हसता मधुर मधाळ तू
जीव माझा धुंद होतो,
पाहता तुजला प्रिये
मी बावरुन जरा जातो..
ये अशी आल्हाद प्रिये
सांज समय मग होतो,
कातरवेळ ती हुरहूर मनी
जीव हलकेच बावरुन जातो..
येतेस तू केतकीच्या बनी
उर अलगद तुझा धपापतो,
वारा अवखळ छळतो तुज
पदर जरासा ढळून जातो..
बट गालांवर हलकेच येता
जीव माझा गुंतून जातो,
स्पर्श तुझा मोहक होता
पुरता मी भान हरवतो..
गुलाबी नाजूक ओठ तुझे
रोमांचित होते अंतरी काया,
अधर चुंबन तुझे मी घेता
मिठीत मोहरते तू तेव्हा..
कसे सांगू सखे तुज
स्पर्श तुझा अलवार होता,
तृप्त होतो मी आल्हाद मग
मुग्ध सैलावते तू ही जरा..
घेतो तुज मिठीत मी
स्पर्श मलमली नाजूकसा,
बेधुंद हो तू जराशी प्रिये
उमटेल तुझ्या मनी श्रुंगार खुणा..
— स्वाती ठोंबरे.
Leave a Reply