संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा समितीवर भारताची अलीकडेच दोन वर्षांसाठी जी निवड झालीतिच्या मागे भारताच्या तिथल्या प्रतिनिधीचा मोठा वाटा आहे. हरदीपसिंग पुरी हे भारताचे संयुक्त राष्ट्रसंघातले कायमचे प्रतिनिधी आहेत. संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा समितीवर अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स, रशिया आणि चीन हे कायमचे प्रतिनिधी आहेत आणि त्यांना व्हेटोचा (नकाराधिकार) अधिकार आहे. व्हेटोचा अधिकार नसलेले दहा प्रतिनिधी निवडण्यात येतात. त्यात यंदा भारताची निवड झाली. भारताला १९१ मतांपैकी १८७ मते पडली हे विशेष आहे. पाच वर्षांमध्ये कोणत्याही एका देशाला मिळालेली ही सर्वाधिक मते आहेत. आशिया विभागातून कझाकस्तानला प्रतिनिधीत्व हवे होते, पण ऐन वेळी कझाकस्तानने आपली उमेदवारी मागे घेतली आणि भारताने ही निवडणूक लढवायचे ठरवले. दरवर्षी कायम नसलेल्या पाच प्रतिनिधी देशांना अशी संधी मिळत असते. गेल्या वर्षी हरदीप बोस्निया, ब्राझील, गेबॉन, लेबानन । आणि नायजेरिया निवडले गेले होते. यंदा जपान, ऑस्ट्रिया, मेक्सिको, तुर्कस्तान आणि युगांडा हे देश निवृत्त होत आहेत. भारताबरोबर दक्षिण आफ्रिका, जर्मनी, कोलंबिया आणि पोर्तुगाल हे देश निवडले गेले आहेत. नव्याने निवडले गेलेले सदस्य आता सुरक्षा समितीवर १ जानेवारीपासून काम पाहायला लागतील. अशा पद्धतीने निवडून येण्याची भारताला जवळपास १९ वर्षांनी संधी लाभलेली आहे. विशेष हे की भारताच्या या प्रतिनिधित्वाला पाकिस्ताननेही पाठिंबा दिला होता. ज्यांनी या प्रतिनिधित्वासाठी कसोशीने प्रयत्न केले ते हरदीपसिंग पुरी हे गेल्या वर्षीच संयुक्त राष्ट्रसंघात प्रतिनिधी म्हणून पाठवण्यात आले होते. त्याआधीचे प्रतिनिधी निरूपम सेन हे निवृत्त झाल्याने ती जागा रिकामी झाली होती. परराष्ट्र सेवेच्या १९७४ च्या तुकडीचे हरदीपसिंग पुरी हे संयुक्त राष्ट्रसंघात दाखल होण्यापूर्वी ब्राझीलमध्ये राजदूत होते. भारत, ब्राझील आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात आर्थिक सहकार्य वाढावे यासाठी निर्माण झालेल्या गटासाठीही त्यांचेच प्रयत्न कारणीभूत ठरले आहेत. ब्राझील हा देश आहे.
अणुपुरवठादार अमेरिकेबरोबरच्या अणुकरारानंतर ब्राझीलचे महत्त्व भारताच्या दृष्टीने अधिकच वाढले होते. त्यातच ब्राझील, भारत आणि चीन असाही आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचा गट निर्माण करण्यात आला. जागतिक व्यापार संघटनेविषयीचा पुरी यांचा चांगलाच अभ्यास आहे, त्याचा ब्राझीलमध्ये उपयोग करून घेण्यात आला. ब्राझील हा देशही संयुक्त राष्ट्रसंघात कायमचे प्रतिनिधीत्व मिळावे यासाठी प्रयत्नशील आहे.
भारताला कायमचे प्रतिनिधीत्व मिळावे यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत, पण भारताचा त्यासाठीचा संपर्क कमी पडतो असा आक्षेप नेहमी घेतला जातो, पण तो वाढवण्यात आपल्याला यश येईल, असे पुरी यांचे म्हणणे आहे. भारताचा आत्मविश्वासही त्यामुळे वाढणार आहे. परराष्ट्र सेवेत दाखल झाल्यावर पुरी यांना त्या खात्याचा आर्थिक विभाग सोपवण्यात आला. नवी दिल्लीमध्ये परराष्ट्र सेवेत त्यांनी इतर अनेक विभागही सांभाळले आहेत. ते परराष्ट्र सेवेत काही काळ सचिवही होते. संयुक्त राष्ट्रसंघाच्या जीनिव्हामधील कार्यालयामध्येही त्यांनी कायम प्रतिनिधी या नात्याने काम पाहिले आहे. पुरी हे अतिशय धूर्त आणि कार्यतत्पर राजनैतिक प्रतिनिधी म्हणून परिचित आहेत परी हे अतिशय थोड्याच अवधीत न्यूयॉर्कमध्ये लोकप्रिय ठरले आहेत. पुरी यांच्या पत्नी लक्ष्मी याही परराष्ट्र सेवेत आहेत. या दांपत्यास दोन मुली आहेत. ३५ वर्षांच्या परराष्ट्र सेवेत त्यांनी जपान, श्रीलंका, ब्रिटन या देशांमध्येही काम केले आहे. परराष्ट्र सचिवांच्या कार्यालयामध्ये ते सचिवपदीही होते. अमेरिकेच्या विभागावर ते सहसचिव होते. त्यांनी संरक्षण मंत्रालयामध्ये काही काळ नेमणुकीवर काम केले आहे. त्यांचे आतापर्यंत पाच ‘पेपर्स’ प्रसिद्ध झाले आहेत. बोस्नियामध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय शिखर परिषदेत त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले होते. पुरी यांचा जन्म १९५४ मध्ये झाला.
Leave a Reply