पावसाळा सगळ्यांच्या आवडतीचा ऋतू असला तरी या दिवसांमध्ये अनेक आरोग्याच्या समस्या उदभवतात. मान्सून सुरू होताच आरोग्या बाबतीत समस्या डोकं वर काढतात. त्यासाठी पावसाळा सुरू होण्यापूर्वीच आपण आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. पावसाच्या दुषित पाण्याने आजार पसरतात. त्याचप्रमाणे पावसाळ्यात आपली पचनक्रिया मंदावते, रोगप्रतिकारकशक्तीही कमी होते. अशा वेळेस आहाराचे योग्य नियोजन असायला हवे. पावसाळाच्या काळात डायरिया, कॉलरा, वाताचे विकार या पाण्यामुळे होणार्या आजारांबरोबरच सर्दी, खोकला यासारखे आजार जडतात. दूषित पाण्यामुळे कावीळ, लेप्टोस्पायरोसिस यांसारखेही विकार जडतात. मग आपणच आपली काळजी घेतली तर या आजारपणाचे प्रमाण काही प्रमाणात कमी करता येऊ शकते. या वातावरणात साथीचे रोग आणि ऍलर्जी याचे प्रमाण जास्त असते.
1) पावसाळ्यात सर्दी-खोकला कमी करण्यासाठी आहारात रोज ‘क’ आणि ‘अ’ जीवनसत्व तसेच प्रथिने असणे गरजेचे आहे. या गोष्टींचा आहारात समावेश असेल तर प्रतिकार शक्ती चांगली राहते आणि संसर्ग झाला तरीही त्याचे प्रमाण आणि तीव्रता कमी राहते. हीच प्रतिकारशक्ती चांगली राहण्यासाठी आहारात कॅल्शियम आणि लोहाचे प्रमाणही चांगले असणे गरजेचे आहे.
2) ताप, खोकला, सर्दी यासारखे छोटे-मोठे आजार जास्त करून पावसात भिजल्यामुळे होतात. अनेकदा ओले कपडे अंगावर राहिल्यामुळेही या आजाराला सामोरे जावे लागते. त्यामुळे शक्यतो पावसात जास्त वेळ भिजू नका. या ऋतूत डांसांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते त्यामुळे डेंग्यू, मलेरिया होण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून आपल्या घराला, आजूबाजूच्या परिसराला स्वच्छ ठेवा.
3) पावसाळा आला की अस्वच्छतेमुळे रोगराई झपाट्याने वाढते आणि बारीक-सारीक आजारांना निमंत्रण मिळते. यावर आळा घालण्यासाठी आजूबाजूच्या परिसरात कचरा, पाणी साचणार नाही, याची दक्षता घेणे गरजेचे असते. पावसाळ्यात स्वच्छता पाळणे अतिशय महत्वाचे आहे. परिसर स्वच्छ ठेवला पाहिजे. पाणी साचता कामा नये. साचलेलं पाणी डासांच्या वाढीसाठी अतिशय पोषक असल्याने डास वाढण्याची शक्यता असते. मुलांना खेळायला पाठवतानाही कुठे खेळतात यावर लक्ष असावे. कारण गवत, डबकी अशा ठिकाणी डास जास्त प्रमाणात असतात.
4) मलेरिया, डायरिया, हिपेटायटीस, कॉलरा आणि लेप्टेस्पायरोसिस या आजारांचा बचाव करण्यासाठी पावसाच्या पाण्यात जाऊ नये. पावसात भिजणे शक्यतो टाळावे. त्याचबरोबर पावसाच्या पाण्यातून बाहेरुन घरी आल्यावर साबणाने हातपाय स्वच्छ धुवावे. ओले कपडे बदलून कोरडे कपडे परिधान करावेत. तसेच एखाद्या वेळेस जखम झाली असल्यास प्रथम डेटॉलने स्वच्छ करुन घेणे तितकेच महत्त्वाचे आहे. त्याचप्रमाणे घराच्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ करावा. बाहेरील उघड्यावरील पदार्थ खाणे टाळा. घरातील अन्नपदार्थ झाकून ठेवा. जास्त दिवस पाणी साठवून ठेवू नका.
5) पावसाळ्यात बाहेरील अन्नपदार्थ, ज्यूस खाणे टाळावे. त्याचबरोबर रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्याकरता घरातील गरम अन्नपदार्थ, वरण – भात, पोळी – भाजी, फळे, सुका मेवा आदिंचे सेवन करावे. पावसाळ्यामध्ये आरोग्याबाबत जास्त दक्षता पाळणे गरजेचे आहे.पायांना इनफेक्शन व त्यामुळे होणा-या दुखापती टाळण्यासाठी पाय जास्त ओले रहाणार नाहीत याची काळजी घ्यावी. कारण पावसाळ्यामधील आर्द्रता,घाम व ओलावा बुरशी व सुक्ष्मजीवांच्या वाढीसाठी पोषक असतो.
6) पावसाळ्यापूर्वीच्या उन्हाळ्यामध्ये शरिरात कोरडेपणा आलेला असतो, शरिराची शक्ती न्यून झालेली असते. कडक उन्हानंतर वातावरणात अचानक पालट होऊन पावसामुळे गारठा निर्माण होतो. हवेतील आर्द्रताही वाढते. त्यामुळे शरिरातील वातदोष वाढतो. वातावरणात, विशेषतः वनस्पती, धान्ये, पाणी इत्यादी सर्वच ठिकाणी आम्लता वाढत असल्याने पित्त साचण्याकडे शरिराचा कल असतो. या दिवसांत पचनशक्तीही घटते. भूक मंदावल्यामुळे अपचनाचे विकार होतात. पावसाच्या पाण्यासह धूळ, कचरा वाहून आल्याने पाणी दूषित होते आणि तेही रोगनिर्मितीस कारण ठरते. या सर्व घडामोडींमुळे वाताचे विकार, उदा. संधीवात, आमवात यांसह जुलाब, अजीर्ण इत्यादी अपचनजन्य विकार बळावतात. म्हणूनंच आपण पावसाळ्यात विशेष घ्यावी.
— संकेत रमेश प्रसादे
Leave a Reply