आपण कुटुंबप्रिय व समाजप्रिय आहोत. दैनंदिन जीवनात आपले अनेकां बरोबर संबंध येत असतात. कुटुंबातील सदस्यांनी जशी काही बंधने पाळायची असतात, तसेच अमुक एका परिस्थितीत कसे वागावे याचे काही निकष समाजाने स्वीकारलेले असतात. यापेक्षा वेगळी वागणुक दिसून आली तर ती समाजमान्य नसते. मग असं वागणार्याला ‘वेडा’ ठरविलं जातं ते योग्य आहे का, असा मला प्रश्न पडतो. याचे उत्तर देण्याआधी काही उदाहरणे देतो.
1) तुम्हाला कोणी ओळखीचे दिसले की तुम्ही हसता. पण तुम्हाला कोणी कॅमेर्यासमोर हसायला सांगितले तर तुम्ही कृत्रिम हसू चेहर्यावर आणता. या दोन हसण्यांमध्ये फरक असतो, कारण मेंदूच्या दोन वेगळ्या भागांचा ह्यात सहभाग असतो. हसणे चेहर्यावर आणणारी ‘खास’ जोडणी (Basal Ganglia – Thalamus) यापैकी फक्त एका प्रकारात काम करते. ओळखीचा चेहरा दिसला की दृष्य संवेदना लिंबिक सिस्टिम कडून बेसल गँग्लियाकडे जातात. नंतर नैसर्गिक हास्य दर्शविण्यासाठी चेहर्यावरील स्नायूंच्या क्रिया क्रमाने घडू लागतात. हे हास्य खरं असतं. आठवा हवाईसूदरीचे हास्य, बॉसच्या फडतुस विनोदावरचे हास्य, हॉटेलमधल्या वेटरचे वा सेल्समनचे हास्य व लाफ्टर शो मधील अति खोटारडे हास्य. खोटे, कृत्रिम हास्य ओळखणे सोपे आहे. खरं हसताना डोळ्यांच्या भोवतालचे स्नायू आकुंचन पावतात व त्यामुळे डोळे लहान होतात. तसेच भुवईची कानाकडची बाजू खाली झुकते. पण तुम्हाला हसण्याची विनंती केली की काय घडतं? ही शाब्दिक सूचना तुमच्या मेंदूतील उच्च केंद्र, श्रवण केंद्र आणि भाषा केंद्र येथे पोचते व त्या विनंतीचा अर्थ लावला जातो. तेथून ती स्नायू कंद्राकडे (Motor Cortex) जाते व चेहर्याच्या हालचाली मुद्दाम घडू लागतात. या केंद्रासाठी हे काम करणे अतिशय क्लिष्ट असते, म्हणुन ते फसते. त्यामुळे तुमचे हास्य कृत्रिम, लादलेलं आणि बंदिस्त वाटते. या दोन प्रकारच्या ‘हास्य जोडण्यां’चे पुरावे हाती लागले ते मेंदूला इजा झालेल्या रुग्णाच्या तपासणीतून. उजव्या बाजूच्या मोटर कॉर्टेक्सला इजा पोचलेल्या व्यक्तीच्या चेहर्याच्या फक्त उजव्या भागातच कृत्रिम हास्य दिसतं. पण याच व्यक्तीला कोणी नातेवाईक समोर दिसला, तर त्याच्या चेहर्याच्या व तोंडाच्या दोन्ही बाजूंना हास्य दिसतं. कारण बेसल गँग्लिया शाबुत असतो व त्यामुळे दोन्ही बाजूना नैसर्गिक हास्य पसरविण्याची क्रिया घडते. आले का लक्षात हसण्यातले बारकावे?
2) एकदा एक महिला प्रसिध्द न्यूरॉलॉजिस्ट डॉ. गोल्डस्टीन यांना भेटायला आली. ती दिसायला व बोलायला व्यवस्थित होती. तिची तक्रार अशी होती – तिचा डावा हात सारखा तिचाच गळा आवळण्यासाठी जात असे. तिला उजव्या हाताने डाव्या हाताशी झटापट करून त्या हाताला आवरावे लागत असे. तिचा डावा हात तिला जीवे मारण्याचा प्रयत्न करत असे म्हणून तिला त्या हातावर बसावे लागे. डॉक्टरांनी खात्री करून घेतली की ती मनोरुग्ण (Psychotic) नाही आणि उन्मादी (Insane) नाही. तिला पॅरालॅसिसचा वा अनावश्यक, प्रतिक्षिप्त क्रियांचा त्रास नव्हता. तिच्या मेंदूच्या उजव्या भागात सुप्त आत्मघातकीपणाची प्रवृत्ती दडलेली असावी असे त्यांना वाटले. सुरुवातीला डाव्या मेंदूकडून या विचारांना विरोध झाला असेल. म्हणून ही लक्षणे दिसत नव्हती. असे संदेश डाव्या व उजव्या भागांना जोडणार्या ‘कॉर्पस कॅलोझम’ द्वारे जातात. नंतरच्या काळात तिच्या मेंदूतील ‘कॉर्पस कॅलोझम’ या भागाला मोठा आघात (Stroke) झाल्याने डावा मेंदू उजव्या मेंदूवर नियंत्रण ठेवू शकला नसावा. डॉक्टरांचे हे निदान खरे ठरले. मेंदूचे दोन्ही अर्धगोल वेगवेगळ्या कामांत तज्ञ असतात, असे त्यांनी सिध्द केले. नंतरच्या काळात त्या महिलेला डावा हात बांधूनच वावरावे लागले.
3) पॅरालिसिस झालेल्या व्यक्तीची डावी किंवा उजवी बाजू लुळी पडते. मेंदूच्या डाव्या वा उजव्या, ज्या भागाला दुखापत झाली असेल त्यानुसार विरुध्द बाजूच्या ऐच्छिक हालचाली बंद होतात. पण जेव्हा अशा रुग्णाला जांभई येते तेव्हा त्याचे दोन्ही हात एकाच वेळी ताणले जातात. पॅरालिसिस झालेला हात सुध्दा. कारण जांभई येत असताना मेंदूतील दुसरा मार्ग हाताची हालचाल नियंत्रित करीत असतो आणि हा मार्ग मूळ मेंदू (Brain Stem) मधील श्वसन केंद्राशी जोडलेला असतो. मूळ मेंदू हृदयाचे आकुंचन-प्रसरण, रक्ताभिसरण व श्वसन या अनैच्छिक क्रिया हाताळतो. त्यात कोणी ढवळाढवळ करू शकत नाही.
4) बाथरूममध्ये कार्बन मोनॉक्साईड वायू साठल्याने डायना गुदमरली. तिला वेळीच मदत मिळाल्याने ती बेशुध्दावस्थेतून बाहेर आली पण तिच्या मेंदूचे काही भाग कायमचे नष्ट झाले. ती शुध्दीवर आली तेव्हा पूर्णपणे आंधळी होती. दोन दिवसानंतर तिला वस्तूचा रंग आणि घडण समजू लागली, पण वस्तूचा आकार ओळखता येत नव्हता. नवर्याचा चेहरा वा स्वतःची आरशातली प्रतिमासुध्दा ती ओळखू शकत नव्हती. ती आवाजावरून व्यक्ती ओळखत होती. वस्तू हातात घेतल्यावर वस्तूचे नाव सांगत होती. पण हाताची किती बोटे वर केली आहेत हे सांगू शकत नव्हती. कागदावरची सरळ रेषा उभी आहे की आडवी की तिरकी हे पण तिला सांगता येत नव्हते. डॉक्टरांनी पत्राची पेटी तिच्या समोर धरली आणि पत्र टाकायची खाच कोणत्या दिशेने आहे ते विचारले. तिला नाही सांगता आले. पण जेव्हा तिला त्या पेटीत पत्र टाकायला सांगितले तेव्हा तिने बरोबर टाकले. पेटी तिरकी, उभी वा आडवी कशीही धरली तरी तिला पत्र टाकता आले. डॉ. मिल्नर यांच्या असे लक्षात आले की पत्र टाकण्याच्या सूचना तिने जाणीवपूर्वक पाळलेल्या नव्हत्या म्हणून तिला ते जमले. त्या क्रिया वेगळ्या मार्गाने घडत गेल्या होत्या. पुढे या डॉक्टरांनी स्ट्रोकमुळे उद्भवलेल्या दृष्टीशी संबंधित समस्यांच्या अभ्यासात जास्त लक्ष घातले.
5) एखाद्या व्यक्तीला त्याचा हात वा पाय अपघातात गमवावा लागतो वा उपचाराचा भाग म्हणून तो कापावा लगतो. त्यानंतर खूप दिवसांनी जर त्या व्यक्तीला तो हात वा पाय आहे असे वाटत असेल तर हाताला वा पायाला अभासी अंग (Phantom Limb) असे म्हणतात. काहींना अभासी अंगाला तीव्र वेदना जाणवतात. अशा वेदनांवर उपचार करता येत नाहीत. काही रुग्ण हाताचे व पायाचे नसणे मान्य करतात पण खूप वर्षांनी. सतरा वर्षाच्या टॉमला अपघातामुळे डावा हात कोपरापासून गमवावा लागला. डॉ. पेनफील्ड यांनी त्याच्या चाचण्या घेतल्या. त्याच्या गालाला पेन्सिल लावली तर त्याला गाल तसेच डाव्या हाताच्या अंगठ्याला स्पर्श केल्याचे जाणवत असे. वरच्या ओठाला पेन्सिल लावली तर वरचा ओठ व डाव्या तर्जनीला स्पर्श केल्याचे जाणवत असे. टॉमच्या चेहर्यावरून पाणी ओघळले तर त्याला हातावरून पाणी सरकत असल्यासारखे वाटत असे. डॉक्टरांनी अनेक रुग्णांवर प्रयोग केले व स्पर्श केल्यावर मेंदूच्या कोणत्या भागात संवेदना जागृत होतात ते पाहिले. त्यांनी एक नकाशा तयार केला. हा नकाशा उलटा पण एका विशिष्ठ प्रकारे असल्याचे त्यांना समजले. टॉमचा आभासी हात पूर्णपणे चेहर्याच्या नकाशावर स्थापन झाला होता. शरीराच्या इतर भागांचा प्रतिसाद अपेक्षेप्रमाणे, म्हणजे सर्वसाधारण होता. या नसलेल्या हाताचा दुसरा नकाशा दंडाजवळील भागावरसुध्दा कोरला गेला होता. त्यामुळे त्याच्या दंडावर खाजवले तर त्याला नसलेल्या बोटांना खाजविल्यासारखे वाटत असे. डॉ. पेनफील्ड यांना प्रश्न पडला की दोन नकाशे का असावेत? या नकाशात हातालगत खालच्या बाजूला चेहर्याचा भाग व वरच्या बाजूला दंडाचा भाग असतो. त्यांना असे दिसले की नकाशातील नसलेल्या हाताच्या थोड्या जागेवर चेहर्याच्या मज्जतंतूंनी अतिक्रमण केले तसेच उरलेल्या थोड्या भागावर दंडाच्या मज्जातंतूंनी. यावरून त्यांना समजले की संवेदना वाहून नेणार्या जोडण्या नव्यानेही तयार होतात.
6) दृष्टी हि फक्त बघण्याशी संबंधित नसते. ती अतिशय गुंतागुंतीची व गूढ प्रक्रिया आहे. आपले डोळे जेव्हा एखादे साधे दृश्य पाहतात, तेव्हा दोन मितींमधली, उलटी प्रतिमा डोळ्याना दिसते. पण आपल्याला आकलन होते ते तीन मितींमधील, रमणीय, सुलट दृश्याचे. एक चमत्कारी बदल घडलेला असतो. हे कळण्यासाठी प्रथम ‘मेंदूत प्रतिमा असतात’ हा समज काढून टाकला पाहिजे. याऐवजी, बाह्य जगातील वस्तूंचे व घटनांचे सांकेतिक वर्णन साठविलेले असते हे लक्षात घेतले पाहिजे. मानवी मेंदूतील तीस (30) भाग दृश्यावर प्रक्रिया करतात. प्रत्येक भाग विशिष्ठ प्रकारची माहिती मिळवतो. उदाहरणार्थ वस्तूचा रंग, वेग, आकारमान, अंतर वगेरे. या 30 भागापैकी एक वा जास्त भागांना जर इजा झाली तर त्या माणसाच्या आकलनात विरोधाभास दिसतो. स्वित्झरलँडमधील ‘इनग्रिड’ या महिलेचे उदाहरण घेऊया. तिला कोणतीही हालचाल वा स्थितीतील बदल ओळखता येत नसे (Motion Blindness). तिच्या मेंदूतील दोन्ही बाजूचे ‘MT’ (Middle Temporal) हे भाग बिघडले होते. तिला आकार समजत होते, ती चेहरे ओळखू शकत होती व पुस्तक वाचू शकत होती. पण रस्ता क्रॉस करण्याचे वेळी तिच्या अंगावर काटा येत असे, कारण येणार्या मोटारींच्या वेगाचा अंदाज तिला येत नसे. समोरील व्यक्तीशी बोलताना फोनवर बोलल्याप्रमाणे ती बोलत असे कारण त्या व्यक्तीच्या चेहर्यावरील बदललेले हावभाव तिला दिसत नसत. कपात कॉफी ओतताना केव्हा थांबायचे हेही तिला समजत नसे कारण कपातील द्रवाची वाढती पातळी तिच्या लक्षात येत नसे. आपल्यासाठी सोप्या असणार्या या क्रिया तिच्यासाठी अवघड होत्या.
7) मेंदूला आघात झाल्यामुळे एलेन दोन आठवडे हॉस्पिटलमधे राहून घरी आली. सकाळी तिने केस विंचरले, मेकअप केला व तयार झाली. तिच्या मुलाला आईकडे बघितल्यावर आश्चर्य वाटले. यापूर्वी असलेली आईची टापटीप व मेकअपची जाण आज कुठे गेली? असा त्याला प्रश्न पडला. तिने डाव्या बाजूचे केस विंचरले नव्हते व ओठांच्या डाव्या बाजूला लिपस्टिक लावली नव्हती. ब्रेकफास्टच्या वेळेस तिने डाव्या बाजूच्या पदार्थांकडे दुर्लक्ष केले. एलेनला जडलेल्या विकाराचे नाव होते Hemi Neglect (उजव्या बाजूच्या Parietal Lobe ला धक्का पोचल्याने होणारी व्याधी). असे रुग्ण डाव्या बाजूकडील वस्तू वा डावीकडील विश्व याबाबतीत अनभिज्ञ असतात. अशा व्यक्तीचे लक्ष डाव्या बाजूकडे वेधल्यास त्यांना समजते, पण स्वतःहून त्यांच्या लक्षात येत नाही. एलेन घरात वावरत असताना डाव्या बाजूकडील वस्तूंना धडक देत असे. एखाद्या गोष्टीवर ध्यान देण्यासाठी मेंदूत विखुरलेल्या अनेक भागांचा सहभाग आवश्यक असतो. डावी बाजू दुर्लक्षित होण्याचा विकार उजव्या बाजूच्या Parietal Lobe ला धक्का पोचल्याने होतो, जसे एलेनच्या बाबतीत घडले. पण गंमत अशी की डाव्या बाजूच्या Parietal Lobe ला धक्का पोचल्यास उजवी बाजू दुर्लक्षित होण्याचा विकार होत नाही. याचे कारण मेंदूच्या उजव्या अर्धगोलात विस्तृत भागावर लक्ष ठेवू शकणारा ‘शोध प्रकाश’ (Search Light) असतो, जो डाव्या व उजव्या दोन्ही बाजूंची दखल घेतो. पण डाव्या अर्धगोलात फक्त उजव्या बाजूवर लक्ष ठेवणारा ‘शोध प्रकाश’ असतो. मेंदूच्या डाव्या भागाला इजा झाली तरी उजव्या बाजूचा मेंदू ते काम करतो. पण उजव्या बाजूला इजा झाल्यास विस्तृत शोध प्रकाश बंद पडतो व डाव्या बाजूचा अर्धगोल फक्त उजव्या बाजूवर लक्ष देवू शकतो. म्हणून Hemi Neglect उजव्या मेंदूस तडाखा बसल्याने होतो. अशा रुग्णाला जेवणाचे वेळी मान डावीकडे वळवून प्लेटमधील डाव्या बाजूचे अन्न पदार्थ बघावे लागतात. खुर्ची वा प्लेट फिरवूनही ते जमू शकते. हा आजार जीवघेणा नसला तरी गंभीर आहे. डाव्या हाताचा व्यायाम करण्याचे प्रयोजनच त्यांच्या दृष्टीने नसते कारण डावा हात काही काम करत असतो हे त्यांच्या नजरेस येत नाही. अशा रुग्णांना सुरुवातीच्या काही आठवड्यात डावा हात व पाय वापरण्यासाठी उद्युक्त करावे लागते. एलेनला कागदावरील आडव्या रेषेचे दोन सारखे भाग करण्यास सांगितले तर ती एकदम उजवी कडे खूण करीत असे. कारण तिच्या दृष्टीने रेषेचा फक्त उजवीकडील भाग अस्तित्वात होता. एलेनला घड्याळ काढायला सांगितल्यावर तिने वर्तूळ काढले कारण त्याचा केलेला सराव कामी आला. पण जेव्हा 1 ते 12 आकडे काढायची वेळ आली तेव्हा तिने सर्व आकडे वर्तुळाच्या उजव्या भागात लिहिले. फुलाचे चित्र काढताना एलेन पाच पाकळ्या उजव्या बाजूस काढत असे.
आता तुम्ही ठरवा डायना, टॉम, इनग्रिड व एलेन यापैकी कोणी खरोखर ‘वेडा’ आहे का? यांचे वागणे सर्वसामान्यांसारखे नाही हे कबूल, पण ती मुद्दाम केलेली कृतीही नाही. आणि महत्वाचे म्हणजे मेंदूविज्ञानाला याची कारणमिमांसा समजू लागली आहे. माझ्या मते यापैकी कुणीही ‘वेडा’ नाही. जांभई आल्यावर पॅरालिसिस झालेल्या व्यक्तीचे दोन्ही हात हलताना बघून त्या व्यक्तीला तुम्ही ‘खोटे’ ठरविणार का? स्वतःचा जीव घेऊ पाहणार्या व्यक्तीचा एक हात व त्याचा प्रतिकार करणारा दुसरा हात ही कृती ‘विक्षिप्त’ वाटेल पण तो वेडाचार नाही. हसण्याची क्रिया मात्र हसण्यावारी नेण्याइतकी सोपी नाही हे खरे.
— रविंद्रनाथ गांगल
Ref: ‘Phantoms in the Brain’ by V.S. Ramachandran and Sandra Blakeslee
Leave a Reply