला मिळतात नि लोक त्याचा आनंद लुटतात; असाच कांहीसा प्रकार !

गोव्याच्या बीचवर विदेशी पर्यटकांना मी पाहिले होते, तसे कांही असभ्य, असंस्कृत प्रकार गोऱ्या युवक-युवतींचे इथेही असतील, हा माझा समज मात्र इथे खोटा ठरला. आम्हा भारतीयांप्रमाणे अंगभर वस्त्रे घातलेले लोक तसे कमीच; पण गोव्याच्या बीचवर विवस्त्र स्थितीत पाहिलेले विदेशी पर्यटक इथे पहायलाही मिळाले नाहीत.

कॅनडात अनेक स्थळांना भेटी दिल्या; परंतु हॅलिफॅक्स बंदराने मला एक वेगळीच मोहीनी घातली. त्यामुळे कधी विरंगुळा म्हणून, तर कधी स्वाभाविक ओढ म्हणून या बंदरावर आलो. प्रत्येक वेळी मला त्याचे वेगळेपण दिसले……कधी समुद्रात निसर्गाची विविध रूपं, तर कधी किनाऱ्यावर लोकांची कलाप्रदर्शनं !

बंदराविषयी अधिक जाणून घेण्याची मनात ओढ होतीच. बंदरावरचे माहिती फलक वाचून थोडीफार माहिती मिळालीही; परंतु तेवढ्यावरून मनाचे समाधान झाले नाही. अटलांटिक महासागराच्या नोव्हास्कोशियाच्या किनारपट्टीवरील हे एक नैसर्गिक बंदर. गेल्या अडीचशे वर्षापासून या बंदरातून समुद्र वाहतूक चालू आहे. उत्तर अमेरिका खंडाचे मुख्य प्रवेशद्वार म्हणूनच त्याची ओळख ! जगातील 150 देश या बंदराने जोडले आहेत. ‘इंटरनॅशनल सी फेअरर्स वेल्फेअर अँड असिस्टन्स नेटवर्क’ या अंतरराष्ट्रीय संस्थेने ‘2015 पोर्ट ऑफ दी ईयर’ पुरस्कार देऊन बंदराचा गौरव केला आहे. यावरूनच या बंदराचे महत्व आमच्या लक्षात आले.

बंदराच्या एका बाजूला ‘फार्मर्स मार्केट’ आहे. कॅनडातील शेती अद्याप पाहिली नव्हती; किमान इथले कृषी उत्पन्न तरी पहायला मिळेल या आशेने आत गेलो. दोन मजली भव्य इमारत. त्यात शेतकऱ्यांनी पिकविलेला भाजीपाला, त्यावर प्रक्रीया करून तयार करण्यात आलेले पदार्थ, दूध, दुधापासूनच्या चीजवस्तूं, मासे, चिकन,……आदी. सारे स्टॉल्स व्यवस्थितपणे मांडले ! कांही तयार खाद्यपदार्थही विक्रीसाठी ठेवले होते. साधारनपणे आपल्याकडे असतो तसाच भाजीपाल्याचा प्रकार! कॅबेज, फ्लॉवर, नवलकोल, बिन्स, भेंडी, बटाटे, दोडकी, रताळी…..इत्यादी ! ढबु मिरची आपल्याकडे असते त्यापेक्षा बरीच मोठी नि विविध रंगी, कांदे नि टोमॅटो एवढाले मोठे, पहातच रहावे असे ! आपल्याकडची भाजी मंडई म्हणजे अस्वच्छता नि कुजलेल्या पाल्याचा दुर्गंध! इथे मात्र कमालीची स्वच्छता, शिवाय मार्केटची इमारतच वातानुकूलितत असल्याने भाजीपाला लवकर कुजण्याची शक्यता कमीच. इथे ग्राहकांचीही मोठी गर्दी होती. आम्ही भाजीपाला खरेदी केला, कांही खाद्यपदार्थांचा आस्वाद घेतला नि विदेशातील एक वेगळा अनुभव घेऊन बाहेर पडलो.

***
कांही अंतरावरील बेडफोर्ड बेस हा सुद्धा हॅलिफॅक्स बंदराचाच एक भाग. दुसऱ्या दिवशी आम्ही फिरण्यासाठी म्हणून या ठिकाणी आलो. विशेषत: सायंकाळच्या वेळी इथे पर्यटकांची गर्दी म्हणता येणार नाही; पण बऱ्यापैकी वर्दळ असते. कांही स्थानिक लोकांनी हौस म्हणून लहान नौका विकत घेतल्या आहेत. विशेषत: सुटी दिवशी संध्याकाळच्या वेळी कुटूंबासमवेत ते इथे येतात नि विरंगुळा म्हणून नौका विहार करतात.

प्रतिवर्षी येथे 1 जुलैला ‘कॅनडा दिन’ साजरा केला जातो. या दिवशी या बीचवर विशेष कार्यक्रमांचे आयोजन असते. योगायोगाने हे कार्यक्रम पहाण्याची संधी मिळाली. त्यातून कॅनडाच्या संस्कृतीचे दर्शन घडले. त्याहीपेक्षा रात्रीच्या फटाक्यांच्या आतशबाजीने मन वेधून घेतले. स्थानिक लोक रात्रीच्यावेळी आपल्या होड्या घेऊन खाडीच्या मध्यभागी जातात व फटाके, हुक्के……आदींची एकाचवेळी आतशबाजी करतात. रात्रीच्या अंधाराला भेदून टाकणाऱ्या या आतशबाजीमुळे समुद्रावर आकाशगंगा अवतरल्याचा भास होतो.
***
बंदरावरचं दृश्य मनाला आनंद देणारं, सुखविणारं आणि ज्ञानात भर टाकणारं होतं. अर्थात आपण जे पहातो, अनुभवतो त्यातून बरच कांही शिकून जातो; परंतु हॅलिफॅक्स बंदरांत वेगळ असं कांहीस आम्हाला मिळालं. त्यात होत ज्ञान आणि मनोरंजनही; परंतु टायटॅनिक जहाजाच्या दुर्घटनेची कथा ऐकून मन तेवढच भारावून गेलं. वाटलं, बुद्धी-कौशल्याच्या जोरावर माणसानं आकाशाला गवसणी घातली तरी त्याच्या कर्तुत्वालाही कुठेतरी मर्यादा ही आहेच. निसर्गाच्या शक्तीपुढे मानवी बुद्धीकौशल्य अपुरे आहे, हेच खरे !

पहिल्या भेटीत बंदरावरील मेरिटाईम म्युझियम वेळेअभावी पहायला मिळाले नव्हते. दुसऱ्या वेळी खास यासाठीच आम्ही पुन्हा बंदरावर आलो. प्रवेशिका घेतल्या नि प्रथम खाडीत उभे असलेले जहाज पहावयास गेलो. जहाजाची बांधणी, इंज़ीन, अंतर्गत व्यवस्था पाहून मी थक्कच झालो. जहाज म्हणजे तरंग़ते घरच होते. स्वयंपाक खोली, डायनिंग हॉल, बेडरूम, स्वच्छतागृहे…..आदी व्यवस्था इथेही होती. जहाजाच्या आतील व्यवस्था व रचना पाहायची माझी ही पहिलीच वेळ. त्यामुळेच असेल कदाचित, या साऱ्या गोष्टींचे मला नवलच वाटले. त्यानंतर आम्ही मेरिटाईम म्युझियम पहायला गेलो.

म्युझियमच्या प्रवेशद्वारावर ठेवलेला आकर्षक लाईट हाऊसचा मॉडेल मन वेधून घेणारा होता. विविध प्रकारची प्रवाशी व मालवाहू जहाजे, लढाऊ जहाजे, वाफेचे इंजिन, पानबुड्या, जुनी शिडाची जहाजे, होड्या, समुद्रप्रवासात वापरावयाचे साहित्य, महासागरात बुडालेल्या जहाजांचे सापडलेले अवशेष…..म्युझियममध्ये ठेवण्यात आले आहेत. सगळ्याच गोष्टी अभ्यासनीय आहेत. पण सर्वापेक्षाही मन हेलावलं ते याच ठिकाणी दाखविण्यात आलेला टायटॅनिक दुर्घटनेचा माहितीपट पाहून!

हॅलिफॅक्स बंदरापासून कांही अंतरावरच आक्राळविक्राळ रूप धारण केलेल्या महासागरांनं हे मानवनिर्मित अजस्त्र जहाज गिळून टाकलं होतं. शेकडो निष्पाप जीवांना जलसमाधी मिळाली होती. वृत्तपत्रातील हे वृत्त वाचले होते. या दुर्घटनेवर आधारीत चित्रपटही पाहिला होता. त्यावेळी मनाची जशी अवस्था झाली होती, तशीच अवस्था माहितीपट पाहिल्यानंतरही झाली. हॅलिफॅक्स बंदर दुर्घटनाग्रस्तांचे मुख्य शोध केंद्र बनले. इथूनच दुर्घटनाग्रस्त जहाजाच्या शोधासाठी दुसरी दोन जहाजं रवाना करण्यात आली. ओळख न पटलेल्या दुर्घटनेतील सुमारे 200 जणांचा दफनविधी याच शहरात तीन ठिकाणी करण्यात आला. ती स्मशानभूमीही पहाण्याचा योग आला. तिथला माहिती फलक वाचून मनाचा पुन्हा थरकाप झाला. ‘पराधीन आहे जगती पूत्र मानवाचा’ हेच खरे !                                           

— मनोहर (बी. बी. देसाई)

बी. बी. देसाई
About बी. बी. देसाई 23 Articles
लेखन : पुनर्वसन कादंबरी, ‘मला भावलेला कॅनडा’ प्रवास वर्णन प्रकाशनाच्या वाटेवर, दैनिक "सकाळ' व "बेळगाव वार्ता'मधून विविध विषयांवर 20 वर्षे लेखन, ज्वाला, जिव्हाळा, अमरदीप दिवाळी अंकातून कथा, लेख व कविता प्रसिद्ध, अमरदीप दिवाळी अंकाचे सात वर्षे संपादक म्हणून कार्य हव्यास : लेखन, वाचन, विविध विषयांवर व्याख्याने, सामाजिक कार्यात सहभाग
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..