” तुम्हाला किष्किंधा नगरी पहायची आहे की विजयनगर पाहायचे आहे ?”
हम्पीला गेल्यावर गाईडने विचारले , आणि आम्ही संभ्रमात पडलो .
पण काहीतरी उत्तर द्यायलाच हवे होते . मी त्याला विचारले ,
“असा फरक का करतोयस तू ? त्रेता युगात जी नगरी किष्किंधा नावाने प्रसिद्ध होती , ती तेराव्या शतकात विजयनगर साम्राज्य म्हणून प्रसिद्ध होती .”
तो हसला , म्हणाला ,
” येणाऱ्या पर्यटकांना काय सांगायचे आणि हंपी तील काय काय दाखवायचे याचा अंदाज घेण्यासाठी मी विचारले .”
” माझ्या जवळ दोन दिवस आहेत आणि मला ऐतिहासिक आणि पौराणिक अशी सगळी स्थळे , माहिती हवी आहे .”
मी स्वच्छ सांगून टाकले .
आणि पुढचे दोन दिवस मी हंपी पाहत होतो , ऐकत होतो …
गाईड , वस्तू , वास्तू दाखवत आमच्यासमोर इतिहास उलगडत होता . त्याच्या सांगण्याच्या शैलीमुळे इतिहास जिवंत होत होता , नजरेसमोर तरळत होता .
हनुमानाच्या किष्किंधा नगरीमुळे संपूर्ण रामायण दृश्यमान होत होते .
मंदिरे , बाजार , पुष्करणी, पत्थर सेतू, सरोवर, पहाड, गजशाळा , विरूपाक्ष मंदिर, महाल परिसर,मातंग पर्वत, विजय विजयविठ्ठ्ल मंदिर अशी असंख्य स्थळे, तुंगभद्रा नदीचे विशाल पात्र, त्यातील मोठ्या परातीच्या आकाराच्या होड्या ( कोरक्कल), त्यातून केलेला जलविहार…
सगळं काही पाहिलं.
पण…
पर्यटन केल्यानंतर मिळणारा आनंद , होणारे समाधान …
काहीतरी हरवल्या सारखं वाटत होतं.
हुरहूर तर वाटत होतीच , पण एकाच वेळी दुःख , संताप , चीड , त्वेष , हतबलता आणि कणव सुद्धा मनात दाटत होती .
मंदिरे होतीच . अतिशय देखणी . कलात्मक. समृध्दी आणि संस्कृती यांचं नातं सांगणारी. भव्य. विशाल. एकाच पाषाणात कोरलेली. कलाकारांच्या दिव्य प्रतिभेचा साक्षात्कार सांगणारी. गुणग्राहक असणाऱ्या सर्व महाराजांच्या कलासक्ततेचा , दिलदार मनाचा , सांस्कृतिक वारसा पुढे नेण्यासाठी केलेल्या प्रचंड खर्चाचा प्रत्यय देणारी .
पाषाण सुद्धा ज्यांच्या कारागिरी समोर मऊसूत व्हावा अशी वास्तू कला , शिल्पकला .
नैसर्गिक प्रवाहांचा वापर करून निर्माण केलेली उद्याने.
प्रत्येक मंदिरासमोर सोन्याचांदीचे , घोड्यांचे , मसाल्याचे , वस्त्रप्रावरणांचे आखीव रेखीव बाजार.
एका विशिष्ट जागेसमोर गणिकांचा ही बाजार .
सर्व काही पूर्वनियोजित . प्रजेचा ,सैन्याचा विचार करून उभारलेले विजयनगरचे साम्राज्य.
मग तरीही अस्वस्थता का होती ?
कारण संपन्न साम्राज्यावर मुघल आक्रमक तुटून पडले.
एकदा नाही ,अनेकदा.
संपत्ती , सुंदर स्त्रिया लुटून नेल्या.
एकदा नाही ,अनेकदा.
चंदना पासून बनवलेले जे जे काही होते ते लुटून नेले , जे नेता आले नाही ते जाळून टाकले.
एकदा नाही ,अनेकदा.
महाकाय गणपती , उग्र नरसिंह, प्रचंड आकाराचे शिवलिंग , विठ्ठ्ल ,राम यांच्या कोणे एके काळी विलक्षण सुंदर असणाऱ्या देवादिकांच्या मूर्ती छिन्न विच्छिन्न केल्या होत्या.
एकदा नाही, अनेकदा.
ऐकताना भयंकर वाटत होतं.
मनात चीड निर्माण होत होती.
मुठी त्वेषानं वळत होत्या.
आपण पर्यटनाला आलो आहोत हे विसरून जायला झालं होतं.
पण एक विलक्षण गोष्ट गाईड सांगत होता .दाखवत होता.
जिथे जिथे विष्णुच्या वराह अवतारातील मूर्ती होत्या , त्यांना आणि त्या मंदिरांना मुघल आक्रमकांनी हात लावला नव्हता .
हंपी खूप पाहिलं .खूप ऐकलं.
पण मनात गाईड चं एक वाक्य घुमत होतं ;
तो सांगण्याच्या नादात एकदम म्हणून गेला ,
फितुरीने घात केला विजयनगर चा , आणि आपल्या संस्कृतीचा सुद्धा !
तो कदाचित सहज म्हणून बोलून गेला असावा , पण भारताची शेकडो वर्षांची दुर्दशा व्यक्त झाली होती.
मित्रानो , केव्हा तरी जा हंपी पहायला . पर्यटन म्हणून नव्हे , तर फितुरीचे परिणाम काय होतात ते पहायला जा आणि पुढच्या पिढीला सावध करा .
— डॉ. श्रीकृष्ण जोशी , रत्नागिरी.
Leave a Reply