आधी दुष्काळ मग पावसाचा कहर यामुळे भाजीपाला दुर्मिळ झाला. गृहिणींना कळेना की रोज शिजवायचे काय? असाच एका घरातला संवाद कानी पडला. आज तिसऱ्या दिवशीही तिने बटाट्याची भाजी आणि आमटी केली होती. त्याला बटाट्याची भाजी बिलकूल आवडत नसे. तिचा नाईलाज होता. तीन दिवस तीन वेगळ्या प्रकाराने तिने भाजी बनविली. हेतू एवढाच की त्याला चव बदलून मिळावी. तरीही तो रागावलाच .
“मी ऐकून घेतो म्हणून तू ही अति करायला लागली आहेस. आज तिसऱ्या दिवशीही बटाट्याचीच भाजी. तुला चांगले माहित आहे की मला बटाटा आवडत नाही. तरी तू मुद्दामच ही भाजी करते आहेस. माझा अंत पहाते आहेस.” असे बोलून तो रागातच जेवला.
ती समजावणीच्या सुरात म्हणाली “बाजारात भाजीच नाही. आधी दुष्काळ मग पाऊस. त्याने भाज्या बाजारात येईनाशा झाल्या आहेत. मी काय करु? तरी मी तीन दिवस वेगळ्या चवीची भाजी केली. एकदा का बाजारात भाजी आली की तुमचा प्रश्न सुटेल.”
तिचे बोलणे ऐकून तो संतापला. म्हणाला “सकाळी उठून स्टेशन जवळून भाजीवाल्यांकडून भाजी का आणत नाहीस?” ती म्हणाली “मी भाजी आणायला गेले तर तुमचा नाश्ता आणि डबा कोण करेल? मुलांना शाळेच्या बसमध्ये कोण सोडून येईल? ”
तो म्हणाला “मग मॉलमध्ये जाऊन भाजी आणत जा. मॉल तर संध्याकाळी उशीरपर्यंत उघडे असतात.” ती म्हणाली “मला ऑफिसमधून यायला उशीर होतो. संध्याकाळच्या जेवणाचे बघायचे असते. मुलांचा अभ्यास घ्यायचा असतो. मॉलमध्ये गेले तर यातले काहीच करायला जमणार नाही. तसे होऊन कसे चालेल? ”
तिच्या बोलण्याने तो अधिक संतापला. म्हणाला “जेवणे उरकून जात जा. मला हा सांगू नकोस.” ती दुखावलेली वाटली तरीही शांतपणे म्हणाली “असे असेल तर तुम्हीही मॉलमधून भाजी आणू शकता.” तो तिच्या अंगावर धावून गेला. तिच्याकडे तुच्छपणाने बघत तो म्हणाला “हे माझे काम नाही.”
ती आश्चर्याने त्याच्याकडे बघत म्हणाली “संसार आपल्या दोघांचा आहे. तुम्ही असे कसे म्हणू शकता? दोघांनी मिळून घर चालवायचे आहे. हे माझे काम नाही असे म्हणून कसे चालेल? ”
तिच्या बोलण्यावर काहीच उत्तर न देता तो घराबाहेर पडला. त्याच्या मनात संताप खदखदत होता. चार पावले चालल्यावर त्याला समोरुन शेजारचे काका येताना दिसले. त्यांच्या हातात एक अवजड पिशवी होती. त्यांना ती पेलत नव्हती तरीही ते सर्वशक्तीनिशी पिशवी उचलून आणत होते. तो त्यांच्याकडे धावला. म्हणाला “एवढी जड पिशवी कशाची आहे? तुम्ही एकटे ती का घेऊन येत आहात? मी आलो आहे. ती पिशवी माझ्याकडे द्या. तुमच्या वयाला हे ओझे पेलत नाही.” एवढे बोलून त्याने त्या काकांच्या हातातून त्यांची पिशवी घेतली. पिशवीमध्ये माती भरलेली होती.
त्याने मातीकडे पहात काकांना विचारले “एवढी माती कशाला आणली आहे? म्हणूनच तुमची पिशवी जड झाली.” काका खिन्न मनाने म्हणाले “पावसाने आपल्या सोसायटी समोरच्या रस्त्यावर किती खड्डे झाले आहेत. म्युनिसिपालटीला सांगूनही आपल्या तक्रारीची दखल घेतली जात नाही. गेल्यावर्षी असाच एका खड्ड्यात माझ्या बायकोचा जीव गेला. मी स्कूटरवरुन तिला घेऊन येत होतो. एक खड्डा समोर होता. तो चुकवायला गेलो तर दुसऱ्या बाजूने मोठी बस आली. बसला चुकवायला वळलो आणि थेट खड्ड्यात पडलो. बिचारी माझी बायको, मागे बसली होती. तिच्या ध्यानीमनीही नव्हते. बेसावध असल्याने ती जोरात पडली. तिथेच गतप्राण झाली.
आज मी एवढी माती आणली आहे कारण मीच ते खड्डे आता या मातीने बुजविणार आहे. मी जसा त्या अपघातामुळे एकटा पडलो तसे दुसरे कोणी पडायला नको.”
“हे काम तुमचे नाही. म्युनिसिपालटीला हे काम आपण करायला लावायचे.” तो म्हणाला. त्यावर क्षीण हसून काका म्हणाले “कुठले काम कोणाचे आहे हा विचार करायचा नाही. आपल्याला चांगले जगायचे आहे. त्यामुळे कुठलेही काम करुन जर आपल्याला इच्छीत सुख मिळणार असेल तर ते करायला काय हरकत आहे? ”
काही वेळापूर्वी बायकोबरोबर झालेल्या संवादाची त्याला आठवण आली. तो मनातून वरमला. काकांबरोबरा मुकाट्याने खड्डे भरायला लागला.
— नीला सत्यनारायण
अनघा प्रकाशनच्या मैत्र या लेखसंग्रहातील हा लेख. हे पुस्तक मार्च २०१७ मध्ये प्रकाशित झाले.
Leave a Reply