नवीन लेखन...

हॅप्पी न्यू Ear

” विहान…अरे अजून किती वेळ आंघोळ करणार आहेस? ? ऑलरेडी पावणे सात झालेत, आत्ता बस येईल गेटपाशी, ये पाहू बाहेर ! ” ” राघव… प्लीज त्याला बाहेर काढ आता, अजून दूध प्यायच बाकी आहे ”

रोज प्रमाणे एकीकडे दूध कपात ओतत, तर दुसरीकडे सँडविच टिफीन मध्ये भरत रश्मीच्या तोंडाचा पट्टा अखंड सुरू होता . सेंट पीटर्स शाळेत चौथीत शिकणाऱ्या मुलाला अर्थात विहानला आणि ही सगळी हातघाई सुरू असताना सोफ्यावर शांतपणे बसूंन पेपर वाचत बसलेल्या नवऱ्याला म्हणजेच राघवला हे काही नवीन नव्हतं .. कडाक्याच्या थंडीचे दिवस होते त्यामुळें गरम गरम पाण्याचा शॉवर सोडून बाहेर यायचं विहान ला जीवावर आलं होतं. ” मम्मा अजून एक सँडविच प्लीज ! ” युनिफॉर्म अंगावर चढवत टेबलावर चां टिफीन न्याहाळत विहान ने रश्मी ला विनंती केली ” ” अजून एक? ? विहान … अरे हेच मोठं सँडविच आहे ! आर यू शुअर? ” आश्चर्य वाटून रश्मीने विचारलं आणि अजून एक सँडविच टिफीन मध्ये भरून टिफीन त्याच्या हातात दिला, दप्तर समोर धरलं आणि त्याला दाराबाहेर पिटाळलं … धडाधड पायऱ्या उतरून विहान खाली उतरला आणि गेट जवळ येत स्कूल बसने हॉर्न वाजवलाच…

सुटकेचा निःश्वास टाकत चहा चे कप घेऊन रश्मी राघव शेजारी येऊन बसली आणि तिने शंका व्यक्त केली ” राघव .. आजकाल हा रोज डबल डबल टिफीन मागतोय रे, आज सँडविच दोन नेले, परवा पोळीचे रोल पण दोन दोन मागितले …,” ” कम ऑन रश्मी… त्यात काय? अगं वाढतं वय आहे, मुलं शाळेत खेळतात, भूक लागते… इट्स ओके ” चहाचा कप तोंडाला लावत आणि पेपर मधून नजर न हटवत राघव ने उत्तर दिलं ..” अर्थातच रश्मीच शंका निरसन काही झालं नव्हत.

रश्मी, राघव आणि विहान… तमाम मोठ्या शहरात असतात तश्याच पैकीं एक त्रिकोणी कुटुंब, राघव एका ऑटोमोबाईल कंपनीत पर्चेस डिपार्टमेंट चां हेड तर रश्मी एका सॉफ्टवेअर कंपनीत एच आर मॅनेजर त्या मुळे दोघांचं ही दिवसभर ऑफिस आणि घरी आल्यावर ही सततचे फोन असच चाकोरीबद्ध आयुष्य ! मग घरी कोणी वडीलधारे नसल्याने लहानग्या विहान ची सोय पाळणा घरात.. हे स्वाभाविक होतच .

घड्याळा प्रमाणे नशीब हाताला बांधल्या प्रमाणे रोजचीच धावपळ ….सकाळी सात वाजता शाळेत रवाना केलेल्या विहान ची रश्मी शी भेट संध्याकाळी सातलाच …. पाळणा घरातून त्याला घेऊन येतानाच व्हायची, तर बरेचदा राघव घरी येई पर्यंत विहान झोपून गेलेला असायचा .. त्यातच कंपनी ची एखादी टूर आली तर मग राघव आठवडा आठवडा गायब असायचा . मग विहान देखील तसा एकलकोंडा होऊ लागला होता,  सोसायटी मधील मित्र मंडळींशी फक्त शनिवारी रविवारी खेळायला मिळायचे… मग शाळेत काही मोजके मित्र त्याचे सोबती होते … त्या पैकीच एक आणि त्याचा खास मित्र होता ” सूरज ”

स्कूल बस शाळेत पोहोचताच सगळी मुलं लगबगीनं आपापल्या वर्गात पळाली… विहान देखील शोधक नजरेने वर्गात शिरला शनिवार रविवार आणि शुक्रवारी आलेली एक जोड सुट्टी..यामुळे सोमवारी सकाळी सकाळी शाळेत जायला शक्यतो मुलं कंटाळा करतात पण आज विहान शाळेत आला तो नजरेने काही तरी शोधत शोधतच ….आणि मग रोजच्या बेंच वर बसलेला सूरज त्याला दिसला आणि स्वारी लगेच खूश झाली..

तो लगबगीने त्याच्या जवळ गेला ” अरे कुठं होतास लास्ट विक .. शाळेत का आला नाहीस? आजारी होता का? ” काळजी पूर्वक स्वरात विहान ने प्रश्नांची सरबत्ती सुरू केली…

” नाही रे ..मी नाही पण आई आजारी होती, हात मोडलाय तिचा.. मग घरातली कामं आणि इस्त्रीची कामं मीच केली तीन चार दिवस ” सूरज ने स्पष्टीकरण दिलं..

विहान च्या एकदम लक्षात आलं…. सूरज त्याच्या आई वडीलांसोबत शाळेच्या परिसरातच राहायचा, त्याचे वडील म्हणजे दशरथ बरीच वर्षे शाळेच्या प्रांगणात आणि बागेत माळी काम करायचे तर आई पार्वती … दिवस भर शाळेच्या कॅन्टीन मध्ये आणि संध्याकाळी कपडे इस्त्री करण्याची कामे करून संसाराला हात भार लावायची, सूरज तीन वर्षांचा असताना दशरथ चे शाळेत कामावर असताना हृदय विकाराने दुर्दैवी निधन झाले, मग शाळेने अनुकंपा तत्वावर पार्वतीला तिथेच कामावर ठेवले आणि छोट्या सूरज ला नाम मात्र फी घेऊन शाळेत दाखल करून घेतले व अश्या प्रकारे या माय लेकांना आश्रय मिळाला होता.. अर्थात सूरज आणि पार्वती या उपकाराची जाणीव स्मरून होते,  पार्वती पडेल ते काम करून सूरज ला मोठं करण्याचं स्वप्न पहात होती तर सूरज देखील प्रामाणिक पणाने अभ्यास आणि शाळा याकडे लक्ष्य केंद्रित करायचा . विहान या विचारात असतानाच पहिल्या तासासाठी क्लास टीचर व मॅथ्स शिकवणाऱ्या आणि मुलांच्या शब्दात ” सो डेंजर ” अश्या मिस् रिटा वर्गात आल्या तसं वर्गात चिडीचूप शांतता पसरली ..मुलांनी पटापटा दप्तरातून मॅथ्स च्या ” प्रोजेक्ट बुक ” काढल्या आणि विहान ची एकदम तारांबळ उडाली आणि पोटात गोळा उठला आठ दिवसां पूर्वी मिस ने मॅथ्स चा प्रोजेक्ट दिला होता आणि तो आज ” सबमिट ” करायचा होता पण त्याची मॅथ्स प्रोजेक्ट बुक कुठं तरी हरवली होती . घरात, त्याच्या पाळणा घरात शोधून शोधून दमला होता तो …

पण ती बुक काहीं सापडली नव्हती त्यामुळे मग प्रोजेक्ट तर लांबचीच गोष्ट !! “आता बहुतेक रिटा मिस मम्मी पप्पा ना शाळेत बोलावणं पाठवणार आणि आपल्याला ” पनिशमेंट ” तर पक्की ! कारण सर्व मुलांच्या समोर त्यांच्या ” प्रोजेक्ट बुक ” दिसत होत्या … तेव्हढ्यात सूरज ने शांत पणे दोन ” प्रोजेक्ट बुक ” त्याच्या दप्तरातून काढल्या आणि डेस्क वर ठेवल्या, एक स्वतः ची आणि दुसरी विहान ची ! विहान चा तर स्वतः च्या डोळ्यांवर विश्वास बसेना स्वतः ची ‘ बुक ‘ पाहून तो आनंदाने चित्कारणार होता पण तेव्हढ्यात त्याला आठवलं ” बुक तर मिळाली ..पण प्रोजेक्ट कुठं पूर्ण झालंय? ” त्यानें दबक्या आवाजात सूरज ला विचारलं ” अरे ! तुझ्या कडे कशी काय आली माझी प्रोजेक्ट बुक? ?  “अरे सोमवारी तू इथेच विसरला होता, मी माझा विसरलेला टिफीन घ्यायला परत वर्गात आलो होतो तेव्हा मला मिळाली …आणि मंगळवार पासून मीच आलो नाही ..त्या मुळे मग माझ्या कडेच राहिली ” सूरज ने निरागस पणाने उत्तर दिलं.

प्रोजेक्ट बुक मिळाल्याने विहान खुश झाला पण लगेच चेहरा पाडून त्याला म्हणाला ” अरे पण प्रोजेक्ट च काय? आता तर मिस पनिश करणार ना मला? ”

त्यावर डोळे मिचकावत सूरज त्याला म्हणाला ” अरे डोन्ट वरी …मी तुझा पण प्रोजेक्ट करून टाकलाय तुझ्या बुक मध्ये ” मग मात्र विहान ला एकदम हायस वाटलं आणि त्याने खुश होऊन सूरज ला जोरदार टाळी द्यायचा विचार केला ..पण रिटा टीचर चां चेहरा पाहून तो रद्द केला…..

थोड्या वेळाने मग मधली सुट्टी झाली आणि विहान ने टिफीन उघडला आणि नेहमी प्रमाणे दोन पैकी एक सँडविच सूरज ला दिलं आणि आग्रहाने खाऊ घातलं … अश्या अनेक छोट्या मोठ्या प्रसंगातून विहान आणि सूरज ची मैत्री घट्ट होत होती, वर्गातील इतर श्रीमंत घरातून आलेल्या मुलांपेक्षा विहान ला सूरज सोबत राहायला आवडायचं तर अबोल, शांत असलेला सूरज देखील विहान च्या संगतीत खुलायचा, बोलायचा..

असेच काही दिवस गेले आणि वर्गात असताना सूरज च्या वागण्यात काहीसा बदल होत असल्याचे जाणवत होते, त्याचे अभ्यासात, शिक्षकांनी दिलेल्या सूचना आणि शिकवणी यात पहिल्या प्रमाणे  लक्ष लागत नव्हते, वर्गातील नोट्स अपूर्ण राहू लागल्या आणि मग त्याला वरचेवर.. हळू हळू शिक्षकांची बोलणी खावी लागायची  शिक्षकांच्या तक्रारी वाढू लागल्या, आणि एके दिवशी क्लास टीचर नी फर्मान सोडलं की ” आज पासून सूरज रोज पहिल्या बेंच वर बसणार ! ” मग त्यामुळे विहान मात्र अस्वस्थ झाला . त्याचा रोजचा साथीदार, मित्र त्याच्या सोबत न बसता आता वेगळा बसणार हे त्याच्यासाठी अवघड होतं.

पण क्लास टीचर च्या निर्णया पुढे त्याचं काय चालणार होतं, मग सूरज बरेच दा शाळेत गैरहजर राहू लागला … नंतर नंतर तर विहान च्या कानावर आलं की बहुतेक सूरजच नाव शाळेतून काढलं जाणार आहे..

डिसेंबर महिना म्हणजे कॉन्व्हेन्ट शाळांसाठी आनंदाचा आणि उत्सवाचा महिना असतो, सेंट पीटर्स मध्ये ही असच उत्साहाला उधाण आलं होतं, शाळेत वेगवेगळे ” डे ” साजरे केले जात होते, स्पोर्ट्स डे देखील आयोजित केला गेला होता, आणि ख्रिसमस च्या आदल्या संध्याकाळी खास ” ख्रिसमस पार्टी ” ची धूम होती आणि मग दहा दिवस सुट्टी व त्या नंतर नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच स्नेहसंमेलन होणार होतं त्यामुळे केवळ मुलं च नव्हे तर शिक्षक आणि पालक सगळेच उत्साहात होते पण या सर्व धामधुमीत विहान मात्र शांत आणि उदास होता . गप्प गप्प राहायचा…. आणि ते रश्मी आणि राघव यांना त्यांच्या व्यस्त दिनक्रमात देखील लक्षात येण्या सारखं होतं .. अर्थात यामागच खरं कारण त्यांना ठाऊक नव्हतं, मग त्यांनी यावर एक उपाय म्हणून राघव च्या भाच्याला अर्थात मयुरेश ला काही दिवस घरी राहायला बोलावलं .. मयुरेश मेडिकल स्टूडेंट होता डी एस मेडिकल कॉलेज मध्ये एम बी बी एस च्या तिसऱ्या वर्षाला होता आणि शहरातच हॉस्टेल मध्ये राहायचा आणि अध्ये मध्ये शनिवारी रविवारी किंवा सणा सुदीच्या सुट्टीला मामाकडे राहायला यायचा. मयुरेश दादा म्हणजे विहान साठी अती प्रिय..खूप आवडायचा तो त्याला ! त्याच्या सोबत खेळणं, गप्पा मारणं त्याला खूप आवडायचं .. त्याच्या कॉलेज मधल्या आणि हॉस्टेल मधल्या गमती जमती ऐकण्यात विहान ला भलतीच मजा यायची !मग त्यामुळेच विहान च्या गप्प गप्प राहण्याच कारण खोदून खोदून विचारल्यावर ही न कळल्याने अखेर रामबाण उपाय म्हणून मयुरेश ला बोलावलं होतं आणि सुट्ट्या असल्याने मयुरेश आला देखील….

आणि अपेक्षे प्रमाणे ही मात्रा बरोबर लागू पडली, मयुरेश दादा आल्यावर विहान ची कळी जरा खुलली.. तो दादा सोबत गप्पा, खेळणं संध्याकाळी खाली पार्क मध्ये जाण..यात त्याची गाडी जरा रुळावर आली आणि रश्मी – राघव ने सुटकेचा निःश्वास टाकला..

ख्रिसमस ” इव ” ला शाळेत पार्टी करून आल्यावर रात्री सगळे जेवायला बसले असताना राघव ने विहान ला छेडले ” काय मग चॅम्प उद्या ख्रिसमस आहे … सॅन्टाक्लॉज साठी सॉक्स लावलास की नाही? ? ” विहान ने त्यावर खाली मान घालून हळूच समोर बसलेल्या मयुरेश दादा कडे पाहिलं आणि त्याच्या चेहऱ्यावर एक मिश्किल हसू उमटलं…

” पप्पा मला माहिती आहे सॅन्टाक्लॉज वगैरे काही गिफ्ट देत नाही, दर वर्षी तुम्ही आणि मम्मा च माझ्या साठी गिफ्ट आणता ” शांत पणाने विहान उत्तरला… अर्थात हे सत्य सर्वानाच माहीत असतं हे ठाऊक असूनही मुलांनी निरागस पणे सॅन्टाक्लॉज त्यांच्या साठी भेटवस्तू आणतो या स्वप्नील भ्रमात राहून त्या गोष्टीचा आनंद लुटावा अस सगळ्या आई बापांना वाटत असतं … त्यामुळे विहान च असं रोख ठोक उत्तर ऐकुन रश्मी आणि राघव ला कससच झालं …

चटकन विषय बदलत मग राघव ने विचारलं ” ऑल राईट… पण मग तुला काय गिफ्ट हवय? ? एक्स बॉक्स ना? ? की प्ले स्टेशन? ” ह्या दोन्ही गोष्टींसाठी विहान बरेच दिवसांनी हट्ट करत होता हे त्याला ठाऊक होतं.

” नो पप्पा… मला या वेळेस नकोय गिफ्ट ! ” पुन्हा एकदा विहान चे तडक उत्तर . ” का रे बेटा? दुसरं काही हवंय का? फुटबॉल …? का वॉच? ” आता रश्मी ने प्रयत्न सुरू केले ..तरी ही ठाम पणे नकार देत विहान म्हणाला ” काहीच नकोय मम्मा !” आता मात्र रश्मी व राघव बुचकळ्यात पडले..आणि त्यांनीं विचारलं ” मग? काय हवंय तुला? “. त्यावर थोडंसं दबकत पण आत्मविश्वास पूर्वक विहान म्हणाला ” पप्पा मला गिफ्ट ऐवजी …पैसे द्याल? ? माझं गिफ्ट मी आणतो ” रश्मी व राघव ने आश्चर्याने एक मेकांकडे पाहिलं आणि विहान ला विचारलं ” पण काय आणायचं आहे ते तरी सांग? किंवा आपण सगळे जाऊ शॉप मध्ये ..तुला काय हवं ते सांग ” ” नको पप्पा… मी मयुरेश दादा सोबत जाऊन घेतो गिफ्ट .ते सिक्रेट आहे .. तुम्ही हव तर दादा कडे पैसे द्या ” विहान अजून ही त्याच्या गोष्टीवर ठाम होता…

रश्मी आणि राघव ने न राहवून मयुरेश कडे पाहिले .. पण त्यानें ही ‘ आहे एक गम्मत .. आम्ही नाही सांगणार ‘ अश्या आविर्भावात मिश्किल स्मित केलं….

अखेर हार मानून राघव ने त्याच्या कडे पैसे दिले आणि विहान ने त्याच्या मयुरेश दादा ला आनंदाने टाळी देऊन आनंद व्यक्त केला..

ख्रिसमस झाला … सुट्ट्या संपवून नवीन वर्षाच्या स्वागताला च शाळेत स्नेह संमेलन आयोजित केलं होतं .. रश्मी आणि राघव ला ऑफिस असल्याने मग विहान सोबत मयुरेश शाळेत आला होता….

राघव च्या मोबाईल वर शाळेच्या ऑफिस मधून फोन आला आणि ” तुम्हाला तातडीने प्रिन्सिपल ….अर्थात फादर फ्रान्सिस ने भेटायला बोलावलं आहे ” असा निरोप मिळाला ..नक्की काय कारण आहे हे मात्र समजलं नाही .राघव ने रश्मी ला फोन करून तशी कल्पना दिली आणि ती देखील संभ्रमात पडली . कशा साठी बोलावणं आल असेल? विहान ने काय केलं शाळेत?  त्याच शाळेतील वागणं तर चांगल असतं..दुसरं काय कारण असेल? ? असे अनेक विचार मनात येत होते..अखेर दोघांनी एकत्र शाळेत जायचं ठरवलं आणि रश्मी च्या ऑफिस मधून तिला पीक अप करून राघव शाळेत पोहोचला …आणि तडक फादर फ्रान्सिस च्या केबिन मध्ये दोघे गेले.तिथे फादर समोर विहान खाली मान घालून उभा होता, त्याच्या शेजारी त्याचा जिवलग मित्र सूरज देखील होता …सूरज बद्दल विहान च्या तोंडून रश्मी ने खूप ऐकलं होतं पण त्याची भेट पहिल्यांदाच होत होती, शेजारीच हाताची घडी घालून मिस रिटा उभ्या होत्या ..मागे एका खुर्चीवर मयुरेश देखील बसला होता…  ” गुड आफ्टर् नून मिस्टर अँड मिसेस कामत …” नाकावरील चष्मा डोळ्यावर सरकवत फादर ने राघव आणि रश्मी चे स्वागत केले…

” गुड आफ्टर नून फादर …काय झालं? ” तिथलं एकंदरीत गंभीर वातावरण पाहून राघव ने तडक विषयालाच हात घातला ..

” यू नो? तुमचा मुलगा विहान ने काय केलंय? ” तश्याच करड्या स्वरात फादर नी प्रतिप्रश्न केला..

” नो फादर…काय केलं … ” आता मात्र धास्तावलेली रश्मी बोलून गेली…

आता फादर त्यांच्या खुर्चीतून उठले, पुढे येत एक हात विहान च्या व दुसरा सूरज च्या खांद्यावर ठेवत म्हणाले ” मिस्टर कामत आम्ही इथे स्कूल मध्ये सगळ्या मुलांना नेहमीच शिकवण देतो … सर्वांना मदत करा, तुम्हाला आवश्यक नसेल तर ती गोष्ट गरजूंना द्या ! इफ यू मेक आदर्स स्माईल .. गॉड विल स्माईल फॉर यु…. पण ही शिकवण मुलं इतक्या लवकर आणि या लहानपणी .. आचरणात आणतील ..आणि ते ही कोणी न सांगता..तर ते आमच्या साठी आणि एक पालक म्हणून तुमच्या साठी खूप अभिमानास्पद आहे ”

रश्मी व राघव अद्याप ही प्रश्र्नांकित चेहऱ्याने एकदा विहान तर एकदा फादर कडे पाहत होते. अजून काहीच नीट समजत नव्हतं..अखेर त्यांची ही अवस्था पाहून फादर ने तडक विषयाला हात घातला ” मिस्टर कामत.. हा आहे सूरज ! तुमच्या विहान चा खास मित्र.. बेंच बडीज् .. सूरज चे वडील आमच्या स्कूल साठी माळी काम करायचे . सॅडली… ही पासड् अवे .. आता सूरज ची आई इस्त्री वगैरे करून घर चालवते. गेले काही महिन्या पासून सूरज ला ऐकू येणं कमी झालं, त्याचा त्रास वाढू लागला ..मे बी इट इज हेरिडेटरी पण हळू हळू त्याला बहिरेपणा आला. वर्गात शिक्षकांनी शिकवलेल ऐकू येईना, त्यामुळे समजेना शिक्षक पनिश करू लागले . मग आत्म विश्वास डळमळीत झाला, शाळेत येण्याची इच्छा कमी झाली …आम्ही एक शिक्षक ..किंवा केअर टेकर म्हणून फक्त त्याची तपासणी करून ” बहिरे पणाच ” निदान केलं..पण यू विल फिल प्राउड मिस्टर कामत .. तुमच्या विहान ने आणि त्याच्या या मयुरेश दादा ने सूरज ला दवाखान्यात नेले व्यवस्थित तपासण्या केल्या आणि त्याच्या कामासाठी हे खास इम्पोर्टेड हिएरिंग मशीन आणलं .. नाऊ धिस बॉय कॅन हिअर वेरी वेल..ही इज बॅक टू नॉर्मल नाऊ. ” सूरज च्या कानाकडे बोट दाखवत फादर फ्रान्सिस ने शेवटचं वाक्य म्हटलं …

त्यांच्या चेहऱ्यावर आता खूप कौतुक आणि समाधान दाटून आलं होतं….

फादर फ्रान्सिस चा शब्द न शब्द रश्मी आणि राघव साठी आश्चर्य कारक होता…अनपेक्षित होता. ..तेव्हढाच सुखद होता ख्रिसमस गिफ्ट साठी आपल्या कडून घेतलेले पैसे एवढ्या सत्कारणी लागतील ह्याची त्यांना कल्पना ही नव्हती …

रश्मीने पुढे येत आता विहान सोबत सूरज ला ही जवळ येऊन मिठी मारली …

” प्राउड ऑफ यू बेटा ” डोळ्यातलं पाणी पुसत पुसत राघव ने दोघांच्या डोक्यावरून हात फिरवला … मग या सर्व घटनेत साक्षीदार व मदतनीस मयुरेश ने सगळी घटना ….सविस्तर कथन केली ! आणि एव्हढ्या लहान वयात एव्हढा परिपक्व विचार करून ही अशी अनोखी मैत्री निभवणाऱ्या विहान चे करावे तेवढे कौतुक कमीच होते…

तर हे सगळं चालू असताना ” आता मात्र सूरज रोज शाळेत येणार आणि पाहिल्यासारखं दोघं जण एकाच बेंच वर बसणार या आनंदात विहान सूरज खिदळत होते …. त्यांच्या चेहऱ्यावरील ते निरागस आनंदाचे भाव पाहून आता फादर फ्रान्सिस पुढे आले आणि सूरज ला जवळ घेत म्हणाले ” या नवीन वर्षात तुला विहान च्या मैत्री मुळे ऐकण्याची शक्ती परत मिळाली आहे … जणू नवीन कान तुला मिळाला आहे….

हॅप्पी न्यू Ear माय सन “

Avatar
About सागर जोशी 10 Articles
सागर जोशी हे फेसबुकवरील लोकप्रिय लेखक असून ते आम्ही साहित्यिक या फेसबुक ग्रुपचे सभासद आहेत. त्याच्या कथा अतिशय लोकप्रिय आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..