हे एक “झोपमोड ” करणारे नाटक आहे (संदर्भ -लोकसत्ता परीक्षणातील शब्दप्रयोग ) म्हणून २६ जानेवारीचा दुपारचा प्रयोग झोपमोड करून आम्ही बालगंधर्वला पाहिला. अल्पावधीतला रौप्यमहोत्सवी प्रयोग त्यामुळे सनई -चौघडे , उत्सवी धावपळ , चंद्रकांत कुलकर्णी (दिग्दर्शक), मोहन आगाशे वगैरे दिसले. आमच्या यादीत हे नाटक होतेच , पण अचानक २५ ता. ला रात्री ” गुलजार -बात पश्मीनेकी ” हा कार्यक्रम रांग मोडून दांडगाईने पुढे घुसला.
दोघांनाही न्याय द्यावा लागला, मात्र यात झोपमोड झाली. रात्री १ वाजता गुलज़ार कार्यक्रमाचा आस्वाद चघळत -चघळत घरी परतलो आणि लगेच दुसऱ्या दिवशी दुपारी बारा वाजता नाटक ! इतकं बॅक टू बॅक हल्ली दमवतं !
माणूस निर्माण झाला आणि त्याच्या भोवती नाती निर्माण झाली. कारणं काही असोत ,नाती दिवसेंदिवस स्ट्रेस निर्माण करू लागली आहेत. त्यात नवा कन्सेप्ट – स्पेस (अवकाश) चा ! प्रत्येकाला ती हवीहवीशी वाटते. पण त्या अवकाशाचे आकारमान किती असावे याबद्दल फक्त गोंधळ ! नाती आजकाल या स्पेसवर अधिकार गाजवायला लागतात आणि यथावकाश “अतिक्रमण ” करायला लागतात. मग घुसमट ,स्ट्रेस वगैरे !
मुळात माणूस एखाद्या हिमनगासारखा असतो. तो फार कमी दिसतो. आपल्याला समृद्ध करायच्या धावपळीत , गडबडीत आपण अशी नाटकं पाहातो आणि हिमनगाचा दडलेला भाग दृश्यमान होतो का हे चाचपून पाहतो.
याही नाटकात एकटी राहणाऱ्या (भलेही पेइंग गेस्ट सोबत ) आईवर मुलगी “हक्काने (?)” अतिक्रमण करते, तिच्या वतीने आणि स्वतःच्या सोयीचे निर्णय घ्यायला लागते. आणि मग त्याचा “काच “आईला जाणवायला लागतो. माझ्या पत्नीच्या एका सुंदर कवितेत एक जीवघेणी ओळ आहे – ” इतुके आलो जवळ आपण की , जवळपणाचे झाले बंधन ” ! असं काहीतरी या नाटकात होतं आणि “पूर्वीचं” अंतर नव्याने निर्माण केलं जातं.
मात्र दोन्ही प्रमुख पात्रं ” प्रतीक्षा आणि वंदना गुप्ते ” अगदी विरोधाभासी रंगात रंगविली गेली असल्याने नाटक तितके भेदक ,तीक्ष्ण वाटत नाही. आपल्या मुलांनी आपल्याला समजून न घेणे हे जगड्व्याळ दुःख इथेही वंदनाच्या वाट्याला येते.
आयुष्य आधीच कॉम्प्लेक्स होत चाललंय आणि नाती बहुधा त्यात भर घालताहेत. एका क्षणी वंदना एक नवं (खरं तर सर्वपरिचित) सत्य बोलून जाते-
‘ आई -वडिलांनी मुलांवर संस्कार करायचे असतात ,त्यांचे संसार करायचे नसतात.”
माझ्यासाठी याही वयात जीवनाच्या वर्गातील ही शिकवण ! चला , पुन्हा शाळेत प्रवेश घ्यायला हवा !
— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
Leave a Reply