आई म्हणोनी कोणी आईस हाक मारी ही कविता वर्गात बाई आम्हाला शिकवत होत्या. त्या आणि आम्हीही रडवेले झालो होतो. आई नसलेल्या एका मैत्रीणीचे रडणे थांबत नव्हते. काळजाला भिडणारी कविता होतीच तशी. पण मला या कवितेत काय आहे हे लक्षात आले नाही…
कारण मला आई होती पण तिने आम्हाला कधी न्हाऊ माखू घालून जोजावले नाही. कधी भरवले नाही. कधी लाड केले नाहीत की मायेने जवळही घेतले नाही म्हणून मायेची उब आम्हा भावंडांना विशेष करून मला कधीच मिळाले नाही. माझ्या वेळी तिला टी बी झाला होता म्हणुन मी बरीच मोठी होई तोवर जवळ ही जाऊ दिले नाही. लहानपणी लग्न झाले होते. वडिल नेहमीच बाहेर गावी सगळे काका काकू करायचे. ती अबोल एकटीच बसून रहायची. जेवढे जमेल तेवढे काम करणे. आतल्या आत झुरत होती. तिच्या चेहर्यावर हसू आनंद कधीच नाही. आणि आमच्या मनात देखिल तिच्या साठी कधीच काही वाटत नव्हते. जेंव्हा आम्ही बहिणी आई झालो तेव्हा तिच्या बद्दल माया प्रेम निर्माण झाले. शेवटच्या काळात तर ती नेहमीच डोक्यावर पांघरूण घेऊन झोपायची. तिला कारण विचारले तर म्हणायची मला खूप सुरक्षित वाटते पांघरूण घेऊन झोपल्यावर. तिच्या मनात कुठेतरी खंत. भिती. काळजी. दबलेल्या भावना असे काही तरी असावे. आवडनिवड. नटणे. सहभागी होणे. मनमोकळेपणा असे काहीही नाही. यंत्रागत होती. ती गेल्यावर माझ्या मनात कायम एक गोष्ट लक्षात आली की ती आई होती पण तिला आईपण भोगता आले नाही. आजारपण. एकटेपणा. स्वतः ला गौण समजणे अनेक गोष्टी आहेत….
मातृदिनाच्या दिवशी अनेकांनी लिहिलेल्या आठवणी वाचून मी खूपच अस्वस्थ झाले होते. आई होती पण तिची माया प्रेम मिळाले नाही. बाकीच्या गोष्टी नाहीच. असो मला लिहायला जमले नाही म्हणून आईचे उपकार कधीच विसरणार नाही. उलट मीच तिला समजून घेतले नाही. याचेच खूप खूप वाईट वाटते. तिला व्यक्त होता आले नाही म्हणून तिची माया प्रेम कमी होती असे नाही. परिस्थितीने ती हतबल होती. पण तिचा आशीर्वाद आहे म्हणूनच मी आयुष्यात खूप काही करु शकले.
धन्यवाद.
— सौ. कुमुद ढवळेकर.
Leave a Reply