नवीन लेखन...

हसताना पडते तिला गोड खळी

१९९० च्या जून महिन्यातील मुंबईची सकाळ.. आमचं ‘सूडचक्र’ चित्रपटाचं सर्व युनिट ‘किरण’ बंगल्यावर पोहोचलं. दहा वाजता मुहूर्ताचा नारळ वाढवून, शुटींगला प्रारंभ झाला.. लेडी इन्स्पेक्टरच्या गेटअपमध्ये ती कॅमेऱ्यासमोर आली आणि मी पहातच राहिलो.. ती होती चित्रपटाची डॅशिंग नायिका, वर्षा उसगांवकर!!
तिला पहिल्यांदा पुण्यात मी पाहिलं होतं, ‘तुझ्या वाचून करमेना’च्या सेटवर.. त्यावेळचं चित्रपटसृष्टीतील तिचं, ते पदार्पण होतं.. ‘सुयोग’च्या ‘ब्रह्मचारी’ नाटकात ती काम करीत असताना, सचिन पिळगावकरने तिला पाहिलं आणि आपल्या ‘गंमत जंमत’ चित्रपटात पहिली संधी दिली. चित्रपटाने जल्लोषात रौप्यमहोत्सव साजरा केला आणि वर्षाकडे, चित्रपट निर्मात्यांची रांग लागली..
२८ फेब्रुवारी १९६८ रोजी गोव्यातील, फोंडा तालुक्यातील उसगाव येथे वर्षाचा जन्म झाला. तिचे वडिल गोवा मुक्ती संग्रामात सहभागी होते. आई, माणिक ह्या अकरा वर्षे शास्त्रीय संगीत शिकलेल्या होत्या. सहाजिकच इयत्ता पाचवीपासून वर्षालाही संगीत व गायनाची गोडी लागली. गोव्यामध्ये बी. काॅम. चे शिक्षण वर्षाने पूर्ण केल्यानंतर, स्थानिक नाट्यसंस्थेतर्फे केलेल्या आंतरराज्य नाट्यस्पर्धेत तिच्या भूमिकेला सुवर्णपदक मिळाले. आई-वडीलांच्या प्रोत्साहनामुळे तिने औरंगाबादमधील विद्यापीठातून नाट्यशास्त्र विभागातून अभिनयाचा अभ्यासक्रम पूर्ण केला.
दामू केंकरे यांच्या ‘कार्टी प्रेमात पडली’ या नाटकातून व्यावसायिक रंगभूमीवर वर्षाने, कामास सुरुवात केली. अवघ्या चारच नाटकांनंतर तिच्यासाठी मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीचे दरवाजे खुले झाले..
सौंदर्य आणि अभिनयाचा मिलाफ तिच्या सादरीकरणात असल्यामुळे अल्पावधीतच तिने अभूतपूर्व यश संपादन केले. ‘आत्मविश्वास’, ‘आमच्यासारखे आम्हीच’, ‘घनचक्कर’, ‘सगळीकडे बोंबाबोंब’, ‘पैज लग्नाची’, ‘मुंबई ते माॅरिशस’, ‘लपंडाव’, ‘सवत माझी लाडकी’, ‘शेजारी शेजारी’ अशा अनेक मराठी चित्रपटांतून तिने स्वतःचा प्रेक्षकवर्ग निर्माण केला..
पुरुषोत्तम बेर्डे दिग्दर्शित ‘हमाल दे धमाल’ चित्रपटातील तिचा अभिनय सर्वोत्तम होता! ‘एक होता विदूषक’ चित्रपटात तिच्या अभिनयाचा कस लागला! हिंदी चित्रपटातही तिने यश मिळविले. ‘महाभारत’ मालिकेत तिने उत्तराची भूमिका साकारली.
तिच्या आवाजात जादू असल्यामुळे तिने ‘वर्षा उसगावकर नाईट’ या ऑर्केस्ट्रामधूनही हजारों रसिकांचे कान तृप्त केलेले आहेत.. ‘दुनियादारी’ चित्रपटातील तिने साकारलेली, ग्लॅमरस आईची भूमिकाही प्रेक्षकांना भावली.
आज तिच्या अभिनय कारकिर्दीला, तीन तपं पूर्ण होत आहेत.. तरी देखील तिच्या सौंदर्यात तोच तजेलदारपणा आहे, जो मी ‘सूडचक्र’च्या चित्रीकरणावेळी अनुभवला.. त्या पंधरा दिवसांच्या शेड्युलमध्ये मी तिचे भरपूर फोटो काढले.. एका सीनमध्ये अजिंक्य देव सोबत मी कामही केले..
सहा वर्षांनी पुन्हा ‘पैंजण’ चित्रपटाचे शुटींग करताना मी वर्षाचे, पब्लिसिटीसाठी फोटो काढले. अरविंद सामंत यांच्या ‘सवाल माझ्या प्रेमाचा’ चित्रीकरणप्रसंगी आमची पुन्हा भेट झाली..
वर्षा उसगांवकरने सामाजिक बांधिलकी म्हणून ‘सांगाती’ नावाची संस्था स्थापन केली आहे. आयुष्यभर कलेची सेवा करणाऱ्या कलावंतांना, मायेचा हात देण्याचे कार्य ही संस्था करते.
— सुरेश नावडकर. 
मोबाईल: ९७३००३४२८४
२८-२-२२.

सुरेश नावडकर
About सुरेश नावडकर 407 Articles
माझा जन्म सातारा जिल्ह्यात झाला. नंतर पुण्यात आलो. चित्रकलेची आवड असल्यामुळे कमर्शियल आर्टिस्ट म्हणून कामाला सुरुवात केली. नाटक, चित्रपटांच्या जाहिराती, पोस्टर डिझाईन, पुस्तकांची मुखपृष्ठ, अशी गेली पस्तीस वर्षे कामं केली. या निमित्ताने नाट्य-चित्रपट क्षेत्रातील कलाकार, तंत्रज्ञांशी संपर्क झाला. भेटलेली माणसं वाचण्याच्या छंदामुळे ही माणसं लक्षात राहिली. कोरोनाच्या लाॅकडाऊनच्या काळात त्यांना, आठवणींना, कथांना शब्दरुप दिले. रोज एक लेख लिहिता लिहिता भरपूर लेखन झालं. मराठी विषय आवडीचा असल्यामुळे लेखनात आनंद मिळू लागला. वाचकांच्या प्रतिसादाने लेखन बहरत गेले.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..