आमच्या जहाजाच्या बाजूला एक इंडोनेशियन जहाज उभे होते. समुद्रात एका जेट्टीच्या दोन बाजूंना दोन्ही जहाजे बांधली होती. दोन्ही जहाजांच्या मध्ये सत्तर एंशी मीटरचे अंतर असेल. आमच्या जहाजातील क्रूड ऑइल कार्गो बाजूच्या जहाजात ट्रान्सफर केला जात होता. रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास कार्गो पंप बंद करून कार्गो ऑपरेशन संपले म्हणून मी केबिन कडे जायला निघालो. जहाजाच्या पुप डेक वर म्हणजे सगळ्यात मागील भागावरील डेक वर मासे पकडण्यासाठी इंजिन डिपार्टमेंट मधील एक मोटारमन आणि डेक वरील पंपमन ने समुद्राच्या पाण्यात गळ सोडले होते. दोघांपैकी कोणीतरी एकजण असला तर थोडा वेळ मासे पकडू आणि झोपायला जाऊ असा विचार करून मी पुप डेक वर गेलो.
दोघांनी मिळून जहाजाच्या रेलिंगला चार पाच ठिकाणी गळाच्या दोऱ्या बांधल्या होत्या. सगळ्या दोऱ्यांना ते दोन गाठी मारायचे की एखाद्या गळाला मासा अडकला की त्या माशाच्या हिसक्याने दोन पैकी एक गाठ सुटायची आणि राहिलेली दुसरी गाठ घट्ट व्हायची.
ज्या गळाला एकच गाठ असायची त्या गळाला मासा अडकलेला असायचा. प्रत्येक वेळी कुठल्या गळाला मासा अडकला आहे हे बघण्यासाठी गळाची दोरी पाण्या बाहेर ओढून मासा अडकला आहे की नाही हे बघायची गरज नसायची.
मी पुप डेक वर गेलो असता तिथे कोणीच नव्हते. इंजिन रुम मधील मशिनरीचा आवाज आणि जनरेटर ची घरघर तेवढी ऐकू येत होती. बऱ्यापैकी वारा असल्याने लाटा उसळत होत्या आणि जहाजाला धडकत होत्या त्यांचा सळसळ आवाज सुद्धा ऐकू येत होता. आमच्या आणि बाजूच्या जहाजावरील लाईट समुद्रात पडली होती त्यात ज्या लाटा दिसत होत्या तेवढ्याच बाकी समुद्राच्या लाटांवर पडलेल्या प्रकाशाच्या पलीकडे एकदम काळा कुट्ट अंधार. दूर दूर पर्यंत दाट गडद काळोख. वाऱ्याचे घोंघावणे कानात घुमत होते. एका गळाला एकच गाठ होती. एक तरी मासा आज अडकला म्हणून मी गळाची दोरी ओढायला गेलो. गळाची दोरी ओढायला सुरुवात केली तसे हाताला हळुवार हिसके बसायला लागले.
दोन एक किलोचा मासा असेल तर गळाच्या दोरीने अलगद ओढला तरी बाहेर येतो. जहाजाचा मेन डेक पाण्यापासून वीस पंचवीस फूट वर असतो त्यामूळे गळाला अडकलेला मासा चांगलाच गुंतला असला तर ठीक नाहीतर कधी कधी मासे हिसके देऊन गळातून निसटून जातात. कधी कधी पाण्याच्या बाहेर येऊन वर ओढताना वजनाने किंवा पाण्याबाहेर येताना तडफडताना खाली पडतात. तसे होऊ नये म्हणून एका दोरीला जाळी बांधलेली असते ती जाळी खाली सोडून गळाला अडकलेल्या माशाला त्या जाळीत घ्यायचे आणि विहिरीतून बादलीतून पाणी काढावं तसे माशाला जाळीत घेऊन दोरीने वर ओढले जाते.
जसं जसा मी दोरी ओढू लागलो तसतसा गळाला अडकेलेला मासा जोराने हिसके देऊ लागला. बहुधा मोठा मासा गळाला लागला असेल आणि आता दोरी बांधलेल्या जाळीने त्याला वर ओढावे लागेल. हे एकट्याला न जमणारे काम होते.कोणाला तरी मदतीला बोलवावे लागणार होते. मला तहान लागली होती, मेस रुम मध्ये जाऊन पाणी पिऊ तिथे कोणी असला तर त्याला बोलावू नाहीतर खाली इंजिन रुम मध्ये फोन करून गळ लावणाऱ्या मोटरमनला बोलावून घेऊ म्हणून मी मेस रुम कडे जाणाऱ्या जिन्याने वर चढू लागलो. जिन्यावरून वर चढता चढता माझी नजर बाजूच्या जेट्टी वर लागलेल्या जहाजाकडे गेली. त्या जहाजाचा पूप डेकवर मला जे दृश्य दिसले ते बघून मला कुतूहल वाटले. रात्रीचे बारा वाजायाला आले होते आणि तिथं पलीकडल्या जहाजावर एक स्त्री समुद्रात गळ टाकत होती. आमच्या जहाजावर आम्ही तिघे भारतीय सोडले तर बाकीचे सगळेजण इंडोनेशियनच होते. पण आमच्या जहाजावर कोणालाच फॅमिली मेंबर्स ना आणता येत नव्हते. बाजूच्या जहाजावर कदाचीत आणता येत असेल म्हणून कुठला तरी अधिकारी त्याच्या बायकोला घेऊन आला असेल असे वाटले.
माझ्या प्रमाणे त्या जहाजावर पण कोणी खलाशी किंवा अधिकारी रात्री बारा वाजता गळ टाकून मासे पकडताना दिसला असता तर मला काही वाटले नसते. पण त्या स्त्रीला बघून मला विचित्र वाटले, मी तिच्या सोबत कोणी आहे का ते शोधू लागलो. पण तिथं कोणीच तिच्या आजूबाजूला दिसेना. तेवढ्यात तिच्या हातातील गळाच्या दोरीला मासा अडकला आहे असं जाणवले. ती जोर लाऊन दोरी ओढू लागली. वाऱ्यावर तिचे मोकळे सोडलेले केस उडत होते. गाऊन सारखा लाल भडक ड्रेस तिने घातला होता. तिचा गोरा रंग, लांब केस आणि अंगावर असलेला लाल गाऊन सोडला तर तिचा चेहरा, तिचं रूप यापैकी काहीही सत्तर एंशी मीटर वरुन दिसत नव्हते. फक्त ती एक स्त्री आहे एवढंच दिसत होते.
ती जोर लावून गळाची दोरी ओढत होती. दोरी पण ताणली गेली होती. मला नीटस दिसत नसल्याने मी धावत धावत अकोमोडेशनच्या मागच्या जिन्यांनी धावत सुटलो. काही सेकंदात मी पाच मजले चढून नेवीगेशन ब्रीज वर गेलो.
तिथून दुर्बीण घेतली आणि त्या दुर्बिणीतून समोरच्या जहाजावरील त्या स्त्री कडे बघू लागलो. कार्गो ऑपरेशन असल्याने वर नेवीगेशन ब्रीज वर कोणीच नव्हते. नेवीगेशनल ऑफिसर खाली कार्गो कंट्रोल रूम मध्ये कार्गोचे पेपर वर्क करत होते.
दुर्बिणीतून त्या स्त्रीकडे बघत असताना तिला गळाची दोरी ओढताना किती जोर लावून ओढावे लागत होते ते स्पष्ट दिसू लागले. तिच्या हाताला लांब आणि नाजूक बोटं दिसत होती. तेवढ्यात मला तिच्या गळाला अडकलेला मासा पाण्याच्या बाहेर येऊन तडफडत असल्याचे जाणवले जहाजावरील लाईट चा खाली अंधुक असा उजेड होता. मी ती स्त्री ओढत असलेल्या गळाच्या दिशेने पाण्याकडे दुर्बीण फिरवली. माझा माझ्या डोळ्यांवर विश्वास बसेना, मला जे दिसले ते बघून मी एकदम हादरलो. खाली पाण्यातून दोन हात बाहेर आले होते. मी पुन्हा त्या स्त्री कडे दुर्बीण वळवली. तर ती स्त्री हसताना दिसली. मी दुर्बिणीच्या लेन्स ला पुन्हा नीट सेट केले आणि पुन्हा खाली पाण्यात पाहिले, पाण्यात पांढरा युनिफॉर्म घातलेला एक पुरुष तडफडत होता त्याच्या खांद्यावर तीन सोनेरी पट्ट्या होत्या. सेकंड इंजिनिअर किंवा चीफ ऑफिसरच्या असतात तशा. त्याच्या तोंडातून रक्त निथळत होते. माशांसाठी लावलेला गळ त्याच्या जबड्यात अडकला होता. तो जिवाच्या आकांताने ओरडत होता पण त्याचा आवाज ऐकू येत नव्हता. मी पुन्हा त्या स्त्री कडे दुर्बीण फिरवली, त्या स्त्रीच्या डोळ्यातून आता रक्त वाहायला लागले होते. तिच्या हसणाऱ्या गालांवरुन डोळ्यातील रक्त अश्रुंसारखे खाली ओघळत होते. मी कधी त्या स्त्री कडे कधी खाली पाण्यात असं दुर्बिणीतून बघत होतो. खाली पाण्यात जिवाच्या आकांताने तडफडणारा पुरुष आणि वर विकट हसणारी आणि त्या तडफडणाऱ्या पुरुषाला धरून ठेवणारी लाल गाऊन मधील ती गोरीपान स्त्री. मला समोर काय घडतंय, मी काय बघतोय, खाली पाण्यात तडफडणारा पुरूष ओरडतो आहे पण त्याचा आवाज का नाही येत, मी एखाद्या भयानक स्वप्नात तर नाही ना असे अनेक प्रश्न मला सतावू लागले. इतक्यात खाली पाण्यात युनिफॉर्ममध्ये तडफडणारा गळाला अडकलेला पुरूष जोराने हिसके देऊ लागला, त्याला एव्हढा वेळ ओढणारी स्त्री जहाजाच्या रेलिंग कडे झुकू लागली, तिचा तोल गेला आणि ती धाडकन पाण्यात पडली. पाण्यात पडल्यावर पाणी उडाले पण आवाज आला नाही.
मी दचकून खाली कार्गो कंट्रोल रूम कडे पळत सुटलो. माझे अंग घामाने भिजले होते. खाली कार्गो कंट्रोल रूम मध्ये कॅप्टन,चिफ ऑफिसर, सेकंड ऑफिसर आणि ऑईल कंपनीचे दोघे जण असे पाच जण होते. मी त्यांच्याजवळ धापा टाकतच गेलो आणि एका दमात जे बघितले ते सांगून टाकले. तोवर घड्याळात रात्रीचे बारा दहा झाले होते. कार्गो कंट्रोल रूम मध्ये कॅप्टन सोडून बाकी सगळे इंडोनेशियन होते. मी एव्हढा घाबरलेल्या अवस्थेत त्यांना हा प्रकार सांगितला पण त्यांना त्याच्यात गांभीर्य वाटले नाही. सगळे गालातल्या गालात हसू लागले. मी त्यांच्याकडे बघून अजून बेचैन झालो.
मी ह्यांना काय सांगतोय आणि हे हसतायत गालातल्या गालात. सेकंड ऑफिसर बोलला डोन्ट वरी इट्स अ हांतु.
मी विचारले व्हॉट इज हांतु, त्यावर तो पुन्हा म्हणाला इट्स अ हांतु इस्त्री बारु. कॅप्टन सांगू लागला, की अरे तू भूत बघितले आहेस. हांतु इस्त्री बारू म्हणजे नव्या बायकोचे भूत. नव्या बायकोचे भूत हा काय प्रकार आहे. चिफ ऑफिसर ने त्या स्त्री ने तुला हाय केले का असं विचारलं. मी म्हटलं नाही. मग तो म्हणाला ती बऱ्याच जणांना दिसते. आता एक लक्षात ठेव असं कोणी जहाजावर अनोळखी दिसले आणि त्यांनी हाय केले की आपण पण त्यांना हाय करायचे. त्यांनी हाऊ आर यू विचारले की आपण आय एम फाईन,हाऊ आर यू असं त्यांना विचारायचे.
इथली भुतं काही करत नाहीत, त्यांच्याशी चांगले वागले की ते आपल्याला त्रास देत नाहीत. त्यांच्या त्यांच्या जगातच असतात ते. दुसऱ्या दिवशी संपुर्ण जहाजात मला सगळे यू सीन हांतु इस्त्री बारु म्हणून विचारू लागले. मी या नवीन बायकोच्या भुताबद्दल इंडोनेशियन थर्ड इंजिनिअरला विचारले. त्याने असे सांगितले की, बाजूला जे जहाज आहे त्याच्यावर पाच वर्षांपूर्वी एका चीफ ऑफिसर ने त्याच्या नवीन बायकोला आणले होते. इकडे इंडोनेशियात सर्रास दोन तीन लग्न करतात. त्याच्या पहिल्या बायकोला या लग्नाविषयी माहिती नव्हते पण जेव्हा तिला कळले तोपर्यंत तो नवीन बायकोला घेऊन जहाजावर आला होता. त्याच्या पहिल्या बायकोने त्याला फोनवर काय धमकी दिली माहिती नाही पण चीफ ऑफिसर जहाजावर आल्याचा दुसऱ्या दिवशी सकाळी त्याची बायको जहाजावरुन नाहीशी झाली होती. तिने आत्महत्या केली की यानेच तिला समुद्रात अंधाऱ्या रात्री ढकलून दिले याचा शोध लागलाच नाही.
गेल्या पाच वर्षांपासून तो चीफ ऑफिसर आणि त्याची नवीन बायको कोणाला ना कोणाला दिसत असते. ते जहाज आपल्या जहाजातून नेहमी कार्गो न्यायला येत असल्याने आपल्या जहाजावर सगळ्यांना ही गोष्ट माहिती होती. तुम्हाला कोणाकडून ऐकून माहिती होण्यापेक्षा अनुभवातून माहिती झाली त्यामुळे आता घाबरू नका. कोणी हाय केले तर हाय करा, कसे आहात विचारले तर मी मजेत तुम्ही कसे आहात असे विचारा.
टीप:
इंडोनेशियन भाषेत,
हांतु – भूत
इस्त्री – बायको
बारू – नवीन
(हांतु इस्त्री बारू म्हणजे नवीन बायकोचे भूत )
कथा काल्पनिक असली तरी भुतांच्या बाबत बरेचसे प्रसंग हे जहाजावर ऐकण्यात आले आहेत.
प्रथम रामदास म्हात्रे
मरीन इंजिनिअर
कोन, भिवंडी,ठाणे.
Leave a Reply