दक्षिण अमेरिकेतल्या अॅमेझॉनच्या जंगलातले काही भाग मानवी वसतीपासून इतके दूर आहेत, की त्यात काय दडलंय हे कळणं कठीणच. या प्रदेशात पूर्वीच्या काळी वेगवेगळ्या संस्कृती होऊन गेल्या. या पूर्वीच्या संस्कृतींचे अवशेष असणारी एकटी-दुकटी काही प्राचीन बांधकामं या जंगलात आतापर्यंत सापडली आहेत. परंतु या संस्कृतींत उदयाला आलेल्या मोठ्या, म्हणजे एका अर्थी शहरं असणाऱ्या वसाहती, आतापर्यंत सापडल्या नव्हत्या. आता मात्र अॅमेझॉनच्या जंगलात लपलेली अशी दोन पुरातन शहरं, दक्षिण अमेरिकेतील बोलिविआ या देशात सापडली आहेत. बोलिविआतील मोजोस पठारांच्या परिसरात सापडलेली ही शहरं सहाशे वर्षं जुनी आहेत. या प्राचीन वसाहतींचा शोध लावण्यासाठी लायडर या तंत्रज्ञानाचा उपयोग केला गेला. बॉन येथील ‘जर्मन आर्किऑलॉजिकल इंस्टिट्यूट’ या संस्थेतील हायको प्र्युमर्स आणि त्यांच्या इतर सहकाऱ्यांचं हे संशोधन ‘नेचर’ या शोधपत्रिकेत अलीकडेच प्रसिद्ध झालं आहे. स्पॅनिश लोक दक्षिण अमेरिकेत पोचण्यापूर्वीच्या काळात अॅमेझॉनच्या जंगलात फक्त विरळ स्वरूपाची वसती असल्याचा, संशोधकांचा आतापर्यंत समज होता. सदर संशोधनानं हा समज चुकीचा ठरवला आहे. अॅमेझॉनच्या जंगलात पूर्वीच्या काळातही दाट वसतीची ठिकाणं अस्तित्वात असल्याचं या वसाहतींच्या शोधामुळे स्पष्ट झालं आहे.
हायको प्र्युमर्स आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी शोधलेली ही शहरं म्हणजे, पाचव्या शतकापासून ते चौदाव्या शतकापर्यंत अस्तित्वात असणाऱ्या ‘कासाराबे’ या संस्कृतीतल्या लोकांच्या मोठ्या वसाहती होत्या. ही कासाराबे संस्कृती इथल्या सुमारे साडेचार हजार चौरस किलोमीटरच्या प्रदेशावर पसरली असल्याचे पुरावे उपलब्ध आहेत. प्रचलित पद्धतीनं केल्या गेलेल्या पूर्वीच्या सर्वेक्षणात, या प्रदेशातली काही प्राचीन बांधकामं शोधली गेली होती. या बांधकामांचं प्रत्यक्ष उत्खननसुद्धा केलं गेलं होतं. मोकळ्या जागांवर असल्यानं, या पुरातन बांधकामांचा शोध घेणं तसं सोपं होतं. परंतु, तिथल्या दाट झाडीत लपलेल्या पुरातन बांधकामांचा अशा प्रचलित पद्धतीच्या सर्वेक्षणाद्वारे शोध लागणं, शक्य नव्हतं. मात्र आता लायडर तंत्रज्ञानाद्वारे इथल्या दाट झाडीत लपलेल्या या बांधकामांचा आणि वसाहतींचा शोध घेतला गेला आहे.
लायडर पद्धतीत, झाडीत लपलेल्या ज्या ठिकाणाचा शोध घ्यायचा असेल, त्यावर विमानातून (किंवा हेलिकॉप्टर वा ड्रोनमधून) स्पंदांच्या स्वरूपात लेझर किरण सोडले जातात. यांतील काही किरण झाडांच्या शेंड्यांवरून परावर्तित होतात, तर काही किरण हे झाडांच्या पानांमधल्या मोकळ्या जागांतून आत शिरतात. या आत शिरलेल्या किरणांपैकी काही किरण पानांच्या आतल्या थरावरून परावर्तित होतात. काही किरण हे या आतल्या थरांतील मोकळ्या जागांतून आणखी पुढे पोचून त्यापुढच्या थरावरून परावर्तित होतात. अशा प्रकारे, काही किरण तर सर्व थर पार करून झाडाखालच्या जमिनीपर्यंत पोचतात व तिथून परावर्तित होतात. स्पंदांच्या स्वरूपात पाठवलेले परंतु वेगवेगळ्या थरांवरून परावर्तित झालेले हे लेझर किरण पुनः त्या विमानातील संवेदकाद्वारे टिपले जातात.
प्रत्येक थराचं अंतर विमानातल्या संवेदकापासून वेगवेगळं असल्यानं, प्रत्येक थराकडून परावर्तित होणारे लेझर किरण संवेदकाकडे वेगवेगळ्या वेळी पोचतात. झाडाच्या शेंड्याकडून परावर्तित झालेले किरण सर्वांत प्रथम संवेदकाकडे पोचतात, तर जमिनीकडून परावर्तित झालेले किरण सर्वांत शेवटी संवेदकाकडे पोचतात. जमिनीकडून परावर्तित झालेल्या लेझर किरणांचासुद्धा संवेदकाकडे पोचण्याचा कालावधी जमिनीच्या उंच-सखल स्वरूपानुसार वेगवेगळा असतो. यानुसार संगणकीय प्रक्रियेद्वारे, संवेदकानं फक्त ठरावीक कालावधीनंतर टिपलेल्या लेझर किरणांवरून त्या प्रदेशाची प्रतिमा तयार केली जाते. या प्रतिमेत झाडं वगळली जाऊन फक्त जमीन व त्यावरील वास्तूंचे तपशील उपलब्ध होतात. मलेशिआ, कंबोडिआ, ग्वाटेमाला, इत्यादी देशांतील दाट जंगलांचा वेध घेण्यासाठी या पद्धतीचा वापर केला गेला आहे. बोलिविआतील मोजोस पठारावर आता सापडलेली शहरं याच पद्धतीनं शोधली गेली आहेत. लायडरद्वारे केलेली ही निरीक्षणं आणि प्रचलित पद्धतीनं केली गेलेली पूर्वीची निरीक्षणं, यांची एकमेकांशी सांगड घालून हायको प्र्युमर्स आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी, बोलिविआतील दाट जंगलांतल्या या प्राचीन शहरांचं तपशीलवार चित्र उभं केलं आहे.
हायको प्र्युमर्स आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी, लायडर तंत्रज्ञानाद्वारे या परिसरातली सहा वेगवेगळी ठिकाणं पालथी घातली. हे करताना एकूण सुमारे दोनशे चौरस किलोमीटर इतक्या क्षेत्रफळाचा प्रदेश त्यांनी अक्षरशः विंचरून काढला. या ‘लायडर-पाहणी’साठी हेलिकॉप्टरचा वापर केला गेला. या हेलिकॉप्टरनं दोनशे मीटर उंचीवरून ताशी सुमारे ऐंशी किलोमीटर वेगानं प्रवास करीत, या सहा ठिकाणांवरचा प्रत्येक चौरस मीटरचा परिसर तपासला. काही वर्षं चाललेल्या या संशोधनातून एकूण दोन मोठ्या वसाहती आणि छोटी बांधकामं असणाऱ्या चोवीस जागांचा शोध घेतला गेला.
या सर्व जागांपैकी काही जागांचं इथलं अस्तित्व पूर्वीपासून माहीत होतं. परंतु दाट झाडीत लपल्यामुळे त्यांचं खरं स्वरूप लक्षात आलं नव्हतं. इथे सापडलेल्या वसाहतींची व्याप्ती आणि तिथली आगळी-वेगळी बांधकामं ही, लायडरद्वारे केलेल्या पाहणीमुळे दृष्टीस पडली. या दोन वसाहतींपैकी अधिक मोठी वसाहत ही सुमारे तीनशे हेक्टर (तीन चौरस किलोमीटर) क्षेत्रफळाची असून ती लँडिवर या नावानं ओळखली जाते. दुसरी वसाहत ही सुमारे दीडशे हेक्टर (दीड चौरस किलोमीटर) क्षेत्रफळाची आहे. तिला कोटोका हे नाव दिलं गेलं आहे. लँडिवर आणि कोटोका या साध्यासुध्या छोट्या वसाहती नव्हत्या, तर प्रत्यक्षात ती त्या काळातली दोन शहरं होती! या शहरांतील मोठ्या प्रमाणावरची बांधकामं आणि त्यांचं स्वरूप हे, त्या काळी इथे दाट मानवी वसती असल्याचं दर्शवतं.
हायको प्र्युमर्स आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी शोधलेल्या या वसाहती वैशिष्ट्यपूर्ण आहेत. या वसाहतींत सापडलेली अनेक बांधकामं ही, कासाराबे लोकांच्या संस्कृतीशी संबंधित कार्यासाठी वापरल्या गेलेल्या वास्तू असाव्यात. वीस ते पंचवीस मीटर लांबी-रुंदी असणारी आणि दोन मीटर उंची असणारी, चौथऱ्यांसारखी अनेक बांधकामं इथे आढळतात. इमारतीच्या गच्चीसारखी दिसणारी सुमारे सहा मीटरपर्यंत उंची असणारी बांधकामंही इथे आहेत. या गच्च्यांवर, काही इंग्रजी यू अक्षराच्या आकाराच्या तर काही पिरॅमिडसारख्या आकाराच्या उंच रचना आहेत. यांतील काही रचना या बावीस मीटरपर्यंत उंच आहेत. या सर्व रचना उत्तर दिशेजवळच्या एका बिंदूकडे रोखल्या आहेत. या रचना एकाच दिशेला रोखलेल्या असण्याचा अर्थ म्हणजे, या बांधकामांचा खगोलशास्त्राची संबंध असावा.
या वसाहतींतील अनेक बांधकामं ही जरी संस्कृतिविषयक कार्यासाठी वापरली गेली असली, तरी या वसाहती कायमच्या वसतीसाठीही वापरल्या गेल्या असाव्यात. या वसाहतींच्या आत व्यवस्थित बांधलेले कालवे आणि तलाव आढळले आहेत. या वसाहतींभोवती संरक्षक खंदक, तसंच संरक्षक भिंती बांधल्या आहेत. काही ठिकाणी या भिंती दुहेरी आहेत. या मोठ्या दोन वसाहती आजूबाजूच्या छोटी बांधकामं असलेल्या इतर जागांशी, जमिनीपासून काहीशा उंच असणाऱ्या रस्त्यांद्वारे जोडल्या आहेत. या छोट्या जागा, मोठ्या वसाहतींपासून दहा किलोमीटरपर्यंतच्या परिसरात विखुरल्या आहेत. या छोट्या जागांचं क्षेत्रफळ फार तर काही हजार चौरस मीटर इतकंच आहे.
बोलिविआच्या मध्यावरचा हा भाग आज जरी अॅमेझॉनच्या जंगलानं व्यापला असला तरी, एके काळी इथली परिस्थिती वेगळी होती. या प्रदेशातला मोठा भाग हा दरवर्षी पुराच्या पाण्याखाली झाकला जात असे व पूर ओरसल्यानंतर या भागाला गवताळ स्वरूप प्राप्त होत असे. कासाराबे संस्कृती ही काही प्रमाणात या गवताळ प्रदेशावर तर काही प्रमाणात आजूबाजूच्या जंगलात बहरली. इथल्या लोकांनी या गवताळ भागाचं रूपांतर शेतजमिनीत करून त्यावर शेती केली. या शेतीत मका तसंच इतरही अनेक पीकं घेतली जात होती. इथे राहणारे लोक हे शेतीबरोबरच शिकार आणि मासेमारीही करीत होते.
सोळाव्या शतकात स्पॅनिश लोकांचं दक्षिण अमेरिकेत आगमन झालं. नंतरच्या काळात इथल्या मूळच्या असणाऱ्या या कासाराबे लोकांना रोगराई, गुलामगिरीचा जाच, गुलामगिरीमुळे लादली गेलेली कष्टाची कामं, अशा विविध त्रासांना तोंड द्यावं लागलं. याच कारणांमुळे ही सगळी कासाराबे वसती नष्ट झाली असावी. निर्मनुष्य झालेल्या या भागांचा आजूबाजूच्या जंगलानं त्यानंतर मुक्तपणे ताबा घेतला व कालांतरानं या जंगलात त्या काळची ही शहरं ‘हरवली’. ही शहरं आता पुनः सापडली आहेत ती अर्थातच, हायको प्र्युमर्स आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी लायडर तंत्रज्ञानाद्वारे त्यांचा शोध घेतल्यामुळे!
— डॉ. राजीव चिटणीस.
छायाचित्र सौजन्य: H. Prümers/DAI, Addicted04/Wikimedia, Anthony Beck/ Wikimedia
Leave a Reply