सर विमानात बसले. दिवस बराच हेक्टिक होता. उद्यापासून दिल्लीचे त्याहीपेक्षा हेक्टिक वेळापत्रक सुरु होणार होते. नव्यानेच सुरु झालेल्या बी -स्कूल ते संचालक म्हणून नुक्तेच रुजू झाले होते. पहिल्या बॅचमधील विद्यार्थ्यांच्या प्लेसमेंटचे आव्हान त्यांच्या नजरेसमोर होते. त्यावरच पुढील वर्षाचे प्रवेश आणि बी स्कूलची पायाभरणी होणार होती. उद्यापासून आठ दिवस दिल्ली आणि परिसरातील सुमारे १०० कंपन्यांच्या एच आर प्रमुखांबरोबर भेटी ठरल्या होत्या. त्यांना भेटून प्लेसमेंटचे निमंत्रण द्यायचे होते. दिवसाला १५०-२०० कि मी प्रवास आणि अक्षरशः दिल्लीच्या सगळ्या भागांमध्ये पायाला भिंगरी लावून फिरायचे होते. या विचारात त्यांचे डोळे कधी मिटले त्यांनाच कळले नाही.
दुसऱ्या दिवशी पहाडगंजच्या त्यांच्या हॉटेल रूममधील फोनची बेल वाजली तेव्हा सकाळचे सात वाजले होते.
–xx–
राधा मोहन रात्री गाडीवर मित्राच्या रूमवर अभ्यासाला निघाला. लवकरच घरी चेन्नईला सुट्टीसाठी जायचे होते. आई -वडील वाट पाहात होते. एकुलता एक मुलगा घर सोडून पहिल्यांदाच पुण्याला एम बी ए साठी गेलाय याची त्यांना काळजी होतीच. दोघेही निरक्षर ,छोटासा शेतीचा तुकडा होता. राधा मोहनच्या शिक्षणासाठी बँकेचे कर्ज काढले होते. यंदा एम बी ए झाला की त्याला चांगली नोकरी मिळेल. कर्ज फेडून तो स्थिरस्थावर झाला की घरची परिस्थिती बदलायला तो कितीसा उशीर? राधा मोहनची स्वप्ने आई -वडिलांच्या स्वप्नांपेक्षा वेगळी नव्हती. अभ्यास आटोपून तो रात्री तीनच्या सुमारास गाडीवर निघाला -मित्रांच्या आग्रहाकडे दुर्लक्ष करून ! वाटेतल्या वाळूच्या ढिगाकडे त्याचे लक्ष नसावे. वेगातील गाडी जोरात घसरली, तोल जाऊन तो फेकला गेला आणि डोक्यावर आघात झाल्याचा त्याला भास झाला. पुढचे त्याला काही कळलेच नाही. आणि कधीच कळले नाही.
–xx–
कॅप्टन सुभाष गाढ झोपेत असताना त्यांचा फोन खणखणला. कॅप्टन त्या बी -स्कूलचे डेप्युटी डायरेक्टर होते. सरांनी झोपेतच फोन घेतला.
” सर, मी भरत बोलतोय. सॉरी टू डिस्टर्ब यू !”
“क्या हुआ भरत ?”
“सर, आपल्या राधा मोहनला अपघात झालाय. ”
“व्हॉट ?” सुभाष किंचाळले.
“होय सर. तो इथे एका वाळूच्या ढिगाऱ्यावर बेहोष पडलाय. अपघात केव्हा झाला कळले नाही. आत्ता आम्हाला एक फोन आला आणि आम्ही इथे आलोय. ”
“थांबा तिथेच , मी आलोच.”
सुभाष अपघातस्थळी आले ,तेव्हा तिथे बऱ्यापैकी गर्दी जमली होती. सुभाषना हेड इन्जुरी बघून परिस्थितीचे गांभीर्य लक्षात आले. त्यांनी तात्काळ ऍम्ब्युलन्स मागवली.
राधा मोहनला सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले. डॉक्टरने प्राथमिक तपासून सरळ आयसीयूत दाखल केले. राधा मोहनवर लगेच ब्रेन सर्जरी करावी लागणार होती. सुभाषने निर्णयासाठी संचालकांना फोन लावला तेव्हा सात वाजले होते.
–xx–
” सर, हे सगळं असं घडलं आहे.” सुभाषने सरांना ब्रिफ केलं. सर क्षणभर विचारात पडले. राधामोहनच्या पालकांना कळविणे आवश्यक होते. खर्च , हाती असलेला वेळ, सर्जरीतील जोखीम साऱ्यांचा विचार करून निर्णय द्यायचा होता. सरांना त्याही परिस्थितीत हसू आलं. डिसिजन -मेकिंग असंच वर्गात मुलांना शिकवतो आपण ! आता वेळ येऊन ठेपलीय तर—-
” सुभाष मी आता दिल्लीतील सगळ्या अँपॉईंटमेंट्स रद्द करून पुण्याला येण्यात काही अर्थ नाही. तुम्ही पुण्यातील परिस्थिती सांभाळा. सर्जरीला कन्सेंट द्या. त्याच्या पालकांना पुण्याला बोलावून घ्या. चेअरमन साहेबांना कल्पना देऊन मी खर्चाची तजवीज करतो.”
सरांनी पटापट निर्णय दिले. ही सरांची स्टाईल होती.
–xx–
पुढील आठ दिवस सरांची अनेक आघाड्यांवर लढाई सुरु होती. दिल्लीतील भेटी, राधा मोहनचा फॉलो अप, विद्यार्थ्यांना धीर देणे, अपेक्षेप्रमाणे कोलमडलेल्या राधा मोहनच्या पालकांना सावरणे, डॉक्टरांशी सल्ला -मसलत !
आनंदाची बाब एकच होती – राधा मोहनचे ऑपरेशन यशस्वी झाले होते. खर्चाचा आकडा एव्हाना दीड लाखाच्या वर गेला होता. ती बाजू चेअरमन साहेबांनी भक्कम सांभाळली होती. विदयार्थ्यांनीही वर्गणी गोळा केली होती. इंस्टीट्युटच्या स्टाफने एक दिवसाच्या पगारकपातीला मान्यता दिली होती. अभ्यासक्रमातील संघभावना प्रत्यक्षात उतरली होती. समस्या हाताळणीचे धडे विद्यार्थी गिरवत होते.
ठरलेली सारी कामे आटोपली. सरांच्या नजरेसमोर आता पुणे तरळत होते.
—xx—
दुसऱ्या दिवशी सकाळी पुण्यात आल्या आल्या सर दवाखान्यात पोहोचले. सरांना पाहून राधा मोहनच्या आईचा बांध फुटला. सरांनी त्यांचे कसेबसे सांत्वन केले आणि डॉक्टरांची केबिन गाठली.
डॉक्टर गंभीर झाले होते. गेल्या आठ दिवसांमध्ये सतत फोनवर बोलून त्यांच्यात एक बंध निर्माण झाला असला तरी प्रत्यक्ष भेट आता झाली होती.
“सर, काही निश्चित सांगता येणार नाही. मुळात अपघात ,त्यात मेंदूला धक्का बसलेला ! कितीवेळ तो रस्त्यावर बेशुद्ध पडला होता कल्पना नाही. कदाचित त्याला लवकर दाखल केलं असतं तर काही शक्य होतं. आता फक्त तो शुद्धीवर येण्याची वाट पाहणं, एवढंच आपल्या हाती आहे. तोपर्यंत फिंगर्स क्रॉसड !”
“पण शुद्धीवर आल्यावर तो ठीक होईल ना ?”
” गॉड नोज ! ” डॉक्टरांनी आकाशाकडे हात दाखविला.
“कदाचित तो ठीक होईल. कदाचित त्याला जन्मभर केविलवाण्या अवस्थेत राहावे लागेल. हा शेवटी मेंदूचा मामला आहे. ऑपरेशन यशस्वी झाले असले तरी आतमध्ये कितपत दुखापत झाली असेल याचा अंदाज नाही. त्यापेक्षा गेला तर सुटेल आणि त्याच्या घरच्यांचीही सुटका होईल.”
देवाने डॉक्टरांचं ऐकलं. तीन दिवसांनी सरांच्या घरी रात्री फोनवर ती बातमी आली.
आता पोलीस कारवाई -अपघाती मृत्यू म्हणून पोस्ट मार्टेम ! तो एक सोपस्कार पार पडला.
सकाळी सगळे स्मशानभूमीत. संस्थाप्रमुखाला काय काय जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात !
कॅप्टन सुभाष सरांकडे आले –
“सर काही बोलाल कां या प्रसंगी ?”
सरांनी सुन्नपणे मान डोलावली . काय बोलायचं असतं अशा प्रसंगी ?
राधा मोहनचे वडील पुढे झाले. भावनातिरेकाने ते थरथर कापत होते. दोन विद्यार्थ्यांनी त्यांना आधार दिला. सरांना त्यांनी बोलण्याची परवानगी मागितली.
दोन्ही हात जोडून भिजलेल्या डोळ्यांनी ते हळू आवाजात बोलू लागले –
” मुलांनो, मी माझा मुलगा गमावलाय. तुम्ही कृपया हेल्मेट वापरा दुचाकी चालवताना ! तुमच्या पालकांवर अशी पाळी येऊ नये हीच ईश्वराकडे प्रार्थना करतो.”
— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
Leave a Reply