हे टिपूर चांदणे,
सख्या तुला बोलावे,
आकाशातील घनमाला,
घराची तुला वाट दाखवे, –||१||
डोईवरचा चंद्रमा,
माझिया प्रियाला स्मरण देई,
एक चंद्र घरी वाट पाहे,
सारखा सूचित करत राही,–||2||
शांत नीरव वातावरणी,
बघ सजणा बोल घुमती,
विरहव्याकूळ तुझ्या प्रियेचे,
कानात कसे गुपित सांगती,||3||
भवतीचा काळोखही,
येण्याची तुझ्या वाट पाहे,
मिलन कल्पून मनाशी,
दोन जिवांची संगत देई, –||4||
सुगंधित रातराणी
मिलाफाचे गान गाई,
दरवळ आपुला पसरत,
शेज सुगंधित करत राही,–||5||
दाराचा उंबरा पहा,
वाट किती पाहतो,
तोच आधी प्रतीक्षेत,
तुझ्या सखीचे काम करतो,–||6||
सभोवार झाडे उभी,
डौलदार ती स्वागतां,
माना झुकवून वाट पाहती,
धनी कधी यायचे आता,–||7||
तुळशीजवळ पणती,
जीव धरून पाहे,
कितीही उशीर झाला तरी,
सखी सोबत करत राहे,–||8||
नादखुळा वाराही झेपावे,
बघ ना रे तुझ्यासाठी,
तू आल्याची खबर सांगे,
पुढे येऊन तुझ्या आधी,-!!||9||
हिमगौरी कर्वे.©
Leave a Reply