नवीन लेखन...

“गाण्यातील आनंदी पर्व”

“तिच्या आवाजात सहजता आणि माधुर्य इतकं भिनलंय की कोणत्याही शैलीतलं गीत गाऊन आपल्याला मंत्रमुग्ध करेल. मुळातच शास्त्रीय संगीताचे लहानपणापासून तिच्यावर झालेले संस्कार आणि कलेचं उपजत ज्ञान यामुळे तिचं व्यक्तीत्व देखील सूरमयी आणि कलात्मक पैलूंनी चमकतंय. स्वरांप्रमाणे इतर कलेत निपुण असणारी गुणी गायिका व कलाकार आनंदी जोशी उलगडतेय आपला संगीतमय प्रवास “मराठीसृष्टी.कॉम” ला दिलेल्या दिवाळी विशेष मुलाखतीतून.”

१) गायनाची सुरुवात कधी आणि कशी झाली?
आनंदी – माझे वडिल शास्त्रीय गायक आहेत, तर गाणं शिकायला सुरुवात ही त्यांच्याकडूनच झाली होती. त्याशिवाय अनेक “लाईव्ह परफॉर्मन्स” ऐकत होते. त्यामध्ये भावसंगीत, शास्त्रीय संगीत होतं. त्यासोबतच कॅसेट्स आणि रेकॉर्डसच्या माध्यमातून पण गाणं सतत कानावर पडत होतं. शाळेत असताना गायनाच्या स्पर्धांमध्ये भाग घ्यायचे तेव्हा देखील प्रत्येकवेळी मी पहिल्या क्रमांकावर असायचे. दुसरं म्हणजे “आनंदाचं झाड” ह्या चित्रपटात छोटासा अंतरा गायला होता आणि ही संधी मला अशोक पत्कींमुळे मिळाली. तर ही “माझ्या गायन कारकिर्दीची” सुरुवात होती असं म्हणता येईल.

२) तुझे वडिल देखील संगीतकार आहेत तर, त्यांचं मार्गदर्शन गायिका म्हणून घडवण्यात कशा प्रकारे मिळालं?
आनंदी – माझे वडिल हे शास्त्रीय गायक आहेत. पण ज्यावेळी मी सुगम संगीत गाते त्यावेळेस निश्चितच ते बारकाईने लक्ष देत असतात. त्याशिवाय अनेक प्रकारचे राग, संगीतातील हरकतींवर नेहमीच त्यांच्याकडून मार्गदर्शन मिळत आलेलं आहे.

३) “सा रे ग म…” या रियालिटी शोमुळे तुझ्यातील कलेला व्यासपीठ मिळालं, पण तुझ्या कारकीर्दीच्या दृष्टीने देखील हा कार्यक्रम किती महत्त्वपूर्ण होता असं वाटतंय ?
आनंदी – खूप महत्वाचं व्यासपीठ होतं असं मी म्हणेन कारण “सा रे ग म…” मुळे मला ओळख मिळाली गायिका म्हणून. जगभरात हा कार्यक्रम पोहचत असल्यामुळे प्रेक्षकांकडून मेल्स, एस.एम.एस.च्या माध्यमातून त्यांच्या प्रतिक्रिया कळायच्या आणि आपल्या गाण्याची कोणीतरी नोंद घेतंय ही सुद्धा कोणत्याही गायकासाठी महत्वपूर्ण गोष्ट आहे. आज त्यांच्या प्रोत्साहनामुळे काम करण्यासाठी बळ मिळतं.

४) कोणत्याही गायकाला शस्त्रीय संगीताचं ज्ञान असणं आवश्यक आहे, तुझं काय या विषयीचं मत आहे आणि तू कशारितीने अभ्यास केला होतास ?
आनंदी – शास्त्रीय संगीत अवगत असणं आणि त्याचा रियाज गायकाने करणं हे अत्यंत महत्वाचं आणि गरजेचं देखील आहे, हे मी स्त:च्या अनुभवातून सांगते. लहान असताना माझा कल हा शास्त्रीय संगीतापेक्षा सुगम संगीत आणि चित्रपट संगीताकडे अधिक असायचा. पण माझे वडिल या गोष्टीमुळे काहीसे त्रस्त होत. एके दिवशी त्यांनी मला शास्त्रीय संगीताचं महत्त्व असं काही समजावून सांगितलं की मी त्यांचं बोलणं मनावर घेतलं आणि त्यापद्धतीने मग शास्त्रीय गायनाच्या रियाजाला सुरुवात केली. दुसरी गोष्ट जी मला आवर्जुन सांगायला आवडेल ती म्हणजे माझ्या वडिलांनी अनेक शास्त्रीय संगीताच्या परीक्षा देण्यासाठी प्रवृत्त केलं. त्याचा उपयोग मला आज गाणी गाण्यासाठी होत आहे.

५) “अल्बम्स”, “मालिकांची शीर्षक गीतं”, आणि चित्रपटांसाठी तू पार्श्वगायन केलेलं आहेस तर या वेगळ्या फॉरमॅट मध्ये गायन करताना तू कशा प्रकारे अभ्यास करतेस ?
आनंदी – खरं तर ही कामं जरी वेगवेगळ्या प्रकारची वाटत असली तरी पण एक गायिका म्हणून मी कधी भेदभाव करु शकत नाही. कारण हे फिल्ड मला नेहमीच आपलसं वाटतं आणि त्याचा संबंध हा संगीताशी आहे. चित्रपटात तुम्ही कोणत्या प्रसंगासाठी गात आहात हे देखील महत्वाचं असतं. ते कशा प्रकारे गायलं जातं हे सुद्धा गरजेचं ठरतं. जरी तुमचा आवाज चांगला असला तरी चित्रपटातील त्या नायिकेला तो शोभला नाही तर मग “व्हीज्युअली” चांगलं नाही दिसत. यासाठी गायकाने स्वत:ला बोल्ड करायला हवं. या सर्व गोष्टी अनुभवातून कळत जातात. हा अनुभव मी “शबाय शबाय” च्या निमित्ताने घेतला. खूप वेगळ्या प्रकारचं गाणं होतं ते, ज्यामध्ये शब्दांना बरचसं महत्त्व होतं. जेवढ्या वेगळ्या पद्धतीने मी गाणार होते त्यामुळे या गाण्यातून आशय पोहोचणार होता, म्हणून हे गाणं माझ्यासाठी अनोखं असंच होतं. त्याचप्रमाणे जेव्हा मी प्रेम गीतं गायली आहेत त्यावेळी, त्या प्रकारच्या भावना व्यक्त करणं हे माझ्या मते खूप महत्त्वाचं आहे असं मी मानते. यासाठी गायकाला “एक्सप्रेशन्स” देणं क्रमप्राप्त ठरतं असं मला वाटतं.

६) मराठीमध्ये गायनाचे तुला कोणते नवीन प्रयोग करायला आवडतील?
आनंदी – खरंतर सध्याच्या घडीला मराठीत हिप हॉप स्टाईल्स, फ्युजन त्याचप्रमाणे विविध प्रकारची संगीतशैली बर्‍यापैकी रुजत आहे असं मी म्हणेन. नवीन गायक आणि संगीतकार देखील प्रयोगशील आहेत. पण कसं आहे की प्रेक्षकांनी देखील आजचं संगीत उचलून धरायला हवं असं मी सांगेन. कारण प्रेक्षक जेव्हा जास्तीत जास्त नव्या ट्रेंडच्या गाण्यांना रिस्पॉन्स देतील त्यावेळी आम्हाला देखील नवीन प्रकारचं गाणं आणि संगीत याची निर्मिती करायला आवडेल. आणि मला व्यक्तीश: विचारशील तर “वेस्टर्न”, “क्लासिकल” या पद्धतीने गायला आवडेल. त्यामुळे मराठी संगीत समृद्ध होणार आहे. यामध्ये कोणती भेसळ करण्याचा उद्देश नक्कीच नाही, पण त्यामध्ये नव्यानं काहीतरी रुजवलं पाहिजे जेणेकरुन सर्वजण त्याचा भाग होऊ शकतात.

७) गायकाला वेगवेगळ्या भषांमध्ये गायन करावं लागतं तर तू कधी भाषा शिकण्याचा प्रयत्न केला आहेस का?
आनंदी – मूळत: मी वेगवेगळ्या भाषांमधली गाणी, तिथलं संगीत ऐकण्याचा प्रयत्न करते. कारण त्यामुळे गायनातलं एक्सप्रेशन कळतं. भाषा जरी त्यातली समजत नसली तरीसुद्धा त्यातले भाव कळून येतात. दुसरं म्हणजे मी संस्कृतची पदवीधर असल्याने इतर भाषा समजून घेण्यात मला तितकीशी अडचण येत नाही आणि बोलण्याची शैली अनेकदा सारखी असते त्यामुळे समजून घेताना देखील अवघडल्यासारखे वाटत नाही.

८) सध्या आपण पहातोय की अनेक दूरचित्रवाणी आणि रेडिओ वाहिन्यांवर रियालिटी शोजचं पेव फुटलंय तर हे रियालिटी शो एखाद्या स्पर्धकासाठी किती महत्वपूर्ण असतात असं तुला वाटतं?
आनंदी – रियालिटी शो एखाद्या कलाकाराच्या दृष्टीने खूपच महत्वाचे असतात असं मी म्हणेन कारण त्यानिमित्ताने त्याची ओळख प्रस्थापित होते. त्याला “फेम” मिळतं. अनेक गायक, संगीतकारांपर्यंत त्याचं गाणं पोहोचत असल्यामुळे स्पर्धक सर्वपरिचित होतो. त्यामुळे अनेक कार्यक्रमांतून निमंत्रण मिळत असतं. पण याचा अर्थ असा होत नाही की त्याचा स्ट्रगल संपतो. उलट जबाबदार्‍या वाढत जातात, मेहनत अधिक प्रमाणात करावी लागते, कारण रसिकांच्यादेखील तुमच्याकडून अपेक्षा या वाढलेल्या असतात. त्यामुळे ही एक उत्तम संधी आहे त्या स्पर्धकाच्या दृष्टीने असं मी म्हणेन.

९) रियालिटी शो करताना आणि त्यानंतरही तुझ्या अनेक गायक-संगीतकारांशी भेटीगाठी झाल्या, त्यावेळी तुझ्या गायनासाठी कोणत्या टिप्स त्यांच्याकडून मिळाल्या ?
आनंदी – आपल्याला कुठलंही संगीतकारांकडून एखादं गाणं मिळतं त्यावेळेस अनेक बाबी आपल्याला शिकायला मिळतात. संगीताच्या हरकती असतील किंवा ते गाणं कशा पद्धतीनं अरेंज करत आहेत, “रेकॉर्डिंग प्रोसेस” हे सर्व संगीतकार गायकांकडून मी शिकले. यामध्ये आवर्जुन उल्लेख करावा असे अशोक पत्कीजी आहेत. कमलेश भडकमकर, कौशल इनामदार, मिथिलेश पाटणकर हे आहेत. बर्‍याचदा मी स्टुडिओ मध्ये बसून फक्त त्यांचं काम पहात रहायचे. या व्यतिरिक्त या सर्व मंडळींनी मला खूप सपोर्ट केलं. कुठेही कोणाशी कधी, कसं बोलायचं या सर्व अनुभवाच्या गोष्टी त्यांच्याकडूनच शिकायला मिळाल्या.

१०) एकुणच कलेचं क्षेत्र थोडसं बेभरवशाचं आहे आणि अशावेळी सेकंड ऑपशन सुद्धा असायला हवा, तर मग गाण्याव्यतिरिक्तही तुझा बॅक अप आहे का?
आनंदी – लहानपणापासूनच मला नृत्य, गायन, नाटकांमध्ये कामं करण्याची हौस होती. तेव्हापासूनच कुठेतरी गायन क्षेत्राची आवड निर्माण झाली आणि यामध्ये आपली कारकीर्द घडवण्याचा मी निर्णय घेतला. त्यावेळी मला आई एवढचं म्हणाली की तू गाणं सोडू नकोस पण आणखी एक गोष्ट तिने सांगितली की याव्यतिरिक्त तुला काही करता आलं तर त्याचा विचार देखील तू करुन ठेव. अर्थात भाषा हा माझा आवडीचा विषय असल्याने, “मास्टर इन लिंग्वीस्टिक्स” मध्ये स्पेशलायझेशन केलं आहे. तर या विषयात मला काम करायला आवडेल.

११) तुझ्या सुरेल गायनासाठी अनेकदा कलाकारांकडून आणि रसिकांकडून अशी एखादी लक्षात राहिलेली दाद आमच्या सोबत शेयर करायला आवडेल का तुला?
आनंदी – खूप अवघड आहे हे सांगणं कारण यामध्ये मी तुलना नाही करु शकत. खळे काका असतील, हरीहरन सर आणि इतरही अनेक गायक, संगीतकारांकडून मला कौतुकाची थाप मिळाली. मी समजते की ज्या ज्या कलाकारांनी माझं कौतुक केलं तो मला मिळालेला आशिर्वादच होता. आणि तिथून पुढेही गायनासाठी मिळालेलं प्रोत्साहन होतं. रसिकसुद्धा माझ्या गाण्यांमुळे मला ओळखत आहेत, तर ही सुद्धा महत्वपूर्ण दाद म्हणता येईल.

१२) दिवाळीचं सेलिब्रेशन कसं करतेस?
आनंदी – दिवाळी आम्हा गायकांसाठी, संगीतकारांसाठी खूप खास असते असं मी म्हणेन. दिवाळी पहाट, दिवाळी संध्या यामुळे एक वेगळा अनुभव आम्हाला घेता येतो. प्रेक्षकांसाठी देखील अनोखी पर्वणी असते. यानिमित्ताने आपल्या आवडत्या गायक-गायिकांना त्यांना ऐकायला मिळतं. याकाळात भले आम्ही कुटुंबियांसोबत दिवाळी साजरा करत नसू तरी पण रसिकांसोबत, सह गायक-संगीतकारांसोबत आम्ही हा सण साजरा करतो, आणि मज्जाही येते.

१३) तुझ्यातील एखादा गुण किंवा अशी कोणती बाब आहे जी आम्हाला माहित नाही ?
आनंदी – मला लिहायला खूप आवडतं. गद्य या प्रकारचं लेखन मी करते. पण ते फक्त माझ्या आवडीसाठी म्हणून. मी अगदी शाळेत असल्यापासून लिहिते. मला लिहिण्याची खूप आवड आहे. वाचनामुळे तर ही आवड आणखीन वाढत गेली आहे.

१४) तुझे आगामी प्रोजेक्टस् कोणते आहेत ?
आनंदी – लवकरच “असा मी अशी ती” ही फिल्म रिलीज होतेय. यामध्ये एका फेस्टीव्हल सॉंगमध्ये मी गायलं आहे. याशिवाय “पोतराज” नावाचा चित्रपट येतोय ज्यामध्ये माझं गाणं तुम्हाला ऐकायला मिळेल. आणि नुकतेच माझे “आरोह” आणि “ओंजळीतून मनाच्या” हे अल्बम्स रिलीज झाले. “ओंजळीतून मनाच्या” तर नवीनच आहे. अत्यंत मेलिडियस अशी गाणी ऐकायला मिळतील. प्रेक्षकांचा देखील या अल्बम्सना छान प्रतिसाद मिळतो आहे, त्यामुळे याचं सक्सेस मी एंजॉय करते आहे.

१५) तू खास वेळ काढून “मराठीसृष्टी.कॉम” ला दिलेल्या खास मुलाखतीसाठी तुझे खूप खूप आभार, धन्यवाद
आनंदी – थॅंक्यू..

(आनंदी जोशी सोबतच्या खास गप्पा तुम्ही ऐकूही शकता. यासाठी दिलेल्या “साऊंड लिंक” वर क्लिक करा.)

— सागर मालाडकर

Avatar
About सागर मालाडकर 111 Articles
श्री. सागर मालाडकर हे आकाशवाणीवरील निवेदक असून ते मराठीसृष्टीसाठी नियमितपणे लेखन करतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..