‘कराग्रे वसती लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, करमुले तू गोविंद, प्रभाते करदर्शनम’ सकाळी सकाळी उठल्यावर आपल्या हातांचे दर्शन घ्यायला फार पूर्वीपासून सांगितले जाते. हातांचे दर्शन घेतल्यानंतर वरील श्लोक म्हटला पाहिजे. त्याचा अर्थ सोपा आहे, साधा आहे. श्लोक म्हणतानाच तो लक्षातही येतो. जसे आपल्या हातातच लक्ष्मी, सरस्वती आणि ईश्वराचा वास आहे. त्यामुळे हातांचे दर्शन सकाळी उठल्यावर पहिल्यांदा घेतले पाहिजे. हातांचे दर्शन सकाळी का घेतले पाहिजे. कारण आपणी जी काही कार्य करतो, ती सर्व हातांशी संबंधीतच असतात. एकही कार्य आपण हाताशिवाय करू शकत नाही. त्यामुळे हातांचे दर्शन आधी घ्यायचे. अगदी जन्मलेलं मुलं देखील आईचे बोट आपल्या इटुकल्या मुठीत पकडुन ठेवतं. इवल्या इवल्या हातांनी मुलं आईला पकडुन ठेवण्याचा प्रयत्न करतं. थोडं मोठ झाल्यावर पाटीवर पहिलं अक्षर आपण हातांच्या माध्यमातून गिरवतो आणि शिक्षणाचा श्रीगणेशा होतो. वर्गात काही तरी चुकल्यानंतर शिक्षकही हातांनीच कान पिरगळत असतात. पुढे अनेक दिवस हा कान दुखत असे तो भाग आणखी निराळा. आबा-धाबी (चेंडु एक दुसऱ्याला मारण्याचा खेळ) खेळताना हातांचाच उपयोग केला जायचा. मित्रांशी दंगा करताना हातांनी चापटा-बुक्के, धपाटा मारत असतो. पकडा पकडी खेळताना बऱ्याचदा मित्रांच्या शर्टाची कॉलरच हाती यायची, शर्ट फाटायचा पण गंमत यायची ती खुप आनंद देणारी होती. पुढे दिवाळीच्या सणात मित्र-मित्र मिळून किल्ला बनवायला घ्यायचो. मस्त काळ्या मातीचा गारा-चिखल करून किल्ला आकार घेत असे. मग त्या किल्ल्यावर विविध प्रकारची झाडं लावली जायची. किल्ला तयार करताना थोडासा चिखल-गारा मित्रांच्या अंगावर टाकला जायचा तो देखील हातांनीच… रंगपंचमीला एकेमकांचे चेहरे रंगीत करतो ते देखील हातांनीच ना.
असे एक ना अनेक उपयोग हातांचे. हात देणारे ही असतात आणि घेणारेही. देणाऱ्या हातांचे कर्तृत्व मोठं. सामाजिक पातळीवर हातांचं काम अधोरेखित होत जातं. हातांनीच उभे राहतात अनेकांचे संसार. नैसर्गिक आपत्तीच्या वेळी हातच धावत असतात एकमेकांच्या मदतीला. एकमेकांचे संसार उभे करण्यासाठी हात पुढे सरसावत असतात. जीवनापासून निराश झालेल्या मित्रांच्या खांद्यावर हात ठेवून लढण्याचं बळ देणारे हाताच असतात. खांद्यावर ठेवलेला हात म्हणजे विश्वासाचं प्रतिकचं. तू हे करू शकतो असा विश्वास या हातांच्या माध्यमातूनच दिला जातो. दूर कुठेतरी चालत असतांना एकमेकांचा हात हाती असला तर चालणे चालणे वाटत नाही, ते केवळ तरंगणेच वाटते. विश्वासानं एकमेकांचा हात हाती घेतल्यानंतर खडतर वाट देखील सुकर होऊन जाते.
हातच असतात वर्गात छडी खाणारे, हातच असतात मूर्तीवर फुलांची उधळण करणारे, हातच असतात टेबलाखालून काहीतरी स्वीकारणारे, हातच असतात लोकशाहीचा हक्क बजावणारे, हातच असतात निर्माण करणारे, हातच असतात विध्वंस करणारे, हातच असतात घडवणारे, हातच असतात उभे राहण्याचे बळ देणारे, हातच असतात झोपडी आणि महालाची निर्मिती करणारे, हातच असतात सेवा करणारे, हातच असतात दान करणारे, हातच असतात दान स्वीकारणारे, हातच असतात पुजेसाठी जोडले जाणारे, नमाजअदा करणारे, हातच असतात सीमेवर पहारा देणारे, हातच असतात घडवणारे, हातच असतात मुलांचा आधार आणखीही बरेच काही असतात आपले हात… हातच असतात माणसाचे माणसाशी नाते जोडणारे…! आणखीही बरेच काही असतात आपले हात आपल्यासाठी.
जुन्या चित्रपटातील एक गाणं आज हातांच्या निमित्ताने आठवतय..
‘साथी हात बढाना, साथी हात बढाना
एक अकेला थकजाये तो, मिलकर बोज उठाना..!’
— दिनेश दीक्षित
Leave a Reply