दरवर्षी ऑक्टोबर महिन्याच्या ३१ तारखेला अनेक देशांमध्ये `हॅलोविन डे’ साजरा केला जातो. आपल्या भारतात मात्र फारच कमी ठिकाणी हॅलोविन साजरा केला जातो. मुख्य म्हणजे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये हॅलोविन सारखी कोणतीही प्रथा सांगितलेली नाही.
जगभरात हॅलोविन विविध नावांनी ओळखला जातो. जसे की ऑल सेंट्स इव्ह, ऑल हॅलोविन किंवा ऑल हॅलोज इव्ह. हॅलोविन हा दिवस रीफोर्मेशन डे च्या किंवा ऑल हॅलोज डेच्या संध्याकाळी साजरा करण्याची प्रथा आहे. हॅलोविन हा सण सर्व चांगल्या, पुण्यवान, संत-महात्मे, योद्धे, शूर वीर म्हणून जे मृत्यू पावले आहेत त्यांच्या आत्म्यांची आठवण म्हणून साजरा केला जातो. आयर्लंड आणि स्कॉटलंड मध्ये १९ व्या शतकात ह्या प्रथेचा उगम झाला. पुढे ही प्रथा उत्तर अमेरिकेमध्ये पसरत गेली. २० व्या शतकात बऱ्याच पाश्चिमात्य देशांत ह्या प्रथेने आपले पाय रोवले.
युरोपातील सॅल्टिक जातीचे लोक मानतात की, ह्या काळात मेलेल्या नातेवाईकांचे आत्मे आपल्या कुटुंबियांना भेटायला येतात. हे लोक ह्या दिवसाला ‘सॅमहॅन’ देखील म्हणतात. तसेच ह्या प्रथेमागे लोकांची पूर्वी अजून एक श्रद्धा होती की, ह्या दिवशी पूर्वजांच्या आत्मा पृथ्वीवर येतील आणि त्यांना शेतीच्या कामात पीक कापणीमध्ये मदत करतील. म्हणूनच ते भूतांचा पोशाख करायचे, प्राण्यांचे मुखवटे, त्यांची कातडी आणि कवटी घालून रात्रभर नाचायचे, मज्जा करायचे, तो सोहळा आनंदाने साजरा करायचे.
हॅलोविन मध्ये सगळ्यात जास्त पाहायला मिळतात चित्र विचित्र पद्धतीने भीतीदायक वाटतील अश्या रीतीने कोरलेले भोपळे! अमेरिकेमध्ये भल्या मोठ्या भोपळ्यांचे जास्त प्रमाणावर उत्पादन होते. ह्या भोपळ्यांवर भूतांचे असतात असे डोळे, नाक, तोंड कोरले जातात आणि त्यामध्ये जळती मेणबत्ती ठेवली जाते. हे भोपळे घरात आणि आसपासच्या परिसरात लावले जातात. ह्यांना जॅक-ओ-लॅन्टरन्स देखील म्हटले जाते. ह्या दिवशी प्रत्येक घरात भोपळ्याच्या बिया शिजवून खाल्ल्या जातात. भोपळ्याच्या रंगाचे कपडे परिधान करतात. तसेच ह्या दिवशी लोक विविध प्रकारचा भुताचा, पिशाचांचा, चेटकिणीचा, वेश परिधान करून रस्त्यांवर उतरतात. तसेच बरेच जण चांगल्या भूतांचे देखील कपडे परिधान करतात. ठिकठिकाणी हॅलोविन पार्टीचे आयोजन केले जाते.
— संजीव वेलणकर
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
Leave a Reply