एक चव्हाण गेले आणि दुसरे चव्हाण आले. राज्याच्या राजकारणात किंवा समाजकारणात त्यामुळे काय स्थित्यंतर येईल? पृथ्वीराज चव्हाण राज्याची धुरा व्यवस्थित सांभाळू शकतील का? राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही गटबाजी उफाळून आली असून छगनराव भुजबळ यांचा काटा पक्षातील मराठा लॉबीने काढल्याने अंतर्गत धुसफूस वाढेल का ? ही स्थित्यंतरे काय दर्शवतात?
अशोक चव्हाण यांनी एक वर्ष आणि दोन दिवसांनंतर मुख्यमंत्रीपदाची सुत्रे सोडल्यावर पृथ्वीराज चव्हाण यांचेच नाव प्रामुख्याने घेतले जात होते. अशोकराव हे खरे तर पूर्णपणे राजकारणी नाहीत की प्रशासकही नाहीत. कोणी तरी लावलेल्या सापळ्यात ते अलगदपणे अडकले. यातच त्यांच्या अपरिपक्वतेच्या खुणा आहेत. आदर्श सोसायटी घोटाळा हा खरे तर महसूल मंत्री नारायण राणे यांनी लावलेला सापळा असू शकतो. परंतु आपल्या सार्या सासरच्या मंडळींच्या नावावर फ्लॅट घेण्याचा गाफीलपणा अशोकरावांनी कसा केला हा संशोधनाचा विषय ठरावा.
अशोकराव जाणार म्हटल्यावर सार्याच काँग्रेसजनांनी आपापले गॉडफादर सज्ज ठेवले होते. एक चव्हाण जाणार म्हटल्यावर त्यांच्या जागी कोण येणार हा चर्चेचा विषय होणे स्वाभाविक होते. या ही वेळेस महाराष्ट्रातील मराठा लॉबी प्रबळ ठरली. त्यांनी राज्यावरील आपली पकड कायम ठेवली. राष्ट्रवादीतील मराठा आणि इतर मागासवर्गीय लॉबी काँग्रेसला हानीकारक ठरू शकते याचा अनुभव काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी अनेकदा घेतला आहे. त्यामुळे राज्यातील सहकार व सामाजिक क्षेत्र ज्यांच्या बळावर चालते त्या मराठा लॉबीतील मुख्यमंत्री निवडण्याची दक्षता काँग्रेस पक्षश्रेष्ठी आणि पक्षाध्यक्षांच्या सल्लागारांनी घेतली. प्रश्न आहे तो पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री झाले म्हणून राज्याच्या राजकारणाला वेगळे वळण लागेल का याचा! किंबहुना, राज्यातील काँग्रेसजनांना एका साच्यात ठेवणे त्यांना जमेल का? वर्षभर मुख्यमंत्री म्हणून राहून अशोक चव्हाण यांना पक्षात किवा विरोधकांत मित्र मिळवता आले नाहीत. पृथ्वीराज चव्हाण यांना हे जमेल का ? अशोक चव्हाण यांनी कोणी गॉडफादर केला नव्हता म्हणून त्यांची गच्छंती लवकर झाली. पृथ्वीराज चव्हाण यांचा गॉड फादर कोण असा प्रश्र कोणालाही पडणे स्वाभाविक म्हणावे लागेल. राज्यातील राजकीय स्थित्यंतर एका वर्षातच येईल, याचा अंदाज मात्र भल्याभल्यांना आला नव्हता.
अनेकांना पृथ्वीराज चव्हाण कोण आहेत तेच माहित नाही. मुख्यमंत्री म्हणून त्यांचे नाव जाहीर झाल्यावर तर अनेकांच्या भुवयाही चढल्या. 17 मार्च 1946 रोजी इंदोरच्या मराठी कुटुंबात पृथ्वीराज चव्हाण यांचा जन्म झाला. अभियांत्रिकीतील पदवी घेतल्यावर कॅलिफोर्निया विद्यापीठातून एअरोस्पेस इंजिनिअरिंगमध्ये त्यांनी मास्टरी मिळवली. 1974 मध्ये भारतात परतण्यापूर्वी त्यांनी विमाने, पाणबुड्यांची संकल्पचित्रे तयार करण्याचे काम केले. राजीव गांधी यांच्याशी भेट झाल्यावर चव्हाण यांनी राजकारणात कारकीर्द करण्याचे निश्चित केले. त्यांनी राजकारणात झपाट्याने प्रगतीही केली. सर्वप्रथम 1991 मध्ये ते सातारा जिल्ह्यात कराड येथून लोकसभेवर निवडून गेले. 2002 मध्ये ते प्रथमच राज्यसभेत गेले आणि पंतप्रधान कार्यालयात राज्यमंत्री झाले. त्यांचे वडील डी.आर. चव्हाण पं. जवाहरलाल नेहरू यांच्या मंत्तिमंडळात कॅबिनेट मंत्री होते. म्हणजे चव्हाणांना राजकारणाचे बाळकडू जन्मत:च मिळाले आहे. त्यांची शरद पवारांशीही चांगलीच जवळीक झाली. काँग्रेसच्या महाराष्ट्रातील विभाजनानंतर पृथ्वीराज चव्हाण शरद पवार यांच्या तंबूत जातील हा सार्यांचा कयास मोडित निघाला आणि ते काँग्रेसमध्येच राहिले.
असाच प्रसंग त्यांच्या वडिलांच्या आयुष्यातही आला होता. 1969, 78 मध्ये काँग्रेसची शकले उडाली तेव्हा ते ही निष्ठेने इंदिरा गांधी यांच्या पाठीशी उभे होते. पंतप्रधान कार्यालयातील पंतप्रधानांचा खास विश्वासू म्हणून चव्हाण यांची नियुक्ती करून गांधी कुटुंबियांनी त्यांच्या खानदानी निष्ठेचा पुरस्कार चव्हाण यांना दिला होताच. आता तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री करून त्यांच्या निष्ठेबाबत कौतुकाची नवी थाप पाठीवर द
िली आहे. जम्मू-काश्मीर, हरियाणाचे प्रभारी म्हणून काँग्रेसने त्यांचा प्रभाव द्विगुणित केला आहे. त्यांनी तांत्रिक शिक्षण आणि जमीन व महसुली नोंदींसाठी भारतीय भाषात संगणकीकरणावर भर दिला होता. त्यावेळी ते राजीव गांधी यांच्या मंत्रिमंडळात होते. आपल्या फावल्या वेळेत क्रिकेट, टेनिस, टेबल टेनिस खेळून ते स्वत:ला रमवतात. थोडक्यात, अशोकराव काय किंवा पृथ्वीराज काय परंपरेने गांधी घराण्याचे समर्थक आहेत. अशोकरावांना जशी खिरापत देण्यात आली तशीच खिरापत पृथ्वीराज यांना देण्यात आली आहे काय, ते महाराष्ट्रासाठी काय करू शकतात याची उत्तरे काही काळात मिळतीलच. पृथ्वीराज चव्हाण आधुनिक विचारांचे महणून ओळखले जातात. त्यांचे खूप कौतुकही जाणकार करीत असतात. त्यांचे सकारात्मक स्वागतही बरेच काही सांगणारे आहे. नारायण राणे, पतंगराव कदमांसह अनेकांचे पतंग या नियुक्तीने कापले गेले आहेत.
काँग्रेसने केलेल्या खांदेपालटाच्या अनपेक्षित प्रतिक्रिया आघाडीचा सहकारी पक्ष राष्ट्रवादीतही उमटल्या. अजितदादा पवार समर्थकांचा मोठा गट बंडाच्याच पावित्र्यात उभा ठाकल्याचे चित्र निर्माण करण्यात पक्षातील मराठा लॉबी यशस्वी झाली. भुजबळ हे राष्ट्रवादीतील मराठा लॉबीला नकोसे आहेत, हे कधीच स्पष्ट झाले आहे. तेलगी प्रकरणी भुजबळांकडे संशयाने पाहिले गेले. त्यांचे गृह व उपमुख्यमंत्रीपद गेले होते. परंतु समता परिषदेच्या माध्यमातून राज्य आणि देशाच्या काही भागातील लक्षावधी मागासवर्गीयांना संघटित करण्याचे काम भुजबळांनी केले. राष्ट्रीय स्तरावर पक्षाचा विस्तार करण्यासाठी भुजबळांची गरज किती आहे, याची जाणीव शरदरावांना झाली आणि पुन्हा भुजबळांचे पक्षातील वर्चस्व नाखुषीने का होईना पण मान्य केल्याचा देखावा दादांसह सार्यांनाच करावा लागत होता. भुजबळांनी नाशकात उभी केलेली भुजबळ नॉले
ज सिटी सार्यांच्याच मत्सराचा विषय न ठरली तरच नवल होते. या गटबाजीला वैतागून भुजबळांनी एकदा राजकीय भूकंप कधीही होऊ शकतो, असे म्हणून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनाही हादरवले होते. पवारांनी चतुराईने आपणाकडे डिझास्टर मॅनेजमेंट असल्याचे विधान केले होते. भुजबळांच्या विरोधात वातावरण निर्मिर्ती होण्याची काही विशेष कारणे आहेत. शरदराव आपली कन्या सुप्रिया सुळे यांना पुढे करून अजितदादांवर अन्याय करत असल्याचा पश्चिम महाराष्ट्रातील दादा समर्थकांचा समज झाला आहे. दादा खरे तर मुख्यमंत्री पदाचे दावेदार, त्यांना उपमुख्यमंत्री पदही मिळू नये? घरातून दादांवर होणार्या अन्यायाचे परिमार्जन सध्या तरी शक्य नाही. किमान बाहेरच्यांकडून होणारा अन्याय तरी दूर करू, या भावनेतून भुजबळांना दूर करण्यात आले असावे. भुजबळांना एका वेळी किती आघाड्यांवर लढावे लागते, ते लक्षात घेतले तर कुणीही त्यांचे कौतुकच करेल.
चव्हाण गेले, चव्हाण आले. भुजबळ गेले, पवार आले. राज्याची स्थिती बदलणार आहे काय? दोन्ही चव्हाणांना निष्ठेचे पारितोषिक मिळाले तर भुजबळांना दादांच्या निष्ठावंतांनी दणका दिला. नेतृत्वातील खांदेपालट सकारात्मक बदल घडवणारा ठरेल काय, हा प्रश्न अनुत्तरीत आहे. सत्तेचे आणि अधिकारांचे सारे प्रवाह एका ठराविक चॅनेलने प्रवाहित होत असतात. आधीचे किंवा आताचे चव्हाण, भुजबळ अथवा पवार त्याला अपवाद कसे असतील?.
पूर्वीचीच आव्हाने कायम : रत्नाकर महाजन
ताज्या भ्रष्टाचार प्रकरणामुळे अशोक चव्हाणांनी राजीनामा दिल्यानंतर आता दोषींविरुध्द तातडीने कायदेशीर कारवाई करणे पृथ्वीराज चव्हाण यांना भाग आहे. शिवाय भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठीही काही खास उपाय करावे लागणार आहेत. मुख्य म्हणजे पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्त्वाखालील सरकारपुढे मागील सरकारपुढे असणारीच आव्हाने कायम आहेत. २००९ च्या निवडणुकीनंतर राज्यात सत्तारूढ झालेल्या काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीपुढे असणार्या आव्हानांचा या सरकारलाही सामना करावा लागणार आहे. त्या शिवाय पक्षांतर्गत सहकार्य आणि समन्वय वाढवण्यावर भर द्यावा लागणार आहे. नवे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची वैचारिक प्रगल्भता आणि सर्वांना बरोबर घेऊन जाण्याची वृत्ती लक्षात घेता ते सरकारपुढील विविध आव्हानांचा सामना करण्यात यशस्वी होतील अशी आशा आज तरी बाळगायला हरकत नाही.
केवळ व्यक्ती बदलली, बाकी तेच : गोविंद पानसरे
पृथ्वीराज चव्हाणांच्या निवडीनंतर मुख्यमंत्रीपदी एक व्यक्ती जाऊन दुसरी आली, बाकी फरक पडला नाही असे म्हणावे लागेल. कारण सत्ताधारी पक्ष तेच आहेत, या पक्षांची धोरणे तीच आहेत, मंत्रिमंडळातील सहकारीही तेच आहेत. मग फरक तो काय असा प्रश्न पडतो. अशा परिस्थितीत केवळ एक व्यक्ती बदलून काही साध्य होईल असे वाटत नाही. अशोक चव्हाण यांना ज्या प्रकरणातून राजीनामा द्यावा लागला त्यात ते एकटे सामील असतील असे नाही. त्यांचे इतर काही सहकारी, सरकारी अधिकारीयांचा या प्रकरणात सहभाग असणार आहे. कोणताही मंत्री किवा लोकप्रतिनिधी उच्चपदस्थ नोकरशाहीच्या सहभागाशिवाय भ्रष्टाचार करु शकत नाही हे उघड सत्य आहे. त्यामुळे आता आदर्श सोसायटी प्रकरणात कथित सहभाग असणार्यांवर नव्या मुख्यमंत्र्याकडून कोणती आणि कशी कारवाई केली जाते याकडे जनतेचे लक्ष असणार आहे. याशिवाय आगामी काळात जनतेचे प्रश्न अधिक तीव्र बनणार आहेत. शिवाय विकासाचा असमतोल कायम आहे. अशाच असमतोलातून स्वतंत्र विदर्भाची मागणी पुढे आली हे विसरता कामा नये. त्यामुळे हा असमतोल दूर करण्यासाठी नव्या मुख्यमंत्र्यांना तातडीने पावले टाकावी लागणार आहेत. राज्यात शिक्षणाचा मुद्दा महत्त्वाचा आहे. शिक्षणाबाबत आपल्या राज्याचा क्रमांक देशपातळीवर दहाच्याही खाली आहे. एकीकडे जिल्हा परिषदांच्या अर्थात गोरगरिबांच्या शाळा बंद पडत आहेत. त्याच वेळी खासगी शाळा जोरात सुरू आहेत. या परिस्थितीत शासकीय शाळांचे भवितव्य सुधारण्यासाठी कोणत्या योजना आखल्या जाणार हा खरा प्रश्न आहे. खरे तर पृथ्वीराजचव्हाण यांना प्रशासकीय कामकाजाचा चांगला अनुभव आहे. त्यांची प्रतिमाही चांगली आहे. त्यामुळे त्यांच्याकडून बर्याच अपेक्षा आहेत. त्या कशा पूर्ण होतात ते आता पहायचे.
— मनोज मनोहर
(अद्वैत फिचर्स)
Leave a Reply