नवीन लेखन...

हतबल – भाग एक.

प्रसंग एक ….

” कंट्रोल कॉलिंग xxxx वन मोबाईल” . वायरलेस खणखणतो. पोलिस स्टेशन मधील वायरलेस सेट कडे ड्यूटी ऑफिसर चे कान स्वभाविकपणे लागतात आणि त्याच्या मनात विचार येतो ” सेक्शनमधून आता काय काम घेऊन येतेय बुवा वायरलेस मोबाइल ! ”
प्रत्येक पोलिस स्टेशनची तीन वायरलेस मोबाईल वाहने त्या पोलिस स्टेशनचा भौगोलिक आकार लक्षात घेऊन , हद्दीमध्ये तिन मोक्याचा ठिकाणी उभी केलेली आणि प्रसंगी तत्काळ निघायच्या तयारीत अशी ठेवलेली असतात. त्यांना अनुक्रमे ” xxxx पोलिस स्टेशन one / two / three असे संबोधतात. एखाद्या ठिकाणी तातडीने पोलिस पाठवणे आवश्यक असते तेंव्हा कंट्रोल रूम त्यापैकी , त्या ठराविक ठिकाणाच्या सर्वात जवळ असलेले वाहन रवाना करते.
” xxxx वन रीप्लाइंग सर “.
” कंट्रोल टू xxxx वन मोबाईल , xxxx रस्ता , xxxx चाळ , रूम नं xx मधे एक दारु प्यालेला इसम मोठ्याने शिवीगाळ करत गोंधळ घालत आहे.एकवीस पस्तीस. ”
शेवटचे दोन शब्द मेसेज दिल्याची वेळ . ही नोंद महत्त्वाची असते कारण मेसेज प्राप्त झाल्यापासून किती मिनिटात मोबाईल व्हॅन घटनास्थळी पोहोचली याची प्रत्येक वेळी नोंद लिहिली जाते. कळवलेल्या ठिकाणी जाऊन तेथून थोड्याच वेळात ती वायरलेस गाडी पोलिस ठाणे आवारात शिरते. दोन पोलिस हवालदार, पस्तीशीच्या वयाच्या दारू पिऊन तर्र झालेल्या इसमाला बकोटीला धरून उतरवतात.. त्याची असंबद्ध बडबड आणि कुणाकुणाच्या नावे वाईट वाईट शिव्या उच्चारणे अखंड सुरू असते. त्याच्या मागोमाग त्याची बायको , तिच्या कडेवर तीनेक वर्षाचा मुलगा आणि पाठोपाठ आठ नऊ वर्षाची मुलगी पोलिस ठाण्यात ड्यूटी ऑफिसर समोर येतात.
वायरलेस मोबाइल स्टाफ संबंधित इसमाला पोलिस ठाण्यात आणून ड्यूटी ऑफिसरच्या ताब्यात दिल्याची वेळ नमूद करून कंट्रोल रूम ला कळवतात आणि परवानगी घेऊन आपल्या नेहमीच्या पॉइंट वर निघून जातात.

दारू प्यालेल्या इसमाला कसलीही शुद्ध नसते. त्याला सरकारी इस्पितळात तपासणीसाठी रवाना करायचे असते. त्यासाठी मेमो तयार करण्यासाठी ड्यूटी ऑफिसर त्याला त्याचे नांव विचारतो. त्याला कसलीही जाणीव नसते . दारूच्या धुंदीत असलेला तो एकाही प्रश्नाचे उत्तर द्यायच्या अवस्थेत नसतो. बायकोच्या पायातील सेफ्टी पिनने बांधलेल्या पट्ट्यांच्या स्लिपर्स आणि घरात रात्रीसुद्धा मुलीच्या अंगावर असलेला शाळेचा युनिफॉर्म त्या घरातील ददात ठळकपणे उघड करतात. त्या लंकेच्या पार्वतीच्या चेहेऱ्यावर आपल्या आयुष्यात देवाने आणखी काय काय वाढून ठेवले आहे या विचाराने पूर्ण खचलेले शरणागत भाव असतात. लहान मुलं हाता खांद्यावर आहेत म्हणून ती रडत नाही इतकेच .

तिच्याकडून नवऱ्याचा तपशील घेऊन ऑफिसर मेमो बनवतो. ती भेदरलेली असते. कडेवरचा लहानगा आळीपाळीने भोवतालच्या गणवेशातील पोलिसांकडे आणि शुद्धीत नसलेल्या वडिलांकडे आणखीनच भेदरून पहात असतो. अकाली प्रौढत्वाचे भाव चेहेऱ्यावर बाळगून असलेली मुलगी आईचा पदर धरून उभी असते. तिथे असलेल्या बाकावर बसायला सांगितले तरी उभं राहून बरळणाऱ्या वडिलांकडे पाहून आई किंवा मुलगी बसत नाहीत. नवऱ्याचं नाव आणि पत्ता सांगण्यासाठी बायकोने तोंड उघडलं की तिचे पुढले दात गायब असल्याचे कळून येते. ती नक्की तिच्या यजमानांचीच मर्दुमकी . कारण त्याच्या तोंडून वाहणाऱ्या गालीप्रवाहात प्रामुख्याने तिचा आणि तिच्या माहेरच्यांचे उल्लेख सतत तरंगत असतात.

एकेकाळी चांगल्या कंपनी मधे नोकरीला असलेला , नावाजलेला डाय मेकर असलेला हा, कामगारांचा संप लांबल्यामुळे कंपनी बंद होऊन बेकार झाला आणि वाईट संगतीमुळे दारूच्या आहारी गेल्याचे त्याच्या बायको कडून कळते. त्याला सरकारी इस्पितळात नेण्यासाठी दोन हवालदार सज्ज होतात. याच्या शेजाऱ्याने याचा हा रोजचा तमाशा चालू असताना , त्रास कायमचा कमी होईल या आशेने १०० नंबर फिरवून पोलिस कंट्रोल रूमला कळविलेले असते. परंतु या पोलिस प्रकरणाकरीता बायकोच जबाबदार असल्याचा समज करून घेत तिच्याकडे खुनशी कटाक्ष टाकत नवरा तिच्या नावाने शिव्यांची बरसात करत असतो. पोलिसांनी नवऱ्याला अटक केली आहे इतके बायकोला कळते. पुढे काय ? या बाबत ती अनभिज्ञ असते.

त्याच्यावर कायदेशीर कारवाई होऊन तो गजाआड गेला की तिला घरी जायला सांगावे लागते. ” त्यांना कधी सोडणार?” असे ती विचारते . ” उद्या ” असे उत्तर मिळाले तरी ती ” सोडा की त्यांना आत्ता . शांत झाले असतील एव्हाना ” असं विनवते. खरं तर त्याची बडबड बंद झालेली असते आणि नशेतच तो लादीवर अंग टाकून झोपलेला असतो. मुलगी आईच्या पदराला धरून बावरलेल्या मोठ्या डोळ्याने इकडे तिकडे पहात असते. कडेवरचा मुलगा वडिलांना डोळ्यांनी शोधत असतो.

बायको मुलांना घेऊन निघते. मुलांना घेऊन पोलिस स्टेशनच्या बाहेर हेतूविना अशीच थांबते .रात्रीचे साडेअकरा वाजलेले असतात. त्या टोकाच्या चाळ वस्तीत जायला वाहन नसते. रिक्षा परवडणे शक्य नसते. थोड्या वेळात दुसऱ्या कामात व्यस्त असलेल्या ऑफिसरचे तिकडे लक्ष जाते. नाईट राऊंडला निघालेल्या ऑफिसरला, त्या तिघांना त्यांच्या घराच्या जवळपास सोडण्यासाठी तो सुचवतो. पोलिस जीप मधून ते तिन परावलंबी जीव घरी रवाना होतात.

ड्यूटी ऑफिसरच्या डोळ्यासमोरून घरातील कर्त्या पुरुषाच्या एका व्यसनामुळे आयुष्यातील आनंद गमावून बसलेले ते तीन हतबल चेहरे हलत नाहीत. उद्यासुद्धा या प्रकाराची पुनरावृत्ती होणार याची त्याला खात्री असते. पुन्हा तक्रार आलीच तर अशीच कारवाई करण्या पलीकडे आपण काही करू शकणार नाही असा विचार त्याच्या मनात येतो. तो हतबल असतो.

येताना दारूडा नवरा कुटुंबाच्या बरोबर नाही हे पाहून सुरुवातीला पोलिसांना कळविणारा शेजारी सुखावतो आणि स्वतःला शाबासकी देतो.

घरात असेल ते मुलांना खायला घालून ती त्यांना झोपवते आणि झालेल्या साऱ्या प्रकाराची मनात उजळणी करत रात्र जागवते. आजची पुनरावृत्ती होणाऱ्या येणाऱ्या उद्याच्या रात्रीचे चलतचित्र तिला दिसत असते. प्रकरण पोलिसांपर्यंत गेल्यावर झालेल्या सगळ्या प्रकारांना आणि मानहानीला जबाबदार धरून राग काढण्यासाठी सहजप्राप्य गोष्ट म्हणजे नेहेमीप्रमाणे तीच स्वतः असणार याची पुरेपूर कल्पना असल्याने नशिबाला दोष देत त्या लहानग्यांकडे पहात वेळ ढकलते.

इकडे या महाशयांची नशा सकाळपर्यंत उतरलेली असते. लॉक अपच्या जाळीतून , ड्यूटी ऑफिसरचे दर्शन झाले की आतूनच तो ओरडतो , ” ओ साहेब , सोडा मला . मी काय दारू पिणाऱ्यातला वाटलो काय ? काल मित्राबरोबर गेलो आणि चूक झाली. सोडा आता. बायकोपोरं असलेला माणूस आहे मी. ” कधी सुटतोय आणि कधी संध्याकाळ होते याची प्रतिक्षा तो करत असतो . पूर्वीच्या कंपनीतील मित्राने , दुसऱ्या कंपनीत नोकरी मिळ्याल्याबद्दल , आज पार्टी द्यायचे त्याला कबूल केलेले असते.
………………….

प्रसंग दोन …..
उच्चभ्रू परिसरातील नवश्रीमंत जोडपे पोलिस स्टेशनला येते. मॅडमचे हीऱ्याचे कानातले हरवलेले असतात.
” भाचीच्या लग्नात घालण्यासाठी बँक लॉकरमधून दोनच दिवसापूर्वी काढून आणले होते. इतर दगिन्यांबरोबर तेही लग्नात अंगावर होते. रात्री लग्न समारंभ आटोपल्यावर उशिरा घरी आलो आणि दागिने काढून कपाटात ठेवले. कानातले हीऱ्याचे डूल मात्र कानातच राहिल्याचे झोपताना समजले. ते ड्रेसिंग टेबलवर ठेवले. सकाळी मुलगा ट्रेकिंग साठी निघाला म्हणून डबा द्यायला मी उठले तेव्हा ते तिथे होते . सकाळी आमच्या कामवाल्या मावशी आल्या. भांडी करून , डस्टिंग करून गेल्या. मी दागिने पुन्हा बँक लॉकर मधे ठेवायला जायचे म्हणून आवरले आणि निघताना लक्षात आले की ड्रेसिंग टेबल वरील कानातले गायब झालेले आहेत . अगदी सगळीकडे शोधले . नाही सापडले. यांनाही कॉल केला. त्यांना त्याची काहीच कल्पना नव्हती. आम्हाला वाटतं त्या कामवाल्या बाईनेच उचलले असावेत . कारण तिच्याशिवाय आमच्या खेरीज ड्रेसिंग टेबल जवळ कोणीच गेलेलं नाही ”

” किती वर्ष कामाला आहे तुमच्याकडे ती बाई?”
” झाली आता चार साडेचार वर्ष ”
” या अगोदर काही गेलंय का घरातून ? ”
” नाही . पण मी फार पर्टीक्युलर आहे वस्तू जागच्या जागी ठेवण्यात. तसा वावच मिळाला नसेल .”
” तसं नव्हे हो ! चोरटी वृत्ती असेल तर किंमती वस्तूच नाही , पर्स मधील पैसे , घड्याळ अशा दुसऱ्या वस्तुही घरातून गायब होतात .यापूर्वी असे कधी झाले आहे का? ”
” नाही . परंतु ही फार मौल्यवान वस्तू होती ना! कोणालाही मोह पडेल अशी .”
” पुन्हा घरात शोधून पहा . नक्की सापडेल . एक आणखी प्रयत्न करून पहा ”
” अहो मी सांगतेय ना! सगळं शोधूनही नाही सापडले म्हणून तर शेवटी इथे यावं लागलं. आणि आमच्या कामवाल्या बाईंशिवाय दुसरं कोणी घरात आलेलच नाही . आणि एक सांगू का ? तिच्या मुलीचं लग्न जमतंय . त्यामुळे चणचण दूर करण्यासाठी मोह झाला असेल. ”
मॅडम खात्रीने बांधलेला अंदाज वर्तवतात.
” तुम्ही तिला ताब्यात घेऊन पोलिसी खाक्याने विचारा जरा ” यजमान सांगतात.
” अहो त्यासाठी तुमची तक्रार घ्यावी लागेल मला आणि गुन्हा दाखल करून त्यात त्या बाईला अटक करावी लागेल.”
” कुठे राहतात त्या कामवाल्या मावशी ? ”
” घर माहीत नाही . पण xxxx नगर झोपडपट्टी आहे तिकडे कुठेतरी राहतात . पण आत्ता या वेळी आमच्याच सोसायटीत सी विंग मधे तिसऱ्या मजल्यावर कुणाकडे तरी काम करतात , तिथे असतील .”

नाईलाजाने ड्यूटी ऑफिसर त्या मॅडमची चोरीची फिर्याद लिहून घ्यायला सुरुवात करतो. त्याच वेळी डीटेक्शन स्टाफचे एक हवालदार आणि महीला पोलिस यांना जीपने मॅडमच्या सोसायटी कडे त्या कामवाल्या बाईना आणण्यासाठी रवाना करतो. ज्या घरात त्या बाई काम करत असतात त्या घराकडे सिक्युरीटी वॉचमन पोलिसांना घेऊन जातो. त्या घराच्या मालकीण बाईंना पोलिसांच्या येण्याचे कारण समजावले जाते . पोलिस आपल्याला का न्यायला यावेत या कोड्यात त्या कामवाल्या मावशी थिजून जातात. नुकताच कामाला लागलेल्या मुलाबद्दल त्यांच्या मनात नाही नाही ते विचार येतात. त्या तिथल्या घर मालकीण बाईना मुलाला फोन लावायला सांगतात. आपल्या आईला कामावरून पोलिस घेऊन गेले असल्याचे त्याला कळते.

पोलिस स्टेशन मध्ये जीप पोहोचल्यावर , त्या सकाळी जिथे कामाला जात असतात तिथल्या मालकीण बाई ड्यूटी ऑफिसर समोर बसलेल्या त्यांना दिसतात. ” काय हो ताई ? काय झालं? ” असं त्यांनी विचारल्यावर , मॅडम ” हे पहा मावशी, घरातून माझे कानातले गायब झाले आहेत. सकाळी तुम्ही येऊन गेलात तो पर्यंत जागेवर होते. नंतर तिथून नाहीसे झाले. म्हणून आम्ही इथे तक्रार करायला आलो आहोत. आम्हाला काही प्रकरण वाढवण्याची इच्छा नाही. घेतले असलेत तर देऊन टाका. नाहीतर पोलिस आणि तुम्ही .” असं एका दमात सांगून टाकतात.

“अहो मी कशाला घेईन ते तुमचे कानातले. इतकी वर्ष इतक्या ठिकाणी कामं करते मी ! कधी कुणाच्या आठ आण्याला हात लावला नाही आणि माझ्यावर चोरीचा आळ घेता ? “.

बाई मटकन खालीच बसतात. बाईने कानातले चोरले नसल्याचे ड्यूटी ऑफिसर एका नजरेत ओळखतो. पण मॅडम ऐकायला तयार नसतात. या बाईं शिवाय दुसरं कोणी नेईलच कसं? या त्यांच्या अनुमानावर त्या ठाम असतात. ड्यूटी ऑफिसर महिला पोलिस हवालदारांच्या मदतीने त्या बाईना कोपऱ्यातील बाकावर बसवून शांत करतो. त्यांची वाचा गेल्यासारख्या त्या डोळे वहावत गप्प असतात.

नवरा गेल्यापासून दहा बारा वर्ष घरकाम करून त्यांनी मुलांना वाढवलेले असते. मोठी मुलगी . आईला घरकामात मदत करत बारावी झाल्यावर तिला गावाहून लग्नाची मागणी येते. एस टी मधे नोकरीला असलेला थोडीफार शेती राखून असलेला चांगला मुलगा जावई होतोय म्हटल्यावर होकार कळवला जातो. आता याच महिन्यात सोयरे येऊन जाणार असतात. मुलगा रात्रशाळेत जाऊन दहावी झालेला , आई ज्यां एका घरात काम करते त्यांच्या ऑफिस मधे शिपाई म्हणून नोकरी करत कॉलेज करणारा, थोड्याच वेळात मुलगा आणि त्याचा त्याच भागात राहणारा मामा पोलिस स्टेशन मधे पोहोचतात. आल्या आल्या मुलगा ” आई काय झालं ग ? ” विचारत आईजवळ जातो. डोळ्याला पदर लाऊन बसलेली आई काहीच बोलत नाही. एक जाणते हवालदार मुलाला आणि त्याच्या मामाला बाजूला घेऊन दाखल होत असलेल्या गुन्ह्याबद्दल थोडक्यात सांगतात. मुलगा रडू लागतो. तिथेही आई त्याला जवळ घेते.

मामा , मॅडमच्या यजमानांना आपली बहीण चोरी करणे शक्य नाही हे हर तऱ्हेने समजावण्याचा प्रयत्न करून पोलीस केस न करण्याविषयी हातापाया पडून विनवणी करत असतो. यजमान मख्ख असतात . हलाखीच्या परिस्थितीतही मुलांवर चांगले संस्कार घडवत काबाड कष्ट करून आपल्याला वाढवणारी आई कधीही चोरी करणे शक्य नाही हे जाणून असलेला मुलगा आईवर चोरीचा आळ घेणाऱ्या मॅडमकडे रागाने पहात असतो. “आम्ही गरीब म्हणून ही अशी वेळ आमच्यावर आणता ” हे शब्द अंगार होऊन त्याच्या डोळ्यातून आग आणि उद्वेगाचे अश्रू ओतत असतात.

” अजून किती वेळ लागणार आहे हे आटपायला ? ” . यजमान घड्याळाकडे पहात त्रयस्था सारखे ड्यूटी ऑफिसरला विचारतात.
त्या बाईं चोरी करणे शक्य नाही हे पुरेपूर जाणून असलेला ड्यूटी ऑफिसर ” पहा , जरा पुन्हा विचार करून ” असं निर्वाणीचं मॅडमना सांगतो. त्यावर ” छे हो ! दुसरं कोणी असूच शकत नाही ” असं सांगत दोघेही चोरीची फिर्याद करायचीच आहे असं ध्वनित करतात. नावासकट चोरीची तक्रार असल्याने गुन्हा नोंदवणे ड्यूटी ऑफिसरला भाग पडते. तो हतबल असतो.

फिर्यादीवर मॅडम सही करतात . जोडपे घरी निघून जाते. ड्यूटी ऑफिसर गुन्हा रजिस्टर मधे आवश्यक त्या नोंदी करतो. कंट्रोल रूम ला दाखल गुन्ह्याचा तपशील कळवतो. जड मनाने त्या बाईंचा अटक फॉर्म भरतो , महिला हवालदारा करवी अंगझडती पंचनामा , जबाब इ. सोपस्कार उरकतो आणि थोड्या वेळात नियमाप्रमाणे घरझडती पंचनामा करण्यासाठी बाईंच्या घराकडे निघतो.
मॅडम घरी पोहोचतात . थोड्या वेळात ट्रेकिंगला गेलेला त्यांचा मुलगा घरी परत येतो. त्याला चहा देत असताना मॅडम त्याच्या ट्रेकिंगचा वृत्तान्त ऐकता ऐकता दिवसभरातील घडामोडी आणि पोलिस ठाण्यात जाऊन आल्याचे सांगतात.

तो एकदम ओरडतो ” अग आई सकाळी निघताना तू डबा करत होतीस तेव्हा तुझ्या पर्स मधून सुटे पैसे घेण्यासाठी मी तुझ्या खोलीत गेलो. ड्रेसिंग टेबलवर तुझे ते हिऱ्याचे नवीन कानातले उघडेच पडलेले दिसले . म्हणून मी ते उचलून तुझ्या पर्स मध्ये टाकले. सांगायला विसरलो . मी तिकडून कॉल केला की सांगणार होतोच पण तिथे जंगलात रेंजच नव्हती.”
मॅडम घाईघाईत पर्स उघडतात. तीमधे असलेले कानातले पाहून हरखून जातात. वॉक साठी गेलेल्या यजमानांना फोन करून कानातले मिळाल्याचे कळवतात.

” ठीक आहे. मी आल्यावर पोलिसांना कळवू ” यजमान सांगतात. इकडे त्या बाईंच्या घरी झडती साठी पोलिस पोहोचलेले असतात. त्या छोट्याश्या खोलीच्या दरवाज्याशी बरीच गर्दी जमते. बाई आणि मुलांवर कारण नसताना शेजाऱ्यापाजाऱ्यांपासून आपली तोंडं लपवायची वेळ येते . मुलाचे एकदोन मित्र आत येऊन त्याला धीर देतात. इतके बायका पुरुष जमलेले. परंतु पंच म्हणून सही करायला कोणी तयार होत नाही. त्यात वेळ जातो . हे केव्हा संपतय असं त्या बाईला झालेलं असतं. घरझडतीत काही मिळत नाही . मिळणार नसतंच. पण नियमाने हे सगळं करणं भाग असतं. शेवटी तो सोपस्कार पूर्ण करून जीप बाईंना घेऊन पुन्हा पोलीस ठाण्यात येते.

काही वेळाने यजमान पोलिस ठाण्यात येतात. ड्यूटी ऑफिसरला कानातले मिळाल्याचं सांगतात. तो पर्यंत बाईंच्या अटकेचे सोपस्कार होऊन गेलेले असतात. उघड झालेल्या वस्तुस्थिती बाबत फिर्यादी मॅडमचा नवीन जबाब, महिलांना रात्री पोलिस ठाण्यात बोलावले जात नसल्याने , त्यांच्या घरी जाऊन घेतला जातो. केस ” सी ” फायनल वर्गात जाऊन तपास बंद होतो. बाईंना केसमधून डिस्चार्ज केले जाते. मात्र या अंकामुळे बाईंच्या कुटुंबाचे कधीही न भरून निघणारे नुकसान झालेले असते. चाळीमध्ये तिच्या अटकेची बातमी वाऱ्यासारखी पसरते. उद्या कोर्टात वकील उभा करायला लागेल म्हणून खर्चाच्या मदतीसाठी मामाने गावाकडे त्याच्या भावाला फोन केलेला असतो. मुलीची जिथे सोयरिक जमत होती ते स्थळ गावातीलच असल्याने त्यांच्याकडे वादळ उठते. त्यामुळे गावचा रस्ता बंद होतो .

बाई मॅडम कडे पुन्हा कामाला जाणे अशक्य असल्याने ते काम सुटते . महिन्याची आमदानी कमी होत असताना दुसरी कामं मिळणेही कठीण झालेले असते. चाळीतील सगळ्यांना बरेच दिवस पुरेल असा चघळायला विषय मिळालेला असतो. किती जणांची तोंडं बंद करणार ? जिवंतपणी बाई मरणयातना अनुभवत असते. कुणाच्या तरी बेफिकिरीमुळे आणि आपल्या आततायीपणामुळे होणाऱ्या विपरीत परिणामांबद्दल टोकाच्या अनास्थेच्या वृत्तीमुळे एक प्रामाणिक आणि काबाडकष्ट करून आकाराला येत असलेले कुटुंब असे उध्वस्त होते.

सुरुवाती पासून ड्यूटी ऑफिसरला याची कल्पना असते. परंतु कायद्याने आणि नियमांनी कर्तव्याशी बांधलेल्या त्याच्या अधिकारानाही मर्यादा असल्याने तो हतबल असतो.
——————
-अजित देशमुख,
(नि) अप्पर पोलीस उपायुक्त,
9892944007.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..