नवीन लेखन...

महाराष्ट्र मोल्सवर्थचे ऋण विसरलाय का?

मोल्सवर्थचा मराठी – इंग्रजी शब्दकोश (१८३१)  ऐकूनही माहीत नाही असा मराठी माणूस सापडणं कठीण. पण हा मोल्सवर्थ नेमका कोण हे माहीत असणारी मराठी माणसंही तशी कमीच. मोल्सवर्थची मराठी-इंग्रजी डिक्शनरी प्रथम १८३१ मध्ये प्रकाशित झाली. तिची दुसरी सुधारित आवृत्ती १८५७ मध्ये छापली गेली. आजही सुमारे १००० पानांचा मोल्सवर्थचा हा शब्दकोश मराठीतला सर्वांत मोठा शब्दकोश आहे.

महाराष्ट्रातल्या न्यायालयात जेव्हा एखाद्या मराठी शब्दाचा अर्थ लावण्याची वेळ येते तेव्हा मोल्सवर्थने दिलेला अर्थ न्यायाधीश प्रमाण मानतात. मोल्सवर्थ ह्या ब्रिटीश माणसाने आपल्याला ही डिक्शनरी तयार करून दिली. इंग्रजांच्या काळात घडलेली त्या शब्दकोश निर्मितीची सत्यकथा अचंबित करणारी आणि आजच्या तरूणांना प्रेरणा देणारी अशी दोन्ही आहे. प्रत्येक मराठी माणसाला ती निदान माहीत तरी असायला हवी.

जेम्स थॉमस मोल्सवर्थ हा एक ब्रिटीश लष्करी अधिकारी. जन्म १५ जून १७९५ चा. शालेय शिक्षण व बालपण ब्रिटनमध्ये गेलेलं. त्याकाळी किशोरवयीन ब्रिटीश मुलांना लष्करात दाखल करण्याची पद्धत होती.

जेम्स वयाच्या १६ व्या वर्षी ब्रिटीश लष्करात दाखल झाला. एप्रिल १८१२ मध्ये १७ व्या वर्षी त्याला भारतात पाठवण्यांत आले. ब्रिटीश लष्कराच्या पद्धतीप्रमाणे भारतात आलेल्या प्रत्येक अधिकाऱ्याला मराठी आणि हिंदी भाषा शिकावी लागे. त्याच्या परिक्षा घेतल्या जात, आणि त्यात पास होण्याची लष्करी सक्तीही असे.

जेम्स त्या परिक्षांसाठी मराठी शिकू लागला आणि मराठी भाषेच्या चक्क प्रेमातच पडला. मराठी शब्द जमवण्याचा छंद त्याला लागला. पुढे १८१४ मध्ये त्याला लेफ्टनंट म्हणून बढती मिळाली. १८१८ मध्ये त्याची बदली सोलापूरला झाली. तेव्हा तो २३ वर्षांचा होता. मराठीत भाषांतर करण्यासाठी तो जे शब्द टिपून ठेवत होता त्याची संख्या दिवसेदिवस वाढत होती. पुढे १८२४ मध्ये त्याची बदली गुजरातमध्ये खेडा भागात झाली.

मराठी वातावरणाची सवय झालेल्या मोल्सवर्थला गुजरातमध्ये करमेना. त्याने पुढल्या काही महिन्यांत ब्रिटीश सेनेकडे मराठी – इंग्रजी शब्दकोश तयार करण्याचा प्रस्ताव पाठवला आणि महाराष्ट्रात बदलीही मागितली. शब्दकोशासाठी सहकाऱ्यांचा पगार, स्टेशनरी वगैरेंचा मिळून एकूण खर्च २००० रूपये येईल त्यास मंजुरी मिळावी अशी प्रस्तावात विनंती होती. पण ब्रिटीश सेनेने त्याचा प्रस्ताव फेटाळला.

इंग्रज सरकारला मराठी शब्दकोशाशी कसले देणेघेणे? त्यांना आपले साम्राज्य सांभाळायचे आणि त्यासाठी लढाया करायच्या एवढेच माहिती. मोल्सवर्थच्या प्रस्तावावर ब्रिटीश सेनेचे म्हणणे होते की लेफ्टनंट कर्नल व्हान्स केनेडी यांनी एक मराठी – इंग्रजी शब्दकोश तयार केला आहे. तो पुरेसा आहे. सबब, प्रस्ताव नामंजूर.

पण मोल्सवर्थ तर मराठी शब्दकोशाच्या कल्पनेने झपाटला होता. गुजरातमध्ये राहून मराठी शब्दकोश होणे शक्य नव्हते. वारंवार विनंती अर्ज, स्मरणपत्र पाठवूनही त्याची महाराष्ट्रात बदली होत नव्हती. शेवटी कंटाळून त्याने एक धमकी आणि एक ऑफर ब्रिटीशांना दिली. धमकी अशी की बदली झाली नाही तर मी लष्करी नोकरीच सोडून देईन.

ऑफर अशी की शब्दकोशासाठी रजा दिली तर त्याला मिळणारे सर्व भत्ते तो सोडून द्यायला तयार आहे. एवढं टोक गाठल्यावर त्याची बदली मुंबईत करण्यांत झाली. शब्दकोश तयार करण्याची परवानगीही त्याला देण्यांत आली. मोल्सवर्थवर अधिकारी म्हणून लष्करी जबाबदाऱ्या होत्या, त्यात आणखी एक भर म्हणजे बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीचा (BNES) कारभार पाहण्याचं कामही त्याला दिलं गेलं.

बीएनईएस संस्थेत त्याची भेट मराठी भाषा उत्तम जाणणाऱ्या काही शास्त्री मंडळींशी झाली. सोलापूरला असताना त्याची ओळख थॉमस कँडी यांच्याशी झाली होती. थॉमस कँडी आणि त्यांचा जुळा भाऊ जॉर्ज दोघेही मराठी उत्तम जाणणारे होते. थॉमस तर संस्कृत पाठशाळेचे प्राचार्य म्हणून काम करीत असत.

दोघा कँडी बंधूंना मुंबईला बीएनईएस मध्ये पाठवण्यांत यावं ही मोल्सवर्थची विनंतीही ब्रिटीशांनी मान्य केली. कँडी बंधू एप्रिल १८२६ मध्ये मुंबईला आले. आता मराठी शब्दकोशाचं काम वेगात सुरू झालं. पण जून महिन्यांत मुंबईत पावसाने थैमान घातलं. हवामान पार बदलून गेलं. कँडी आणि मोल्सवर्थ सगळेच त्या पावसाने हैराण झाले. मुंबई सोडून कोकणात जावं असं त्यांनी ठरवलं.

त्यानुसार शब्दकोशाचं पुढलं काम बाणकोट आणि दापोली येथे झालं. १८२८ च्या डिसेंबरात शब्दकोशाची अंतिम प्रत तयार झाली. बीएनईएस संस्थेचा लिथो छापखाना होता. तिथे शब्दकोशाची छपाई करावी असं ठरलं. मोल्सवर्थला उपलब्ध असलेले मराठी टाईप आवडले नव्हते. त्यामुळे त्याने नवा आणखी सुबक टाईप शब्दकोशासाठी करून घेण्याचे ठरवले.

त्यावेळी टाईप फक्त कलकत्त्यात तयार होत. काही आठवड्यांत कलकत्त्याहून नवे टाईपही आले. तयार झालेला शब्दकोश २५,००० शब्दांचा होता. कलकत्त्याहून टाईप यायला जो वेळ लागला तेवढ्या वेळात मोल्सवर्थने आणखी १५,००० शब्द जमा केले आणि शब्दकोशातील शब्दांची संख्या ४०,००० केली. शब्दकोशाला नाव दिले ‘महाराष्ट्र भाषेचा कोश’. छपाई पुर्ण होऊन प्रती हाती यायला १८३१ साल उजाडले.

मोल्सवर्थने काही प्रती एका पत्रासोबत ब्रिटीश सेनाप्रमुखांकडे पाठवल्या. पत्रात लिहीले की “कामाचा आवाका, आणि झालेल्या कामाचा दर्जा (याबाबत मी बोलण्यापेक्षा) प्रत्यक्ष पाहिल्यानंतर कल्पना येईल. लेफ्टनंट कर्नल व्हान्स केनेडींनी तयार केलेला मराठी शब्दकोश ८००० शब्दांचा होता. मोल्सवर्थचा ४०,००० शब्दांचा. पण सरळ कौतुक करतील तर ते ब्रिटीश कसले?

शब्दकोशाचा दर्जा ठरवण्यासाठी त्यांनी एक समिती नेमली. त्यात लेफ्टनंट कर्नल केनेडी, लेफ्टनंट जॉर्ज पोप, आणि रॉबर्ट कॉटन मनी हे तीन सदस्य नेमले. केनेडींच्या मते मराठी ही फक्त एक बोली भाषा होती, आणि त्यात जे मोजके शब्द आहेत त्यांचा कोश त्यांनी तयार केलेला होता.

नव्या कोशाला मुळातच त्यांचा विरोध होता. त्यांनी मत दिले की मोल्सवर्थने संस्कृत, पर्शियन, फारशी, अरबी वगैरे शब्दांचा भरणा करून शब्दसंख्या वाढवली आहे. मराठीत एवढे शब्दच नाहीत. जॉर्ज पोप यांनीही केनेडींचीच री ओढली. पण रॉबर्ट मनी यांनी मोल्सवर्थचं कौतुक केलं. भारतात आजपर्यंत झालेल्या छपाईत ही छपाई उजवी असल्याचे सांगून त्यांनी लिहीलं की “अशा मोठ्या शब्दकोशाची विद्यार्थ्यांचा विचार करता गरजच होती. शब्दकोश समृद्ध आणि अचूक आहे. मऱ्हाठा (मराठी) भाषेचे विशाल ज्ञान त्यात आहे. हा ग्रंथ गौरवास पात्र आहे.”

त्रिसदस्य समितीची उलट सुलट मते पाहून इंग्रज सरकार बुचकळ्यात पडले. त्यांनी आता १८ सदस्यांची एक समिती मोल्सवर्थ डिक्शनरीचे मूल्यमापन करण्यासाठी नेमली. त्या समितीने मात्र एकमुखाने मोल्सवर्थच्या कामाची वाखाणणी केली. ही डिक्शनरी नसती तर किती तरी मराठी शब्द युरोपियनाना कधीच समजले नसते असा अभिप्राय बहुतेक सदस्यांनी दिला.

पाठोपाठ सप्टेंबर १८३१ मध्ये इंग्रज सरकारनी मोल्सवर्थची प्रशंसा करणारे पत्र त्याला पाठवले. मोल्सवर्थने आता इंग्रजी – मराठी डिक्शनरीही तयार करावी असं इंग्रज सरकारने सुचवलं आणि त्या खर्चास मंजुरीही दिली.

मोल्सवर्थने कँडी यांच्या मदतीने इंग्रजी – मराठी डिक्शनरीचे काम सुरूही केले. पण १८३२ च्या सुमारास त्याला प्रकृतीचा त्रास होऊ लागला. जिद्दीने मराठी – इंग्रजी शब्दकोशाचे काम करताना त्याचे तब्येतीकडे दुर्लक्ष झाले होते. आयुष्यातली इतकी सारी वर्ष मराठी – इंग्रजी शब्दकोश तयार करण्यांत गेली होती. तो आता ३७ वर्षांचा झाला होता. लग्न करायचं राहूनच गेलं होतं. थंड हवेच्या ठिकाणी गेलं तर तब्येत सुधारेल म्हणून तो उटीजवळच्या भागात दक्षिण भारतात काही दिवस जाऊन राहिला. पण तब्येत त्याला साथच देत नव्हती.

नाईलाजाने तो १८३६ मध्ये इंग्लंडला परत गेला.
१८३६ ते १८५१ ही १५ वर्षे मोल्सवर्थ मराठी आणि महाराष्ट्रापासून दूर साता समुद्रापार इंग्लंडमध्ये राहिला. दरम्यान शब्दकोशाची पहिली आवृत्ती संपत आली होती. दुसरी सुधारित आवृत्ती तयार करायची होती. इंग्रज सरकारने १५ वर्षांनंतर मोल्सवर्थला विनंती केली की दुसरी आवृत्ती तयार करायला भारतात या, मराठीसाठी तुमची गरज आहे. त्या विनंतीला मान देऊन मोल्सवर्थ १८५१ साली पुन्हा भारतात आला. वय ५६ वर्षांचे होते.

पण तब्येत सुधारली होती. त्याला सर्वांशी उत्साहाने उत्कृष्ट मराठीत बोलताना पाहून लोक तोंडात बोट घालत होते. १८५१ ते १८५७ ही सात वर्षे मोल्सवर्थने मराठी – इंग्रजी शब्दकोशासाठी पुन्हा वाहून घेतले. हे काम त्याने पुणे आणि महाबळेश्वर येथे राहून केले. तयार झालेल्या नव्या सुधारित शब्दकोशात आता ६०,००० मराठी शब्द होते. १८५७ साली हा ९५२ पानांचा सुधारित मोल्सवर्थकृत मराठी इंग्रजी शब्दकोश प्रकाशित झाला.

आज आपण हीच आवृत्ती पहात असतो. अमेरिकेच्या शिकागो युनिव्हर्सिटीने ही डिक्शनरी इंटरनेटवर (सर्चसह) उपलब्ध केली आहे हे आज बहुतेकांना माहित आहे.

मोल्सवर्थ १८६० मध्ये इंग्लंडमध्ये परत गेला. शब्दकोशाच्या कामात मोल्सवर्थला मदत करणारी कितीतरी शास्त्री मंडळी होती. त्यात अलिबाग नागाव कडली बरीच होती. ते सारे मोल्सवर्थला मोलेसर शास्त्री म्हणत. काही जणांनी तर मोरेश्वर शास्त्री असेच बारसे करून टाकले होते. मोल्सवर्थ १३ जुलै १८७२ रोजी कलीफ्टन येथे वारला. असं म्हणतात की तो गेल्याचे कळल्यावर आपल्याकडल्या अनेक शास्त्र्यांनी मोलेसर शास्त्र्याचा श्राध्दपक्षही केला होता.

जेम्स थॉमस मोल्सवर्थ, ज्याची मातृभाषा इंग्रजी होती, ज्याचा मराठीशी काहीही संबंध नव्हता, असा एक ब्रिटीश आपल्या भाषेच्या प्रेमात पडतो काय, त्यासाठी आयुष्य वाहून टाकून शेवटपर्यंत अविवाहित राहतो काय, आणि कोण कुठले परके ब्रिटीश त्याच्याकडून १८५७ साली आपल्याला पुढे आयुष्यभर पुरेल असा सुधारित शब्दकोश तयार करून घेतात काय, सगळेच अघटित आहे. अगदी मोल्सवर्थइतकं समर्पण आज मिळण्याची अपेक्षा नाही, पण निदान त्याच्याकडून प्रेरणा घेण्याइतपत तरी क्षमता आजच्या मराठीजनांमध्ये असायला हवी. असावी.

मोल्सवर्थच्या कार्याचा गौरव करताना विश्वकोशकर्ते पं. लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी लिहीले, “‘मोल्सवर्थने मोठ्या आकाराचा पहिला मराठी शब्दकोश तयार केला. त्याने त्याच्या या शब्दकोशाच्या प्रचंड कामासाठी कितीतरी विद्वानांना प्रेरित केले आणि त्या कामात सहभागी करून घेतले. स्वत: मोल्सवर्थनेही या शब्दकोशासाठी आपले संपूर्ण आयुष्य वाहिले. मराठी भाषा आणि महाराष्ट्र, मोल्सवर्थचे हे ऋण कधीच विसरू शकणार नाही.’

वस्तुस्थिती ही आहे की महाराष्ट्र मोल्सवर्थचे ऋण विसरला आहे.

हा लेख सोशल मिडियातून वाचायला मिळाला. फार आवडला म्हणून शेअर केला.. 

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..