‘माणसाला शेपटी का नाही?’ हा अनेकांकडून अनेकदा विचारला गेलेला प्रश्न आहे. परंतु, माणसाची शेपटी नाहीशी होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. कारण माणसाला कधी शेपटी नव्हतीच. माणसाची निर्मिती होण्याअगोदरच, माणसाच्या पूर्वजांनी ही शेपटी गमावली. या शेपटीचे अवशेष मात्र माकड हाडाच्या रूपानं मागे राहिले आहेत. त्यामुळे या प्रश्नाला वेगळंच स्वरूप प्राप्त झालं आहे. ‘माणसाला शेपटी का नाही?’ या एका प्रश्नातून तीन प्रश्न निर्माण झाले आहेत – ‘माणसाच्या पूर्वजांची शेपटी केव्हा नाहीशी झाली? ती कशी नाहीशी झाली? ती का नाहीशी झाली?’. या तीन प्रश्नांतील पहिल्या प्रश्नाचं उत्तर पूर्वीच मिळालं आहे. दुसऱ्या प्रश्नाचंही उत्तर नुकतंच मिळालं आहे. तिसऱ्या प्रश्नाचं स्पष्ट उत्तर मात्र अजून मिळालेलं नाही.
वानरवर्गीय प्राण्यांची उत्क्रांती सुमारे पाच ते सहा कोटी वर्षांपूर्वी झाली. कपी हा वानरवर्गातलाच, परंतु शेपटी नसलेल्या प्राण्यांचा, सुमारे अडीच कोटी वर्षांपूर्वी उत्क्रांत झालेला प्रकार आहे. माणसाची गणना या कपी प्रकारात होते. या प्रकारात, माणसाव्यतिरिक्त आज अस्तित्वात असलेल्या ओरांगउटान, गोरिला, चिंपांझी, यांसारख्या प्राण्यांचा समावेश होतो. गेल्या दशकाच्या सुरुवातीला टांझानिआतील रूक्वा प्रदेशात अडीच कोटी वर्षांपूर्वीच्या, शेपटी असलेल्या वानरवर्गीय प्राण्याचे, तसंच शेपटी नसलेल्या वानरवर्गीय प्राण्याचे अवशेष सापडले. या समकालीन पुरातन अवशेषांच्या जनुकीय विश्लेषणावरून, शेपटीधारी वानरवर्गीय प्राण्यांपासून शेपटीविरहित वानरवर्गीय प्राण्यांची – कपींची – निर्मिती झाली असल्याचं नक्की झालं. कपींच्या जन्माचा काळ जरी या अवशेषांवरून समजला असला तरी, वानरवर्गातील या प्राण्यांची निर्मिती होताना त्यांची शेपटी नष्ट कशी झाली असावी, हा संंशोधकांच्या उत्सुकतेचा भाग होता. अमेरिकेतल्या ‘इंस्टिट्यूट फॉर सिस्टम जेनेटिक्स’ या संस्थेतील बो शिआ आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी, माणसाच्या या पूर्वजांची शेपटी नष्ट होण्यामागचं कारण शोधून काढलं आहे. बो शिआ आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं हे संशोधन लवकरच संशोधनपत्रिकेत प्रसिद्ध होईल.
कोणत्याही सजीवाच्या शरीराची रचना ही त्या प्राण्याच्या शरीरातल्या पेशींतील जनुकांवरून ठरते. विविध प्राण्यांच्या शेपटीचं स्वरूप ठरवणाऱ्या सुमारे तीस जनुकांची संशोधकांना ओळख पटली आहे. त्यामुळे वानरवर्गातील प्राण्यांची शेपटी ही, या शेपटीशी संबंधित असणाऱ्याच एखाद्या जनुकात बदल झाल्यामुळे नाहीशी झाली असण्याची शक्यता या संशोधकांना वाटत होती. जनुक हे पेशींतील डीएनएचा भाग असतात. त्यामुळे या संशोधकांनी मानव, चिंपांझी, बोनोबो, गोरिला, ओरांगउटान आणि गिब्बन या सहा कपींच्या पेशींतील डीएनएच्या रेणूंच्या रचनेवर आपलं लक्ष केंद्रित केलं. या सहा कपींच्या डीएनएच्या रचनेची मकाक, ऑलिव्ह बबून, स्नब-नोझ्ड मंकी, अशा वेगळ्या प्रकारच्या आठ शेपटीधारी वानरवर्गीय प्राण्यांच्या डीएनएच्या रचनेशी तुलना केली. अतिशय काटेकोरपणे केलेल्या या तुलनेत, त्यांना टीबीएक्सटी या नावे ओळखल्या जाणाऱ्या जनुकात बदल झालेला आढळला. हा बदल अनपेक्षित ठिकाणी झालेला होता.
टीबीएक्सटी या जनुकातील बदलाचा या संशोधकांनी तपशीलवार अभ्यास केला. डीएनए रेणूचाच काही भाग या जनुकात शिरून बसला असल्याचं, या अभ्यासावरून स्पष्ट झालं. या जनुकातील हाच बदल कपींची शेपटी नष्ट होण्यास कारणीभूत ठरला असण्याची शक्यता दिसून येत होती. ही शक्यता खरी आहे का, हे तपासण्यासाठी या संशोधकांनी उंदरांतल्या टीबीएक्सटी या जनुकात अशाच प्रकारचा बदल घडवून आणला. जनुकातील या बदलानंतर, या उंदरांच्या पुढच्या पिढीतील अनेक उंदराना शेपट्या नसल्याचं त्यांना आढळलं. तसंच ज्यांना शेपट्या होत्या, त्या कमी लांबीच्या असल्याचंही दिसून आलं. बो शिआ आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या या संशोधनावरून, माणसाच्या पूर्वजाची शेपटी नष्ट होण्यामागे टीबीएक्सटी या जनुकात झालेल बदल असल्याचं नक्की झालं.
आता राहिला तिसरा प्रश्न – ही शेपटी का नाहीशी झाली? दुसऱ्या शब्दांत हाच प्रश्न म्हणजे, शेपटीधारी वानरवर्गीय प्राण्यांच्या जनुकात बदल का घडून आला? या प्रश्नाचं उत्तर देणं, हे आज तरी कठीण आहे. या जनुकीय बदलामागची एक शक्यता म्हणजे परिस्थितीबरोबर जुळवून घेणं. काही शेपटीधारी वानरवर्गीय प्राण्यांना, झाडाच्या फांद्यांवर उभं राहून चालताना, शेपटीचा अडथळा होत असावा. त्यामुळे हे जनुकीय बदल घडून आले असावेत. परंतु, शेपटी गमावल्यावरही माणसाचे हे पूर्वज, काही काळ दोन पायांऐवजी चार पायांवरच चालत असल्याचं, उपलब्ध पुराव्यावरून दिसून येतं. शेपटी गमावल्यानंतर त्यांना चार पायांवर चालण्याचं कारण नव्हतं! आता दुसरी शक्यता… वानरवर्गीय प्राण्यांच्या शेपटीचं सुमारे अडीच कोटी वर्षांपूर्वीचं नाहीसं होणं, हे हळूहळू घडून न येता, अल्पकाळातच घडून आल्याचं त्यांच्या अवशेषांवरून दिसून येतं. प्राण्यांच्या पेशींतले जनुकीय बदल हे अनेकवेळा उत्स्फूर्तपणे, अचानक घडून येतात. बो शिया आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या मते, हा जनुकीय बदल काही शेपटीधारी वानरवर्गीय प्राण्यांत अचानक घडून आला असावा व त्यानंतर तो त्यांच्या पुढच्या पिढ्यांत संक्रमित झाला. हा बदल घडून आल्यामुळे, काही कपींना दोन पायांवर चालणं सुलभ वाटू लागलं असावं व ते दोन पायांवर चालू लागले.
वानरवर्गीय प्राण्यांच्या उत्क्रांतीशी संबंधित असणारं हे संशोधन, मानवी उत्क्रांतीशीही संबंधित आहे. वानरवर्गीय प्राण्यांनी आपली शेपटी गमावणं, हा उत्क्रांतीतला महत्त्वाचा टप्पा आहे. माणसाला असणारं माकड हाड हे त्या शेपटीचेच अवशेष आहेत. बो शिआ आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं संशोधन हे वानरवर्गीय प्राणी आणि आजचा माणूस यांच्यातला संबंध स्पष्ट करतं. चार्ल्स डार्विनच्या ‘माणूस हा वानरवर्गीय प्राण्यांत झालेल्या बदलांमुळे निर्माण झाला!’, या उत्क्रांतीबद्दलच्या मताला या संशोधनाद्वारे दुजोरा मिळाला आहे.
— डॉ. राजीव चिटणीस.
छायाचित्र सौजन्य: Hans Hillewaert / Wikimedia.
Leave a Reply