नवीन लेखन...

हसत-खेळत म्हातारपण

जीवनातील अंतिम परंतु महान सत्य म्हणजेच “मृत्यू”. जो ह्या विश्वात आला तो एक दिवस जाणारच ह्यात तिळमात्र शंका नाही. ज्ञान असो वा विज्ञान आजपर्यंत तरी कुणीही मृत्यूच्या सत्यतेविषयी आक्षेप घेतला नाही.

अथवा हे सिद्ध करु शकला नाही की जो आला आहे तो येथेच स्थिर आहे. वा मृत्यूच्या आहारी तो गेला नाही. हा एक मात्र खरं आहे की येण्या व जाण्यामधला काळ हा सर्वसाधारण सर्वांसाठी वेगळा वेगळा व अनिश्चित असल्याचे मात्र दिसून येते. ह्याच काळाला ‘जीवन रेखा’ हे नाव दिले गेले आहे.

परमेश्वर हा सर्व श्रेष्ठ कलाकार दयाळू, न्यायी, शक्तीमान इत्यादी असल्याचे आजपर्यंत मोठे संत महात्मे, विद्‍वान व सर्वसामान्यजण पण मानीत आले आहे. हे कुणी दुसरा म्हणतो म्हणून मी म्हणतो असा सर्वसामान्याचा भाव नसतो. हा अतिशय सत्यपणे थोड्याफार प्रमाणात प्रत्येकाला आलेला अनुभव असतो. मनुष्य नास्तिक असेल तर कोणती तरी ‘शक्ती’ वा निसर्ग, पंचमहाभूते म्हणल. व आस्तिक असेल तर त्या परमेश्वराला स्वत:च्या आंतरिक इच्छेप्रमाणे एखादे प्रचलीत नाव देईल. पण एक मात्र ‘सत्य’ आहे की त्या निसर्गाने प्रत्येक कलाकृती निर्माण करताना ‘आयुष्य रेखा’ मात्र त्या त्या कलाकृती प्रमाणे आखून दिलेल्या आहेत. त्याची ही देणगी अटळ व निश्चीत स्वरुपाची आहे. जसे कुत्रा ह्या प्राण्यासाठी १० वर्षे व अमीबा ह्या एक पेशीमय जीवासाठी कांही क्षण , तर मानवाच्या वाट्यास १००वर्षाचे आयुमान दिलेले आहे. ना जास्त ना कमी म्हणूनच ‘शतायुषी’ व्हा. हा वडीलधाऱ्याकडून आशीर्वाद दिला जातो. तेव्हा प्रत्येकाने आत्मविश्वासाने हे गृहीत धरले पाहिजे की त्याच्या वाट्याला १०० वर्षाचे आयुष्य लाभलेले आहे. तो एवढी वर्षे ह्या विश्वांत जगणारच आहे. हे झाले तर्कज्ञान, तत्त्वज्ञान. परंतु शतायुषी माणसे शोधून पण सापडत नाहीत. अगदी क्वचित आणि त्याच्याविषयी लगेच कौतुकास्पद मजकूर वृत्रपत्रांत येतात. कारण सर्व सामान्य अशा घटनेस निसर्गाचा चमत्कार वा परमेश्वराची विशेष कृपा ह्या सदरात नेवून सोडतात.

‘परिस्थीत’ ह्या शब्दाची व्याप्ती जेवढी मोठी करता येईल ती कारणे अतिशय महत्त्वाचे आहे. ज्याच्या त्याच्या ज्ञान क्षमतेप्रमाणे त्याची दिशापण बरीच वाढू शकते आणि जेव्हा ही क्षमता अपूरी पडते तेव्हा अस्तित्वात असलेल्या विज्ञानाची मर्यादा दिसून येते. केवळ समाधानाचा आसरा घेण्यासाठी मनूष्य म्हणतो “परमेश्वराची इच्छा” ह्याच परिस्थीतीचा विचार करावयाचा म्हणजे शरीरावर सदैव बाहेरुन व आतून बरेचसे घटक परिणाम करीत असतात. याच्याचमुळे शरीराची झीज होत राहते. दीर्घ आयुष्यला हेच घटक खीळ निर्माण करतात. मनुष्य शतायुषीची जीवन रेखा हलके हलके आखूड होते चाललेली जाणवतो.

शुद्ध हवा, चांगले व स्वच्छ पाणी, सकस आहार, योग्य असे तापमान, आद्रता इत्यादी काही बाह्य वातावरणाशी निगडीत असलेले घटक आहेत. ह्याचा पर्यावरणाशी संबंध आहे. वैज्ञानिक युगाच्या रगाड्यामध्ये वरील घटकांची चांगलेपणाची व्याख्याच बदलून गेली आहे. आजकाल शुद्ध हवा ही हिमालयाच्या परिसरांत देखील सर्व दृष्टीने चांगली असेल का हा एक प्रश्नच पडतो. शहरामधली हवा फार दुषीत व ज्यात प्राणवायूचे प्रमाण अतिशय कमी झालेले असते. खेड्यामध्ये देखील धुराळा, शेकोट्या, अस्वच्छता इत्यादीमुळे हवा दुषीतच असते. शुद्ध पाण्याविषयी तर विचारण्याची सोयच नाही. स्वच्छ पाण्यालाच मिळालेले सांडपाणी, गटारे इत्यादी. पाण्याचा साठ्या नजीकच वाढत जाणाऱ्या प्रचंड झोपडपट्ट्या आणि सारा अस्वच्छ परिसर पाण्याला स्वच्छपणापासून खूप दूर नेवून ठेवतो. जेव्हा नैसर्गिक स्वच्छ पाणी उपलब्ध होत नाही, तेव्हा त्यात औषधांची प्रक्रिया करुन ते सर्वांना मिळते व असे औषधीयुक्त पाणी पचविणे शरिराचे एक कर्तव्य बनून शरिरास अपायच करते.

सकस आहार तर आता इतिहास जमा होत आहे. चांगले खाद्य पदार्थ मिळतच नाही. भेसळयुक्त व अतिशय निकस असे मिळणारे धान्य, तेले, तुप इत्यादींवर जगणे भाग पडते. तेव्हा असल्या खाण्यामुळे शरिराची जी झीज होते, तीच आयुष्याची जीवन रेषा आखूड करण्यास कारणीभूत ठरते. निसर्गाचा समतोलपणा बऱ्याच अंशी विज्ञानांनी नष्ट केलेला आहे. निरनिराळे प्रयोग हे पर्यावरणाला असमतोल करतात आणि त्याचमुळे तापमान, आद्रता इत्यादींमध्ये सदैव बदल होत जातो. शेवटी त्याचा परिणाम शरिरावर होतो. थोडक्यात म्हणजे ह्या सर्व बाह्य घटकांची यादी बरीच मोठी करता येईल. हे सर्व आजकालच्या माणसाच्या शक्तीबाहेर होऊन गेले आहे. हा कवेळ सामाजिक वा राष्ट्रीयच प्रश्न न राहता सर्व जगातील ही समस्या बनत चालली आहे आणि त्याला झगडा देणे हे केवळ अशक्य आहे. परिणाम फक्त एक “आयुष्य कमी करणारी कारणे”

शरीराच्या आतून हल्ले कऱणारे घटक हे तर माणसाच्या आवाक्याबाहेरचीच बाब आहे. उदा. रक्तामधले गुणधर्म, जेनेटीक कॅरेक्टरीस्टक्स ( Genetic Characteristic ) इत्यादी हे सारे रक्ताच्या समजल्या जाणाऱ्या गुणधर्मामुळे कौटुंबीक (Family) बनतात. कुणाचे आई – वडील, आजा आजी, पंजा-पंजी इत्यादीच्या रक्तामधून येणारा विकार, हा तुमच्या पर्यंत येतो व तुमच्या शरीरावर आघात करतो. तुम्ही अशा स्थितीत काहीच करु शकत नाहीत. परिणामी तुमच्या आयुष्याची रेषा आखूड करण्यासाठी हे सारे कारणीभूत होतात.हे सारं बघीतल्यावर असे वाटू लागते की प्रत्येकजण आपल्यापरी, जीवन रेखा मर्यादीत करण्यास प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे कारणीभूत झालेला आहे. ज्या घटणाचे त्याला अवलोकन होत नाही. त्याबद्दल तो नशीबाला वा परमेश्वराला बोल लावतो ते केवळ समाधानासाठीच.

अकाली, अकस्मित आणि अनैसर्गिक मृत्यू सोडल्यास प्रत्येकाच्या जीवनरेखेवर वृधत्वाचा एक अखेरचा टप्पा असतोच. मृत्यू हे एक अंतीम सत्य समजले गेले.

त्याला आनंदाने व हासत सामोरे जाण्यासाठीच ह्या वृध्वत्वकाळाची जाण सर्वांनी करुन घ्यावयास हवी. कित्येक कारणांनी वृधत्वाचा काळ प्रत्येकाला क्लेशदायक व निराशा निर्माण करणारा वाटतो. परंतू जर कुणी योजनाबद्ध जीवन आखण्याचा प्रयत्न केला तर वृधत्व हा भार न वाटता सुसह्य वाटेल. बालपण, तारुण्य, पौढत्व हे पहिले तीन टप्पे निसर्गाने जीवनांत काहीतरी निर्माण करण्यासाठी, कमविण्यासाठीच दिले आहे. मग तो विकास शारिरीक, वैचारिक, आत्मिक, शैक्षणिक, आर्थिक वा आणखी इतर कारणासाठी असो. ह्या ज्याचा त्याचा वैयक्तीक विचार असेल. परंतू शेवटी समाधानाची पायरी चढताना वैयक्तीक, कौटूंबीक, सामाजिक किंवा राष्ट्रीय थरापर्यंत जाण्याचा प्रत्येकजण विचार करीतच असतो. अतिशय उच्च कोटीला गेलेली मंडळीच फक्त ह्या जगाचा आणि सर्व विश्वाचा अतिशय उज्वलतेमधून विचार करतात. जे कांही साध्य करावयाचे असेल, त्यांच्यासाठीच जीवनातील पहीले तीन टप्पे आहेत. आपण जे कमविले वा गमविले त्याचे विश्लेषण करणे. दुसऱ्यांच्या जीवनातील यश –अपयशाचा अभ्यास करणे. सर्व आठवणी आणि अनुभवांचे तुमच्यामागून येणाऱ्या पिढीसाठी मार्गदर्शन करण्यात आनंद प्राप्त करण्याचा काळ, म्हणजेच वृधत्वाचा काळ आहे. परमार्थ ज्ञान, ईश्वरी चिंतन व मनाच्या शांतीसाठी सदैव व्यस्त राहण्याचे कसब बाळगणे वा निर्माण करणे हाच हा काळ चांगल्यारितीने व्यतीत करण्याचा एकमेव मार्ग.

काळ हा अतिशय वेगाने पुढे जात आहे. तो तितक्याच वेगाने बदलत आहे. ज्यांना ह्या वेगाची जाणीव त्वरीत येते ते आपली परिस्थीती चटकन बदलून आलेल्या नवीन विचारांशी जास्तीत जात सहमत होण्याचा प्रयत्न करतात. अशांनाच हा वृध्वत्वाचा काळ सुसह्य होतो. कांही मंडळी बदलत्याकाळाप्रमाणे वहात जाण्यापेक्षा, आपलाच विचार वा परंपरागत गोष्टी इतरांवर लादू पाहतात. त्यांना शेवटी निराशेलाच तोंड द्यावे लागते. वृध व्यक्तीने “ आपण मावळते सुर्य असून आपल्या मागची पिढी हे उगवणारे सुर्य आहेत ह्याची सदैव जाण ठेवावी ” . मार्गदर्शन म्हणजे अट्टाहास नव्हे. अनुभवाची शिदोरी म्हणजे तुम्हाला आलेले काही अनुभव. इतरांना अगदीचे तसेच अनुभव येतील असे मुळीच नाही. फक्त “ सांभाळून राहा, विचारांतीच निर्णय घेत जा ” अशाप्रकारचे मार्गदर्शनपर वक्तव्य त्यांनी करुन फक्त मागुन येण्याऱ्याला मार्ग दाखवावे इतकेच.

वृधांच्या आरोग्याशी निगडीत असलेल्या तीन मुख्य समस्या आहेत. शारिरीक, मानसीक आणि आर्थिक. ह्याच्याच अनुषंगाने विचार होऊन वृधत्वाचा काळ हा कसा सुखकर होऊ शकतो हे बघावे लागेल. शारिरीक समस्या :- माणसाच शरीर हे एक अतिशय उकृष्ट नमुन्याचे ‘यंत्र’ आहे आणि जर आपण शरिराकडे ते केवळ एक यंत्र ‘मशीन’ आहे. ह्या दृष्टीकोणातूनच बघीतले तर आपले कितीतरी प्रश्न उकळून जावू शकतात. त्याचप्रमाणे प्रत्येकाला वाटणारी काळजी ही देखील बऱ्याच प्रमाणात कमी होऊ शकेल.

आता प्रथम कोणत्यातरी एखाद्या मशीनविषयी थोडेसे समजून घेवू या. उदाहरणात ‘स्कूटर’ अतिशय उपयुक्त. एक ठरावीक प्रकारचे कार्य याच्यांकडून घेतले जाते. त्याच्या मशीनमध्ये निरनिराळे भाग असून सर्व भागांचे एकमेकांशी सहकार्य व पूरक कार्य असून त्याचा परिणाम म्हणून स्कूटर चालविली जाऊ शकते. प्रत्येक स्वतंत्र भागाचा एकमेकांशी अशा रितीने संबंध असतो की त्या भागात जर काही बिघाड झाला तर त्याच्या विशीष्ट कार्यात बिघाड होतो व जर तो भाग फार महत्त्वाचा असेल तर पूर्ण मशीन काम करणे थांबते. शरीराचे देखील असेच आहे. त्याच्यात देखील बरेच भाग ज्याला अवयव म्हणतात. ते असतात निरनिराळ्या अवयवाचे निरनिराळे कार्य असते आणि त्याचप्रमाणे त्यांचे एकमेकांशी सहकार्य वा पूरक कार्य असते. जसे हाताने वस्तू तोंडात जाते, दातांनी तिचे बारीक तुकडे होतात व पोटांत सोडले जाते. पुढे त्याच वस्तूवर निरनिराळ्या अवयवामध्ये निरनिराळ्या क्रिया होऊन, त्यामधली असलेली शक्ती काढून घेणे व आपल्या शरीराला त्याचा उपयोग करुन घेणे, ही थोडक्यात होणारी घटना. ह्या प्रक्रीयेमध्ये जर का कोठेही अडथळा निर्माण झाला, तर त्याचा परिणाम त्या त्या प्रमाणात संपूर्ण शरीरावर होतो.

स्कूटरमध्ये देखील ऑईल आणि करंट मिळणे ह्या अत्यंत महत्त्वाच्या प्रक्रीया आहेत. त्याविणा दुचाकी चालूच शकणार नाही. परंतू स्कूटरचे सीट, लाईटस् एवढेच काय ब्रेक्स इत्यादी भाग हे वाहनाची अत्यंत सोय निर्माण करणारे, परंतू काही कारणाने त्यात बिघाड झाला तर वाहन चालू तर शकते. फक्त गैरसोय मान्य करुन. यांत हात, पाय, डोळे, कान, दात इत्यादी अवयव म्हटल्यास अशाच यादीमध्ये जावू शकतात. शरिराला त्याच्या व्यवस्थीत कार्य पद्धतीमध्ये अशा अवयवाचा सहभाग असतो, परंतू त्यांच्या शिवाय देखील माणसाला आपले आयुष्य व्यवस्थीत जगता येते. म्हणूनच आंधळे, बहीरे, लंगडे इत्यादी बरीच अभागी माणसे देखील त्यांचे व्यंग बाजूला ठेवून जीवनाच्या इतर सर्व बाबींमध्ये रस घेताना, आनंद घेताना दिसतात. दुर्दैवाने कांही वेळा शरीरात व्याधी निर्माण होतात. त्यावेळी एखाद्या कार्यांत होणाऱ्या बिघाडाविषयी केवळ खंत करीत बसू नका. त्या वेगळ्या परिस्थितीत जीवन कसे सुसह्य बनविता येईल हे बघा. मधूमेह झाला व त्यासाठी डॉक्टरांनी साखर वर्ज केली अथवा रक्त दाब म्हणून मीठ सोडण्याचा जर सल्ला दिला. हे सल्ले शास्त्रीय व वैद्यकीय दृष्टीने योग्य असतील. ते केवळ मान्य करुनच नव्हे तर अशा सूचनांना मनांत एवढे पक्के केले पाहिजे की ते तुमच्या जीवनांचे एक अंगच बनले पाहिजे. त्या गैरसोयीच्या अनुषंगाने जीवन व्यथीत करण्याचा निश्चयी प्रयत्न करा.

कोणतेही मशीन पाहीजे तर तेच उहाहरण सोईसाठी घेतो. स्कूटर ह्या पूष्कळशा कंपनीच्या आहेत. काहींना आपण चांगले मशीन म्हणतो ते मुख्यत्वेकरुन ते जास्त काळासाठी व्यवस्थीत कार्यान्वीत राहते म्हणून आणि त्यात बिघाड कमी प्रमाणात होत असतो. परंतू एक मात्र सत्य आहे की कितीही चांगले यंत्र असले तरी ठरावीक काळानंतर त्याचे कार्य कमी ५ कमी होत जाते व ते शेवटी निकामी बनते. आपले शरीर पण त्याच्या निगा राखण्यावर अवलंबून राहते व ठरविक काळानंतर ते पण जर जर होऊन निकामी होते. ज्याप्रमाणे मशीनच्या कार्यशक्तीच्या आपण नेहमी आढावा घेत जातो व त्याची ठराविक काळासाठी जर आपली गरज भागविली तर त्याच्या निकामी होण्याच्या कालक्रमणेमध्ये आपण त्याविषयी खंत बाळगीत नाही. माणसाने शरीराबद्दल देखील हीच भावना बाळगली पाहिजे व वयाप्रमाणे जेव्हा शरिर क्षीण, अशक्त वा कार्यहीन होऊ लागते, त्यावेळी त्याच्या बद्दल खंत बाळगता कामा नये. म्हणजेच जो वृधत्वाचा काळ आहे त्यामध्ये शरिर यंत्र नादुरुस्त होते, क्षीण होणे वा अवयवांचे सहकार्य न राहणे ही एक अपरिहार्य व निश्चीत होणारी घटना आहे व तीची जाणीव प्रत्येकाने मनामध्ये अतिशय खोलवर रुजवावयास हवी. तेव्हाच शरीराबद्दल निराशा न वाटता त्याच्या विकलांगपणाला सामोरे जाण्याचा प्रयत्न करण्याची मानसिक तयारी केली गेली पाहिजे.

मशीनच्या ना दुरुस्त होण्याचे पण सर्व साधारण काही ठओकताळे दिसून येतात. ते थोडेसे विचार करण्याजोगे आहेत. उदा. स्कूटरचे ब्रेक्स,ल्पग पॉईंट, ऑईल सील, गीअर्स, एक्सेलरेटर इत्यांदीमध्ये सरासरीने जास्त बिघाड होतो. कारण स्पष्ट आहे की ह्या भागावर सतत आघांत होत असतात. त्याचप्रमाणे माणसाच्या शरिरामध्ये सांध्याचे दुखणे त्यातल्या त्यात गुढगा व ढोपर? पाठीचा कणा, संधी वात, पोटाचे विकार, अपचन, गॅस ट्रबल, पोट दुखी constipation, ….loose frequent motions ………… इत्यादी. छातीमध्ये खोकला, थरथर कापणे, निद्रा नाश, लघवी सारखी होणे, लघवी करताना वेळ लागणे, कमी ऐकू येणे, कमी दिसणे, विसराळूपणा, दमा, अशक्तपणा, रक्तदाब आणि मधूमेह इत्यादी इत्यादी. खरे म्हणजे म्हातारपणात कोणत्याही व्याधीने त्रास होण्याची शक्यता असते. मी बऱ्याच वृध्व मंडळींना बघीतले, तपासले परंतू काही गोष्टी मनास खटकतात त्या येथे सांगतो उदा. एक वृध्द गृहस्थांना सांधे दुखण्याचा त्रास होता. त्याच्या सर्व चाचण्या व तपासणी होऊन दोन, तीन मोठमोठाले orthopedic surgeon चे वेगवेगळे घेतलेले मत आणि टिपणी बघीतली. सर्वांच्या मते त्यांना कोणता रोग जडलेला नाही. कोणतीही व्याधी जडलेली नाही. कि ज्याला औषधपाणी देवून बरे करता येईल. सर्वानुमते ठराविक वय झाल्यानंतर सांध्याचे अशा प्रकारचे दुखणे सुरु होते. सांध्याच्या हाडांमधील मऊपणा कमी होतो. सांध्याला वाकविणारे व जागेवर ठेवणारे स्नायू आणि लिगामेंटस अशक्त व कमकुवत होतात आणि परिणामी सांधा सारखा दुखू लागतो. ह्या व्याधीवर संपूर्ण बरे करणारा उपाय नाही. जे काही औषध दिले जाते ते तात्पुरते व व्याधीची तीव्रता फक्त कमी करणारे . परंतु दुर्दैवाने बहुतांशी वृद्ध माणसे हे सर्व समजून देखील मान्य करण्यास तयार नसतात. त्याची अशी कल्पना झालेली असते की हा रोग त्यांना जडला असून त्याचे निदान त्या डॉक्टरांना झालेले नसावे व परिणामी ते निरनिराळ्या तज्ञाच्या भेटी घेत फिरतात.

औषधामध्ये होणाऱ्या वेगवेगळ्या बदलामुळे थोडासा दिलासा मिळतो, परंतु परत येरे माझ्या मागल्या म्हणत, त्याच व्याधीनाच सहन रकीत बसाव लागते. माणसाची आशा वेडी असते व ती त्या व्याधीच्या सुटकेसाठी प्रयत्नशील असते. पण शेवटी निराशाच पदरी येणार हे अटळ असते आणि नेमके हेच ह्या गृहस्थांचे झाले. सांधेदुखी ही त्यांच्या म्हातारवयांत ही त्यांना नेहमीसाठी त्यांच्या उर्वरीत आयुष्यापर्यंत ताप देणारीच ठरणार होती व ठरली.

असेच दुसऱ्या वृधांच्या बाबतीत घडते. ज्यांना अपचन, गॅस ट्रबलचा त्रास होतो. खाल्लेले पचन करण्यासाठी पोटाच्या आतड्यामध्ये जे रस तयार होत असतात ते वयाप्रमाणे कमी कमी होत जातात. तसेच आतड्यांच्या हालचाली पण मंदावतात आणि परिणामी पोटांत घातलेले अन्न पचण्यामध्ये अडथळे निर्माण होतात. ह्याचा शेवट म्हणजे अपचनाचा त्रास होत राहतो. हा पण काही रोग नव्हे. परंतु जी क्रिया पूर्वी तारुण्यात अतिशय वेगाने व व्यवस्थीत चालत होती ते सारे कमी होताना माणूस जाणवतो. वाटेल ते आणि वाटेल त्या प्रकारचे घेतलेले अन्न काहीही तक्रार न होता जे पचन होत असे ते आता अगदी साधे अन्न मऊभात, दुध, ताक इत्यादी पचवताना देखील कठीण होऊ लागते आणि परिणामी वृद्ध लोक डॉक्टरांच्या दवाखाण्याच्या चकरा मारतात. वृध्दांना जो शारिरीक त्रास होत असतो तो त्यांनी सहन करा असे मी सुचवू इच्छित नाही. परंतु त्या त्रासाकडे बघण्याचा आणि विचार करण्याचा दृष्टिकोन जर बदलला तर मात्र त्या व्याधी बऱ्याच अंशी सुसह्य होतील. तेव्हा वरिल दिलेल्या दोन उदाहरणावरुन प्रथम हे निश्चित करुन मनांत पक्के ठसवून घ्या की तुम्हाला झालेला व होत असलेला त्रास हा एखाद्या रोगामुळे नसून उतारवयामुळे आहे. ती पण एक नैसर्गिक प्रक्रियेची परिणीती आहे. कोणत्या रोगाची नव्हे म्हणजे मानसिक खंत वाटणार नाही. कारण जेव्हा आपण एखादी गोष्ट नैसर्गिक समजतो तेव्हा ती आपण सुसह्य करुन घेतो. “वृद्धत्वपणा ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे व त्यामुळे निर्माण होणाऱ्या सर्व समस्या ह्यादेखील नैसर्गिक स्वरुपाच्या समजा.”

श्री. शिरोडकर यांना माझ्याकडे ड्रेसींग करण्यासाठी आणले होते. त्यांना हाताला फ्रॅकचर झाले होते त्याला प्लास्टर (Plaster) केले होते. डोक्याला लागलेल्या जखमेला मलमपट्टी करण्यासाठी त्यांना आणले होते. बोलताना तेच म्हणाले, “डॉक्टर माझ वय ८० च्या जवळ आलं आहे हे तुम्हाला खरं वाटेल? पण आजही माझी प्रकृती कशी एकदम तंदुरुस्त आहे बघा. परवा मुलीकडे जाण्यासाठी म्हणून चालती बस पकडण्याचा प्रयत्न केला व तोल जावून पडलो आणि हाताचे हाड मोडले, काय गंमत आहे बघा. मी एके काळचा राष्ट्रीय Heavy weight lifting champion आणि थोड्याशा माराने हाड मोडले”

माणसांनी आपल्या पूर्व जीवनांत केलेल्या कर्तृत्वाबद्दल निश्चितच अभिमान बाळगावा. हे कुणीही मान्य करेल, परंतु कित्येकजण त्याच उत्साहाने नेहमीच जगण्याचा प्रयत्न करतात. हे चुकीचे आहे. आठवणी ताज्या ठेवणे वेगळे आणि बदलत्या परिस्थितीची जाण, पण त्यापाई विसरुन जाणे हे अयोग्य आहे. शरीर आणि मन हे दोन भिन्न आहेत. काळाच्या ओघामध्ये शरीर हे सतत बदलत जावून अशक्त होत राहते. परंतू मन मात्र नेहमीच तजेले, तरुण किंवा बालरुपी देखील होऊ शकते. मनाचा उत्साह हा सतत कायम राहू शकतो. म्हाताऱ्या माणसाला पण चॉकलेट, बिस्कीट, भजी इत्यादी खावे वाटते. त्याला पण खाण्याची तितकीच तीव्र इच्छा होते. जेवढी लहान मुलाला वा तरुणाला परंतु त्याच्या शरिरात झालेला बदल, आतड्यामध्ये आलेला अशक्तपणा हे असते. रुचकर पदार्थ पचविण्यास असमर्थ असतात आणि जर ह्याची जाण वृद्धाने न ठेवता तरुणाप्रमाणे खाण्याचा वेडेपणा केला तर त्या बळजबरीने पोटात कोंबलेल्या अन्नाचा शरीर स्वीकार करीत नाही व त्याचे अपचनाचे परिणाम त्या वृद्धाला भोगावे लागतात. त्याचप्रमाणे शरीराचे हात, पाय इत्यादी अवयव मजबूत असताना तुम्ही केलेली धावाधाव, उचलेल्या जड वस्तू किंवा उंचावर जाण्याचे केलेले विक्रम इत्यादी हालचाली काळाप्रमाणे तुमचा फक्त इतीहास म्हणून राहतात. उतारवयातही त्याच उत्साहाने हालचाली कराव्यात असे केव्हा केव्हा वाटते. कारण ‘मन’, मन हे तसेच उत्साही असते. परंतु त्याला बळीपडून शरीराची बदललेली क्षमता विसरुन जर तुम्ही पावल उचलाल तर त्याचे विपरीत परिणाम निश्चितच होतील. श्री. शिरोडकरांची धावपळ करुन बस पकडण्याची इच्छा व त्या इच्छेला शरीराने न दिलेली साथ हेच त्यांचा तोल जावून पडण्याचे व मार लागण्याचे कारण आहे. तेव्हा प्रत्येक वृद्ध व्यक्तीने आपल्या शरिरातील झालेल्या बदलाची व आज असलेल्या क्षमतेची निश्चित जाणीव ठेवावी व त्याचप्रमाणे आपल्या सर्व हालचाली अतिशय शिस्तित आणि काळजीपूर्वक कराव्यात. जेव्हा वय खूपच पुढे जाते तेव्हा तर अतिशय क्षुल्लक वाटणाऱ्या गोष्टी खूप मोठा शारिरीक आघात करु शकतात. उदा. झोपेमध्ये एकदम कुशी बदलणे, मोठ्याने खोकणे वा शिंकणे हे सुद्धा हाडांचे फ्रॅक्चर होण्यास कारणीभूत होऊ शकतात. तुमच्या हालचालीतील तिव्रता आणि त्याचा होणारा परिणाम ह्याचा संबंध खूपच जवळ जवळ येवू लागतो. साधी वाटणारी गोष्ट भयानक होऊ शकते. “न पचणारे चमचाभर खाद्य पदार्थ उतारवयात तुम्हास हैराणा करु शकतात” “थोडक्यात माणसांनी आपल्या पूर्व जीवनाच्या कर्तृत्वाला आठवून, विसंबून, सद्यस्थितीचा विचार न करता केलेली हीम्मत त्याच्या शरिराला हानी पोहचवू शकते. भूतकाळामधाली प्रकृती विसरत चला व फक्त वर्तमान काळाचा विचार करा”

काळ हा अतिशय वेगाने बदलत आहे, समाजाची धारणा व ठेवण बदलत चालली आहे आणि विशेष म्हणजे ‘कौटुंबीक रचना’ ही पूर्णपणे बदलू पहात आहे. कुटूंबामधल्या व्यक्ती व्यक्तीमध्ये जे संबंध होते, जी बंधने होती, जी कर्तृत्व होती जो आदर व प्रेम होते त्यामध्ये आमुलाग्र बदल होऊ पाहत आहे. त्या सर्व बदलू पाहणाऱ्या गोष्टींना तशी सामाजीक 8 कारणे असतील व आहेतच. परंतु ह्या ठिकाणी मी फक्त जे होत आहे त्याचा वृद्ध व्यक्तीशी होणाऱ्या परिणामाचा विचार करु इच्छितो. पूर्वी घरांत ‘आजोबा’ असणे हा अतिशय कौतूक व अभिमानाचा विषय असे. आज ते चित्र बदलत हे. आज प्रत्येक गोष्टीचे मोजमाप होत असते. ‘कुणाचा किती उपयोग हेच सूत्र लावले जाते.’ कुणाचा एके काळी किती उपयोग झाला, कुणामुळे कोण जीवनांमध्ये भरभरक्कम पायावर उभा आहे, आयुष्य बनन्यासाठी कुणाचा किती उपयोग झाला इत्यादी बरेच प्रश्न ज्यांचे स्वरुप ‘भूतकाळ’ ह्या सदरात मोडते त्यांचा विचार करण्याची कुणालाही जरुरी वाटत नाही. आज प्रत्येकाला हवा आहे ‘वर्तमान काळ’. भूतकाळाशी त्याची सांगड घालण्याचे कुणालाही प्रयोजन वाटत नाही आणि भविष्यकाळावरचा तर त्याचा विश्वासच उडाला आहे. वृद्ध हे मावळते सूर्य असून नवीन पिढी ही उगवत्या सूर्याप्रमाणे आहे आणि म्हणूनच वृद्ध लोकांनी प्रथम ह्या बदलांची जाणीव करुन घेतली पाहिजे. चार दिवस सासूचे चार दिवस सूनेचे आणि हे अधिकारांचे चक्र सदैव फिरत राहते. परंतु ह्या दोन्ही म्हणीमध्ये दोन गोष्टींची समज अतिशय पद्धतशीर दिली गेली आहे. एक म्हणजे अधीकार हा प्रत्येकाला मिळणार व दुसरे म्हणजे त्याला मिळालेल्या अधीकाराच्या मर्यादेचा काळ हा देखील ठराविकच असणार. हे महान तत्व आहे. परंतु संघर्ष तेव्हा होतो जेव्हा मनुष्य हा त्या काळाच्या मर्यादा विसरतो (Time Limit) आणि आपल्या शक्ती युक्तीने जास्त काळपर्यंत आपल्या अधिकाराच्या कक्षा वाढविण्याचा प्रयत्न करतो. नव्या पिढीचा मागून येणाऱ्या व्यक्तींचा येथेच वैचारिक खटका उडण्याची शक्यता होते. शेवटी परिणाम हे वृद्धालाच भोगावे लागतात. म्हणून एक गोष्ट अत्यंत महत्त्वाची सांगावी वाटते की प्रत्येत वृद्ध व्यक्तीने हे पूर्ण जाणून घ्यावे आणि मान्य करीत मनावर बिंबवावे की “मला नशीबाने मिळालेला कर्तृत्वाचा आणि अधिकाराचा काळ हा आता संपला आहे.” तुम्हाला जे मिळाल ते तुम्ही तुमच्या शक्ती, बुद्धीनुसार उपभोगाल, किती योग्य मिळवल किती गमावल ह्याचाच आता ताळेबंद करण्याच तुमच्या हाती उरत. तुमच्या उतार वयाप्रमाणे त्यात आता खूपसा फरक होणार नाही. तेव्हा आपल उर्वरित आयुष्य मर्यादीत करुन जगणं हेच आता बाकी राहते. तुम्ही काही काळ अधीपत्य केलं आता इतरांना संधी घ्या.

जीवनाच्या प्रत्येक दिवसाचे जर विश्लेषन केले तर असे दिसून येते की, प्रत्यक दिवस हा आपल्यापरिने अगदीच वेगळा असतो. घडणाऱ्या प्रत्येक गोष्टी ह्या अगदी भिन्न असतात. आपण जर आपलेच जीवन बघीतले तर ते कितीतरी वेगवेगळ्या अनुभवाने भरलेले दिसून येते. मला काल आलेला अनुभवाचा उपयोग आजच्या अनुभवाला होईलच हे सांगता येत नाही. किंबहुना प्रत्येक अनुभव नवीनच काहीतरी शिकवून जातो. अर्थात पूर्वीच्या अनुभवाने माणूस थोडासा दक्ष होऊ शकतो एवढेच. परंतु माझा पूर्वीचा अनुभव मला नविन वातावरणात यश देईल याची खात्री सांगता येत नाही. आणि विशेषत: जेव्हा सभोवतालची परिस्थिती अतिशय वेगाने जर बदलत चालली असेल. तर मग पूर्वीच्या अनुभवाला निश्चितच मर्यादा पडतात. हा एक विचार आहे आणि ते एक सत्य आहे. म्हातारी माणसे ही अनुभव संपन्न असतात. त्यांच्या दीर्घ आयुष्यामध्ये त्यांना नानातऱ्हेचे अनुभव आलेले असतात आणि जीवनातील यश अपयश त्यांनी स्वत: जाणले असतात. त्यांना त्यांच्या मागून येणाऱ्या पिढी बद्दल प्रेम व आदर असतो आणि म्हणून त्यांना जे वाईट अनुभव आलेले असतात त्याचा आधार घेवून ते तरुणांना उपदेश करण्याचा प्रयत्न करतात. तसे म्हटले तर हा प्रयत्न स्तुत्य आहे. परंतु मी वर सांगितल्याप्रमाणे ह्या वृद्धाला आलेला अनुभव त्याच्या मुलाला तसाच येईल ह्याची शक्यता सांगता येत नाही. कदाचित काही वेगळे व चांगले पण उत्पन्न होऊ शकते. म्हाताऱ्या माणसांनी एखादवेळी मार्गदर्शन करणे, क्वचित प्रसंगी सूचना देणे निराळे परंतु दिसून मात्र असे येते की म्हातारी माणसे आपल्या अनुभवाचा आणि वयाचा अधिकार सुप्तरितीने जागवून तरुण वर्गाला प्रत्येक बाबतीत उपदेश वा सल्ला देण्याचा प्रयत्न करतात आणि ते तरुण व वृद्ध ह्या दोघांसाठी अयोग्य आहे. ह्या त्यांच्या वागण्याने दोघांत एक प्रकारची दरी निर्माण होते. आणि वैचारिक संघर्ष निर्माण होतो. जर वास्तविकत: मी म्हटल्या प्रमाणे तुमचाच पूर्वीचा अनुभव तुम्हालाच पुढच्या आयुष्यात फार मदत करित नाही तर तुमच्या आणि केवळ स्वत:ला आलेल्या एखाद्या परिस्थीतीमधील अनुभवावरुन तुमच्या मागे येणाऱ्यावर वैचारिक बंधने कशासाठी शिवाय काळ किती झपाट्याने बदलतो याची दखल तुम्हास घ्यावीच लागेल.तुमच्या अनुभवाचा सल्ला तुम्हाला जर विचारलेच तर घ्या. विनाकारण आणि सदैव उपदेशाचे ढोस इतरांना पाजू नका. क्वचित प्रसंगी “काळजी घेत जा सांभाळून रहा इत्यादी प्रेमाने सांगा तुमचा आदर राहील. तुमच्याविषयी काय ह्यांची कटकट” ही भावना राहणार नाही.

वृद्धकाळामध्ये होणारे शारिरीक त्रास हे प्रत्येकाचे निरनिराळे असू शकतात. कुणाला दम्याचा त्रास, कुणाला अपचनाचे विकार, कुणास चढउतार करताना सांधे दुखणे, चक्कर येणे इत्यादी इत्यादी आणि त्यांच्या ह्या विकारांनी त्यांना एकप्रकारे जायबंदी केले जाते. त्यांच्या शारिरीक हालचालींना मर्यादा पडतात. प्रत्येक म्हाताऱ्या माणसांनी आपल्यामध्ये निर्माण होत असलेला विकार चांगल्या तऱ्हेने जाणून घ्यावा. जेवढा प्रयत्न करुन तो कमी करण्याचा मार्ग सुरवातीस केला जातो. पण नंतर औषध पाण्याच्या मर्यादा संपतात. एकदा त्या विकाराबद्दल निश्चीत विश्लेषण झाले की नंतर तो तुमचा एक मित्रच आहे हे मानावयास हवे आणि त्या त्या विकाराप्रमाणे जीवन जगण्याचे अगदी वैयक्तीक तंत्र निर्माण करावे. त्याच्या अनुषंगाने मार्ग आखावा. उदा. तुम्हाला दम्याचा विकार आहे. सर्व डॉक्टर सांगतात की हा त्रास पित्तामुळे (Allergic in nature) होतो आणि तुमच्या शरीराला नको असलेल्या वस्तूंचा संपर्क आला तर तुमच्यामध्ये ह्या विकाराचे लक्षण सुरु होतात वस्तू ह्या असंख्य आहेत परंतु त्यातील एखाद दुसरी वस्तूच तुमच्या शरीराला सहन न होणारी असू शकेल आणि ती नेमकी कोणती असेल ही शोधून काढणे अत्यंत कठीण काम आहे. परंतु नेमक प्रत्येक दम्याच्या रुग्णाबद्दल घडत ते वेगळच आणि ह्यात रोग्याचा जेवढा सहभाग असतो ह्यापेक्षा डॉक्टरांचे ठराविक पद्धतीचे मार्ग दर्शन हेही कारणीभूत होत असते. काही पदार्थ हे पित्त (Allergy) करण्यास कारणीभूत असतात आणि त्याची एक यादी डॉक्टराकडून रुग्णास मिळते. हे सेवन करु नका, हे वापरु नका, हे टाळा, ते करा अशी एक मोठीच यादी डॉक्टर लोक ठराविक ठशाने त्याला देतात. रुग्ण हे सारे इमानइतबारे मान्य करुन खाण्यापिण्यामधल्या बऱ्याच गोष्टी वर्ज करतो वा इतर गोष्टींचा संपर्क टाळतो. त्यात आणखी भर पडते. ती त्याच्या मित्र मंडळींची जो तो आपला स्वतंत्र अनुभव सांगून ‘मी हे टाळले मी हे वर्ज केले तेव्हा मला आता बरे वाटते’ हे विविध लोकांचे सल्ले ह्या वृद्ध दमेकरी व्यक्तीच्या मनावर परिणाम करीत असतात. त्याला सर्व प्रथम त्याच्या स्वत:च्या त्रासातून सूटका हवी असते. आणि तो सर्वाचे थोडेफार मान्य करतो. परिणामी त्याच्यावरच्या बंधनाची यादी बरीच मोठी होऊन तो आपल्या खाण्यापिण्याच्या व इतर वस्तूसंपर्कांना बरीच मोठी मर्यादा घालतो. असे मी बरेच रोगी बघीतले आहेत. पण आश्चर्यांची गोष्ट म्हणजे आख्या शारिरीक त्रासामध्ये थोडासा देखील फरक झालेला नसतो. तसेच डॉक्टरांच्या विविध चाचण्या घेण्याचे प्रकार दोन तीनशे लशींची चाचणी होऊन खरे म्हणजे हाती काही लागत नाही. वेळ व पैसा मात्र वाया जातो.

ह्या साऱ्या ‘रामायणा’ मध्ये फक्त दोनच गोष्टी महत्त्वाच्या आहेत. एक म्हणजे तुम्ही वृद्ध आहात व तुमची प्रतिकार शक्ती ही मर्यादेमध्ये राहीली आहे आणि दुसरे म्हणजे तुम्हाला दम्याचा (पित्ताचा, Allergic in nature) जो विकार आहे तो मी वर सांगीतल्याप्रमाणे एखाद्या विशीष्ट वस्तूमुळेच जास्त नाही. परंतु लोक सांगतात, मी दुध घेत नाही, अंडी खात नाही, केळी खात नाही, दही नाही, थंड वस्तू नाही, हे नाही ते नाही इत्यादी. हे सर्वस्वी चुकीचे आहे. जर रुग्णाला स्वत: निश्चित अनुभवले की एखाद्या ठराविक वस्तूमुळेच त्याला त्रास झाला वा होतो तर तेवढीच गोष्ट वर्ज करणे तत्त्वाला धरुन आहे. पण केवळ कल्पनने वस्तू विनाकारण वर्ज करणे एकदम चुकीचे आहे. थोडक्यात तुमच्या शरीराला जे भावते, पचते, सहन होते. ह्या विषयी तुम्हालाच तुमचे वैद्य बनून बारकाईने स्वत:हाच्या शरिराबद्दल अभ्यासपूर्वक रुपरेखा आखावी लागेल. मर्यादीत व पद्धतशीर जीवन जगण्याचे तंत्र ठरवावे लागेल.

श्री. देशपांडे माझे कौटुंबीक रुग्ण. एकदा त्यांचे नवे घर बघण्याची संधी मिळाली. बरेच दिवसापासून घरी या असे त्यांचे आमंत्रण होतेच. परंतु काहीना काही कारणांमुळे जाणे झाले नाही. अचानक एकदा त्यांच्याच सोसायटीमध्ये एका रुग्णास बघण्यासाठी गेलो. तेव्हा त्याचवेळी श्री. देशपांडे यांच्याकडे गेलो. दरवाज्यावर ए छोटीशी पाटी होती ‘स.गो. देशपांडे’ बेल वाजविताच थोड्यावेळाने स्वत: देशपांडे आले व त्यांनी दार उघडले. अतीशय प्रेमाणे व अगत्याने माझे स्वागत केले गेल. घरात त्यावेळी ते व त्यांच्या सौ. दोघच होते.

एक दिड तास गप्पा मारण्यात वेळ मजेत गेला. अतिशय मन मोकळेपणाने ते मज बरोबर बोलत होते. त्यांनी आपल्या जीवनातील काही गोष्टी इतक्या व्यवस्थीत सांगितल्या की त्यावर मी बराच काळपर्यंत नंतर विचार करीत राहिलो. एक सत्य, एक कौटुंबीक समस्या त्यांनी मजसमोर चित्रीत केली. काही मुद्दे हे मनाला पटणारे नव्हते परंतु जेव्हा शांतचित्ताने, बदललेल्या सामाजिक परिस्थितीचा विचार करता त्यांच्या प्रत्यक बाबीवर मला मान्यता द्यावी लागली. हा विचार श्री. देशपांडे ह्याच्या वैयक्तीक जीवनाचा नव्हता तर त्यांच्या समस्येवरुन हा सद्य स्थितीतील कौटुंबीक आणि त्यातही वृद्धत्वामधील स्थितीला चालणा देणारा विचार होता. त्यांच्या चर्चेतील त्यांचेच विचार :“एका चाळीमधल्या दोन छोट्या खोल्यांमध्ये माझं सार जीवन गेलं. बालपणापासून नोकरीच्या निवृती काळापर्यंत त्याच घरात आयुष्य गेलं. सारी सुख दु:खे बघीतली. शिक्षण, नोकरी, संसार आणि मुले ह्या जीवनामधल्या महत्त्वाच्या पायऱ्या. ह्याच घरी राहून चढून गेलो. अतिशय सुखी व समाधानी, सर्वसाधारण जीवन जगलो. मध्यम वर्गीय कुटुंब आणि त्याचप्रमाणे प्रपंच केला. जेवढं मिळवणं शक्य आहे ते मिळवल व जेवढे कष्ट करावयास हेव ते केले. फक्त एक गोष्ट नोकरीला लागल्यापासून व लग्न झाल्यापासून नेहमी मनात येत असे आणि ती म्हणजे स्वत:ची एखादी वास्तू असावी. आपण आपल्या पैशानी, कष्टाच्या कमाईने छोटे का होइना एखादा फ्लॅट असावा. चाळीच्या जीवनाला कंटाळलो नव्हतो. त्यातला आनंद काही वेगळाच. परंतु ते घर मला वडीलांकडून वडीलोपार्जित असल्यामुळे मिळाले. मला आपले स्वत:चे घर असावे ही इच्छा मनांत खोलवर होती. इच्छा आणि परिस्थिती ह्याच्या झगड्यात इच्छेलाच हार खावी लागत असे आणि परिस्थिती जेव्हा मान्यता देईल. तेव्हा बघू हे सात्वनपर तत्त्वज्ञआन मनाशी बांधून मी शांत होऊन से.’नोकरी निवृत्ती मिळाली. बराचसा पैसा एकदम हाती आला. नोकरीच्या काळामधली बँकेमधली साठवण पण माझ्या इच्छेला मदत करण्यासाठी सरसावली. तरीही फ्लॅटसाठी बरीच रक्कम उभारणे जरुररीचे होते. खूप विचार केला आणि चाळीमधले घर काढून टाकले. परिस्थितीला सर्व आघाड्यावरुन हल्ला केला गेला. तिला पण कदाचित मजवर दया आली असावी आणि ती नमली. इच्छेला जबरदस्त चालना मिळाली. इच्छेचा विजय झाला. जीवनामध्ये जे कष्ट करुन मिळविले ते एकत्र केले आणि सारी आयुष्याची पूंजी घालून हा तीन खोल्यांचा, स्वतंत्र, सर्व सुविधांनी युक्त असा फ्लॅट खरेदी केला. जेव्हा हे घर माझ्या नावाने झाले त्यावेळी मी केवढी आनंदी होतो हे शब्दाने व्यक्त करणे केवळ अशक्य होते. तो दिवस मला आजही आठवतो. ज्या दिवशी मी माझ्या नावाची पाटी ‘स.गो. देशपांडे’ ही स्वत:च बाहेर दारावर लावली. एक अत्यंत मोठी इच्छा, क ध्येय मी मिळवले याचा अभिमान वाटू लागला. हे घर माझ आहे आणि आस्मादिक स.गो.देशपांडे हे मालक आहेत. परंतु हा माझा आनंद फारच थोडा काळ टिकला. सभोवतालच्या परिस्थितीने आणि जीवनातल्या चाकोरीने मला हे दाखून दिले की मी काल जो निर्णय घेतला तो संपूर्ण चूक होता. एका निराशामय वातावरणाची छाया जीवनावर परसरु लागली. स्वतंत्र घराची कल्पना चांगली होती. आजही माझे जीवन तसे आनंदी आहे. परंतू घराच्या स्वातंत्र्याने माझे वैयक्तीक स्वातंत्र्य नष्ट केले होते. आज घराचा मालक मी आहे परंतु माझ्या खिशात एक रुपया पण नाही. बँक रिकामी, नोकरी नाही, विचित्र परिस्थिती होऊन बसली आहे. सार माझ असून देखील मला अतिशय छोट्याशा गोष्टीसाठी मुलाकडे वा सूनेकडे हात पुढे करावा लागतो. माझा आदर आहे. मी जे मागील ते मला चटकन व सर्वकाही त्वरीत मिळते. ह्यात शंका नाही. पंरतु असे पूर्वीच्या जीवनात केव्हाच घडले नव्हते त्यामुळे पैसे मागणे ही बाबचमुळी मला बैचेन करते. नातीला खावूसाठी, कपड्यासाठी मी पैशाची याचना करावी ही निराशा करणारी गोष्ट नव्हे का? ह्या तर अतिशय क्षुल्लक घटना आहेत. उद्या जर दुखले, खूपले, शारिरीक त्रास झाला तर सारे कसे निभावून नेणार? आज प्रखरतेने जाणीव होऊ लागली की वृद्धकाळासाठी कमीत कमी जीवनाला आवश्यक पैसा हा हाती असणे हे किती जरुरी आहे.

जीवनामध्ये प्रत्यक गोष्टींची गरज त्यात्या काळात तीव्रतेने भासते. माणसाच्या आवडी-निवडी, समाधान, आनंद इत्यादी कल्पना ठराविक वयातच महत्त्व निर्माण करतात. प्रत्येकानी त्यासाठी योग्यवेळीच प्रयत्न करावा व ते मिळवावे परंतू जर काही परस्थितीमुळे 1 शक्य झाले नाही तर काळाचा विचार करुन, आपल्या हाती असलेल्या साधनाचा व आयुष्याचा विचार करुन इच्छेला वेगळा मार्ग द्यावा. नोकरीच्या प्रारंभीच्या काळात जास्त कष्ट करुन, बँक अथवा गृहनिर्माण संस्थाकडून कर्ज घेवून फ्लॅट घेतला असता ते सोईचे झाले असते. हलके हलके हफ्ते भरुन काही काळाने मला माझे घर मिळवता आले असते. पंरतू घराचा विचार तडीला लावण्याचा निर्णय व क्रिया ह्या अवेळी झाल्या व आज हाती काहीच राहिले नाही. आज तरी मला त्या घराची तितकी गरज भासेनासी झाली. अर्थात हे सत्य आहे की हे घर माझ्या मुलासाठी असेल. परंतु आज मला जो आंतरीक परकेपणाचा व अवलंबून राहण्याचा भाव डोक्यात येत राहतो त्याचे काय? जसे ६० वर्षे त्या चाळीत राहिलो तसाच उरलेला आयुष्याचा भाग मी आनंदात चालू ठेवू शकलो नसतो का? हाती पैसा असता व त्याचे मानसिक समाधान निश्चितच अवर्निय आहे. कुणीही काहीही ह्या जगातून जाताना आपल्या बरोबर नेत नसतो. तेव्हा तुम्ही जे कमविले ते कालांतरानंतर तुमच्यात मुलांना वा सख्यातील व्यक्तींना मिळणार आहे. एके काळी ही एक जबरदस्त मानसिक धारणा होती की हे सारे मी माझ्या मुलांसाठी करतो. परंतू आता काळाची गती परिस्थितीचे लक्ष्य वेगळेच होत चालले आहे. आजही हे वाक्य सत्य आहे की सर्व काही मुलांसाठी परंतू माझ्या उरल्या सरल्या आयुष्याची सांगता झाल्या नंतरच एकत्र कुटुंब पद्धती लोप पावू लागली आहे आणि असंख्य संसारीक प्रश्नाच्या चक्रात व्यक्ती व्यक्तीला एकमेकांकडे लक्ष्य देण्यास काळजी घेण्यास अथवा देखभाल करण्यास खरोखरच वेळ काढणे अवघड होत आहे. कुणी जाणून बुजून दुर्लक्ष करतो अशातला भाग नसतो. परिणामी ‘तुमचे तुम्ही बघून घ्या’ असा कठोर भासणारा परंतू सत्य परिस्थितीवर आधारीत मार्ग केवळ वृद्धासाठी उरतो. 13 शेवटचे १० – १५ वर्षे जर मानाने व स्वतंत्र विचाराने जगावयाचे असतील तर हाती पैसा हा पैसा ह्याच रुपाने तुमच्या जवळ असावा, एक मोठी मालमत्ता म्हणून नव्हे.

तुमचे वृद्ध काळातले जीवन चागले व समाधानी जाण्यासाठी, गरज असते ती प्रथम शारीरिक सुद्दढतेची. मनाच्या आनंदाचा विचार हा तरी दुय्यमच असेल. तरी सारे कांही तुमच्या धडपडीच्या जीवन कालखंडात याची योजनाबद्ध आखणी केलेली असावी. जे जीवनरेषा जाणीत आयुषाची वाटचाल करतात, त्याना सुकर आयुष्य लाभते. दुर द्दष्टी हीच हसत खेळत म्हातारपण घालविण्याचा मार्ग असेल.

डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
e-mail – bknagapurkar@gmail.com

Avatar
About डॉ. भगवान नागापूरकर 2132 Articles
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

1 Comment on हसत-खेळत म्हातारपण

  1. अतिशय सुंदरपणे आयुष्याची रूपरेखा समजावून सांगितलेली आहे. खरच आपल्याच हातात आहे आपले जीवन आनंदी घालवणे.

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..