नवीन लेखन...

हरयाणातील झुंडशाही; विवेकशुन्य विचारांचा अपरिहार्य परिणाम

गेले दोन-तिन दिवस हरयाणात जो काही धिंगाणा त्या राम रहीमच्या भक्तांनी घातलाय, तो मनाला अस्वस्थ करणारा आहे. त्याहीपेक्षा अस्वस्थता, सरकारने हे सर्व होऊ दिलं, याची आहे. झुंडशाहीपुढे झुकलेलं सरकार ही चिंतेची बाब आहे.

‘झुंडी यशस्वी होतात, मात्र त्या नेहेमीच शहाण्या नसतात’ या अर्थाचं प्लेटोचं एक वाक्य आहे, ते या निमित्तानं आठवलं. हल्ली हे वाक्य वारंवार आठवतं, नाही, या वाक्याचा विसरच पडता नये, असं आपण सारेच वागत चाललो आहोत. पूर्वीही वाटायचं, पण आता ते वाटणं ठामपणात बदलत चाललंय. समाजाच्या दृष्टीने हे घातक आहे. राम रहीमच्या तथाकथीत भक्तांनी जे काही केलंय, ते पाहून मला हाच निश्कर्ष काढावासा वाटला. लोकनियुक्त सरकार एखाद्या गुंड प्रवृत्तीच्या इसमाच्या झुंडशाहीपुढे नांगी टाकताना दिसणं, हे आगामी काळात येणाऱ्या कठीण काळाची नांदी वाटते मला.

आपण भारतीय लोकांच्या मनाची ठेवणच अशी आहे, की वैयक्तीक स्वातंत्र्याचा मुखाने उद्घोष करणारे आपण, वैयक्तीकरित्या कधीच स्वतंत्र राहू शकत नाही. आपल्यावर कुणा ना कुणाच्या विचारांचा पगडा असतोच. असा पगडा असणंही वाईट नव्हे, पण त्या विचारावर आपण स्वत: विचार करून तो विचार आणखी प्रगल्भ कसा करता येईल किंवा पटला नाही तर टाकून कसा देता येईल यावर पुनर्विचार करायचा असतो, हेच आपण विसरत चाललोय. मग त्या आंधळेपणानं (काहीजण याला भक्ती, श्रद्धा वैगेरे म्हणतात) स्विकारलेल्या विचारांचा अविचार आणि मग विकार बनायला वेळ लागत नाही आणि याचा अटळ परिणाम विनाश हाच असतो.

एका विशिष्ट गोष्टीचा किंवा विचारांचा किंवा तो विचार देणाऱ्या व्यक्तीचा ‘विकारी’ पगडा असणारे काही लोक एकत्र आले, की मग त्यांची अविचारी झुंड बनायला वेळ लागत नाही आणि मग एकदा का झुंड बनली, की मग शहाणपणा, सारासार विचार, विवेक हे शब्द मोडीत निघतात. मी मुंबईत राहातो. कामानिमित्त लोकलने प्रवास करणं हे नित्याचंच असतं आम्हा मुंबईकरांना. लोकलच्या प्रवासात ही झुंडशाही नेहेमी अनुभवायला येते. कधी कधी नव्हे, बऱ्याचदा आपणही नकळत त्या झुंडीचा हिस्सा बनलेले असतो. ही नकळत घडणारी प्रक्रिया असते. प्लॅटफॅर्मवरचा एखादा माणूस गच्च भरलेल्या ट्रेनमध्ये येऊ देण्यासाठी गयावया करत असतो आणि आत असलेले सर्वजण त्याला विरोध करत असतात. कधीकधी तो बाहेरचा माणूस नेट लावून गाडीत घुसतोही आणि काही क्षणापूर्वी ‘बाहेरचा’ असणारा तो, क्षणात ‘आतल्या’ झुंडीचा हिस्सा बनतो आणि मग पुढल्या स्टेशनवर दुसऱ्या एखाद्याला, अगदी आत जागा असुनही, आत येण्यास निकराने विरोध करण्यात हा मागच्या स्टेशनवर आत आलेला सर्वात पुढे असतो. झुंड कशी बनते आणि विवेक कसा फाशी दिला जातो, याचं हे उदाहरण मी रोज अनुभवत असतो. अगदी आपल्या घरातल्या भांडणात देखील आपलं म्हणनं पटणारा आपल्या व्यतिरिक्त अगदी एक सदस्य जरी आपल्याला मिळाला, तरी आपल्या बोलण्याचा ताल एकदम वरच्या सुरात जातो, मग आणखी काहीजण आपल्या विचारांशी सहमत अयणारे सदस्य वाढले की मग झुंड तयार होऊन ‘मी म्हणतो तेच खरं’ इथपर्यंत आपली मजल घरातही जाते, तेच चित्र मोठ्या प्रमाणावर समाजात दिसू लागलंय. विचार बाजूला पडून ‘विकार’ त्या झुंडीचा ताबा घेतो आणि एकदा का विकाराने ताबा घेतला, की मग विनाश अटळ असतो. राम रहीमच्या निमित्ताने हे मोठ्या प्रमाणावर आणि स्पष्ट दिसून आलं इतकंच.

आपल्या समाजात अशा झुंडी सर्वच क्षेत्रात तयार झालेल्या दिसतील. पेशॅटचा जीव गेला तरी चालेल पण आपल्याला ‘चेन कमिशन’ मिळालंच पाहिजे म्हणून डाॅक्टर्सच्या झुंडी. आपली पोळी भाजून घेण्यासाठी समाज दांव पे लगाने को तैयार असलेल्या विविध राजकीय पक्षांच्या नेत्या/कार्यकर्क्यांच्या झुंडी, भाडं अनैतिकरित्या वाढवून मिळण्यासाठी समाजाला वेठिस धरणाऱ्या आॅटो रिक्शा-टॅक्सी चालक-मालकांच्या झुंडी, आझाद मैदानांवर हजारो लाखोंच्या संख्येत स्वत:च्याच काही मागण्यांसाठी जाणाऱ्या झुंडी, टक्रेवारीसाठी आणि ती मिळवून देणाऱ्या सत्तेसाठी काहीही करण्याची तयारी असलेल्या, तत्वांशी फारकत घेणाऱ्या सर्वपक्षीय नेत्यांच्या झुंडी, संविधानाचं रक्षण करण्याच्या शपथा घेऊन तेच पायदळी तुडवण्याचं कार्य करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या झुंडी, वंदे मातरम म्हणनार आणि म्हणनार नाही असं म्हणनाऱ्यांच्या झुंडी, सध्याच्या दिवसांत दिसणाऱ्या सार्वजनिक गणपती मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या झुंडी, मिडीयाच्या बेबंद झुंडी आणि आपल्या समाजात ‘हम सब एक है म्हणत’ जात-पंथ-धर्म यांच्या वेगवेगळ्या झुंडी. या झुंडींचा आणि सामाजीक समतेच्या शहाणपणाचा कोणता आणि कसा काय संबंध असतो, हे कोणि विचार करायच्या मनस्थितीत आहे की नाही ही चिंतेची बाब आहे. समाजात असे अनेक ध्रुव तयार झाले, की मग समाजाचं विकेंद्रीकरण होणं अगदी अपरिहार्य असतं आणि याचा फायदा बाहेरचा शत्रू अगदी सहज घेऊ शकतो याचं भानं आपण सोडलंय असं वाटण्यासारखी परिस्थिती निर्माण झालीय हे खरंय.

एकेकाळी प्रगल्भ असलेल्या, जगाला विचार देणाऱ्या आपल्या समाजाचं असं अध:पतन का व्हावं ही गांभिर्याने विचार करण्यासारखी गोष्ट आहे. समाजाला स्वातंत्र्य, समता, बंधुता, समरसता, आचार-विचार यांचा पाठ देणारे एकेकाळचे संत, विचारवंत आज का निर्माण होत नाहीत? कधीकाळी होऊन गेलेल्या या विचारवंतांनी सामाजाचा तोल ढासळू नये म्हणून स्वार्थापलिकडे जाऊन जीवाचं रान केलं होतं. आता तसं होताना दिसत नाही ही चिंतेची बाब आहे. स्वत:ला विचारवंत म्हणवणारे, त्यांना स्वत:ला पटो वा न पटो, स्वार्थासाठी एखाद्या कळपात सामिल झालेले दिसतात आणि स्वत:चा विचारांचा त्याग करून कळपाच्या विचारांच्या आहारी गेलेले दिसतात. समाजाच्या समोर विचार ठेवून समाजाला समतोल विचार करायला भाग पाडणारे विचारवंत, साहित्यिक आपल्या समाजात निर्माण होण्याचं थांबलेलं आहे. आणि जे काही बुद्धीवादी स्वत:ला विचारवंत म्हणवतात, ते आपलाच विचार कसा बरोबर हा अट्टाहास बाळगताना आणि विरोधी विचार मांडणाऱ्यांना झोडपताना दिसतात.अलीकडे ज्या झुंडी निर्माण झालेल्या दिसतात, त्याच्यामागचं हे कारण आहे. जे स्वतंत्र विचार करणारे आहेत, त्यांच्यावर कुठल्यातरी ‘इझम’चं लेबल लावून त्यांना शत्रु ठरवलं जाताना हल्ली दिसतं. झुंडशाहीत हे असं हेणं अपरिहार्य असतं. आपली वाटचाल पुन्हा उलट्या दिशेने अश्मयुगातल्या कळप पद्धतीकडे चाललीय याची साधार भिती वाटतेय.

हे टाळायचं असेल तर समाजातील साहित्यिक आणि विचारवंतांनी वैयक्तिक स्वार्थ बाजूला ठेवून पुढे यायला हवं. समाज सुदृढ हवा आणि सुदृढतेसाठी काही पथ्य पाळायची असतात याचं भान ठेऊन, समाजाला सुदृढ विचार द्यायची जबाबदारी मुख्यत: साहित्यिक आणि विचारवंत यांची असते. डाॅ. अरुण टिकेकरांचा एक निबंध मला अशा वेळी आठवतो. टिकेकर म्हणाले होते, “अल्पकालिक राजकीय लाभासाठी पुढच्या कित्येक पिढय़ांच्या भवितव्याचे नुकसान करणारे मोठे राजकीय नेते, स्वार्थासाठी आणि संपत्तीसंचयासाठी राजकीय तशीच व्यक्तिगत निष्ठा बदलण्यास मागेपुढे न पाहणारे लहान नेते आणि ‘विचारवंत’ हे बिरुद दिमाखाने मिरवणारी, पण कोणत्याही प्रकारचे सामाजिक दायित्व न मानणारी साहित्य, कला आणि डॉक्टरी, वकिली पेशांतील मंडळी महाराष्ट्राला पुढे घेऊन जात आहेत की मागे, असा प्रश्न आज कोणाही सुबुद्धाला पडेल. समाज जसजसा सुशिक्षित होईल, तसतसा तो अधिक विचारी, अधिक विवेकी, विनयशील आणि सुसंस्कारित होईल, असा पूर्वीच्या समाजधुरिणांचा जो कयास होता तो महाराष्ट्राने खोटा पाडला आहे. महाराष्ट्रात जो पैसा येऊ लागला आहे, तो उन्मत्त आणि उर्मट प्रवृत्तीलाच खतपाणी घालू लागला आहे. आपला समाज उघडपणे असभ्य भाषा आणि हिंसा यांचे समर्थन करू लागला आहे. नागरिकशास्त्राचे साधे साधे पाठ विसरू लागला आहे. कायदा बंधनकारक वाटू लागल्याने तो मोडण्याकडे त्याची प्रवृत्ती होऊ लागली आहे. याचा अर्थ मराठी संतांनी मराठी समाजाच्या मनाची जी मशागत केली होती, ती पार धुपली गेली आहे. मराठी समाजसुधारकांनी महाराष्ट्रात सुधारणांची जी रोपटी लावली होती, ती आर्थिक मस्तीच्या प्रखर उन्हात जळून खाक झाली आहेत. एकेक करून जुन्या-जाणत्या समाजसुधारकांना समाजाने हरवले आहे. त्या प्रत्येकाचे नाव हरघडी घेत त्यांच्या विचारांना मात्र समाजाने पराभूत केले आहे.” श्री. टिकेकरांचे हे उद्गार आज किती खरे ठरतायत हे पुन्हा एकदा राम रहीमच्या निमित्ताने समोर आलंय.

भल्या कमी आणि बुऱ्या जास्त मार्गाने येणारा पैसा, विचारांपेक्षा महत्वाचा ठरला आहे. दोन नंबरने मिळवलेला पैसा व तसा पैसा मिळवण्याचे मार्ग समाजात प्रतिष्ठा पावू लागले आहेत. असा पैसा अशांतीच घेऊन येतो आणि मग ती अशांती घालवून शांतीच्या शोधात असे महाभाग निघाले असता, अशा बाबा, बापू, महाराज, माॅं यांची ठिकाणं निर्माणं होणं अपरिहार्य असतं. भगवी वस्त्र, दाढी-मिशा-जटांचं जंगल आणि मुखात देवांच्या नांवाची दंगल असली, की मग शांतीच्या शोधात निघालेली, इमान विकलेली, अशांत माणसं, साक्षात देव भेटला म्हणून तिथंच थांबतात आणि मग आणखी नवं ढोंग तिथे जन्म घेतं, नवी झुंड तयार होते. बाबा, बापू, महाराज, माॅं यांचे जे राजकारणी, बडे अधिकारी, चित्रपट तारे-तारका, डाॅक्टर्स, इंजिनिअर्स वैगेरे सुशिक्षित आणि श्रीमंत भक्त असतात, ती अशीच भल्या-बुऱ्या मार्गाने मिळालेल्या पैशांची अनौरस निपज असते. मग तिथे सर्वप्रकारच्या अनैतिक धंद्यांना प्रेत्साहन आणि राजकीय अधिष्ठानही प्राप्त होतं. स्वार्थापायी आपण संपूर्ण समाजाला वेठीस धरल्याची जाणीव यापैकी कुणालाच नसणं, हे अतिशय गंभिर आहे.

आपण सारेच मेंदू कुणाकडेतरी गहाण ठेवल्यासारखे वागतोय. स्वार्थाची सीमा आपण कधीच ओलांडली आणि समाजात जी काही अराजकता निर्माण होऊ लागलीय, त्याचं कारण हेच आहे. याबाबतीत समाजाला दोष देणं योग्य नाही, कारण समाजापुढे आदर्श असं काहीच राहीलेलं नाही. पिठात पाणी मिळवून कालवून दुध म्हणून पिणाऱ्यांना, अस्सल दुध काय असते हे कसं कळायचं? दोष पिठात पाणी मिसळवून दुध म्हणून पिणाऱ्यांचा नाही, तर त्यांना ते दुधच आहे सांगणाऱ्या सध्याच्या विचारवंत-नेत्यांचा आहे.

हे थांबू शकतं. फक्त प्रत्येकाने शुद्ध विचार करणं आवश्यक आहे. आपण प्रत्येकजण कुठल्या न कुठल्या विचारांचे असतो. हा विचार आपला पगडा घेऊन आपली विचारशक्तीच नाहीशी करणार नाही याची दक्षता पदोपदी घेण्याची गरज आहे. आपले विचार फक्त आपल्यालाच सुखावताहेत, परंतू समाजासाठी, देशासाठी जर ते पोषक नसतील, तर ते निग्रहाने बाजूला करायला हवेत. समाजाला अस्सल विचारांचं अस्सल दुध पाजणारे निर्माण व्हायला हवेत. विचार आणि विवेक एकत्र असतील तरच काहीतरी चांगलं घडेल, अन्यथा जे सध्या आहे तेच चालू राहील आणि पुढील पिढ्यांना प्रचंड निराशेशिवाय अन्य कोणताही वारसा आपण देऊ शकणार नाही.

— नितीन साळुंखे
9321811091

नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश
About नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश 377 Articles
श्री नितीन साळुंखे (मित्रपरिवारात गणेश या नावाने परिचित) हे मुळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील खांबाळे या गावचे. सध्या मुक्काम मुंबईत. वाचन, लेखनाची अत्यंत आवड. स्वत:चा ७०० हून जास्त पुस्तकांचा संग्रह. इतिहास, भाषा,शब्दांचा जन्म, देव, धर्म, संस्कृती, प्रथा, परंपरा यांचा अर्थ काय व त्या कशा अस्तित्वात आल्या याचा शोध घेण्याची विशेष आवड. लहानपणापासून संघ स्वयंसेवक व संघविचारांशी एकनिष्ठ. पुणे येथील संघप्रणित सर्वात मोठ्या अशा जनता सहकारी बॅंकेतील प्रदिर्घ नोकरीनंतर त्यांचे मित्र आणि आमदार प्रमोद जठार यांच्याबरोबर काम करण्यासाठी त्यांनी २००७ मध्ये नोकरी सोडली. त्याचबरोबर मित्राबरोबर मुंबईत बांधकाम व्यवसायात पदार्पण. २०-२२ वर्षांचा ज्योतिष शास्त्राचा अभ्यास असल्यामुळे परिचितांमध्ये एक उत्तम ज्योतिषी म्हणून ओळख. सर्व थरातील मित्र. त्यातही बहुतकरून लेखक, कविंचा, कलाकारांचा जास्त भरणा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..