म्हणावयास व समजण्यासही सोपे असे आर्या वृत्तात रचलेले हे स्तोत्र फक्त पाच श्लोकांचे आहे. हनुमान या दैवताचे स्थान महाराष्ट्रात फार मोठे असल्याने या स्तोत्रासंबंधी अधिक माहिती देण्याची आवश्यकताच नाही.
वीताखिल-विषयेच्छं जातानन्दाश्र पुलकमत्यच्छम् ।
सीतापतिदूताद्यं वातात्मजमद्य भावये हृद्यम् ॥ १॥
मराठी- ज्याच्या ऐहिक वासना नाहीशा झाल्या आहेत, जो आनंदाश्रूंमुळे रोमांचित झाला आहे, श्रीरामाचा जो प्रथम दूत आहे, त्या अत्यंत पवित्र पवनसुत (हनुमानाला) मी मनोमनी स्मरतो.
नष्ट वासना, अश्रू आनंदाचे, रोमांचित होई
रघुनाथाचा पहिला दूत मारुती पावन मम हृदयी ॥ १
टीप- भक्तियोगात वर्णिलेले अष्ट सात्विक गुण असे आहेत- स्तंभ, खेद, रोमांच, स्वरभंग (वैखर्य), कंप, वैवर्ण्य, अश्रुपात, प्रलय.
तरुणारुणमुख-कमलं करुणा-रसपूर-पूरितापाङ्गम् ।
सञ्जीवनमाशासे मञ्जुल-महिमानमञ्जना-भाग्यम् ॥ २॥
मराठी- नुकत्या उगवलेल्या सूर्यबिंबाप्रमाणे ज्याचे वदनकमळ आहे, ज्याचे कटाक्ष करुणेने ओतप्रोत भरलेले आहेत, जो (लक्ष्मणाचे) पुनरुज्जीवन आहे (ज्याने लक्ष्मणाला संजीवन दिले), ज्याचा महिमा प्रांजळ आनंदकारक आहे, अशा अंजनीचे भाग्य असणा-या मारुती(च्या कृपे)ची मी आशा करतो.
नव रविसम मुखकमळा, नेत्री वाहे प्रवाह करुणेचा ।
आशा उत्थानाची, प्रांजळ महिमा मनी मारुतीचा ॥ २
शम्बरवैरि-शरातिगमम्बुजदल-विपुल-लोचनोदारम् ।
कम्बुगलमनिलदिष्टम् बिम्ब-ज्वलितोष्ठमेकमवलम्बे ॥ ३॥
मराठी- ज्याचा वेग मदनाच्या बाणापेक्षा अधिक आहे, ज्याचे कमळाच्या पाकळीप्रमाणे विशाल डोळे सौम्य (करुणेने भरलेले) आहेत, ज्याचा कंठ शंखासमान आहे, जो वायूचे (आपल्या वडिलांचे- मारुती वातात्मज आहे) सद्भाग्य आहे, ज्याचे ओठ बिंब फलाप्रमाणे लाल आहेत, अशा एकमेव मारुतीचा मी आसरा घेतो.
मदन शराहुन वेगे, कमलदलासम विशाल मृदु डोळे ।
लाल ओठ, शंखासम मान, आसरा पवन प्राक्तनी मिळे ॥ ३
टीप- ‘शम्बरवैरि-शरातिगम्’- शंबरारी हे श्रीकृष्णाच्या अनेक नावांपैकी एक. त्याच्या बाणापेक्षा अधिक वेगवान. रामरक्षेत मारुतीचे वर्णन मनोजव म्हणजे मनाच्या वेगाने जाणारा असे आहे. श्रीकृष्ण हा धनुर्धारी असल्याचे उल्लेख फारसे नाहीत. तथापि तो ‘अनंगरंगसागर’ (पहा शंकराचार्य विरचित श्रीकृष्णाष्टक) असल्याने शंबरारि हा शब्द मदन या अर्थी वापरला असावा.
दूरीकृत-सीतार्तिः प्रकटीकृत-रामवैभव-स्फूर्तिः ।
दारित-दशमुख-कीर्तिः पुरतो मम भातु हनुमतो मूर्तिः ॥ ४॥
मराठी- सीतेचे दुःख दूर करणारा, श्रीरामाच्या राजवैभवाचे दर्शन घडविणारा, रावणाची ख्याती धुळीला मिळवणारा, देदीप्यमान हनुमान माझ्या समोर मूर्तिमंत प्रकट होवो.
शमवी सीता शोका, राम गौरवा प्रकट करी जगती ।
नामोहरम दशानन, समोर झळको आंजनेय मूर्ती ॥ ४
वानर-निकराध्यक्षं दानवकुल-कुमुद-रविकर-सदृशम् ।
दीन-जनावन-दीक्षं पवन तपः पाकपुञ्जमद्राक्षम् ॥ ५॥
मराठी- वानर समूहाचा प्रमुख, राक्षसकुल रूपी रात्रकमळासाठी जो सूर्यासमान आहे (सूर्योदयानंतर रात्रकमळ कोमेजून जाते), ज्याने दीनांच्या रक्षणाचा वसा घेतला आहे, जो वायूच्या तपश्चर्येची सच्ची राशी आहे, अशा मारुतीला मी पाहिले.
कपि मुख्या मी पाही, रवि राक्षस-कुल-कुमुदा, ज्यास वसा
दुबळ्या जनांस राखी, राशी वायूतपास शोभेसा ॥ ५
एतत्-पवन-सुतस्य स्तोत्रं यः पठति पञ्चरत्नाख्यम् ।
चिरमिह-निखिलान् भोगान् भुङ्क्त्वा श्रीराम-भक्ति-भाग्-भवति ॥ ६॥
मराठी- हे ‘पंचरत्न’ नावाचे वायुपुत्राचे स्तोत्र जो म्हणतो, तो या जगती सर्वकाळ सर्व सुखे उपभोगून श्रीरामाच्या भक्तांमध्ये सामावून जातो.
हे स्तोत्र मारुतीचे ‘पंचरत्न’ जो म्हणे सदाकाळी ।
रामभक्त तो होई, भोगी जगती सदा सुखे सगळी ॥ ६
। श्री शंकराचार्य विरचित हनुमान पंचरत्नम् स्तोत्र संपूर्ण ।
— धनंजय बोरकर (९८३३०७७०९१)
आपण खूपच सुंदर रचना केली आहे. गेयता असल्यामुळे अधिकच छान वाटते. मन:पूर्वक अभिनंदन.
भक्तियोगात वर्णिलेले “अष्टसात्विक गुण” असा उल्लेख आपण केला आहे पण सहसा अष्टसात्विक भाव असे म्हटले जाते. भाव आणि गुण वेगळे असतात असे मला वाटते.