नवीन लेखन...

हॅपी व्हॅलेंटाईनस् डे (कथा)

पर्वतीच्या मंदिरातुन दर्शन घेऊन मेधा बाहेर आली. काही पायऱ्या खाली उतरून नंतर बाजूच्या वाटेने चालत ती त्यांच्या नेहमीच्या जागी येऊन पोहोचली. खांद्यावर अडकवलेली पर्स आणि हातातली रेड हार्टच चित्र असलेली पिशवि तिथल्या दगडी कट्यावर ठेवून मेधा तिथून समोर दिसणाऱ्या पुण्याकडे पाहत होती. १०, १५ मिनिटे तशीच गेली त्यातही तिने कितीतरी वेळा घड्याळ पाहिलं होतं.

अखेरीस वैतागून मेधाने पर्स मधून फोन काढला आणि अनलॉक करत नंबर लावला. पलीकडून 3 रिंग नंतर फोन उचलला आणि काही आवाज येईल तेवढ्यात मेधा बोलू लागली.

“मी इथे येऊन १५ मिनटे ऑलरेडी झाली आहेत. तू निघाला तरी आहेस का की अजून तिथेच आहेस…?”

काही क्षण कोणीच बोललं नाही. नंतर समोरून मोठा श्वास सोडल्याचा आवाज आला आणि विराज म्हणाला.

“लास्ट राऊंड आहे तेवढी झाली की येतो. 5 मिनिटात होईल की पुढल्या १० मिनिटात तुझ्याजवळ…”

विराज हळू आवाजात बोलत होता. त्याच्या वाक्याने ती गालातल्या गालात हसतपण लाडिक रागात म्हणाली.

“मी घड्याळ लावत आहे अँड युअर टाइम स्टार्ट नाव.”

अस म्हणत तिने लगेच फोन कट केला आणि गोड हसली. आज त्याचा दुसरा व्हॅलेंटाईन होता. क्षणात ती  भूतकाळात रमली. त्यांची भेट मग मैत्री पुढे प्रेम आणि चक्क घरातल्यांची बिनविरोध त्यांच्या नात्याला परवानगी. सगळ्यांनी ती भारावून गेली होती. तिच्या ह्या जगात तरंगत असताना तिला एका आवाजाने वास्तव जगात परत आणलं.

“हाय… मेधा…”

विचारातून बाहेर येत तिने आवाजाच्यादिशेने मागे वळून पाहिलं.

“अमोघ…?! हाय…. तू, इथे?!”

“आलो… असच…”

“कसा आहेस…? खूप महिन्यानी भेटतोय नई आपण?”

“हो ना… तीन वर्षांनी.”

क्षणभर थांबत त्याने विचारलं.

“तू कशी आहेस? कोणीची वाट बघत आहेस…?”

अमोघ मेधाला प्रश्न विचारत असतानाच तिच्या फोनची मॅसेज टोन वाजली. तिने लगेच फोन बघितला. विराज हा मॅसेज होता.

‘इमर्जन्सी आली आहे. थोडा वेळ लागेल… प्लीज चिडू नकोस.’

मॅसेज वाचून नेहमीचंच आहे ह्याच अस भाव चेहऱ्यावर आणत मेधाने गाल वाकडा केला.

“एनी प्रॉब्लेम?” अमोघने विचारलं.

“आ… नाही, नेहमीचंच. तू काही विचारात होतास का मला?”

“हो, म्हटलं कोणाची वाट पाहत आहेस का?”

“हो… येईलच तो थोड्या वेळात. तू कोणासोबत आला आहेस?”

“नाही. मी, एकटाच आलो आहे.”

“आजच्या खास दिवशी एकटा..? अजून कोणी स्पेशल आलं नाही वाटत लाइफ मध्ये?!”

तिच्या वाक्यावर अमोघ नुसताच हसला.

“कसे आहेत रे आपल्या एरियातले सगळे. २ वर्ष झाली तिथली जागा सोडून. कोणाचा काही कॉन्टॅक्टच नाही.”

मेधा म्हणाली.

“बरेच असतील…”

“म्हणजे तुम्ही पण जागा सोडली की काय…?”

“मेधा मला तुझ्याशी थोडं बोलायचं आहे..”

अमोघ अचानक गंभीर झाला.

“बोल ना…”

मेधा प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे पाहू लागली.

“मेधा, तीन वर्षांपूर्वी तुला ह्याच दिवशी एक गिफ्ट आणि सोबत एक चिठ्ठी मिळाली होती. त्या चिठ्ठीत लिहिल्याप्रमाणे तू भेटायला गेली होतीस?”

मेधा कपाळावर आठ्या आणत अमोघकडे पाहत होती.

“सांग ना… गेली होतीस…?”

“तीन वर्षांपूर्वी…?”

आठवल्या सारख करत मेधा म्हणाली.

“हा…. एक चिठ्ठी मिळाली होती मला…. पण तुला हे कस कळलं? तुला माहिती आहे, कोणी पाठवली होती ते…?”

“तू सांग ना मला, गेली होतीस?”

निर्वाणीचा चेहरा करत अमोघने विचारलं.

“खर सांगू….? गेले होते… ऍक्टऊली जाणार नव्हते, पण ती चिठ्ठीच इतकी सालस होती की तो लिहिणारा कसा असेल ह्या विचारानेच तिथे जावसं वाटलं. आणि त्याने बोलावलं तरी कुठे? तर, सारस बागेत. माझी आवडती जागा… म्हणून गेले. पण कसला बावळट असेल तो. आलाच नाही. मी बसले वाट बघत. चांगली तासभर होते. मूर्खात काढलं मला. शेवटी वैतागले आणि आले निघून. कोण? होता कोण तो अक्कलशुन्य?”

“मीच, होतो तो ‘अक्कलशून्य’…”

हे ऐकून मेधाचे डोळे मोठे झाले.

“तू…?”

तिचा आवाजही मोठा झाला. तिथून जाणारे एक दोन कपल तिच्याकडे बघून हसले. तिला ओशाळल्या सारख झालं.

“तो मुलगा तू होतास, अमोघ?”

“हो, आणि म्हणून मी इथे आलोय तुला सॉरी म्हणायला.”

“आता…? तीन वर्षांनी…? आर यु ऑल राईट?”

“मला माहितीए मला जरा उशीरच झाला.”

“जरा…?”

“तू ऐक ना माझं…. ऍक्टऊली त्याच दिवशी माझा अकॅसिडेंट झाला. सो मी पोहचू नाही शकलो.”

“ओह…! ओके!”

“मेधा…, मी… जर म्हणजे जर आपली त्या दिवशी भेट झाली असती तर… तुझं काय उत्तर असत?”

“अमोघ..?”

त्याच्या प्रश्नाने मेधा वैतागल्यागत चेहरा करून त्याच्याकडे पाहू लागली.

“हे बघ तू चिडू नकोस. मला फक्त तुझ्या, माझ्या बद्दलच्या भावना जाणून घ्यायच्या आहेत.”

“भावना..? कुठल्या भावना? मला तुझ्या बद्दल कधीच काहीच वाटलंल नाही. आणि त्या दिवसापासून तर नाहीच नाही. तुझी ती चिठ्ठी देखील मी फाडून फेकुन दिली.”

तिच्या बोलण्याने अमोघ दुखावला जात होता पण तरीही ती बोलत राहिली.

“त्या दिवशी तू आला नाहीस.तुझा अकॅसिडेंट झाला होता मान्य आहे. पण जर खरच माझ्या बद्दल तुझ्या मनात असे काही विचार होते तर बरा झाल्यावरही तुला एकदाही मला येऊन सांगावस वाटू नये? तूला बर व्हायला असा कितीसा वेळ लागला असेल? दोन, तीन महिने किंव्हा ह्याहून थोडे जास्त… पण त्यानंतर देखील तु आता आला आहेस सॉरी म्हणायला.  हे सगळं त्याच दिवशी संपलं होत माझ्यासाठी. तू आत्ता येऊन माफी वगैरे मागायची गरज नाही अरे…. अँड आय एम व्हेरी हॅपी इन माय लाईफ…. सिरियसली.”

“आय नो दॅट… विराज खूप प्रेम करतो तुझ्यावर… मी बस तू इथे आहेस हे कळल्यावर तुला भेटायला, सॉरी म्हणायला आलो होतो. तो प्रश्न तर सहजपणे निघून गेला माझ्याकडून. जातो मी.”

तो निघाला. जाता जाता थांबून म्हणाला.

“फक्त एकदा तुला विश करायच होत… हॅपी व्हॅलेंटाईनस डे मेधा…”

मेधा काही रिप्लाय न देता त्याच्या विरुद्ध दिशेने वळली. अमोघ निघून गेला तसा तिच्या मनात विचार डोकावला.

‘एक मिनिट…. ह्याला विराजच नाव कस समजलं?’

ती झटक्यात मागे फिरली. दोन तीन पावलं पुढे जाऊन अमोघला शोधायला लागली पण तो कुठेच दिसेना. अखेरीस तिने विचार सोडून दिला.

पुढल्या १०, १५ मिनिटात विराज तिथे पोहचला. दोघांनी एकमेकांना विश केल. मेधाने आणलेलं गिफ्ट तिने विराजला दिल. त्याने ते घेतलं पण कुठल्याही कुतूहलाने काहीही न विचारता त्याने ते तसच बाजूला ठेऊन दिल. त्याचा आज मूड ठीक दिसत नाही हे कळल्यावर ती म्हणाली.

“काय झालंय विराज? तू नेहमी सारखा दिसत नाहीयेस. एनी प्रॉब्लेम?”

“मगाशी तुझा कॉल झाला तेव्हा एक पेशंटला चेक करत होतो. चेकिंग करून निघालो. डॉक्टर दिपला आपल्या आजच्या भेटीबद्दलच सांगत होतो आणि अचानक त्याचे पल्स रेट झपाट्याने कमी होऊ लागले. सिच्युएशन फारच खराब झाली. खूप प्रयत्न केले पण नाही वाचला तो.”

विराज नाराज झालेला पाहून मेधाने त्याला धीर दिला. “ईट्स ओके” म्हणत ती त्याच्या पाठीवरून हात फिरवू लागली.

“तीन वर्ष कोमात होता, पण तरी त्याची तब्बेत बऱ्यापैकी स्टेबल होती. आई वडील दोघेही काय वाटेल ते करायला तयार होते त्याला बर करण्यासाठी. पण काहीच उपयोग झाला नाही बघ… एवढा यंग पण आयुष्याची दोरी अपुरी पडली.”

“खरच.… काय नाव त्या पेशंटच?”

“अमोघ… अमोघ देवळे.”

हे नाव ऐकताच मेधाच्या पायाखालची जमीन सरकली.

‘कस शक्यय? अमोघ आता माझ्याशी इथे उभं राहून बोलत होता… आणि विराज म्हणतो तो ह्या जगात नाही. हे काय आहे नक्की?’

तिच्या डोक्यात विचारांचं वादळ उठल.

“तीन वर्षांपूर्वी सारस बागेच्या अलीकडच्या चौकात त्याचा अकॅसिडेंट झाला होता. डोक्याला जबरदस्त मार लागला होता. तेव्हाही बरीच ट्रीटमेंट झाली पण काही विशेष इलाज करता आला नाही आणि तो कोमात गेला. आता अस वाटत की कदाचित कशासाठी तरी थांबला होता, पण नक्की काय होत कोण जाणे.”

विराज बोलत होता आणि त्याचे शब्द मेधाच्या कानावर आपटून मागे फिरत होते. मगाशी ती त्याच्याशी इतकं रुडली बोलली. त्याच कारण, तो ही तिला आवडत होता. त्यामुळे त्याने एवढया उशिरा येऊन हे तिला सांगणंच तिच्या रागाचं कारण बनलं होत. ‘आत्ता का आलास? तेव्हाच वेळेवर आला असतास तर…’ पण आता ह्या सगळ्याला काहीच अर्थ नव्हता. तो निघून गेला… कायमचा. तिच्या आयुष्यात ते स्थान आता विराजच होतं. विराज तिच्यावर मनापासून  प्रेम करतो हे तिला माहीत होतं.

पण मनापासुन प्रेम तर अमोघ ही करत होता. म्हणूनच तर…

मेधाच्या डोळ्यातून अश्रू ओघळला विराजच्या नकळतच तिने तो पुसून टाकला. काठड्याजवळ येत ती दूरवर पाहू लागली. तिला आजूबाजूच काहीच ऐकू येईनास झालं कानात फिरत होत ते एकच वाक्य.

“फक्त एकदा तुला विश करायच होत… हॅपी व्हॅलेंटाईनस डे मेधा…”

— रेणुका दीक्षित जोशी

 

Avatar
About रेणुका दीक्षित जोशी 3 Articles
मी एम. ए. मानसशास्त्राचे शिक्षण घेतले आहे. वाचनाची आवड लहानपणापासून होती पण कधी लिखाणाचा विचार केला नव्हता. कोरोनाच्या काळात माझ्यातील ह्या गुणास वाव मिळाला. मधुरा वेलणकर ह्यांच्या मधुरव ह्या कार्यक्रमात माझी एक लघुकथा वाचण्यात आली होती. मी प्रतिलिपी ह्या अँपवर देखील माझ्या अनेक कथा प्रकाशित केल्या आहेत. आणि नुकतेच मला 'मुंबई मराठी ग्रंथसंपदा' (विलेपार्ले शाखा) ह्या ग्रंथालयाने आयोजित केलेल्या लघुकथा स्पर्धेत द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले आहे.

2 Comments on हॅपी व्हॅलेंटाईनस् डे (कथा)

  1. कथा सुरेख आहे.
    “खरंच….. काय नाव त्या पेशंटचं?”
    “अमोघ, अमोघ देवळे”
    हे संभाषण कथेचा क्लायमॅक्स आहे. त्याच्यानंतर जास्त मजकूर शक्यतो येऊ नये. अपेक्षित असलेल्या धक्क्याची तीव्रता कमी होते. फक्त विराजच्या स्पष्टिकरणाचा परिच्छेद ठेवला असता आणि पुढे काहीही लिहिले नसते तर शेवट जास्त परिणामकारक ठरला असता. अर्थात हे आपले माझे मत आहे. परंतु कथा उत्तम रंगवली आहे हे निर्विवाद.

    • तुमच्या कंमेंट साठी धन्यवाद…
      खूप छान वाटलं तुम्ही मत मांडल्या बद्दल.

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..