रुसवे फुगवे, तंटे बखेडे
हवे कशास लढाई झगडे
अतीतटीचे हे हेवेदावे
आत्यंतिक द्वेषाचा सोस कशाला? ।।
आभाळाच्या मुक्ततेला नाही बंध
देवाच्या मायेला ना बंधाचा गंध
भिंतीआडच्या कृत्रिम जगाचा
तुम्हाआम्हाला मग ध्यास कशाला ॥
जमिनीच्या हक्काच्या तुकड्याला
कुंपणात जोखण्याचे ध्येय आम्हाला
मुक्त हवा करुन कलुषित या
छपराखाली कोंडला श्वास कशाला ॥
आयुष्याची वरात ही रिकामहाती
घर भरण्याची मग आस कशाला
इवल्या मुठीत ना मावताना
मिळे ते साठण्याची हाव कशाला ।।
जे नाही ते दाखवण्याचा
हा खोटा ध्यास कशाला
जे नसतंच कधी आपलं
ते कुणा देण्याचा भास कशाला ।।
देवाच्या असीमतेला बंदिस्त गाभारा
माणसाच्या नग्नतेला वस्त्रांचा डोलारा
एकल्या प्रवासाला हा नात्यांचा पसारा
असतं ते झाकण्याचा अट्टाहास कशाला ॥
माणसाच्या मातीला हा वास एकला
वेगळेपणाचा वेडा आटापिटा कसला
जीवनाच्या क्षणभंगुर व्यर्थतेपुढे
जगण्याचा आकांत, हव्यास कशाला ।।
जन्मजन्मांतरीच्या किती त्या शपथा
दुष्मनी पिढ्यापिढ्यांची मिथ्या
परीक कुणा आसभास ना कसला
ना ही शाश्वतता पुढील क्षणाला ॥
एकमेकांच्या भावविश्वांना
जखडून मापण्याचे दंड कशाला
संपायचीच असतात जर सारी
बांधावी नाती उदंड कशाला ॥
तोटक्या आयुष्याच्या तुकड्यावर
उभारुन अहंतेच्या उंच हवेल्या
एकमेकांना तुच्छण्यासाठीचा
हा थाटमाट बडेजाव कशाला ।।
क्षणभंगुरतेला नजरेआड सारणाऱ्या
खोट्या साऱ्या समजूती कशाला
नश्वरतेला चिरंतन जपण्याचा
सत्याचा एवढा अपलाप कशाला ॥
जन्माचा आनंद, मृत्यूचा शोक कशाला
पुनःपुन्हा चक्राच्या त्या फेऱ्या कशाला
विरंगुळ्याच्या मृगजळाला सोडून
सत्याचा का नाही ध्यास आम्हाला ॥
– यतीन सामंत
Leave a Reply