नवीन लेखन...

व्यंकटेश माडगुळकर – हरहुन्नरी लेखक

नवकथा लेखकामध्ये ज्यांनी पन्नाशीच्या दशकात मराठी कथेला वेगळ वळण दिलं त्या लेखकांच्या नामावलीत व्यंकटेश माडगुळकर याचं नाव अग्रस्थानी आहे. किंबहुना ना.सी. फडके यांच्या चाकोरीबद्ध प्रेमाच्या  आणि वि.स.खांडेकर यांच्या ध्येयवादी नायकांच्या कथांमध्ये अडकलेल्या मराठी कथेला वेगळ रूप दिलं. मराठी कथेला सामान्याची कथा बनवली .त्यात  सामान्याचे प्रतिबिंब होत , त्यामुळे त्या कथा सामान्यांना भावल्या. आपल्याश्या वाटल्या. भाषा अतिशय सोपी, सरळ, साधी.

माडगुळकर यांनी लिहिलेली पहिली कथा “काळ्या तोंडाची”, कथा साधीच, एक काळ्या तोंडाची कुत्री स्वताला अपेशी समजणारी ,जेथे जाईल तिथे सोबत अपयश घेऊन जाणारी, ती ज्यांच्या ज्यांच्या संपर्कात आली त्यांच्यावर संकटे कोसळली असे समजणारी.सगळ्यांकडून तिरस्कार मिळाल्यावर गाव सोडून निघून जाणारी.या कथेत त्यांनी परकाया प्रवेश उत्तम पद्धतीने दाखवला आहे. कुत्रीच मनोगत मानवी पद्धतीने उलगडून दाखवले आहे.वास्तविक थोरल्या पातीच्या प्रचंड लोकप्रियतेच्या ओझ्याखाली हि धाकटी पाती कोमेजून जाऊ शकत होती,पण तसे झाले नाही.

माडगुळकर जरी ब्राह्मण घरात जन्माला आले असले तरी त्यांचा वावर मात्र शेजारपाजारच्या मोमीन ,धनगर,तेली तांबोळी ,रामोशी अश्या वेगवेगळ्या जातीच्या लोकांशी आला.त्यांचं आयुष्य उघड्या डोळ्यांनी पाहिले आणि त्यांना खुल्या दिलाने स्वीकारले.त्यामुळेच ते त्यांना कथेमध्ये किंवा व्यक्तिचित्रणात मांडता आले.  त्यानंतर त्यांनी अनेक  कथा लिहिल्या   काळी आई ,वाळूचा किल्ला, बाई, लग्न, बाजारची वाट, ग्रामीण भागात वावरल्यामुळे त्यांच्या भाषेचा बाज वापरता आला . कुठेही लिहिताना ओढाताण करावी लागली नाही त्यामुळे प्रत्येकाला त्यांचा कथा भावल्या .अगदी आईने वयाच्या पाचव्या,सहाव्या वर्षी आपल्या कुळ सांभाळणाऱ्या लोकांकडे तूप आणायला पाठवले असता वाटेत येणाऱ्या अनुभवावर सुद्धा कथा लिहिली. इतके साधेपण त्यांच्या कथेत होते.सोप्या कथेचं दार  त्यांनी सामन्यासाठी खुल केल.मराठी कथेला चाकोरीतून बाहेर काढलं. त्यांच्या कथा  सत्यकथा मध्ये छापून येऊ लागल्या. पन्नाशीच्या दशकात कथा भागवतांच्या सत्यकथा मासिकात  छापून येण म्हणजे लेखकाला आपला गौरव वाटत असे. भागवतांनी ज्या ज्या तरुण लेखकांना आवर्जून लिहित केलं त्यात माडगुळकर एक होते . भागवत स्वतः प्राध्यापकीचा पिंड असणारे, त्यामुळे त्यांनी बर्याच नावोदितांवर लेखनाचे संस्कार केले.

माडगुळकरानी लिहिलेल्या बनगरवाडीची दखल तत्कालीन मराठी साहित्यिकांना आणि टीकाकारांना घेणे भाग पाडलं.वास्तविक बनगरवाडी म्हणजे  तरुणपणी शाळामास्तर म्हणून रुजू झालेल्या गावाच वर्णन. सातारा जिल्ह्याच्या माण तालुक्यातल्या दुष्काळी भागाच वर्णन.लिखाण निवेदनाच्या अंगान जाणारे. कादंबरीतील प्रत्येक पात्र सशक्त आणि वाचकाला आपलंस वाटणारं. माडगुळकर त्याच भागातले,त्यामुळे तो परिसर लहानपणापासून परिचयाचा. म्हणून तिथलं वर्णन सशक्तपणे लेखणीतून साकारू शकले. बनगरवाडी मधलं परिसराच वर्णन, गावचा दुष्काळ , प्रत्येक पात्र,त्यांचे एकमेकाबरोबरचे संबंध.हेवेदावे,याच अचूक वर्णन केलं आहे.  बनगरवाडी याचे इंग्लिश ,जर्मन ,हिंदी अश्या अनेक भाषात भाषांतर झाले. .त्यावर चित्रपट सुद्धा  आला . पाठोपाठ माणदेशी माणस आलं. ते व्यक्ती चित्रण हि खूप गाजले . त्यातली सगळी व्यक्तीचित्रणे इतकी सशक्त होती कि ती प्रत्येक वाचकाला आपल्या भोवताली  कुठेना कुठेतरी पाहिलेली वाटतात, प्रत्येक पात्र माडगुळकर डोळ्यासमोर उभे करतात.त्यांच्या घराशी उतारवयात सुद्धा इमान राखणारा धर्मा रामोशी, शाळेत मास्तर मारतात म्हणून शाळा बुडवून गावभर भटकणारा आणि नव्या मास्तरासमोर गुर्मीत उभा राहणारा झेल्या, परिस्थितीने नाडलेला पण बहिणीच्या मुलावर जीव लावणारा आणि माडगुळकर यांच्या  डब्यातल्या ताज्या पोळ्या भाच्यासाठी घरी घेऊन जाणारा रामा मैलकुली, असो किवा माडगुळकरांवर पोटच्या मुलासारखा जीव लावणारा  बीटाकाका असो हि सगळी पात्रे वाचकांच्या अवती भोवती वावरतात. हेच त्यांच्या लिखाणाच वैशिष्ठ्य आहे.प्रत्येक कथा,कादंबरी ते वाचकांच्या डोळ्यासमोर उभी करतात  .हीच  त्यांच्या लिखाणातली ताकद होती. बनगरवाडी आणि माणदेशी माणस याच्या अनेक आवृत्या निघाल्या. मराठीत सशक्त व्यक्तिचित्रण करणारी जी मोजकी लेखक मंडळी आहेत त्यात व्यंकटेश माडगुळकर याचं नाव वरच्या क्रमांकावर आहे. बनगरवाडी आणि माणदेशी माणसं ह्यांनी माडगुळकर ह्यांना खऱ्या अर्थाने वाचक प्रिय लेखक बनवलं.त्यांच्या वावटळ कादंबरीचा  झी मराठीच्या पिंपळपान मालिकेत समावेश करण्यात आला.

माडगुळकर यांनी  तू वेडा कुंभार,कुणाचा मेळ कुणाला नाही, पती  गेले ग काठेवाडी, ह्यासारखी लोकनाट्य लिहिली. चित्रपटाच्या कथा,पटकथा किंवा  संवाद  लिहिले  त्यातील प्रमुख म्हणजे ,जशास तसे,पुढचे पाउल, रंगपंचमी,वंशाचा दिवा आणि सगळ्यात महत्वाचा सांगते ऐका जो १०० आठवड्याच्या वर चालला. तरीही  ते दोन्ही माध्यमात मनापासून  रमले नाहीत.

व्यंकटेश माडगुळकर यांना खाजगीत तात्या म्हणत. तात्यांनी लेखणी बरोबर आणखी एक छंद जोपासला तो म्हणजे  शिकारीचा. त्यासाठी ते रानोमाळ भटकले. लिखाण आणि शिकारीत त्यांनी मनसोक्त मुसाफिरी केली. आपले शिकारीचे अनुभव शब्दबद्ध केले. वाघाच्या मागावर, जंगलतील दिवस या  शिकारकथाच्या रुपात लिहून वाचकासमोर पेश केले.अनेक रेखाचित्र त्यांनी आपल्या लेखांसाठी रेखाटली. फक्त हस्तिदंती मनोर्यात बसून लिखाण केले नाही म्हणून त्यांचे लिखाण सोपे झाले आणि सामान्यांना भावले. साहित्याकांच्या कोंडाळ्यात वावरले नाहीत.सामन्यातही तेव्हढेच समरसून गेले..स्वातंत्र्य लढ्यात भाग घेऊन नंतर मुंबईस नोकरीस आले.त्याच सुमारास तात्यांना पुणे रेडीओकेंद्रावर ग्रामीण कार्यक्रमाचे संचालक म्हणून नोकरी मिळाली. त्या निमित्ताने खूप भटकणे झाले त्यानी तात्यांना अनुभव संपन्न  केले.   Australia ला जाणे झाले. त्या अनुभवावर हिरवी कुरणे पांढरी मेंढरे प्रवासवर्णन लिहिले.. तात्यांनी स्वताचा वेगळा ठसा मराठी साहियत्यात उमटवला. लिखाणाची आपली वेगळी वाट चोखाळली.अनेक सन्मान मिळाले. १९८३मध्ये सत्तांतर साठी  साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला.तसेच १९८३ मध्येच अंबेजोगाई येथील मराठी  साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषवले.  नवीन लिखाण कायम चालूच ठेवले. वृत्तपत्रात सदर लिहिणे चालू  ठेवलं. शेवट पर्यंत त्यांनी लेखणी खाली ठेवली नाही .शेवटच्या आजारात सुद्धा ते लिहित होते.शेवट पर्यंत ते आपल्याच कैफात जगले.आणि म्हणून तर ते मराठी साहित्यात आपला वेगळा ठसा उमटवू शकले.आपले वेगळेपण जपू  शकले.

— रवींद्र शरद वाळिंबे

 

 

 

 

 

 

Avatar
About रवींद्र शरद वाळिंबे 87 Articles
मी हौशी लेखक आहे.मी विविध विषयावर लेखन करतो.कथा ललितलेखन व्यक्तिचित्रण हे माझे आवडीचे विषय आहेत.माझे आत्तापर्यंत कथा,ललितलेख प्रसिद्ध झाले आहेत.त्यापकी एका कथेला अनघा दिवाळी अंकात दुसरे पारितोषिक व एका कथेला मराठी साहित्य परिषद कल्याण शाखा चे उल्लेखनीय कथाचे पारितोषिक मिळाले आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..