पूर्वीच्या काळी जे शब्द फक्त विज्ञान किंवा तंत्रज्ञान शिकलेल्या माणसांच्या तोंडी असायचे ते आता सर्वांनाच परिचयाचे झाले आहेत. संगणक क्षेत्राशी संबंधित असलेला असाच एक शब्द म्हणजे हार्ड डिस्क. हार्ड डिस्क म्हणजे आपल्या टेबलवर असलेल्या संगणकाचे हृदय असते, ते बंद पडले तर संगणक कामच करू शकत नाही.
त्यामुळेच एखाद्याने हार्ड डिस्क उडाली असे म्हटले तरी आपण दचकून जातो. हार्ड डिस्कचा शोध आयबीएम कंपनीत रे जॉन्सन यांच्या नेतृत्वाखालील पथकाने लावला. पूर्वीच्या काळी तिचा आकार रेफ्रीजरेटर एवढा मोठा होता, आता तो फारच कमी झाला आहे. हार्ड डिस्क हा संगणकातील माहिती साठवणारा एक भाग आहे. यात प्रायमरी मेमरी व सेकंडरी मेमरी असे दोन भाग असतात. हार्ड डिस्क हे सेकंडरी मेमरीचे उदाहरण आहे. हार्ड डिस्क आता अनेक गुणवैशिष्ट्यांसह उपलब्ध असतात, पण त्यात हार्ड डिस्कचा वेग फार महत्त्वाचा असतो, त्यावरच डिस्क ड्राईव्हमधून माहिती किती पटकन मिळणार हे अवलंबून असते. हार्ड डिस्क ही पूर्वीच्या फ्लॉपी डिस्कची अतिसुधारित आवृत्ती आहे, पण त्या दोन्हीत एक महत्त्वाचा फरक असा की, हार्ड डिस्कला दोनपेक्षा अधिक बाजू असतात, त्यामुळे हार्ड डिस्क अधिक वेगाने माहिती देते. फ्लॉपी डिस्कमध्ये माहितीचे रेकॉडिंग वेगळ्या पृष्ठभागावर होत असे व तो मऊ असल्याने त्याला फ्लॉपी डिस्क म्हणायचे.
हार्ड डिस्कमध्ये ज्या कठीण भागाचा रेकॉर्डिंगसाठी वापर केला जातो, त्याला प्लॅटर्स म्हणतात. ते एकावर एक रचलेले असतात. हार्ड डिस्कच्या क्षमतेवर प्लॅटर्सची संख्या अवलंबून असते. हार्ड डिस्क आता ४० गिगॅबाईट्स ते काही टेराबाईट्स (१ टेरा बाईट म्हणजे १००० गिगॅबाईट) क्षमतेपर्यंत उपलब्ध आहेत. आपल्या संगणकात असलेल्या हार्ड डिस्कची क्षमताही वाढवता येते. हार्ड डिस्कच्या पृष्ठभागावर एक चुंबकीय पदार्थाचा थर असतो. चुंबकीय क्षेत्राची विशिष्ट रचना करून त्या माध्यमातून माहिती साठवली जाते. चुंबकीय क्षेत्रातील बदलांचा अर्थ लावत माहिती वाचली जाते. रीड-राईट हेड त्यात प्लॅटर्सवरून कडेकडून मध्यभागाकडे या स्वरूपात फिरते, प्लॅटर्स हे ५६०० आरपीएम वेगाने फिरणाऱ्या स्पिंडलवर बसवलेले असतात. सॅमसंग, सीगेट, वेस्टर्न डिजिटल, क्वांटम अशा अनेक कंपन्यांच्या हार्ड डिस्क बाजारात आहेत. साधारणपणे ५६०० आरपीएम हा वेग योग्य मानला जातो, पण त्यापेक्षा तो जास्त असू शकतो.
Leave a Reply