एकोणिसाव्या शतकात अमेरिकेत आफ्रिकेतील कृष्णवर्णीयांना किंवा निग्रोंना गुलाम म्हणून विकत घेऊन राबविण्याची कुप्रसिद्ध समाजपद्धती होती. एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस जन्माला आलेली हॅरीएट टबमन ही एक अशीच गुलाम होती. म्हणूनच गुलामगिरीविरुद्ध लढण्याचे धैर्य तिला जणू तत्कालीन समाजरचनेनेच दिले असावे.
अमेरिकेच्या इतिहासातील अत्यंत परिणामकारक आणि धाडसी अशा बंडखोरांपैकी एका बंडासाठी हॅरीएट टबमनने आपले आयुष्यच पणाला लावले होते.
आपल्या नशिबी जसे आले तसे आयुष्य विनातक्रार स्वीकारणाऱ्या आणि पिढ्यान्पिढ्या गुलामीत राहणाऱ्या अन्य गुलामांप्रमाणे जगणारी हॅरीएट नव्हती. कोणत्या प्रकारची वस्तुस्थिती आपल्या वाट्यास आलेली आहे आणि कोणती वस्तुस्थिती आपल्यासाठी असायला हवी, याचा प्रदीर्घकाळ अत्यंत गांभीर्याने विचार करूनच हॅरीएट कृतीशील झालेली होती.
वयाच्या एकोणतिसाव्या वर्षीच तिने गुलामगिरीविरुद्ध लढणारी सर्वात भीतिदायक पुढारी म्हणून आपली करिअर सुरू केली होती. स्वातंत्र्यप्राप्तीसाठी तिला अमेरिकेच्या उत्तरेस पळून जावे लागले. परंतु एकटीने पळून जाणे तिला मानवले नाही. आपल्या बहिणी आणि मुलांसाठी ती एक वर्षानंतर आपल्या गावी परतली होती. तिचे ते गावी मागे परतणे तिच्या भावांसाठी आणि आईसाठीही उपयुक्त ठरले होते.
हॅरीएटला आपल्या जीवन-उद्दिष्टांचा मार्गच सापडला होता. तिच्या व्यक्तिमत्त्वातून जणू देवदूतच अवतरला होता. जणू ब्लॅक मोझेसचाच तिच्या रूपाने नवा जन्म झाला होता. गुलामीत असलेल्या आपल्या शेकडो बांधवांना गुलामगिरीच्या क्रूरतेपासून पळून जाण्यासाठी सुमारे वीस वेळा हॅरीएटने अत्यंत धोकादायक अशा दक्षिणेतील मोहिमा आखून त्या यशस्वीरित्या पार पाडल्या होत्या. अशा तऱ्हेने आपल्या बांधवांची गुलामगिरीतून सुटका करण्याच्या योजनेतील ती एक तज्ज्ञच ठरली होती.
प्रस्थापितांना त्रास देण्याची तिची शक्ती जसजशी वाढत गेली तसतसा तिचा उत्तर-दक्षिण प्रवास अधिकाधिक धोकादायक होत गेला. गुलामांच्या मालकांना हॅरीएटला कैद करावयाचे होते. त्यामुळे तिच्या अटकेसाठी त्यांनी त्यावेळी ४० हजार अमेरिकन डॉलर्सच्या बक्षिसाची प्रचंड रक्कम जाहीर केलेली होती!
हॅरीएटने गुलामगिरीतील तिच्या बांधवांना मुक्त करण्यासाठी नेतृत्वाचे पराकोटीचे कौशल्य दाखविलेले होते. त्यामुळेच तिला ब्लॅक मोझेस असे संबोधले जात होते. इतर काहीजण तिला फक्त जनरल म्हणूनच संबोधीत. चर्च आणि घरे यांचे जाळे विणण्यासाठी अमेरिकेच्या संपूर्ण दक्षिण भागात भूमिगत रेल्वेमार्ग निर्माण झालेला होता. हॅरीएट आणि तिचे फरारी बांधव त्यांच्या पलायनाच्या मार्गावर असताना भूमिगत रेल्वेमार्गाचा राहण्यासाठी उपयोग करीत असत.
हॅरीएटची धाडसी कृत्ये सिव्हिल वॉरपर्यंत चालूच राहिली होती. सिव्हिल वॉर चालू झाल्यावर हॅरीएट लष्करात शिपाई म्हणून भरती झाली होती. तेथे उत्तर अमेरिकेची गुप्तहेर म्हणून तिने कार्य केले होते. एकदा तर नदीतील असंख्य बंदूकधारी बोटींची ती प्रमुख असताना दक्षिणेकडील अत्यंत महत्त्वाच्या शत्रूंचा निःपात करून शेकडो गुलामांना तिने मुक्त केले होते. गुप्तहेर म्हणून कार्य करताना हॅरीएटने शत्रूच्या दक्षिणेतील बालेकिल्ल्यात प्रवेश करून गुलामांकडून महत्त्वाची गुपित माहिती हस्तगत केलेली होती.
सिव्हिल वॉरमधील हॅरीएटचे केंद्रीय लष्करातील योगदान मान्यताप्राप्त ठरले होते. सारे केंद्रीय अधिकारी हॅरीएट समोरून जाताना आपल्या डोक्यावरची हॅट काढून तिला मानवंदनाच देऊन जात असत. असे असूनही दुर्दैवाने लष्करातील शिपायांना निवृत्तीनंतर लगेच दिली जाणारी पेन्शनची रक्कम हॅरीएटला मात्र युद्धानंतर तब्बल तीस वर्षांनी मिळाली होती.
युद्धानंतर समाजातील सदोष गोष्टी निर्दोष कशा केल्या जातील, हे हॅरीएट दक्षतेने पाहू लागली. ज्या गोष्टींची तिला चिंता वाटत होती, त्याविषयी अतिशय परिश्रमपूर्वक लक्ष घालून ती काम करीत होती.
शाळांसाठी निधी उभारणे, गुलाम म्हणून ज्यांनी भूतकाळात काम केले होते, त्यांना आवश्यक त्या गोष्टींची मदत देणे, आजारी आणि अत्यंत दरिद्री माणसांसाठी काम करणे इत्यादी सेवाभावी कार्ये करणे तिने सातत्याने चालूच ठेवले होते. विशेष म्हणजे हॅरीएटने वृद्ध आणि अत्यंत दरिद्री कृष्णवर्णीय माणसांसाठी हॅरीएट टबमन होम नावाची संस्था स्थापन केली होती.
हॅरीएटच्या यशस्वी जीवनाचे रहस्य कौशल्याने आणि काटेकोरपणे योजना आखण्याच्या तिच्या कार्यपद्धतीत होते. ती जो प्रवास करीत असे त्याबाबतच्या तपशिलांची आखणी करण्यात ती तरबेज होती. रेल्वेने गुलाम बंधू-भगिनींना मुक्त प्रदेशात नेताना त्यांच्या मालकांकडून पकडले जाऊ नये म्हणून हॅरीएट विलक्षण काळजी घेई. सोबतची मुले रडतील आणि त्यामुळे मोठी माणसे पकडली जातील म्हणून हॅरीएट सोबतच्या मुलांना देण्यासाठी गुंगीची औषधे जवळ बाळगीत असे.
हॅरीएट टबमन ही लष्करी शिस्तीची होती. मुक्ततेच्या मार्गाकडे गुलामांना घेऊन जात असताना त्यांच्यापैकी कुणी जर भीतीने गारठून परत आपल्या मालकाकडे जाण्याचा विचार करू लागला तर त्याला रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून हॅरीएट त्याचे मतपरिवर्तन करीत असे.
अशाप्रकारे अमेरिकेतील गुलामगिरीविरुद्ध हॅरीएटने प्रदीर्घकाळ यशस्वीपणे लढा दिला. उर्वरित आयुष्यात तिने विधायक कार्य केले. १९१३ साली आपणच स्थापन केलेल्या हॅरीएट टबमन होममध्ये वास्तव्यास जाऊन तिने जगाचा निरोप शांतपणे घेतला!
(व्यास क्रिएशन्स् च्या ‘जगावेगळ्या’ ह्या पुस्तकातील प्रा. अशोक चिटणीस ह्यांचा हा लेख)
Leave a Reply